अजूनकाही
सचिन कुंडलकर यांच्या चित्रपटांकडे कितीही ठरवलं तरी मला त्रयस्थपणे पाहता येत नाही. 'कोबाल्ट ब्लू' ही कादंबरी, नाटकं, लेखन आणि चित्रपट या सगळ्यांच्याच मी एका विशिष्ट वयापासून प्रेमात आहे. त्यामुळे 'गुलाबजाम'ची मी वेड्यासारखी वाट पाहत होतो आणि आज चित्रपट पाहिल्यानंतर ते वाट पाहणं सार्थकी लागलं! म्हणजे असं की, एखादी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप असावी आणि सतत चॅटरूमवर बोलणं व्हावं, आपण प्रत्यक्ष भेटीची कल्पना करत प्राण कंठाशी आणून त्या व्यक्तीची वाट पाहावी आणि 'न भूतो, न भविष्यति' इतकी अविस्मरणीय ती भेट व्हावी असं... टीझर पाहिल्यानंतर ट्रेलरची उत्सुकता आणि ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची... आणि चित्रपट संपल्यानंतर सुग्रास भोजनाचा आनंद घेतल्यावर समाधानानं पानावरून उठल्याची भावना...
चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासूनच सचिनच्या सौंदर्यदृष्टीला मनापासून कुर्निसात करावासा वाटतो. ज्या सुंदर पद्धतीनं कलाकारांची नावं आणि इतर नावं पडद्यावर झळकतात, त्या कल्पकतेला तोड नाही. मिलिंद जोग यांच्या छायाचित्रणाचं करावं तेवढं कौतुक थोडंच. सचिनच्या 'निरोप', 'रेस्टॉरंट', 'वजनदार' या सिनेमांना लाभलेला मिलिंदचा परीसस्पर्श 'गुलाबजाम'मध्ये एक वेगळीच किमया साधतो. पडद्यावरचे सर्व खाद्यपदार्थ जसे दिसले आहेत, ते पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. राधाच्या घरातलं कोंदटलेपण आणि नंतर तिचं भावविश्व फुलत जाताना दिसणारी प्रकाशित दृश्यं, हा सगळा भावभावनांचा तरल खेळ मिलिंदच्या कॅमेऱ्यानं अचूक टिपला आहे.
आदित्य नाईकला लंडनमध्ये मराठी पदार्थांचं रेस्टॉरंट सुरू करायचंय. त्याची भेट होते पुण्यातल्या चाळीशीकडे झुकलेल्या राधा आगरकरशी. स्वयंपाक शिकण्यासाठी राधाची मिन्नतवारी करणाऱ्या आदित्यला कुणालाही आपल्या जगात प्रवेश न करू देणारी राधा आपला शिष्य बनवून घेते का, तिचा स्वभाव असा विचित्र का, आदित्य राधाच्या मनाची तटबंदी फोडून तिच्याशी मैत्री करण्यात यशस्वी होतो का, याची ही कथा. फूड फिल्म असली तरी प्रत्यक्षात मानवी नातेसंबंधांची वीण हा चित्रपट अलगद उलगडून दाखवतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही चित्रपट रेंगाळत नाही.
केळीच्या पानावर पदार्थ सजवावेत, त्याच नजाकतीनं चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सजली आहे. सोनाली कुलकर्णीनं सचिनच्याच 'रेस्टॉरंट'मध्ये जेनीची मुख्य भूमिका केली होती. त्यातही तिनं प्राण ओतला होता. 'गुलाबजाम'ची राधा आगरकर मात्र सोनालीची तिच्या आजवरच्या कारकीर्दीतली सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणायला हरकत नाही. आदित्यशी सुरुवातीला तुसडेपणानं वागणारी राधा, नंतर त्याला आपला भूतकाळ सांगणारी केविलवाणी राधा, निरोपाची वेळ येऊन ठेपल्यावर उदास होणारी राधा, हा सगळा तिच्या व्यक्तिरेखेचा ग्राफ सोनालीनं ज्या सहजतेनं पडद्यावर रंगवला आहे, त्यासाठी हॅट्स ऑफ. सिद्धार्थ चांदेकरनं रंगवलेला आदित्यही तितकाच ग्रेट. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हट्टाला पेटलेल्या आदित्यच्या डोळ्यांतील भाव कलिजा खलास करतात. चटपटीत स्वभावाच्या आदित्यच्या आयुष्याला असलेली दुःखाची किनार सिद्धार्थ चांदेकरनं उत्तमरीत्या पेश केली आहे.
अमित दिवेकर यांच्या वेशभूषेनं 'राजवाडे अँड सन्स'प्रमाणेच याही चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. थाईकुड्डम ब्रीज या बँडचं संगीत, देबार्पितो साहा यांचं पार्श्वसंगीत चित्रपटाचा मूड शेवटपर्यंत सांभाळतात. कथा सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांची आहे. कथेतली धक्कादायक वळणं सचिनच्या दिग्दर्शनानं अप्रतिम साकार झाली आहेत. चित्रपटातील इतर कलाकारांचाही अभिनय तोडीस तोड झाला आहे. काही सरप्राईझ पॅकेजेस आहेत. गुलाबजामच्या जोडीनं पंगतीची लज्जत आणखी वाढवण्यासाठी. त्याबद्दल इथं लिहून रसभंग करत नाही.
दिग्दर्शनाबाबत बोलायचं झालं तर मला हा चित्रपट म्हणजे सचिनच्या सौंदर्यदृष्टीचा कळसाध्याय वाटतो. 'रेस्टॉरंट', 'निरोप', 'गंध', 'हॅपी जर्नी', 'राजवाडे अँड सन्स', 'वजनदार' या सगळ्या चित्रपटांत एक समान सूत्र आहे, जे 'गुलाबजाम'मध्येही दिसतं. आणि तरीही हा चित्रपट वरचढ ठरतो. सचिनच्या चित्रपटांतील पात्रं पळून जात असतात कुठेतरी. कुणालाही न सांगता गायब होत असतात. आत्महत्येच्या सीमारेषेवर रेंगाळत असतात. मळलेली वाट सोडून आत्मशोधाच्या प्रवासाला निघालेली असतात. आदित्य आणि राधाची कथाही अशीच.
पिवळ्या रंगात बुडालेला ब्रश पाण्यात बुचकळावा आणि नंतर तोच निळ्या रंगात बुडवून पुन्हा पाण्यात बुचकळावा... आणि मग पाण्यातले पिवळ्या आणि निळ्या रंगाचे कण एकमेकांत मिसळून जाऊन पाणी हिरवं होऊन जावं, तितक्या सहजपणे आदित्य आणि राधाचं आयुष्य, त्यांची आपापली वेगवेगळी ठसठसती वेदना एकमेकांत मिसळून जाते. मनाभोवती घट्ट तटबंदी उभारलेली आणि त्यात कुणालाही प्रवेश करू न देणारी माणसं, हाही सचिनच्या चित्रपटांचा विशेष. पण कुठेही अशा माणसांवर कसलंही लेबल न लावता, प्रेमानं त्यांच्या विश्वात प्रवेश करत त्यांच्या धमन्यांतून कोणतं रक्त वाहत आहे, हे सहजपणे जाणून घेणारा आदित्य या चित्रपटात वेगळा ठरतो. क्षणभर त्यावेळी 'हॅपी जर्नी'मधली निरंजनला कोषातून बाहेर काढणारी जानकीही आठवते. तरीही आदित्य आणि राधाचं नातं वेगळंच. शब्दातीत.
जेवण बनवणं आणि खाऊ घालणं ही सचिनची पॅशन आहे, हे त्यांनीच बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. या पॅशनचं रूपांतर 'गुलाबजाम'च्या निमित्तानं चित्रपटात झाल्याचं पदोपदी जाणवतं. सचिनच्या थेट काळजातून आलेला हा चित्रपट म्हणूनच भिडतो. त्यांचं चित्रपटांवरचं निस्सीम प्रेमही काही प्रसंगांतून जाणवतं. काही वर्षांपूर्वी अरुणा शानभागचं निधन झाल्यावर सचिननं एका वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता. त्याचेही पडसाद चित्रपटात जाणवतात. मानवी नातेसंबंध ज्या मोजक्या भारतीय दिग्दर्शकांना नेमके कळले आहेत, त्यांच्या यादीत सचिनचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. म्हणूनच 'गुलाबजाम' हा नक्कीच यावर्षीचा सर्वांत ‘टेस्टी चित्रपट’ आहे, याबद्दल दुमत नाही.
.............................................................................................................................................
लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ramya savji
Sun , 11 March 2018
फडतूस सिनेमा आहे. परदेशातले कॅमेरा अँगल चोरून साठच्या दशकातील चाकोरीबद्ध लघुकथेसारखी गोष्ट सांगण्याचे सचिन कुंडलकर यांचे कौशल्य इथेही दिसते. यापेक्षा हेट-स्टॉरी-4 कितीतरी अव्वल आहे, मिस्टर.