अजूनकाही
कोणत्याही चित्रपटातील प्रेमकथेचा बाज ठरलेला असतो. नायक-नायिकांचं प्रेम, त्याला असलेला आई-वडिलांचा, प्रसंगी समाजाचा विरोध. आपलं प्रेम विशुद्ध आहे, हे सिद्ध करण्यासाठी नायक-नायिकांनी केलेला संघर्ष किंवा प्रसंगी दिलेलं बलिदान, हे सारं ठराविक साच्यातील प्रेमप्रकरण मोठ्या पडद्यावर अनेकदा पाहायला मिळतं. परंतु या साऱ्या गोष्टी वर्ज्य करूनही एखादी चांगली प्रेमकथा मोठ्या पडद्यावर साकारू शकते? ‘असेही एकदा व्हावे’ या नवीन मराठी चित्रपटात अशीच एक अनोखी प्रेमकथा पाहायला मिळते. मनापासून केलेलं प्रेम हे कोणत्याही शारीरिक व्यंगावर सहज मात करू शकतं, असंच जणू या प्रेमकथेतून सुचवण्यात आलं आहे.
या चित्रपटामध्ये पाहायला मिळते, ती एका उद्योगपतीची आणि एफएम चॅनेलवर ‘आरजे’ म्हणून कार्यरत असलेल्या एका उच्चभ्रू तरुणीची अनोखी प्रेमकथा. तरुण उद्योगपती सिद्धार्थ हा मसाला बनवणाऱ्या कंपनीचा मालक असतो. आपली बहीण रेवतीच्या मदतीनं त्यानं आपल्या कंपनीची भरभराट केलेली असते. मात्र सिद्धार्थ अंध असतो. असं असलं तरी त्याला कोणाच्याही सहानुभूतीचा भयंकर तिटकारा असतो. त्यामुळे आपलं अंधत्व लोकांपासून लपवण्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो.
‘आर जे’ किरणचा आवाज त्याला खूप आवडत असतो. एकदा कंपनीच्या प्रमोशननिमित्त होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सिद्धार्थ-किरणची ओळख होते. किरण त्याच्या व्यक्तिमत्त्वावर भाळते, मात्र सिद्धार्थ अंध आहे, हे तिला पहिल्या काही भेटीत कळत नाही. एक बेसावध क्षणी सिद्धार्थ अंध असल्याचं तिला कळतं. तेव्हा आपलं अंधत्व तिला कळल्यामुळे तिच्या सहानुभूतीचं ओझं आपल्याला वागवावं लागणार, या कल्पनेनं सिद्धार्थ तिचा तिटकारा करू लागतो.
चित्रपटाच्या कथेच्या सुरुवातीचा बराचसा भाग नायकाच्या मसाला कंपनीच्या ब्रॅण्डच्या प्रमोशनासाठी खर्ची घातला आहे. तसंच नायिका ‘आरजे’ असल्यामुळे रेडिओवरील कार्यक्रमही ‘ऐकवण्या’त आले आहेत. (‘आरजे’च्या निवेदनात हिंदी शब्द हवेतच का?) शिवाय सुरुवातीच्या प्रसंगात अंध नायक इतका सराईतपणे वावरला आहे की, तो अंध आहे की नाही इतपत शंका यावी. (काही प्रसंगात तो आंधळ्याचं नाटक करत आहे की असाही भास होता.) त्यामुळे कथेची गाडी रुळावर यायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे चित्रपटाचा पूर्वार्ध कंटाळवाणा झाला आहे. मात्र उत्तरार्धात कथेनं चांगली पकड घेतली आहे. नायकाचं अंधत्व कळल्यामुळे नायिकेची होणारी घालमेल आणि आपलं अंधत्व नायिकेला (बाहेरच्या जगाला) कळल्यामुळे नायकाची होणारी तडफड, हा कथेचा मुख्य गाभा चांगला प्रवाही बनला आहे. शिवाय ‘नातं निर्माण करायचं म्हणजे जबाबदारी आलीच’ यासारख्या नेटक्या संवादामुळे तो चांगला प्रभावी झाला आहे.
ही प्रेमकथा काव्यमय करण्यासाठी नायक कवी तसंच गिटारवादक दाखवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या ओघानं चित्रपटात गाणी आलीच. अवधून गुप्ते आणि अद्वैत पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी श्रवणीय आणि कथेला पूरक ठरली आहेत. नायिका किरण ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे तिच्या लग्नाबद्दल त्यांच्या काही अपेक्षा असणं साहजिक आहे. मात्र तिच्या आई-वडिलांच्या परस्पर संबंधांमध्ये काही तरी समस्या असल्याचा उल्लेख संवादातून वारंवार येतो, मात्र त्याचा उलगडा स्पष्ट होत नाही. हे गूढ कायम का ठेवण्यात आलं, याचं उत्तर मिळत नाही.
सिद्धार्थची बहीण असलेली रेवती ही या चित्रपटातील एक प्रमुख व्यक्तिरेखा. रेवतीची ही भूमिका शर्वणी पिल्लेनं अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. ‘आरजे’ किरणच्या भूमिकेत तेजश्री प्रधाननं सुंदर दिसण्याबरोबरच अभिनयातही बाजी मारली आहे. अंध नायकाची भूमिका साकारताना मात्र उमेश कामत जरा कमी पडला असल्याचं जाणवतं. अजित भुरे व कविता लाड (किरणचे आई-वडील) चिराग पाटील, निखिल राजशिर्के यांच्याही भूमिका चांगल्या वठल्या आहेत.
दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांची पडद्यावरची ही अनोखी प्रेमकथा एक नेत्रसुखद अनुभव ठरला आहे. या प्रेमकहाणीला नंतर कशा स्वरूपाचं वळण लागतं आणि त्यांची ही प्रेमकहाणी यशस्वी होते की नाही, यासाठी हा चित्रपट पडद्यावर पाहायला हवा.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment