रूक्सानाच्या काळ्या अंतरंगाचा शोध न घेणं ही ‘परी’ची डावी बाजू आहे!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अलका गाडगीळ
  • ‘परी’चं पोस्टर्स
  • Mon , 05 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie परी Pari अनुष्का शर्मा Anushka Sharma परांब्रता चॅटर्जी Parambrata Chatterjee

दृश्य एक

घनदाट जंगलातनं गाडी चाललेली असते. रात्रीची वेळ. पुढचं काही दिसू नये इतका पाऊस पडत असतो. विजा कडकडत असतात. काहीतरी घडणार आहे... काहीतरी घडणार आहे... अचानक एक स्त्री कारला धडकते आणि मरून पडते. मिट्ट काळोख, आजूबाजूला कोणीही नसतं. ही स्त्री कोण? हा उलगडा होण्याची शक्यता नसते.

दृश्य दोन

गाडीत बसलेली बार्इ काय घडलंय हे बघायला बाहेर येते. समोर पडलेलं प्रेत बघून तिला उलटी येते.

दृश्य तीन

हॉलमधल्या एका कोपऱ्यात प्रसववेदना सुरू झालेल्या स्त्रिया आक्रोश करत असतात. समोरचं दृश्य बघून त्या भयभीत झालेल्या असतात. मधोमध ठेवलेल्या एका बाथटबातल्या रक्ताळलेल्या पाण्यात एकेका स्त्रीची प्रसूती होत असते. प्रसूती करणारा डॉक्टर, रजत कपूर आणि त्याचा सहायक जन्मजात बाळांच्या मुळावर उठलेले असतात. त्यातली एक स्त्री टबमधून सरपटत निसटून जाण्यात यशस्वी होते.   

दृश्य चार

रस्त्यावर कुत्र्याचं शव पडलेलं असतं. त्याच्या गळ्यावर आणि शरीरावर नखाचे आणि दाताचे व्रण दिसतात.

दृश्य पाच

बाळांच्या गळ्याला नख लावणारा प्रा. कासीम आपला खोटा डोळा काढतो. त्याच्याखालची खोबणी भेसूर दिसते. 

दृश्य सहा

एका घाणेरड्या घरातल्या अस्वस्छ बाथरूममध्ये एक रूपवान स्त्री बसलेली असते. तिला भेटायला कासीम येतो. त्याला एकीचा ठावविकाणा शोधून काढायचा असतो. क्षणार्धात त्या स्त्रीचं रूपांतर जखिणीत होतं. ती उत्तर देते, पण त्या आधी आपली फी घेते. जिवंत कोंबडी. जखीण कोंबडीचा चावा घेते.

भय निर्माण करणारी चार-पाच दृश्यं. या पलिकडे एखाद दुसरं भीषण दृश्य असावं. पण भयपटात सतत भयानक दृश्यं दाखवण्याची गरज नसते, याची समज हा चित्रपट दाखवतो.

सिनेमानं उभ्या केलेल्या वास्तवानुसार नव्वदच्या दशकांत बांगलादेशात इफ्रित पंथ कार्यरत होता. इफ्रित म्हणजे सैतानाला पुजणारा गट. या पंथाच्या अनुयायांची मुलं सैतान होतात, या समजुतींनी पछाडललेला कासीम ही भ्रूण हत्याकांडं घडवून आणतो.

सिनेमात अर्णबच्या (प्ररंब्रता चट्टोपाध्याय) वाग्दत्त वधूच्या कथेचा धागाही आहे. पियाली (रिताभरी चक्रबर्ती) आणि अर्णब लग्न ठरवणाऱ्या संस्थेमार्फत प्रथमच भेटतात. अर्णब बुजरा. खाली मान घालून उभा. पियाली संभाषणाला सुरुवात करते. ‘तुझं अफेअर होतं का?’ ती विचारते. ‘मी मुलींशी कधी बोल्लोच नाही’, अर्णबची मान पुन्हा खाली. ‘मी नर्स आहे, एका हॉस्पिटलमध्ये काम करते. माझं अफेअर होतं एका डॉक्टरबरोबर’. अर्णबला त्याचं काही वाटत नाही. तो खोदून खोदून प्रश्न विचारत नाही.

अर्णबची ही सौम्य आणि कोमल बाजू आश्वस्त करते. पियाली मात्र अफेअर कुठपर्यंत पोचलं होतं, हे सांगण्यासाठी धडपडत असते.

कारखाली सापडून मेलेली रूबीना जंगलातच राहत असते. अपघात झाल्यानंतर तिचं कोणी आहे का याचा माग काढणा-या अर्णबला तिची मुलगी रूक्साना (अनुष्का शर्मा) वनातल्या एका झोपडीत सापडते. तिचे हातपाय साखळीनं बांधून ठेवलेले असतात. प्रेत ताब्यात घेणं, अंत्यसंस्कार करणं ही आपली जबाबदारी असं समजून अर्णब तिला मदत करतो.

रूक्साना अर्णबच्या घरी येते. तिला त्याचं नाव आणि पत्ता कुठून मिळतो? ती आपल्या घरात दिसल्यावर अर्णबला फार आश्चर्यही वाटत नाही. ‘तू एवढं अंतर चालत आलीस?’ त्याची ही प्रतिक्रिया पाहून प्रेक्षकांनाच धक्का बसतो. 

या नंतर सुरू होतो बेचव आणि कंटाळवाणा भाग. तो रूक्सानाला दात घासायला, नखं कापायला शिकवतो. टीव्ही बघून ती ‘आय लव्ह यू’ म्हणू लागते. इथं जुन्या ‘शागीर्द’ सिनेमाची आठवण होते. खेडवळ सायराबानू जॉय मुखर्जीच्या शहरातल्या घरी येते. जॉय तिला शहरी शिष्टाचार शिकवतो. ढंगाचे कपडे घालायला शिकवतो.

अधूनमधून रूक्सानाच्या अंगात सैतान संचारतो. ती अधो जगाची सफर करू लागते. ती उडते, नाहीशी होते, डसतेही. तिच्या अधोजगात जाण्याच्या कल्पनेचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला नाही. ज्याच्या प्रेमात ती आकंठ बुडालेली असते, त्या अर्णबला मात्र मायावी जगात प्रवेश नाही. ही कल्पना अस्फूटपणे येते आणि नाहीशी होते.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वाधिक नामांकनं मिळवणाऱ्या ‘शेप ऑफ वॉटर’ या सिनेमात परीकथा आणि भयकथेचं बेमालूम मिश्रण पाहायला मिळतं. समुद्री विज्ञानाच्या संशोधन प्रयोगशाळेत एलिसा सफार्इ कामगार म्हणून काम करत असते. प्रयोगशाळेच्या तलावात एक प्राणी तिला दिसतो. या प्राण्याशी तिची दोस्ती होते. खरं तर हा प्राणी भयानक आणि धोकादायक ठरवण्यात आलेला असतो. त्यामुळे या प्राण्याशी असलेल्या एलिसाच्या सलगीबद्दल वादळ उठतं. प्रयोगशाळेतील एक शास्त्रज्ञ या प्राण्याची चिरफाड करणार असतो. एलिसा आणि प्राणी या संकटाला कसं तोंड देतात? एलिसाचा पाण्यातील विश्वात कसा प्रवेश होतो? तिथं त्यांचा रोमान्स कसा होतो? या प्रकरणाची तरल हाताळणी चित्रपटांत दिसून येते.

‘परी’मध्येही या अधोअवकाशाचा शोध घेण्याचा अवसर होता असं वाटू लागतं.

इस्लामच्या कडव्या अनुयायांनुसार इस्लाममध्ये गुरू परंपरा किंवा भक्तीपंथाला स्थान नाही. सुफी पंथ, दर्गे, दर्ग्यांचे उत्सव या मंडळींना मान्य नाहीत. कासीम या मंडळींपैकी एक. इफ्रित पंथाला बदनाम करण्यासाठी, त्याचं खच्चीकरण करण्यासाठी ते सैतानाचे वंशज असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता का? सिनेमातली ही एक थीम.  

रूक्सानाला दिवस जातात. गर्भारपणातच तिचा पाठलाग सुरू होतो. कुप्रजनन आणि सुप्रजननाच्या खुळचट कल्पना वंश श्रेष्ठत्वाच्या किल्मिषांमुळे निर्माण होतात. इफ्रित पंथाला सैतान पूजक म्हणणं, त्यांना एका महिन्यातच बाळ होतं, त्यांना नाळच नसते, असे दावे करणं, या पंथांतील नवजात बालकांना मारून टाकणं, रुक्सानाचं बाळंतपण पियालीनं करणं या प्रजनन आणि गर्भप्रतीकांच्या शक्यता निर्माण होतात.

परीनं खूप सोसलंय, तिच्यात खूप ऊर्जा आहे, भाबडी उत्सुकता आहे अणि दुष्ट प्रवृत्तीही आहे. कासीम धर्मशुद्धीसाठी कार्य करतोय, पण तो अन्याय आणि हिंसेचा आधार घेतोय. अर्णब तर कोमल हृदयी, पण अखेरीस तोही कासीमशी हातमिळवणी करतो. कोण सुष्ट आहे या पैकी?

पूर्णपणे दुष्ट व्यक्ती असते का? या उलट पूर्ण सुष्ट व्यक्ती असते का? प्रेमामुळे सारं काही हस्तगत करता येतं का? अशा काही संकल्पना चित्रपटात येतात आणि झर्रकन निघून जातात. माणसं निव्वळ चांगली किंवा वार्इट नसतात.

‘परी’मध्ये अशी अनेक सूत्रं दिसतात, पण त्यांचा पुरेसा शोध न घेतल्यामुळे चित्रपट अपूर्ण आणि विखुरलेला वाटू लागतो. एक मात्र खरं मुख्य प्रवाहातल्या हिंदी चित्रपटांत या प्रकारचा भय/भूतपट झाला नव्हता. अनुष्का शर्मा प्रयोग करते, सिनेमाच्या नवनवीन प्रदेशात मुशाफिरी करते. या चित्रपटातही तिनं जीव ओतून काम केलंय. तिची रुक्साना विश्वसनीय वाटते. चित्रपटाला गहिरेपणा आणण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. पण संहिता ढिली असल्यामुळे चित्रपट धडपडतो. तरीही गोष्टीला पक्कं धरून ठेवण्याचं काम परमब्रत चटर्जीनं उत्कृष्टपणे पार पाडलेलं आहे. 

‘फिल्लूरी’मध्ये अनुष्कानं प्रेमळ भूताचं काम केलं होतं आणि आपल्या भूमिकेचं सोनं केलं होतं. ‘परी’मध्ये रूबीनाची काळी बाजूही अनुष्कानं तेवढ्याच ताकदीनं दाखवली असती. पण शेवटच्या रक्ताळलेल्या अवस्थेतील तिच्या धडपडीखेरीज काहीच मिळत नाही.

रूकसानाच्या काळ्या अंतरंगाचा शोध न घेणं ही या चित्रपटाची डावी बाजू आहे.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......