अजूनकाही
आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग बदलत चाललं आहे. त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत चालला आहे. काळानुसार अनेक रीतीभातीही बदलत चालल्या आहेत. कुटुंबसंस्था हे समाजातील एक प्रमुख परिमाण. परंतु त्यामध्येही बदल होत आहेत. मोबाईल, संगणक आदी उपकरणांना इतकं महत्त्व आलं आहे की, त्याच्यामुळे आपण जीवनातील आनंद, सुख-दु:खं हरवून बसत चाललो आहोत. 'व्हॉट्स-अप लग्न' या नवीन मराठी चित्रपटात हाच विषय हाताळताना यांत्रिकी जीवनामुळे निर्माण होत असलेल्या 'ऑनलाईन संसारा'ची वेधक गोष्ट सांगितली आहे.
अर्थात चित्रपटाच्या कथेत फार नावीन्य आहे असं नाही. मात्र बदलत्या काळाचं प्रतिबिंब कथेत पुरेपूर उतरलं आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना मजा येते आणि थोडंफार अंतर्मुखही होता येतं. या चित्रपटात आकाश आणि अनन्या या आधुनिक काळातील तरुण जोडीच्या 'ऑनलाईन संसारा'ची कथा आहे. आकाश हा आयटी क्षेत्रातील इंजिनिअर, तर अनन्या ही अभिनयाच्या क्षेत्रात काम करणारी. प्रामुख्यानं नाटकात काम करणारी अभिनेत्री. दोघंही स्वतःच्या करिअरला प्राधान्य देणारे. एका शेअर कॅबमधून प्रवास करताना दोघांची ओळख होते आणि ते प्रेमात पडतात. त्यानंतर त्यांचं लग्न होतं.
दोघांची कुटुंबं तशी आधुनिक, मात्र परंपरा, रीतीरिवाजाला मानणारी असली तरी आकाश आणि अनन्या यांच्या इच्छेनुसार लग्न आधुनिक पद्धतीनं म्हणजे रजिस्टर्ड मॅरेज होतं. लग्नपत्रिकाही 'व्हॉट्स-अप'वर आणि 'व्हिडिओ'द्वारे पाठवल्या जातात. मात्र लग्न झाल्यानंतर मुंबईत राहायला आल्यानंतर उभयतांना प्रेम आणि वास्तव जीवनातील फरक कळायला लागतो. करिअरला प्राधान्य देण्याच्या नादात दोघांना एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे सुसंवादाऐवजी विसंवाद निर्माण होतो आणि शेवटी 'ब्रेकअप' करण्याच्या निर्णयापर्यंत ते येऊन पोहोचतात. अर्थात नंतर दोघांनाही आपली चूक उमगते.
मध्यंतरापर्यंत चित्रपटाची कथा लक्षवेधक ठरते. आकाश आणि अनन्याची कॅबमध्ये ओळख झाल्यापासून ते त्यांचं प्रेम जमून लग्न होण्यापर्यंतचे विविध प्रसंग संवादातून मजा आणतात. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाची कथा रेंगाळत जाते. शेवटही बराच लांबल्यासारखा वाटतो. शिवाय ज्यामुळे दोघांनाही आपली चूक उमगते, ते कारण आणखी सबळ दाखवलं असतं तर कथा आणखी प्रभावी ठरली असती. केवळ बॅग बदलल्यामुळे (बॅगेतील वस्तू पाहून) परस्परांवरील प्रेमाचा साक्षात्कार होणं, हे कारण नाही म्हटलं तरी तांत्रिक स्वरूपाचं वाटतं. शिवाय दाजीकाका आणि अनन्याची मावशी या दोन व्यक्तिरेखा केवळ आकाश आणि अनन्याला 'मार्गदर्शन' करण्यासाठीच निर्माण करण्यात आल्या असाव्यात असं वाटतं.
आकाश आणि अनन्याचा अर्धवट राहिलेला 'हनिमून', त्या पार्श्वभूमीवरील अनन्या आणि तिची मोलकरीण यांच्यातील संवाद मात्र लक्षवेधक ठरला आहे. कथेचा विषय बदलत्या आधुनिक काळाशी सुसंगत आहे, ही या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे. मात्र त्यादृष्टीनं कथेचा आशय अधिक अर्थपूर्ण हवा होता. चित्रपटाच्या कथेचं सादरीकरण मात्र एकदम चकचकीत झालं आहे. एखाद्या स्मार्ट फोनप्रमाणेच ते भासतं. त्यासाठी छायालेखक सेथु श्रीराम यांचं खास अभिनंदन करायला हवं. निलेश मोहरीर आणि ट्रॉय-आरिफ यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आणि कथेला पुरक आहेत.
'व्हॉट्स-अप लग्न'मधील वधू-वराच्या प्रमुख जोडीसह अन्य वऱ्हाडी मंडळींच्या म्हणजे प्रमुख कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे हा लग्नसोहळा तसा छान पार पडला आहे. आकाशच्या भूमिकेत वैभव तत्त्ववादीनं दमदार अभिनय केला आहे, तर अनन्याच्या भूमिकेत प्रार्थना बेहेरेनं सुंदर दिसण्याबरोबरच चांगला अभिनयही केला आहे. विक्रम गोखले (दाजीकाका), वंदना गुप्ते (अनन्याची मावशी), स्नेहा रायकर आणि गिरीश जोशी (अनन्याचे आई-बाबा), ईला भाटे आणि विनी जगताप (आकाशची आई आणि बहीण) यांनीही छोट्या भूमिकेत चांगलं काम केलं आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment