अजूनकाही
'हिचकी' सुरू होतो आणि पहिल्याच दृश्यातील शिक्षिकेच्या (राणी मुखर्जी) जागेसाठीच्या मुलाखतीपासूनच चित्रपटाच्या कथानकातील 'क्लिशे' दिसायला सुरुवात होते. समोरच्या मुलाखतकारानं तिला तिच्या 'ट्युरेट्स सिंड्रोम' या न्युरोसायकिअॅट्रिक आजारामुळे (तिला जर भरवर्गात उचक्या लागत राहिल्या तर) ती शिकवणार कशी, असा प्रश्न विचारल्यावर ती, “मी जर तुम्हाला माहीत नसलेल्या या आजाराची ओळख तुम्हाला करून देऊ शकते, तर मुलांनाही शिकवू शकतेच” अशा प्रकारचं उत्तर देते. आणि खरोखर सांगतो, तेव्हा इंटरनेटवर प्रसिद्ध असलेली, समोरील व्यक्ती एकतर काहीतरी अफाट बोलून किंवा किमान तसा आव आणून, हातातील माईक सोडून निघून जाणारी, ‘माईक ड्रॉप’ची ‘जिआयएफ’ आठवते.
याखेरीज 'हिचकी' अनेक गोष्टी फार सोप्या आणि धांदरट प्रकारे करून सांगतो. ज्याची सुरुवात 'ट्युरेट्स सिंड्रोम'ला फक्त 'उचक्यां'पर्यंत आणि शारीरिक मर्यादा इतकंच मर्यादित ठेवत किंवा फार तर भावनिक ताण वगैरे दाखवण्यापर्यंतच राखून ठेवल्यानं कथानकाला अनेक मर्यादा येतात.
ज्या मूळ कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे, ती वाचलेली नसली तरी ती सत्यकथेवर किंबहुना सदर व्यक्तीच्या कथनावर आधारित असल्यानं त्यात इतके 'फिल्मी' प्रसंग, कन्फ्लिक्ट्स नसावेत. आणि खरं तर त्यामुळेच चित्रपट फारच प्रेडिक्टेबल बनत जातो.
म्हणजे सुरुवातीच्या काही भागात येणारा, प्रिन्सिपल खानचा (विक्रम गोखले) आणि नैनाचा ऑडिटोरियममधील सीन पाहून शेवट शंभर टक्के याच ठिकाणी होणार किंवा शेवटी इथं काहीतरी नक्कीच घडणार असं वाटू लागतं, जे पुढे खरंही ठरतं. आणि हे अगदी एकदाच होतं असं नाही. कित्येक प्रसंगांच्या वेळी आपल्याला पुढे काय घडणार याची खात्री वाटत राहते. त्यामुळे खिळवून ठेवणं वगैरे संकल्पना लागू पडण्याचा इथं दूर दूरपर्यंत संबंध येत नाही.
सुधाची (सुप्रिया पिळगावकर) सिंगल मदर म्हणून भूमिका किंवा नैनाचे अधूनमधून येणारे वडील (सचिन पिळगांवकर) आणि त्याचा नेहमी तोंडावरील रेषाही न हलणारा, रागीट चेहरा किंवा खुर्चीतून क्वचित उठणारा आणि शाळेत काय चाललंय हेही माहीत नसणारा प्रिन्सिपल (शिवकुमार सुब्रमण्यम), सर्व विद्यार्थी नैनाच्या फेवरमध्ये असताना पुढेही काही वेळ तिच्याविरुद्ध एकटाच उभा राहणारा आतिश (हर्ष मायर) असे कित्येक नमुने देता येतील.
शिवाय हेही कमी नाही म्हणून या 'स्टेरियोटाईप्स'चा एक कळसही यात आहे. तो म्हणजे यातील '9 एफ'मधील चौदाव्यांदा अपयशी रॅपर मुलगा. म्हणजे एखाद्याला किती साचेबद्ध करायचं याचा हा अत्युच्च नमुना आहे. म्हणजे रॅपरनं रंगानं कृष्णवर्णी आणि वैधतेचा त्याहून जास्त मोठा पुरावा म्हणजे स्थूल असावं, हे मागील वर्षीच्या ऑस्करमध्ये - कृष्णवर्णीय महिलांनी नासात महत्त्वाचं काम केलं आणि चक्क अमेरिकन लोकांनी 'जाझ' वाचवलं - असा विनोद ज्या लोकांच्या मानसिकतेबाबत करण्यात आला होता, त्या मानसिकतेचं उदाहरण आहे. जाऊदेत, बॉलिवुड चित्रपटांकडून पॉलिटिकल करेक्टनेस किंवा तत्सम शब्दांना जगण्याची अपेक्षा ठेवणं जरा अतिशयोक्तीपूर्णच आहे.
बाकी राणी मुखर्जीचा अभिनय उत्तम आहे. किंबहुना चित्रपटाला पूर्णवेळ बसण्याची शक्यताही किमान तिच्या पात्रामुळेच निर्माण होते. कारण कथा, पार्श्वसंगीत वगैरे बाकी सगळं जवळपास धन्य आहे. एकूणच सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित 'हिचकी' काही फार वेगळं देतो असं नाही. उलट तोच कळत-नकळत अगदी 'एबीसीडी'पासून ते 'डेड पोएट्स सोसायटी'सारख्या अनेक चित्रपटांकडून काही ना काही उसनं घेतो. आणि तरीही योग्य तो परिणाम साधण्यात अयशस्वी ठरतो.
बाकी एकूणच चित्रपटाची टाईमलाईन आणि चित्रपटात घडणाऱ्या घटना, भरणारी शाळा किंवा इतरही प्रसंग अशी एकूणच टाईमलाईन फार उलटसुलट आणि कधीही काहीही घडणारी आहे. (शिवाय नीरज काबीचा वाडिया नक्की काय करत राहतो कोण जाणे! म्हणजे तो नक्की शिक्षक आहे की व्यवस्थापनात महत्त्वाचा आहे की, नेहमी एकटाच सूट घालून वावरणारा बिझनेसमन आहे ते काही कळत नाही.)
म्हणजे विद्यार्थी आणि अगदी शिक्षक वर्ग अर्ध्यात सोडून जातात किंवा वऱ्हांड्यात भटकत राहतात. वाडिया (नीरज काबी) असेम्बली अर्ध्यात सोडून बाहेर पडतो. त्यामागोमाग एक विद्यार्थीही बाहेर येतो. शाळेच्या प्रिन्सिपललाच काय चाललंय माहीत नसतं वगैरे बरंच काही घडत राहतं.
फक्त प्रॉब्लेम हा असतो की, आपल्याला मध्येच थिएटर सोडता येत नाही, कारण चित्रपट कसाही असो, तो पूर्ण पाहण्याचा प्रयत्न नेहमी करावा. म्हणजे त्याबद्दल नीट बोलता तरी येतं.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment