'राक्षस' : रहस्यमय आहे खरा, मात्र खुर्चीला खिळवून ठेवत नाही
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी    
  • 'राक्षस'चं एक पोस्टर
  • Sat , 24 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie राक्षस Raakshas सई ताम्हणकर Sai Tamhankar शरद केळकर Sharad Kelkar ऋजुता देशपांडे Rujuta Deshpande

एखादी गोष्ट सांगत असतानाच त्या गोष्टीच्या कथानकाबरोबरच चित्रपटाची कथा पडद्यावर साकार करायची ही कल्पना खरोखरच खूप चांगली आहे. त्यादृष्टीनं ‘राक्षस’ या नवीन मराठी चित्रपटाच्या संकल्पनेचं स्वागतच करायला हवं. मात्र उत्तम कथानक असूनही सादरीकरणासाठी आवश्यक असलेली पटकथा आखीव-रेखीव नसेल तर पडद्यावर त्या कथानकाचा फारसा प्रभाव पडत नाही. या चित्रपटाचं नेमकं हेच झालं आहे. उत्तम कथानक, चांगले कलाकार आणि कथानकाला अतिशय पोषक असे स्थळप्रसंग असूनही या चित्रपटातील गोष्टीतला 'राक्षस' आणि त्याचं रहस्य गोष्टीतच दडून राहिलं आहे. 

आदिवासींचं जंगलावर असलेलं प्रेम आणि जंगल वाचवण्यासाठी त्यांनी सुरू केलेला लढा, हा चित्रपटाचा विषय वर्तमानकाळाशी सुसंगतच असा आहे. त्याला रहस्याची जोड देऊन पडद्यावर हा ‘राक्षस’ साकारण्यात आला आहे. 

जंगल बचावासाठी सुरू झालेल्या या आदिवासींच्या आंदोलनावर लघुपट काढण्यासाठी म्हणून गेलेला अविनाश (शरद केळकर) हा मुंबईतील तरुण एकाएकी बेपत्ता होतो. त्याचा शोध घेण्यासाठी त्याची पत्नी इरावती (सई ताम्हणकर) आपल्या आरू (ऋतुजा देशपांडे) नावाच्या लहान मुलीसह अविनाश जिथं उतरलेला असतो, त्या वनखात्याच्या विश्रामगृहावर येते. त्याच्या आधी एकदा अविनाश आरूला घेऊन याच विश्रामगृहावर आलेला असतो. त्यावेळी आरूला एका झाडाच्या ढोलीत एक जुनं पुस्तक सापडलेलं असतं. त्या पुस्तकात जंगलात राहणाऱ्या एका राक्षसाची गोष्ट असते.

त्या देशाचा राजा एकदा त्या जंगलात आलेला असताना राक्षस त्याला गिळून टाकतो. त्याच्या सुटकेसाठी राजकन्या जंगलात येते. तिथं तिला जादूगार भेटतो आणि त्याच्या मदतीनं ती आपल्या वडिलांची सुटका करते, अशी ती कथा असते. पुस्तकातील राक्षसाची ही रूपक कथा डोळ्यासमोर ठेवून आरू आपल्या बेपता वडिलांचा शोध घेण्याचे ठरवते.

आरुलाही जंगलात असाच एक मांत्रिक भेटतो, तो तिला काही कोडी घालून त्याची समर्पक उत्तरं आणून दिल्यास राक्षस जागा होईल आणि तुझ्या वडिलांचा पत्ता कळेल असं सांगतो. त्याप्रमाणे आरू त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून काढते. तर तिकडे इरावती परसू या आणखी एका आदिवासी तरुणाच्या मदतीनं अविनाशच्या शोध घेण्याचा प्रयत्न करते. शेवटी अविनाशचा शोध घेण्यात कोण यशस्वी होतं? त्यासाठी प्रत्यक्ष चित्रपट पाहायला हवा. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383

.............................................................................................................................................

दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी कथेबरोबरच पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. एकाच वेळी रूपक कथा सांगताना त्याचबरोबर वर्तमानकाळातील कथा पडद्यावर साकारण्याची त्यांची कल्पना स्तुत्य आहे. मात्र पटकथेवर अधिक लक्ष देण्याची गरज होती, हे चित्रपट पाहताना सतत जाणवत राहतं.

जंगलतोड करून उभारण्यात येणाऱ्या कंपनीला विरोध करण्यासाठी आदिवासींनी सुरू केलेल्या या आंदोलनाला नक्षली लढ्याचीही किनार आहे. कंपनीला विरोध करणारा भिरा (उमेश जगताप) हा आदिवासी आणि अविनाशची चांगली मैत्री झालेली असते. मात्र तो आक्रमक असल्यामुळे त्याचे आणि नक्षलवाद्यांशी संबंध असावेत असा पोलिसांचा संशय असतो. परिणामी तो बनावट चकमकीत मारला जातो, तर अविनाश बेपत्ता होतो, ही गुंतागुंत मात्र पडद्यावर ‘गुंतागुंत’च राहते. तिची उकल चांगल्या पद्धतीनं करता आली असती, तर चित्रपट प्रभावी होण्यास मदत झाली असती.

याशिवाय विश्रामगृहावर उतरलेल्या आरूनं रात्री-अपरात्री जंगलात जाणं आणि त्याचा तिच्या आईला थांगपत्ता न लागणं, किंबहुना राक्षसाच्या कथेनुसार मांत्रिक सांगेल, त्याप्रमाणे वागणाऱ्या आपल्या मुलीबाबत ती पूर्णपणे अनभिज्ञ राहणं या बाबी खटकतात. तसंच रहस्याला पोषक असणारं पार्श्वसंगीतही आणखी गडद हवं होतं. मात्र राक्षसाची कथा आणि त्याला पोषक असणारे जंगलातील विविध स्थळप्रसंग मात्र उत्तम वठले आहेत. त्यासाठी छायालेखक मयूर हरदास यांचं कौतुक करायला हवं.  

आरू या लहान मुलीचं पात्र ही या चित्रपटाच्या कथेतील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. ऋतुजा देशपांडे हिनं अतिशय आत्मविश्वासानं ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सई ताम्हणकरनं इरावतीची भूमिका पत्नी आणि आई अशा दुहेरी भूमिकेतून प्रभावीपणे सादर केली आहे. त्यामानानं शरद केळकरांची भूमिका छोटी असून ती त्यानं आणखी प्रभावीपणे रंगवणं आवश्यक होतं. उमेश जगताप, विजय मौर्य (पोलीस इन्स्पेकटर), पूर्णानंद वांढेकर (जीपचालक), विठ्ठल काळे (परसू ), याकूब सईद (मांत्रिक) आदी अन्य कलाकारांच्या  भूमिका उत्तम वठल्या आहेत. 

हा 'राक्षस' रहस्यमय आहे खरा, मात्र तो खुर्चीला खिळवून ठेवू शकत नाही.    

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख