अजित भुरे : जागरूक नाट्यनिर्माता
कला-संस्कृती - ‘किमयागार’ कलाकार
प्रा. कमलाकर सोनटक्के
  • अजित भुरे
  • Sun , 01 April 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti किमयागार कलाकार कमलाकर सोनटक्के Kamlakar Sontakke अजित भुरे Ajit Bhure

अजित भुरेची व्यावसायिक रंगभूमीवरची पहिली दोन नाटकं १९८६ आणि १९८७सालची. त्यावेळी ती दोन्ही बरी चालली. ‘मुंबई मुंबई’चे १२५ तर ‘आपलं बुवा असं आहे’चे १००च्या आसपास प्रयोग झाले. ‘आपलं बुवा असं आहे’ हे त्याचं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक १९८६ च्या सुमारास आलं होतं. हे नाटक अजितनं वयाच्या २४व्या वर्षी निर्माता म्हणून रंगमंचावर आणलं होतं. पुढे २५व्या वर्षी अजितनं ‘मुंबई मुंबई’ या नाटकाची निर्मिती केली. मराठी रंगभूमीवर तेच ते भावनिक, वरकरणी वास्तववादी त्याला करायचं नव्हतं. म्हणून आग्रहानं माईमच्या अंगानं जाणारं हे नाटक त्यानं केलं. हा एक धाडसी प्रयोग होता. त्यानंतर ‘आपलं बुवा असं आहे’ या नाटकाची त्यानं पुनर्निर्मिती केली. यात त्यावेळी रीमा लागू, रविंद्र मंकणी, विवेक लागू ही मंडळी त्यानं घेतली होती. प्रकाश बुद्धिसागर या नव्या दमाच्या दिग्दर्शकानं हे नाटक बसवलं होतं.

पण उत्तम चालण्याची आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्याची शक्यता असलेली ही दोन्ही नाटकं नाइलाजास्तव त्याला बंद करावी लागली. परिणामी नफ्या-तोट्याची गणितं जुळवून नवीन नाटक बसवण्याची अजितची उभारी कमी झाली आणि पुढील काही वर्षं मग अजित व्यावसायिक नाट्यनिर्मितीपासून ठरवून बाजूला झाला.

त्यानंतर अजितनं आपल्या व्यक्तिमत्त्वात अंगभूत असलेल्या अन्य क्षमतांचा वापर केला. त्याला भारदस्त आवाजी देणगी लाभली आहे. त्यावर परिवार आणि परिसराचे संस्कार, शिवाय नाट्यप्रशिक्षणाद्वारे त्यावर त्यानं डोळस मेहनत घेतली होती. तसंच त्याचं अतिशय लाघवी व्यक्तिमत्त्व. या गुणांच्या बळावर त्यानं जाहिरात क्षेत्रात डबिंग आर्टिस्ट म्हणून भरपूर काम केलं. जाहिरात क्षेत्रातला तो आघाडीचा कलाकार म्हणून खऱ्या अर्थानं गाजत राहिला, आजही गाजत आहे. लता मंगेशकरांपासून तो विजया मेहता यांच्यापर्यंत आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन ही सारी मुशाफिरी अजित हुकमतीनं, आपल्या अटींवर चोख पद्धतीनं करत आला आहे.

नाट्यनिर्मिती

अजितनं २००४ साली पुन्हा नव्या जोमानं व्यावसायिक नाटकांची निर्मिती सुरू केली. त्याच्या ‘काटकोन त्रिकोण’ या पहिल्याच नाटकाचं प्रेक्षक, समीक्षकांनी कौतुक केलं. विवेक बेळे लिखित ‘काटकोन त्रिकोण’ अजितकडे आलं ते गोड अपघातासारखं. हे नाटक प्रायोगिक स्तरावर पुण्याला सादर झालं होतं. ते लोक चाकोरीतल्यापेक्षा एका वेगळ्या निर्मात्याच्या शोधात होते. या नाटकात मोहन आगाशे या नाटकात महत्त्वाची भूमिका करत होते. अशा परिस्थितीत लेखक विवेक बेळे अजितकडे आले. आणि २५ प्रयोगानंतर हे नाटक व्यावसायिक स्वरूपात अजितनं आणलं. ते करताना अजितनं त्याचा संपूर्ण बाज बदलला. नेपथ्य नव्यानं केलं. वेशभूषा बदलली. थोडंफार संगीत बदललं. मात्र कलावंत सक्षम असल्यानं तेच ठेवले. नाटकाचा आघात बदलला. विशेषत: मोहन आगाशेंची अतिशय सूक्ष्म हालचाली असलेली दृश्यं नेपथ्याच्या शेवटच्या अंगाला बांधली. काटकोर प्रकाशयोजनेनं आणि ध्वनिसंकेतांनी ती अधिक गहिरी केली. दृश्यात गतिमानता आणण्यासाठी बाकीच्या दोन पात्रांच्या उलटतपासणीत हालचालींचा तीव्र गोफ आणि त्यांच्या आजूबाजूला कोळ्याचा जाळ्याचा आकृतीबंध. जणू उलटतपासणी करणारा प्रश्नाचं जंजाळ उभं करून गोफ गुंफतोय.

या नाटकाच्या लेखनातील वेगळी, बुद्धिनिष्ठ मांडणी,, तार्किक गुंतागुंत वेगळी असल्यानं काही हितचिंतकांनी अजितला सुरुवातीला या नाटकापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला होता. पण त्याचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथं प्रभावी ठरला.

हेच नाटक परेश रावळ यांनी गुजराती रंगभूमीवर त्यांच्या लोकाभिमुख पद्धतीनं साकार केलं.

‘नामदेव म्हणे’ या नाटकाचा एक किस्सा मुद्दाम सांगण्यासारखा आहे. या नाटकात अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत होता. शेवटच्या स्वगतात तो चक्क प्रेक्षागृहात उतरून चालत जातो असं दाखवलं होतं. याचं कारण या स्वगतात मराठी माणसाची जी अधोगती झाली आहे, तिच्यासाठी तोच कसा जबाबदार आहे, हे तो पोटतिडिकीनं सांगतो. या नाटकाच्या रंगीत तालमीला आलेल्या काही निर्मात्यांनी व्यावसायिक नाटकाचा तिकीट काढून आलेला प्रेक्षक हे असं काही मुळीच स्वीकारणार नाही असं सांगितलं. त्या रात्री अजित झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्यानं निर्मात्यासोबत करार केला की, प्रेक्षकात जाऊन विलिन होण्याची क्लृप्ती आपण पाच प्रयोगात वापरून बघू. ती प्रेक्षकांना नाही रुचली, तर काढून टाकू. पण आश्चर्य म्हणजे प्रेक्षकांना अतुलचं त्यांच्यात मिसळून जाणं खूप भावलं.

‘सारखं छातीत दुखतंय’ हे नाटक विश्राम बेडेकरांच्या ‘वाजे पाऊल आपले’ या नाटकावर बेतलेलं होतं. (तो ‘सेंड मी नो फ्लॉवर्स’ या मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद आहे.) लेखक संजय मोने, दिग्दर्शक विजय केंकरे आणि निर्माता अजित भुरे अशी टीम होती. अशोक सराफ मध्यवर्ती भूमिकेत होता. हे नाटक खूप लोकांना आवडलं, चांगलं चाललं. त्याचे जवळपास २७५ प्रयोग झाले. या नाटकाचा प्रिमिअर शो सियाटेलला बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात झाला.

‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या नाटकाचा जीव आणि घटना तशी खूप लहान. चाळीशी पार केलेल्या स्त्री-पुरुषांच्या जीवनात घडणाऱ्या बदलांचे पॅरामीटर्स वेगळे असतात. या वयातच तुम्हाला ब्लडप्रेशर चेक करता येतं, शुगर चेक करता येते. पण मेंदूत नेमकं काय चाललंय हे हेरण्याचं कुठलंही पॅरामीटर उपलब्ध नाही. या मानसिक गोंधळामुळे ते ‘चाळीशी’तले चोर
ठरतात.

‘अलीबाबा…’ या नाटकानंतर अजितनं ठरवून टाकलं होतं की, आता किमान वर्षभर तरी नव्या नाटकाचा विचार करायचा नाही. पण शिल्पा शिवलकर लिखित ‘सेल्फी’ हे नाटक त्याच्याकडे आलं आणि त्यानं आपला निर्णय बदलून हे नाटक करायचं ठरवलं. नाटक उत्तम होतं. सुकन्या कुलकर्णी, सोनाली पंडित, ऋतुजा देशमुख, शिल्पा शिवलकर आणि पूर्वा गोखले या पाचही अभिनेत्रींचा अभिनय उत्तम होता. पण सुरुवातीच्या २०-२५ प्रयोगांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. नाटकाच्या जाहिरातींचा खर्च जीवघेणा असतो. यातून मार्ग काढण्यासाठी ‘सेल्फी’चं फेसबुक पेज तयार करण्यात आलं. त्यावर वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज केल्या गेल्या. त्यानंतर नाटकावर चर्चा होऊ लागली. या नाटकाचे अमेरिकेतही आठ प्रयोग झाले.

‘सेल्फी’च्या निर्मितीनंतर मात्र अजून तरी अजितनं दुसऱ्या कुठल्या नाटकाची निर्मिती केलेली नाही.

दृष्टिकोन

अजितची अशी ठाम श्रद्धा आहे की, व्हाईसिंग आणि डबिंग या क्षेत्रात आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळताहेत. हे आपल्याला रंगभूमीच्या अभ्यासातूनच मिळालेलं आहे. त्यामुळे या क्षेत्राचं ऋण फेडणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते फेडण्याचा रास्त मार्ग म्हणजे निर्दोष नाटकं रंगभूमीवर आणणं. त्यांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचवणं. या भावनेतून अजितनं नाट्यनिर्मिती करण्याचा घाट घातला. आपल्या क्षेत्राचं ऋण फेडण्याची अजितची ही प्रामाणिक वृत्ती अन्य निर्मात्यांपेक्षा वेगळं स्थान निर्माण करणारी आहे.

ही भूमिका अजितच्या जीवनविषयक दृष्टीकोनावरही प्रकाश टाकणारी वाटते. त्याच्या मते फार काय होईल? या अशा नाटकांवर झालेला निर्मिती खर्च भरून निघणार नाही. त्यात थोडाफार आर्थिक तोटा सहन करावा लागेल. पण म्हणून काय झालं? या अशा वेगळ्या धाटणीच्या प्रयोगातून घेतलेल्या आनंदाचं मोल त्याला मोठं वाटतं. त्याच्या मते आर्थिक नुकसान ही खूप छोटी बाब आहे. या नाटकांच्या निमित्तानं जी २५ माणसं आपण जोडतो, हे महत्त्वाचं आहे. ही अशी भावना जागृत ठेवणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं या व्यवसायात उठून दिसणारं आहे. केवळ पडद्यामागचेच नाही तर पडद्यापुढचे कलावंत यांना मिळणारा आनंद हा त्याच्या दृष्टीनं फार मोठा आणि मोलाचा आहे.

अजित केवळ पैसा कमवण्यासाठी नाट्यनिर्मिती करत नाही. तोटा सहन केल्याचं दु:ख आणि ‘काटकोन त्रिकोण’सारखं नाटक निर्माण केल्याचा आनंद, त्यातून मिळालेलं नाव हे त्याच्या दृष्टीनं अधिक मोलाचं आहे. चांगल्या कलाकृतीमुळे आपण चांगली माणसं जोडू शकतो अशी अजितची धारणा आहे. कलाक्षेत्रातली-नाट्यक्षेत्रातली चांगली, गुणवान माणसं जोडण्याचं अजितला वेडच आहे.

जेव्हा मनाजोगती संहिता मिळत नाही, तेव्हा अजित करायचं म्हणून नाटक करत नाही. तो गेली दोन वर्षं थांबून आहे. कित्येकदा अजितला पाश्चात्य रंगभूमीवर बघितलेल्या आणि प्रचलित असलेल्या नाट्यतंत्राची प्रकर्षानं जाणीव होते. तिकडे जर लायन किंगसारख्या नाटकाची निर्मिती होऊ शकते, तर आपल्याकडे रत्नाकर मतकरी यांच्या ‘मधुमंजिरी’ या नाटकाची निर्मिती आधुनिक नाट्यतंत्राच्या दृष्टिकोनातून का नाही होऊ शकत, असं त्याला वाटतं. तो म्हणतो, असं भव्यदिव्य सादर करण्याची तयारी असेल तर अशा प्रकल्पात गुंतवणूक करायला तयार असलेले लोक आहेत. पण असं साहस आम्ही लोक करत नाही.

अजितला दामू केंकरे यांचा सल्ला आठवतो. सुदृढ व्यावसायिक रंगभूमीवरच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी प्रायोगिक रंगभूमीवर काय चाललंय हे जाणीवपूर्वक डोळे उघडे ठेवून बघायला हवं. जिथं जिथं जे जे म्हणून नवीन आहे, त्याचा व्यावसायिक रंगभूमीवर वापर करायला हवा. मग ते नाटकांचे विषय असोत, नवे कलावंत असोत किंवा नवीन विचार असोत.

अशा प्रकारचा प्रयत्न अजितनं ‘काटकोन त्रिकोण’ आणि ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या नाटकांमधून केला. ‘सेल्फी’ या नाटकात तर पाच बायका आणि एकच अभिनय स्थळ असा मर्यादित मामला होता. अनेकांनी अजितला सल्ला दिला होता की, केवळ पाच बायकांचं नाटक व्यावसायिकदृष्ट्या चालू शकणार नाही. पण या नाटकाचे १५० यशस्वी प्रयोग जाले. याच्या नेमकं उलट ‘नामदेव म्हणे’ या नाटकात केवळ पाच पुरुष होते. हेच लोक त्याला आग्रहपूर्वक सांगत होते की, पाच पुरुषांचं नाटक करू नये. व्यावसायिक रंगभूमीवर ते चालणार नाही. पण त्याचे ३५० यशस्वी प्रयोग झाले.

चित्रपटनिर्मिती

लेखक-दिग्दर्शक म्हणून सचिन कुंडलकरांचा पहिला चित्रपट ‘रेस्टॉरंट’ हा निर्माता म्हणून अजितचाही पहिलाच चित्रपट होता. सचिनचं पेपरवर्क अतिशय उत्तम होतं. अजितसारख्या पहिला चित्रपट निर्माण करणाऱ्या निर्मात्याला सोयीचं जावं म्हणून प्रत्येक दिवसाचा कॅश फ्लो, प्रत्येक शेड्यूलचा अगदी रॉस्टिकपासूनच्या खर्चासह सारं तयार होतं. त्यामुळे अजितलाही पैसे उभे करण्याच्या दृष्टीनं सोयीचं गेलं. एप्रिल महिन्यात स्क्रिप्ट हाती आलं, ऑगस्टमध्ये चित्रीकरण सुरू झालं आणि नोव्हेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित झाला. या व्यवसायातल्या भल्याभल्यांना न जमणारं हे वेळापत्रक सांभाळलं गेलं ते परस्परांच्या सहकार्यानं, विश्वासानं आणि कामावरच्या निस्सीम श्रद्धेमुळे.

चित्रपट सांगण्याची, मांडण्याची एक वेगळी भाषा आहे. त्याचं वेगळं व्याकरण आहे. याचा सराव आणि अनुभव अजितला सचिन पिळगावकरकडे दिग्दर्शन सहायक असताना आला. मात्र चित्रपट दिग्दर्शित करण्याचं धाडस त्यानं अजून केलेलं नाही.

अभिनय

अजितचा उंचापुरा सुदृढ बांधा, मराठी भाषेवरचं प्रभुत्व, भूमिका समजून घेण्याची बौद्धिक क्षमता, संयत पद्धतीनं विविध भावाविष्कार व्यक्त करण्याची धाटणी, यामुळे अभिनेता म्हणून त्यानं स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यानं ‘अंधायुग’, ‘अंधेरनगरी’, ‘ऑन द पेव्हमेंटस ऑफ लाइफ’ या नाटकांमधील विविधांगी भूमिका मोठ्या समजूतदार पद्धतीनं केल्या होता. पुढे संगीत कलाकेंद्रासाठी आम्ही भारताच्या दौऱ्यावर नेलेल्या प्रसिद्ध ‘थँक यू, मिस्टर ग्लाड’ या हिंदी नाटकातील आणि ‘चित्रकथी’ या संगीतप्रधान एकांकिकेमधील त्याची भूमिका मला आजही आठवतात.

त्याचबरोबर अजितनं अनेक मराठी मालिकांमधून मध्यवर्ती आणि अर्थपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांचंही कौतुक झालं. ‘आनंदी गोपाळ’ ही सह्याद्री वाहिनीवरील मालिका फक्त १३ भागांची होती. यात अजित मध्यवर्ती भूमिकेत होता. आजही त्यातल्या अजितच्या गोपाळरावांच्या भूमिकेची प्रशंसा केली जाते.

बालवयात अजितनं रत्नाकर मतकरींची ‘मरनाची मंजिरी’, ‘निम्माशिम्मा राक्षस’ अशी नाटकं बघितली होती. त्यानंतर इंटर कॉलेजला असताना त्यानं नाटकात कामं केली. नंतर प्रवीण अकादमीत नाट्यकलेचं शिक्षण घेतलं. त्यामुळे आपल्या विचारांची बैठक पक्की झाल्याचं तो सांगतो.

अजितच्या निवडक नाटकांची गणना अर्थपूर्ण, आशयघन नाटकांमध्ये होते. धंदेवाईक नाटकांच्या भाऊगर्दीत त्याची ही संयत व्यावसायिक नाटकं गुणवत्तेच्या बाबतीत उठून दिसतात. ती चाकोरी बाहेरची, ज्यांना प्रायोगिक म्हणता येईल अशा स्वरूपाची आहेत. अजितच्या ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचे ३०० प्रयोग, ‘सारखं छातीत दुखतंय’चे २५० प्रयोग, ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’चे २५० प्रयोग, ‘सेल्फी’चे १५० प्रयोग आणि इतर काही नाटकांचे ५०-५० प्रयोग झाले आहेत.

आतापर्यंत अजितनं १३ वेगवेगळ्या प्रकारची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आणली आहेत. व्यावसायिकदृष्ट्या ती किती पैसा देऊन गेली, यापेक्षा कलात्मकदृष्ट्या विषय, आशय आणि शैली या दृष्टीनं ती भिन्न होती, नवं काही सांगणारी होती हे नक्की.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.

sontakkem@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......