'बागी-२' : टायगर श्रॉफचा 'ओन्ली अॅक्शन ड्रामा'
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी 
  • ‘बागी २’मधील दृश्यं
  • Sat , 31 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie बागी २ Baaghi 2 Tiger Shroff टायगर श्रॉफ

'बागी-२' हा त्याच्या नावावरून 'बागी-१'चा सिक्वेल असावा असं प्रारंभी वाटतं. मात्र नायिका वेगळी आणि कथाही वेगळी. नावात फक्त छोटासा. त्यामुळे आकर्षण उरतं ते फक्त नायकाचं, जो 'बागी-१'चाही नायक आहे. हा नायक म्हणजे टायगर श्रॉफ. 'बागी-२'ची कथा संपूर्ण वेगळी असली तरी टायगर श्रॉफला समोर ठेवूनच ती लिहिण्यात आली आहे, हे चित्रपट पाहताना पहिल्या दृश्यापासून जाणवतं. त्यामुळे 'बागी-२' म्हणजे 'देशी रॅम्बो' बनलेल्या टायगर श्रॉफचा 'ओन्ली अॅक्शन ड्रामा' या एका वाक्यातच त्याचं वर्णन करावं लागेल.

वास्तविक 'बागी-२'च्या कथेमध्ये गुन्हेगारी विषय असला तरी गुंतागुंतीचं चांगलं रहस्य आहे. मात्र पटकथेची मांडणी करताना ते शेवटपर्यंत कायम ठेवण्यात दिग्दर्शक अहमद खान यांना फारसं यश मिळालेलं नाही. हे रहस्य नेमकं काय असेल याचा 'अंदाज' आधीच येत असल्यामुळे टायगर श्रॉफची 'मार-धाड-अॅक्शन' पाहणं एवढंच काम उरतं. 

लष्करात कमांडो असलेला रणवीर प्रतापसिंग उर्फ रॉनी हा फौजी जवान आपली एकेकाळची प्रेयसी, नेहा हिच्या सांगण्यावरून सुटी घेऊन गोव्याला येतो. तिथं नेहाबरोबर त्याला कॉलेजमधील गतजीवन आठवत असतानाच नेहा त्याला, आपल्या लहान मुलीचं अपहरण करण्यात आल्याचं आणि पोलीस पाहिजे तसं सहकार्य करत नसल्यामुळे तिचा नव्यानं शोध घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगते. रॉनी जेव्हा त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला हळूहळू अनेक गोष्टी कळू लागतात.

मुख्य म्हणजे शेखर या नेहाच्या नवऱ्यासह बरेच जण त्याला नेहाला मुलगीच झाली नसल्याचं सांगतात. नेहाची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ती आपल्याला मुलगी असल्याचं आणि तिचं अपहरण झाल्याचं खोटंच सांगत असते, असंच रॉनीला सर्वांकडून भासवलं जातं. मात्र त्याला नेहाच्या घरातच तिला मुलगी झाली असल्याचा पुरावा मिळतो. त्यासाठीच्या तपासात त्याला 'डीआयजी' आणि आणखी एका 'एलएसडी'नामक एका पोलीस अधिकाऱ्याची साथ मिळतेही, मात्र पाणी कुठे तरी वेगळीकडेच मुरतं आहे याची शंका त्याला येते. त्याचा शोध घेण्याच्या प्रयत्न करत असताना त्यापाठीमागे असलेल्या एका वेगळ्या रॅकेटचा त्याला सुगावा लागतो आणि तो अनेक अडथळे पार करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचतो.

चित्रपटाची कथा खरं तर चांगली रहस्यमय आहे आणि तिचा वेगही चांगला ठेवण्यात आला आहे. मात्र ज्या प्लॉटवर कथा आधारलेली आहे, तो खूपच तकलादू आहे. अनेक गोष्टींची तर्कसंगती लागत नाही. आणि ती लागावी असा दिग्दर्शकाचाही आग्रह दिसत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी नेहाच्या अपहरणामागचा मुख्य सूत्रधार पाहिल्यानंतर कसलाच धक्का बसत नाही.

चित्रपटाची संपूर्ण कथा गोव्यात घडते. आता गोवा म्हटलं की, ड्रग्जचा व्यापार, तस्करी हे ओघानं आलंच. शिवाय नायकाला 'हिरो' ठरवण्यासाठी पोलीस विनोदी, मूर्ख आणि भ्रष्ट असणं हे ओघानं आलंच. तसंच एरवी पोलिसांकडे कायद्याचा आग्रह धरणारा आणि तपासासाठी जाब विचारायला गेलेला आपला फौजी जवान हिरो पोलीस ठाण्यातील अनेक पोलिसांना बदड बदड बदडतो, तरीही त्याच्याविरुद्ध फारशी कारवाई होत नाही, अशाही गोष्टीकडे कानाडोळा करावाच लागतो. याशिवाय गंमत म्हणजे चित्रपटाच्या शेवटी मुख्य सूत्रधाराच्या जो अड्डा आहे, त्यात शिरण्यासाठी 'टायगर' असलेला नायक जो साहस दाखवतो, त्याला तोडच नाही. कधी निःशस्त्र तर कधी सशस्त्र असलेला हा नायक सुमारे शंभर-दीडशे सशस्त्र लोकांना असा काही लोळवतो की, त्याच्यापुढे हॉलिवुडमधील 'रॅम्बो', 'कमांडो' सारे फिके पडतात.

हेलिकॉप्टरमधून सतत मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव होत असताना त्याला एकही गोळी लागत नाही. त्यामुळे तो निधड्या छातीनं त्याला सामोरं जातो (जणू काही त्याची छाती म्हणजेच बुलेटप्रूफ जॅकेट आहे!). चित्रपटाच्या उत्तरार्धात प्रामुख्यानं हेच सारं पाहावं लागतं. या चित्रपटात 'मुख्य आकर्षण' म्हणून घुसडण्यात आलेल्या माधुरी दीक्षितच्या 'एक, दोन, तीन, चार... ' या गाजलेल्या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिस नाचली आहे, मात्र ती भ्रष्ट नक्कल बघवत नाही. 

रॉनीच्या प्रमुख भूमिकेत टायगर श्रॉफनं उत्तम काम केलं आहे. भावनिक प्रेम आणि संघर्ष या दोन्ही कसोट्यांना तो चांगला उतरला आहे. दिशा पटणीनंही नेहाच्या भूमिकेत त्याला चांगली साथ दिली आहे. त्या दोघांची केमिस्ट्री छान जमली आहे. मनोज वाजपेयी (डीआयजी), रणदीप हुडा (एलएसडी- हिप्पीच्या वेशातील पोलीस अधिकारी), प्रतीक बब्बर (नेहाचा व्यसनासक्त दीर) यांच्या महत्त्वाच्या भूमिका असूनही त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही. याउलट दीपक डोब्रियालनं 'सलीम लंगडा'ची छोटीशी भूमिका नेहमीप्रमाणे चित्तवेधक केली आहे. 

थोडक्यात वेळ घालवण्यासाठी हे दोन घटका मनोरंजन ठीक आहे. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख