अजूनकाही
त्याच्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे मला उर्दू वाचत असल्यासारखं एका दशकाची पानं उलटून मागे जावं लागतं. दिग्दर्शक असलेल्या माझ्या या मित्राचा ऑक्सिजन आहे चित्रपट म्हणजे. तिचं नुकतंच निधन झालं, तेव्हा तो अक्षरशः कोसळून पडला. मी तिचे 'इंग्लिश विंग्लिश', 'चालबाज', 'मिस्टर इंडिया' एवढेच मोजके चित्रपट पाहिले होते. ती एक ग्रेट अभिनेत्री आहे, हे माहीत होतं. पण त्यानं तिचे चित्रपट जसे पिंजून काढले आहेत, तेवढे मी पाहिले नव्हते. अनेक चित्रपटांतून तिला सलामी दिलेली मी पाहिली होती. अयान मुकर्जीचा 'वेक अप सिद' असो किंवा 'तुम्हारी सुलु'मधलं 'हवाहवाई'चं रिमेक असो, ती अनेकांच्या दिलाची धडकन होती.
त्यामुळे मुंबईत तिचे चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा लागणार, या बातमीनेच तो मोहरून गेला होता. त्याची इच्छाशक्ती एवढी प्रबळ की, सुरुवातीला महिला दिनाच्या निमित्तानं फक्त स्त्रियांसाठी लावलेले मोजकेच शोज नंतर वाढवून इतरांसाठीही लावण्यात आले. त्यातही आधी वडाळा, भांडुप वगैरे दूरच्या ठिकाणी शोज लागले होते. त्यात भर घालून गोरेगाव, अंधेरी अशा पश्चिम उपनगरांतल्या ठिकाणीही शोज लावले गेले. तिचे 'लम्हे' आणि 'चांदनी' हे दोन चित्रपट मला दाखवायचेच, या हट्टानं तो पेटून उठला होता. माझीही हरकत नव्हतीच.
'लम्हे' आधी पाहिला आणि नंतर 'चांदनी'. दोन्ही चित्रपटांत बरीच साम्यस्थळं आहेत निर्मितीच्या बाबतीत. दिग्दर्शक यश चोप्रा. गीतं आनंद बक्षी यांनी लिहिली आहेत. संगीत शिव-हरी यांचं आहे. आजच्या काळातली सिनेमॅटोग्राफी फिकी पडेल, अशी नयनरम्य सिनेमॅटोग्राफी मनमोहन सिंग यांची आहे. त्यामुळे दोन्ही स्वप्नं पडद्यावर भव्यदिव्य अशीच उतरली आहेत आणि ती मोठ्या पडद्यावर पाहणंच योग्य. पण दोन्ही चित्रपटांत लक्षात राहते ती तीच. श्रीदेवी. 'चांदनी'मध्ये थोडीशी बुजलेली वाटणारी ती 'लम्हे'मध्ये छान खुलली आहे. सगळं उधळून स्वैर संचारली आहे. ऋषी कपूर, अनिल कपूर, विनोद खन्ना या तिघांनाही पुरून उरली आहे. तिच्या नृत्याविष्काराची मोहिनी तर आहेच, पण दोन्ही चित्रपटांतलं तिचं तांडव म्हणजे जणू नटराज शिवानंच तिला प्रशिक्षण दिल्यासारखं.
चित्रपट म्हणून कथेच्या आणि एकूणच ट्रीटमेंटच्या बाबतीत 'लम्हे' 'चांदनी'च्या पुष्कळ योजने पुढे निघून जातो. तरीही 'लम्हे'मध्ये डोळ्यांत गेलेल्या कुसळासारखा खुपणारा दीपक मल्होत्रा आहेच. मॉडेल्सनी अभिनय का करू नये, याचा वस्तुपाठ म्हणून या चित्रपटातला दीपकचा अभिनय पाहावा. समलिंगी संबंधांचं छुपं प्रकटीकरण म्हणून 'लम्हे'मधल्या अनुपम खेरच्या पात्राकडे पाहता येईल. दुर्लक्ष करता येणार नाही, इतकं ते स्पष्ट आहे. नंतरच्या असंख्य चित्रपटांवर या दोन चित्रपटांचा प्रभाव लख्खपणे जाणवतो. काही दृश्यांची तर सरळसरळ कॉपीच. त्या दृष्टीनंही हे दोन्ही चित्रपट फार महत्त्वाचे ठरतात. माझ्या लाडक्या रणबीर कपूरचा आवाज डिट्टो ऋषी कपूरसारखा आहे, हे 'चांदनी' पाहताना जाणवत होतं.
आयुष्यात पुढे निघून गेल्यावरही पूर्वाश्रमीचा प्रियकर परत आल्यावर त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी 'चांदनी'ही विलोभनीय आणि बापाच्या वयाच्या माणसावर प्रेम करणारी पूजाही तितकीच लोभस. करण जोहरच्या 'बॉम्बे टॉकीज'मधल्या कथेत एक संवाद होता - "तुम्हांला माधुरी आवडत असेल, तर तुम्ही स्ट्रेट. श्रीदेवी आवडत असेल तर तुम्ही खात्रीनं समलैंगिक." गंमतीचा भाग वगळला, तर असं का, हे 'लम्हे' आणि 'चांदनी' पाहून जाणवतं. प्रियकराच्या चुका पोटात घालून त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी चांदनी आणि प्रियकरानं प्रेमाचा अव्हेर केल्यावर चवताळणारी, त्याला आव्हान देणारी पूजा ही दोन्ही समलैंगिक पुरुषांची प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्वं आहेत.
आते जाते गली में मेरा दिल धड़के
मेरे पीछे पड़े हैं आठ-दस लड़के
अशी स्वतःच्या मादक सौंदर्याची अभिव्यक्ती असो किंवा
जाने कौन घड़ी में निकले साजन घर से
मैं घूँघट में जल गयी, कितने सावन बरसे
मेरी प्यास ना बुझी रे, बरसातमां
असं काळजाला हात घालणारं विरहगीत असो, समलिंगी पुरुषांच्या आयुष्यातल्या या सप्तरंगी छटा श्रीदेवी नावाच्या वादळानं अशा ताकदीनं सादर केल्या आहेत, की ज्याचं नाव ते!
मी सुदैवीच की त्याच्यामुळे मला हा कलाविष्कार मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला आणि तिच्या प्रेमात पुन्हा नव्यानं पडण्याची संधी मिळाली.
.............................................................................................................................................
लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 18 March 2018
लेखात ओढूनताणून होमोगिरी आणली आहे. त्यातनं विनोद पैदा होत नाहीये. -गामा पैलवान