‘बागी २’ : लॉजिक मरते, आपण मात्र वाचतो!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार 
  • ‘बागी २’मधील दृश्यं
  • Sat , 31 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie बागी २ Baaghi 2 Tiger Shroff टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफचे स्टंट्स, त्याचा डान्स याबद्दल जरी थोडाफार आदर असला तरी एक अभिनेता म्हणून त्याला अनेक मर्यादा आहेत. आणि या मर्यादा जरा जास्तच आहेत. 'बागी २'मध्येही या मर्यादांवर मात करणं टायगर श्रॉफला जमलेलं नाही.

'बागी २'मध्ये नायक, रणवीर प्रताप सिंह उर्फ रॉनी (टायगर श्रॉफ) आर्मीत असल्यानं सुरुवातीलाच आपण काश्मीरमध्ये जाऊन पोहचतो. तिथं त्याला थेट अतिरेक्यांशी मारामारी करताना पाहतो. नंतर तथाकथित राष्ट्रवादी लोकांच्या देशभक्तीला खतपाणी घालत, मागे कधीतरी कुणी खऱ्या आर्मी ऑफिसरनं केलं होतं तसं, त्यातील मुख्य अतिरेक्याला आर्मी जीपसमोर बांधून शहरातून (की गावातून) बाहेर पडतो. त्यासाठी वरिष्ठांकडून ग्राउंडच्या काही फेऱ्या वगैरे शिक्षा मिळून सुटका होते. नंतर पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा फोन आल्यानं तिला मदत करण्यासाठी म्हणून तो काही दिवसांच्या सुट्टीवर जायचा निर्णय घेतो. 

तर झालेलं असं असतं की, त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी, नेहाच्या (दिशा पाटनी) मुलीचं अपहरण झालेलं असतं. त्याचा गेले दोनेक महिने तपास लागत नसल्यानं आणि पोलिसही म्हणावे तितके सक्रिय नसल्यानं ती याला बोलावते. मग तिच्या मुलीचं, रियाचं अपहरण कसं होतं, ती सापडते का यासारखे अनेक प्रश्न, फ्लॅशबॅक, गाणी, अनेक उपकथानकं, या सगळ्याचा सावळागोंधळ सुरू होतो. ज्यात चित्रपटाचा फर्स्ट हाफ तर रॉनी आणि आपण नक्की काय घडत आहे याचा शोध घेण्यातच जातो.  

'बागी २'च्या कथानकात अनेक लूपहोल्स आणि गुंता आहे. बहुधा लेखक-दिग्दर्शक या गुंत्यालाच काहीतरी ‘भारी’ समजत असावेत. त्यांना हा सगळा गुंता पाहूनच 'नोलन'सारखं काहीतरी केल्याचा भासही झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आणखी एक गोष्ट म्हणजे सलमान किंवा तत्सम अभिनेता मुख्य भूमिकेत असेल तर, सदर चित्रपटाच्या निर्मात्यांना आपण व्यावसायिक हेतू समोर ठेवून एक 'चित्रपट' बनवत आहोत याची जाणीव असते. जी यापूर्वीच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'चिरंजीवी' किंवा 'नागार्जुन' यांच्या चित्रपटांतही टिकून होती. त्यामुळे पाय फिरवून छोटेखानी वादळ निर्माण करणं, अनेक लोकांना अचंबित करणाऱ्या नानाविध प्रकारांनी लोळवणं, वगैरे गोष्टी या चित्रपटांत किमान टाळ्याखाऊ म्हणून तरी शोभतात. मात्र ‘बाघी’ सिनेमा म्हणून 'कमांडो', 'फोर्स' किंवा अगदी 'हॉलिडे'शी नातं जोडणारा असल्यानं या अतर्क्य आणि अशक्य गोष्टी बाळबोध वाटतात. 

याखेरीज दीपक डोब्रियालचा लंगडा, मनोज वाजपेयीचा डिआयजी, रणदीप हुडाचा 'एलएसडी' अशी बरेचशी पात्रं काही टिपिकल व्यावसायिक चित्रपटातील विनोद उकळवण्यासाठी काहीतरी असंबद्ध बोलत राहतात. शिवाय यात युट्यूब सेन्सेशन वगैरे असलेली 'ग्रँडमास्टर शिफु शौर्य' नामक व्यक्तीही आहे. जी अर्थातच पुन्हा एकदा राष्ट्रवादाला पूरक म्हणून आहे. 

सुरुवातीच्या काही दृश्यांमध्ये, जेव्हा नेहाच्या म्हणण्यानुसार तिच्या मुलीचं अपहरण झालेलं असतं, त्यावेळचा दिशा पाटनीचा अभिनय लाजवाब आहे. मात्र यात तिची काय चूक म्हणा! कतरिनाकडून किमान 'कबीर खान'सारखे दिग्दर्शक त्यातल्या त्यात बरं काहीतरी काढून घेऊ शकतात. इथं मात्र दिग्दर्शकाचीच बोंबाबोंब आहे. दिग्दर्शक अहमद खान ही व्यक्ती केवळ कुठेही दिग्दर्शकीय प्रभाव जाणवणार नाही याची पुरेपूर काळजीच घेत नाही तर ती अंमलातदेखील आणते. ज्यामुळे समोर असलेले 'मनोज वाजपेयी' ते 'दीपक डोब्रियाल'पर्यंतचे सगळे अभिनेते त्यांचा जास्तीत जास्त फ्लॅट परफॉर्मन्स देतात. 

बाकी, टायगरच्या एंट्रीला किंवा तो पोलिस अधिकाऱ्यांना मारत असताना दुसऱ्या हातानं टेबलावरून खाली पडणारा राष्ट्रध्वज पकडतो, तेव्हाही वाजणार नाहीत इतक्या टाळ्या आणि तेव्हाही प्रेक्षक मग्न होणार नाहीत इतके जॅकलिन फर्नांडिसच्या 'एक दो तीन' या आयटम साँगवर होतील याची पुरेपूर सोय दिग्दर्शकानं करून ठेवली आहे.

या अॅक्शनपटामधील अॅक्शन सीन्स फारच अतर्क्य वाटतात. इतके की त्यांच्यापुढे 'टायगर जिंदा है'मधील अॅक्शन अधिक चांगली वाटेल. आणि 'टायगर श्रॉफ'पेक्षा 'टायगर जिंदा है'मधील 'कतरिना कैफ' उजवी वाटेल. आता स्पेशल इफेक्ट्स आणि अधिक चांगलं तंत्रज्ञान उपलब्ध असूनही जर अर्धशतकापूर्वीच्या चित्रपटांतील फाईट सीक्वेन्सेस जास्त खिळवून ठेवणारे असतील तर आपण नक्की कोणत्या दिशेनं प्रवास करत आहोत? 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......