शम्मी : कहाँ हो तुम जरा आवाज दो...
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
आफताब परभनवी
  • शम्मी (२४ एप्रिल १९२९ - ६ मार्च २०१८)
  • Sat , 10 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie शम्मी Shammi

शम्मी रसिकांच्या स्मरणात होती एक गोड अवखळ म्हातारी म्हणूनच. वयाच्या ८८ व्या वर्षी शुभ्र म्हातारपण आनंदानं उपभोगत असताना झोपेत तिनं शेवटचा श्वास घेऊन शांतपणे जगाचा निरोप घेतला. तिच्या उत्तर आयुष्यातल्या चरित्र भूमिका गाजल्या. टीव्ही मालिकांमध्ये तिला प्रचंड मागणी होती. (‘देख भाई देख’, ‘जबान संभाल के’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘कभी ये कभी वो’, ‘फिल्मी चक्कर’ ते अगदी शेवटची टीव्ही मालिका ‘शिरी फरहाद की तो निकल पडी’पर्यंत.) स्मरणशक्ती थोडी ताणली तर चित्रपटांतील तिच्या चरित्र भूमिकाही रसिकांना आठवतात. ‘कुली नं. १’, ‘मर्दोवाली बात’, ‘हम साथ साथ है’, ‘गुरूदेव’, ‘गोपी किशन’, ‘हम’, ‘इम्तिहान’. 

अजून मागे स्मरण शक्ती नेली तरी हाती लागतात ८० च्या दशकातील तिच्या छोट्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिका (आंचल, कुदरत, आवारा बाप, स्वर्ग). त्याहीपुढे स्मरणशक्ती ताणत नेली तर आपण जाऊन थांबतो थेट शशी कपूर-नंदाच्या ‘जब जब फुल खिले’पर्यंत. शशी कपूर नंदाला घोड्यावर बसवून काश्मीरचं अप्रतिम सौंदर्य दाखवत फिरवत आहे. नंदाच्या मागे घोड्यावर बसलेली लाल स्वेटरमधील तिची मैत्रीण म्हणजे शम्मी.  

जुन्या गाण्यांचा एक प्रचंड मोठा तोटा म्हणजे ही गाणी रेडिओच्या काळातली गाणी होती. त्यामुळे ती खूप ऐकली गेली पण पाहिली गेली नाहीत. मग एखाद्या गाण्याचा उल्लेख केला तर गाण्याचे शब्द न शब्द आठवतो. त्यातील संगीताचे तुकडेही लख्ख आठवतात. पण बऱ्याचदा हे गाणं कुणावर चित्रित आहे, ते मात्र लक्षातच येत नाही. 

आता शम्मीचंच बघा ना. गायक मुकेशनं १९५१ मध्ये ‘मल्हार’ नावाचा एक चित्रपट निर्माण केला होता. त्यातील लता-मुकेशचं अजरामर गाणं म्हणजे 

बडे आरमान से रख्खा है बलम तेरी कसम 

प्यार की दुनिया में ये पहला कदम  

राज कपूरसाठी सुरवातीला मुकेशचाच आवाज वापरून ट्रेंड सेट करण्यात पुढाकार घेणारा शंकर जयकिशन सोबतचा दुसरा संगीतकार म्हणजे रोशन. ‘बावरे नैन’ (१९५०) मध्ये त्यानं मुकेशला राज कपूरसाठी वापरलं होतं. याच रोशनकडे मुकेशननं ‘मल्हार’चं संगीत सोपवलं होतं. रोशननं या संधीचं सोनं केलं. ‘बडे आरमान से रख्खा है बलम तेरी कसम’ या गाण्यात नायक अर्जुन सोबत जी नायिका आहे, ती म्हणजे शम्मी. लहानपणीचे नायक-नायिका एकमेकांमागे धावत धावत पायऱ्या चढत आहेत. गाण्याची सुरुवात होते, तेव्हा ते पाठमोरे असतात. कॅमेरा त्यांना पकडू पाहतो. धावता धावता ते मोठे होतात. लहानपणातून मोठं होण्यासाठी गाण्याची ही ट्रिक काही चित्रपटांमध्ये त्या काळात यशस्वीरीत्या वापरली गेली. 

या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. गाणं तर गाजलं. मुकेशची गायक म्हणून दमदार कारकीर्द सुरू झाली. पण या चित्रपटाची शोकांतिका म्हणजे नायक अर्जुन, गीतकार कैफ इरफानी आणि नायिका शम्मी यांना कुणालाच पुढे फार व्यवसायिक यश मिळालं नाही. अगदी रोशनलाही कमीच चित्रपट मिळाले.

शम्मीला कामाची गरज होती. चांगले चित्रपट वाट्याला येईपर्यंत हातावर हात ठेवून वाट बघत बसणं शक्य नव्हतं. तिने शांतपणे येईल ते चित्रपट स्वीकारायचा व्यवहार्य मार्ग पत्करला. 

गुरुदत्तच्या चित्रपटांमधून जॉनी वॉकरची एक विशिष्ट प्रतिमा तयार होत चालली होती. त्याच्यासाठी खास गाणी संगीतकार योजून ठेवायचे. अशाच एका चित्रपटांत ‘मुसाफिरखाना’ (१९५५) मध्ये त्याच्या वाट्याला एक गाणं आलं. मजरूह सुलतानपुरी- ओ.पी.नय्यर या जोडीच्या बहराचा हा काळ. 

थोडासा दिल लगा के देख 

नैनों से मुस्कुराके देख 

मेरा ना बन सके अगर 

अपना हमे बना के देख 

या गाण्यात जॉनी वॉकरसोबत फुग्याच्या बाह्या असलेला फ्रॉक घालून धमाल नाचणारी नायिका म्हणजे शम्मी. शमशाद-रफी यांच्या शब्दांतील अवखळपणा पडद्यावर साकार करण्यात जॉनी सोबत शम्मी कुठेही कमी पडली नाही.

शम्मीला दुय्यम भूमिका मिळत गेल्या, पण त्या तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्मरणीय ठरवल्या. दुय्यम भूमिकांत मिळालेली गाणीही तिनं जीव ओतून रंगवली. सी. रामचंद्र यांच्या ‘राजतिलक’ (१९५८) मध्ये तिच्या वाट्याला चरित्र अभिनेता आगासोबत एक गाणं आलं. बैलगाडी चालवणारा आगा आणि बैलगाडीत गवताच्या गंजीवर बसून ऊस खाणारी गावाकडच्या वेशातली शम्मी. रफी-आशाच्या आवाजातील हे गाणं आहे -

चलना संभल संभल के जी चलना संभल के

हो राही हो... हो राही हो...  

या जोडीच्या मागून येणाऱ्या गाडीत पदमिनी आहे. ती पण गात आहे. पण ती इतकी नटलेली दाखवलेली आहे की, शम्मी जशी नैसर्गिक वाटते, तशी ती वाटत नाही.

याच वर्षी ‘आखरी दांव’ (१९५८) हा नुतन-शेखर यांचा मदन मोहनच्या संगीतानं नटलेला चित्रपट पडद्यावर आला. यात नुतनवरच्या दोन गाण्यांत शम्मी तिची मैत्रीण म्हणून सोबत दाखवलेली आहे. पहिलं गाणं आहे रफीच्या आवाजातील- 

तुझे क्या सुनाऊ मैं दिलरूबा 

तेरे सामने मेरा हाल है

तेरी इक निगाह की बात है

मेरी जिंदगी का सवाल है

आणि दुसरं सुंदर गाणं आशाच्या खट्याळ आवाजात आहे -

हाय उनकी वो निगाहे

दिल देखे जिनकी राहे

कोई उनसे जाके पुछे

हम क्यु न उनको चाहे

या गाण्यात शम्मीच्या तोंडी मदन मोहननं शिट्टीचा वापर केला आहे. शम्मीच्या शिट्टीनं गाण्याची नजाकत वाढवली आहे. गाडी चालवणारा बावरलेला नायक शेखर आणि मागे मस्ती करणाऱ्या नुतन आणि शम्मी असं पडद्यावर जमून गेलेलं रसायन आहे. लताच्या आवाजाच्या प्रेमात असलेल्या मदन मोहननं गीता किंवा अशाला अशी मोजकीच पण फार सुरेख गाणी दिली आहेत.

अशोक कुमार-निरूपा रॉय यांच्या ‘कंगन’ (१९६०) मध्ये मा. भगवान आणि शम्मी यांच्यावरही एक मस्त गाणं संगीतकार चित्रगुप्तनं दिलं आहे. सी.रामचंद्र यांच्याशी भांडण झाल्यावर गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी चित्रगुप्त यांना आपल्याकडचे चित्रपट द्यायला सुरुवात केली. हे गाणंही राजेंद्र कृष्ण यांचच आहे. गीता-रफी यांच्या इतर गाण्यांचा उल्लेख नेहमी होतो पण या गाण्याचा फारसा होता नाही. हे गाणं आहे 

जवाब नही जवाब नहीं 

गोरे मुखडे पर तिल काले का 

मा. भगवान, जॉनी वॉकर पुढे चालून मेहमुद यांनी विनोदी भूमिका करताना आपल्यासाठी खास गाणी मागून घेतली आहेत. त्यांची गाणी बऱ्यापैकी गाजलीही आहेत. नायिकांमध्ये हे यश शम्मी मग शुभा खोटे यांना मिळालं. 

शम्मीच्या कारकर्दीतील उल्लेख करावा असं शेवटचं गाणं म्हणजे मीनाकुमारी-राजकुमार यांच्या गाजलेल्या ‘दिल अपना और प्रीत पराई’ (१९६०) मधलं 

शीशा ए दिल इतना ना उछालो

ये कही टूट जायेगा ये कही फुट जायेगा

खरं तर हे गाणं काही शम्मीवर नाही. गाणं आहे मीनाकुमारीवरच. समुद्रकिनारी पाण्यात मस्ती करणाऱ्या मैत्रिणींवर हे गाणं चित्रित आहे. यात शम्मी गाजली ते तिच्या बिकिनीमुळे. त्या काळात हे धाडस कुठली नायिका करत नव्हती. शम्मीनं ते केलं.

शम्मीनं आपली कारकीर्द छोट्या छोट्या भूमिका करत पुढे नेली. तिने कधी तक्रार केली नाही. आयुष्यातील कठीण प्रसंगी अंगावरच्या प्रसंगी घरातून बाहेर पडून परत आपली कारकीर्द उभी करून दाखवली. जिद्दीनं शांतपणे आपल्या वाट्याला आलेली भूमिका निभावली. 

शम्मीसाठी लता-गीता-आशा-शमशाद सगळ्या आघाडीच्या गायिकांनी गाणी गायली. नायिकेची नसली तरी नंतर सहनायिकेची, त्यानंतर चरित्र नायिकेची आणि शेवटी शेवटी खट्याळ म्हातारीची भूमिका तिनं मन:पूर्वक रंगवली. आपल्या छोट्याशा भूमिकांच्या मोठ्या कारकिर्दीचा मनापासून आनंद लुटला आणि रसिकांनाही दिला.

शम्मीचा गाण्यासाठी जो चित्रपट गाजला त्या ‘मल्हार’मध्ये एक आर्त गाणं आहे. 

कहां हो तुम जरा आवाज दो हम याद करते है, 

कभी भरते है आहे और कभी फरयाद करते है 

लताच्या कोवळ्या आवाजाला अतिशय साजेसा अभिनय शम्मीनं केला होता. खरं तर तिचे गोबरे गाल, बॉब केलेले केस, खट्याळपणा दाखवणारे छोटे डोळे हे दु:ख व्यक्त करायला पोषक नाहीत. आज शम्मीच्या जाण्यानं रसिक ‘कहाँ हो तुम जरा आवाज दो’ असंच म्हणताहेत.       

.............................................................................................................................................

लेखक आफताब परभनवी हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......