अजूनकाही
एखादा पुजारी देवाच्या पूजाअर्चेत अष्टौप्रहर मग्न असू शकतो का? त्यात त्याला संपूर्ण आनंद मिळतो का? त्याचं त्याच्या शरीराच्या गरजांकडे लक्ष असतं की नाही? या लैंगिक गरजांचे, त्यांच्या अतृप्तीचे काय परिणाम होतात आणि जेव्हा या गरजा पूर्ण होण्याच्या शक्यता निर्माण होतात, तेव्हा काय होतं वगैरे मूलभूत प्रश्न उपस्थित करणारं नाट्यपूर्ण स्वगत (ड्रॅमॅटिक मोनोलॉग) म्हणजे गिरीश कार्नाड लिखित इंग्रजी नाटक ‘फ्लावर्स’. हे एकपात्री नाटक ‘रेज प्रॉडक्शन्स’ या मुंबर्इस्थित नाट्यसंस्थेनं सादर केलं आहे.
गिरीश कार्नाडांच्या ‘हयवदन’, ‘नागमंडळ’ वगैरे नाटकांप्रमाणेच ‘फ्लावर्स’लासुद्धा एका लोककथेचा आधार आहे. यातील कथानक कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग या गावात घडतं. यात एक मध्यमवयीन ब्राह्मण पुजारी आहे, त्याची पत्नी आहे आणि चंद्रावती गणिका आहे. हा पुजारी शिवाचा भक्त आहे. मंदिरात एक भलंथोरलं शिवलिंग आहे. हेसुद्धा प्रतीकात्मक ठरतं. हा ब्राह्मण जर वैष्णव पुजारी दाखवला असता तर पुजाऱ्याची अतृप्त वासना व्यक्त करणं अवघड झालं असतं.
हा पुजारी शिवाची मनोभावे सेवा करत असतो. एक मोठा शिवभक्त म्हणून त्याचं पंचक्रोशीत नाव असतं.
अशाच एका महाशिवरात्रीच्या सोहळ्यात त्याची नजर चंद्रावती या गणिकेवर पडते आणि त्याच्या भावजीवनात खळबळ माजते. त्याच्या वासना जागृत होतात. एका रात्री तो असह्य होऊन तिच्या घरी जातो. चंद्रावतीला जे काय समजायचं ते समजतं. ती पुजाऱ्याला घरात घेते. अशा गोष्टी लपून राहणं शक्यच नसतं. त्या षटकर्णी होतात. पुजाऱ्याच्या पत्नीपर्यंत पोहोचतात. पण ती एका शब्दानं पुजाऱ्याला विचारत नाही. स्वतःची कर्तव्यं तितक्याच मनःपूर्वकेतेनं करत राहते. ज्या काळात हे कथानक घडतं, तो सरंजामशाहीचा काळ असल्यामुळे असे प्रश्न विचारण्याचा स्त्रियांना हक्क नव्हता, हेसुद्धा आपसूकच अधोरखित होतं. यथावकाश गावावर सत्ता असलेला क्षत्रिय पुरुष परत येतो आणि आपोआपच पुजाऱ्याचं चंद्रावतीकडे जाणं बंद होतं.
या दीडतासाच्या एकपात्री प्रयोगाला तसं बंदिस्त कथानक नाही. पण जे प्रेक्षकांसमोर येतं, ते मात्र खूप अंतर्मुख करणारं आहे. शिवाय या नाटकाचा प्रयोग फारच वेगळ्या पद्धतीनं उभा केला आहे. प्रेक्षक नाट्यगृहात शिरतात, तेव्हा सर्वत्र त्यांना उदबत्त्यांचा वास येतो. एका क्षणात प्रेक्षक शंकराच्या देवळात जातात. रंगमंचाच्या मधोमध शिवलिंग ठेवलेलं असतं. रंगमंचाच्या मधोमध एक मोठं भांडं असतं, ज्यात ताजी फुलं ठेवलेली असतात आणि त्यामागे मोठं फुलांनी झाकलेलं शिवलिंग असतं. रंगमंचाच्या वर एक भलीथोरली फळी लटकत असते. यावर पुजारी बसलेला असतो आणि तेथूनच तो स्वतःची गोष्ट सांगतो.
या मंचीय मांडणीतील नावीन्य खिळवून ठेवणारं आहे. हे नाटक नटाची परीक्षा पाहणारं आहे. यात नटाच्या शरीराच्या हालचालींच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्यावर स्वाभाविक बंधनं येतात. नटाला रंगमंचावर कुठेही फिरता येणार नाही. फिरणं तर दूर, त्याला उभं राहून प्रेक्षकांशी संवाद साधता येणार नाही. फक्त आवाजातील चढउतार, चेहऱ्यावरील हावभाव व प्रसंगी पाणावलेले डोळे या आधारावर पुजारी झालेले रजीत कपूर प्रेक्षकांना दीडतास खिळवून ठेवतात.
या नाटकात प्रकाशयोजना हा अतिशय महत्त्वाचा नाट्यघटक आहे. प्रकाशयोजनाकार अर्घ्या लाहिरी यांनी या नाटकात कमाल केली आहे. मुळात नाटक एका मंदिरात घडत असल्यामुळे रंगमंचावर अंधार जास्त असेल, हे गृहीत धरावं लागतं. लाहिरींनी प्रसंगांचं गांभीर्य व गरज लक्षात घेत प्रकाशयोजनेत केलेल्या बदलांमुळे नाटक वेगळीच उंची गाठतं.
प्रसंगांच्या गरजेनुसार रजीत कपूरवर बसलेले असतात आणि त्याखाली असलेल्या शिवलिंगावर प्रकाश गरजेनुसार कमी-जास्त होतो. हे सूचन खूप कल्पक आहे. प्रकाशयोजनेप्रमाणेच या नाटकात पार्श्वसंगीताला खूप महत्त्व आहे, ज्याची जबाबदारी अमीत हेरी यांना सांभाळली आहे. त्यांनी देवळात घडत असलेलं कथानक लक्षात घेत अनेक प्रसंगांत योग्य वाद्यांचा वापर करत नाटकाचा आशय प्रेक्षकांपर्यत पोहोचला आहे. दिग्दर्शक रोस्टन आबेल यांनी या नाटकासाठी फार बारकार्इनं विचार केल्याचं जाणवतं.
हे नाटक अगदी वेगळं आहे, यात पारंपरिक नाटकांत असते तशी मांडणी नाही, नाट्यपूर्ण प्रसंग नाहीत. आहे ती एक जबरदस्त नैतिक आशय असलेली कथा, जी एका पात्राच्या मुखातून प्रेक्षकांपर्यंत न्यायची आहे.
आजच्या भारतीय रंगभूमीवर एक महत्त्वाचं नाव म्हणजे रोस्टन आबेल हे मध्यमवयीन गृहस्थ. रोस्टन यांनी १९९४ दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्यकलेचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी एखादा ध्यास घेतल्यासारखा शेक्सपिअरची नाटकं सादर केली. आता त्यांनी ‘फ्लावर्स’चं दिग्दर्शन केलं आहे. अशा नाटकाचं दिग्दर्शन करणं तसं अवघड काम होतं. कोणताही एकपात्री प्रयोग यशस्वी व्हायचा असेल तर त्यातील एकमात्र पात्राला दिग्दर्शक भरपूर हालचाली देतो, त्या पात्राला रंगमंचावर सतत हालत/ डोलत ठेवतो, जेणेकरून प्रेक्षकांचं लक्ष त्या पात्रावर खिळलेलं राहिल. यशस्वी एकपात्री प्रयोगाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रयोगाची संहिता सहसा विनोदी असायला हवी. मराठीत लोकप्रिय ठरलेले एकपात्री प्रयोग म्हणजे पु.लं.ची ‘बटाट्याची चाळ’, गुरुनाथ कुलकर्णींचं ‘मी अत्रे बोलतोय’ आणि कै. प्रा. लक्ष्मण देशपांडेंचं ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’. या तिन्ही एकपात्री प्रयोगांतील समान दुवा म्हणजे हे तिन्ही प्रयोग तुफान विनोदी होते.
एकपात्री प्रयोग यशस्वी होण्याचे जे दोन निकष वर दिले आहेत, त्यातील एकही ‘फ्लावर्स’ला लागू होत नाही. रजीत कपूरला काहीही हालचाल नाही. शिवाय नाटकात एकही विनोद नाही. असं असूनही ‘फ्लावर्स’चा प्रयोग कमालीचा यशस्वी होतो. यात जसं गिरीश कार्नाडांच्या जबरदस्त संहितेचं यश आहे, तसंच ‘रेज प्रॉडक्शन्स’नं उभी केलेली कर्तृत्ववान रंगकर्मींच्या टीमचंही आहे.
यात विशेष उल्लेख करावा लागतो तो रजीत कपूर यांच्या अप्रतिम अभिनयाचा. हा गुणी नट गेली अनेक वर्षं मुंबर्इतील इंग्रजी व हिंदी रंगभूमीवर वावरत आहे. त्यांच्या रंगभूमीवरील अभिनयाची चुणूक १९९० च्या दशकात आलेल्या ‘आर देअर एनी टायगर्स इन कोंगो?’ या इंग्रजी नाटकात दिसून आली होती. त्यानंतर त्यांच्या अभिनयाचा आलेख चढा राहिला आहे.
‘फ्लावर्स’ त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरेल असा आहे. ‘फ्लावर्स’मधील पुजाऱ्याची नैतिक, शारिरीक घुसमट रजीत कपूर यांनी केवळ आवाजातील चढउतार व डोळ्यांच्या हालचाली यातून व्यक्त केली आहे. त्यांनी या नाटकातील काही प्रसंग तर डोळ्यांत येत असलेलं, पण प्रचंड शक्ती वापरून पुजाऱ्यानं रोखून धरलेलं पाणी, यातून व्यक्त केले आहेत. ते अप्रतिम आहेत.
या नाटकाबद्दल फक्त एकच बारीकशी तक्रार संहितेबद्दल आहे. गिरीश कार्नाडांनी हे नाटक हिंदीत लिहायला हवं होतं. ‘फ्लावर्स’चा आत्मा भारतीय परंपरेतला आहे. या नाटकातील प्रतिमासृष्टी भारतीय आहे. उदाहरणार्थ शिवलिंग पूजा, त्यासाठी लागणारी निरनिराळी फुलं, उदबत्त्या, आरत्या वगैरे हे सर्व एवढं भारतीय धार्मिक जीवनाशी संबंधित आहे की, या सर्वांचे इंग्रजीतून आलेले उल्लेख खटकत राहतात. इंग्रजीऐवजी जर संहिता हिंदीत असती तर प्रेक्षक जास्त चटकन नाटकाशी एकरूप झाले असते
यू. आर. अनंतमूर्ती यांची ‘संस्कार ही कादंबरी, गिरीश कार्नाड यांची ‘हयवदन’, ‘नागमंडळ’ इत्यादी नाटकं, गिरीश कासारवल्लींचा ‘घटश्राद्ध’ हा सिनेमा, या कन्नडभाषिक कलाकारांनी भारतीय परंपरांचा व लोकजीवनाचा वेध घेण्याचा लक्षणीय प्रयोग केला. त्या प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘फ्लावर्स’. वाकडी वाट करून हा देखणा व विचारप्रवर्तक प्रयोग बघावा.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 05 March 2018
एव्हढा अत्युच्च दर्जाचा नाट्यानुभव देऊन काय दाखवलं तर मंदिरातला पुजारी वासनेने लिडबिडलेला आहे. प्रत्यक्षात कितीतरी बलात्कारी मौलवी आणि पाद्री सापडलेत. पाश्चात्य देशांत नियमितपणे चर्चचे अधिकारी अशा लफड्यांत सापडंत असतात. मदरसे सुद्धा लैंगिक शोषणाची केंद्रे झाली आहेत. इस्लाममध्ये पत्नीस तलाक दिल्यावर परत तिच्याशी लगेच लग्न लावता येत नाही. प्रथम तिला निक्का-हलाला नामक तात्पुरता विवाह करावा लागतो. मौलवी पैसे घेऊन स्वत:शी निक्का हलाला लावतात. पैसे तर मिळतातच वर स्त्री देखील उपभोगायला मिळते. हे सर्व प्रत्यक्षांत घडतंय. ते दाखवायचं सोडून कर्नाड साहेब काय दाखवतात, तर कसलाही शेंडाबुडखा नसलेली काल्पनिक पुजाऱ्याची काल्पनिक वासना! वस्तुस्थितीशी नाळ जोडलेलं नाटक कधी दाखवणार हे लोकं! फाटते की काय? -गामा पैलवान