'आम्ही दोघी' : अनोख्या नात्यांचा 'भाव' नजराणा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'आम्ही दोघी'चं एक पोस्टर
  • Sun , 25 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie आम्ही दोघी Aamhi Doghi मुक्ता बर्वे Mukta Barve प्रिया बापट Priya Bapat

मानवी नातेसंबंधांचं गूढ वेळोवेळी प्रकट होत असतं. ते उकलणं तसं खूप अवघड जातं. परंतु अनेकदा नातेसंबंध संपुष्टात येण्याच्या वेळीच त्यातील हळुवारपणा, त्यातील गोडवा हळूहळू लक्षात येऊ लागतो. मात्र तोपर्यँत खूप उशीर झालेला असतो. आणि मागे उरतो तो फक्त आठवणींचा इतिहास. अर्थात अशा आठवणी मनात घर करून बसतात त्या कायमच्या. प्रतिमा जोशी दिग्दर्शित 'आम्ही दोघी' या नवीन मराठी चित्रपटात अशाच नातेसंबंधांच्या आठवणींचा 'जागर' पाहायला मिळतो.

आगळीवेगळी कथा आणि कलाकारांचे उत्कट अभिनय, यामुळे या 'आम्ही दोघी' चांगल्या लक्षात राहतात. या 'आम्ही दोघी' कोण? तर नायिका आणि तिची सावत्र आई. त्यांच्यातील अनोख्या नात्यांची भावपूर्ण कहाणी नायिकेच्या निवेदनात्मक पद्धतीनं पडद्यावर साकारण्यात आली आहे. 'सावी' (सावित्री सरदेसाई- प्रिया बापट) ही कोल्हापुरातील एका श्रीमंत वकिलाची एकुलती एक मुलगी.

तिचे वडील अप्पासाहेब (किरण करमरकर) हे सतत अशिलांच्या गराड्यात. त्यामुळे सावीसाठी त्यांच्याकडे हवा तेवढा वेळ नाही. त्यातच सावीची आई लहानपणीच गेलेली. आणि आप्पाही दुसरं लग्न करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे आईविना वाढत असलेली सावी काहीशी स्वतंत्र, बिनधास्त आणि व्यवहारी विचाराची बनते. अप्पांचा धाक सहन होत नसल्यामुळे त्यांच्याबद्दलही तिच्या मनात हळूहळू तिरस्काराची भावना निर्माण होते. त्यातच एके दिवशी अप्पा अचानक लग्न करून आपल्या नव्या पत्नीसह घरी येतात. सावीला त्याचा धक्का तर बसतोच, पण प्राप्त परिस्थितीतही ती नव्या आईला स्वीकारते.

'अम्मी' (अमला- मुक्ता बर्वे) हे तिच्या सावत्र आईचं नाव. ही अम्मी, फारशी न शिकलेली, अबोल आणि पिचलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे आपलं अस्तित्वही न जाणवू देणारी अशी असते. त्यामुळे सावीचा स्वभाव आणखीनच आक्रमक आणि बंडखोर बनतो. आपल्या वकिलीचा वारसा सावीनं चालवावा, अशी आप्पांची इच्छा असते. मात्र सावी त्याला स्पष्टपणे नकार देऊन मुंबईला पुढील शिक्षणासाठी निघून जाते. काही दिवसांनी अप्पांचं निधन होतं आणि एकाकी पडलेली अम्मी सावीकडे कायमचं राहण्यासाठी म्हणून मुंबईला येते आणि त्यावेळी सावीला तिचं खरं अंतरंग कळतं. मात्र तोपर्यंत अर्थातच खूप उशीर झालेला असतो. तो कसा त्यासाठी 'आम्ही दोघी' पडद्यावरच पाहायला हवा.

गौरी देशपांडे यांच्या एका कथेवर हा चित्रपट आधारित आहेत. भाग्यश्री जाधव यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. चित्रपटाच्या कथानकाचा काळ लक्षात घेता त्याबाबत मात्र थोडासा गोंधळ उडतो. सुरुवातीला म्हणजे चित्रपटाच्या मध्यंतरापूर्वी सावीच्या लहानपणापासून जेव्हा कथा सुरू होते, तेव्हा तो काळ नाही म्हटलं तरी जुना वाटतो. अप्पांचा स्वभाव, त्यांचं सरंजामी थाटातील वागणं, तसंच अम्मीचं राहणीमान आदी गोष्टी या जुन्या काळातील चालीरीतीप्रमाणे वाटतात. त्याच काळात वाढत असलेली सावी मात्र आपल्या बंडखोर, आक्रमक आणि स्वतंत्र विचारसरणीच्या स्वभावामुळे एकदम आधुनिक वाटते.

मुंबईत गेल्यानंतर तर ती फारच आधुनिक विचारसरणीची बनते. ती इतकी की, प्रेम ही संकल्पना तिला मान्य होण्यासारखी असली तरी तिला विवाहाचं बंधन आवडत नाही. त्यामुळे राम या आपल्या प्रियकराबरोबर अनेक दिवस एकत्र राहूनही ती त्याच्याबरोबर विवाह करायला तयार होत नाही. मात्र शेवटी राम गुपचूपपणे दुसऱ्याच मुलीबरोबर विवाह करून येतो, तेव्हा मात्र तिला वाईट वाटतं. यानिमित्तानं सावी आणि राम यांच्यातील या अनोख्या नात्यांचं भावदर्शन पडद्यावर पाहायला मिळतं. अतिशय व्यवहारी जीवन जगताना आपण, आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तींचं अंतरंग मात्र ओळखू शकलो नाहीत, याची टोचणी मात्र सावीला लागून राहते.

त्याबाबतच्या आपल्या भावना व्यक्त करताना सावीचे अनेक संवाद हे पुस्तकी थाटातले वाटतात. अप्पा कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत अम्मीशी लग्न करतात, याचं गूढ अगदी शेवटी उकलून दिग्दर्शिकेनं सावी आणि अम्मी यांच्यातील अनोख्या नातेसंबंधांचे भाव आणखीनच गडद केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वैशाली माडेनं गायिलेलं चित्रपटातील एकमेव गीत कथेला पूरक वाटतं. मिलिंद जोग यांचं उत्कृष्ट छायाचित्रण हीदेखील या चित्रपटाची जमेची बाजू आहे. 

कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास या कथेतील व्यक्तिरेखांसाठी कलाकारांची  झालेली निवड अतिशय परिपूर्ण ठरली आहे. प्रिया बापटनं, आधुनिक विचारसरणीची आणि परिस्थितीमुळे बंडखोर बनलेली सावी अतिशय उत्कटतेनं रंगवली आहे. शाळकरी वयातही ती चांगली शोभून दिसली आहे. तर आपली अस्तित्वहीन भूमिका अस्तित्वपूर्ण करण्याची किमया मुक्ता बर्वेनं आपल्या सहजसुंदर अभिनयानं उत्तम पार पाडली आहे. किरण करमरकर यांनीही अप्पांच्या रूपात कर्तव्यकठोर बापाची भूमिका चांगली निभावली केली आहे. भूषण प्रधान (राम), आरती वडगबाळकर (स्नेहा- सावीची मैत्रीण) प्रसाद बर्वे यांच्याही भूमिका चांगल्या झाल्या आहेत.

आगळी कथा आणि प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयासाठी तरी ‘आम्ही दोघी’ पहायला हवा. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख