अजूनकाही
गेल्या काही वर्षांमध्ये टीव्ही मालिका या जगभरातल्या प्रेक्षकांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. पण भारतातातल्या प्रेक्षकांइतकं त्यात कुणी गुंतत असेल असं मला वाटत नाही. भारतातले प्रेक्षक जणू काही आपण त्या मालिकेतलं एक पात्रच आहोत इतक्या तन्मयतेनं मालिका बघतात, त्यावर चर्चा करतात.
आपल्याकडे दैनंदिन मालिका सुरू झाल्या त्याला काही वर्षं लोटली. त्याआधी आठवड्यातून एक दिवस मालिका असत. ‘हमलोग’ ही आद्य अशी दूरदर्शन मालिका म्हणता येईल. तो एक कौटुंबिक ड्रामा होता. शिवाय प्रत्येक भागाच्या अखेरीला अशोककुमारांचं निरूपण हे तिचं खास वैशिष्ट्य होतं. ‘हमलोग’नं लोकांना मालिकांची चटक लावायला सुरूवात केली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. ‘हमलोग’मधले दादाजी, दादीजी, बडकी, मंझली, छुटकी, लल्लू, नन्हे, प्रिन्स या पात्रांनी लोकांच्या मनात घर केलं. ही पात्रं जणू काही आपल्याच घरातली आहेत असं लोकांना वाटायला लागलं. त्यानंतर काही वर्षांनी भारत-पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित ‘बुनियाद’ ही मालिका आली. या मालिकेनंही लोकप्रियतेचा कळस गाठला. आज या मालिका बघितल्या तर त्यातल्या तांत्रिक त्रुटी डोळ्यांना खटकतात. या मालिका खूप संथ गतीच्या वाटतात, पण तेव्हा दुसरा काही पर्याय उपलब्धच नव्हता. त्यामुळे या मालिका लोकप्रिय ठरल्या. ‘रजनी’, ‘भारत - एक खोज’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘खानदान’, ‘सत्यजित रे प्रेझेंट्स’, ‘करमचंद’, ‘ये जो है जिंदगी’ यासारख्या मालिकाही खूप गाजल्या.
काही वर्षांनी जेव्हा इतर वाहिन्या स्पर्धेत उतरल्या तेव्हा प्रेक्षकांना वेगळे पर्याय उपलब्ध झाले. झी टीव्हीची ‘तारा’ ही पहिली गाजलेली मालिका. त्यानंतर ‘बनेगी अपनी बात’, ‘हम पंछी एक डाल के’ यासारख्या मालिका आल्या. पण या सगळ्या मालिका साप्ताहिक होत्या. १९९९-२००० मध्ये दूरदर्शननं पहिली दैनंदिन मालिका सुरू केली ती म्हणजे ‘शांती’. वेगवेगळ्या प्रकारचं रेखीव कुंकू लावलेली, कुरळ्या केसांची मंदिरा बेदी आपल्याला आठवत असेलच. त्यानंतर स्टार प्लसनं ‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी घर घर की’ या दोन दैनंदिन मालिका सुरू केल्या. आणि पुढे जे काही घडलं तो केवळ इतिहास आहे.
या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांना जणू वेड लावलं. सुरुवातीच्या काळात आठवड्यातून चार दिवस असलेल्या या मालिका हळूहळू आठवड्यातून सहा दिवस दाखवल्या जायला लागल्या. तोपर्यंत मराठी वाहिन्यांचाही सुकाळ झाला होता. हिंदीत स्टार प्लस, झी, सोनी या वाहिन्या होत्याच. काही वर्षांनी त्यांच्या जोडीला कलर्स, स्टार वन, झी अनमोल अशा वाहिन्याही आल्या. मराठीत झी, आधीचं इटीव्ही आताचं कलर्स मराठी, स्टार प्रवाह अशा वाहिन्या आल्या. या वाहिन्यांवर आधी मालिका वगळता इतरही मनोरंजक कार्यक्रम असायचे, पण नंतर मात्र त्यांनी ते कार्यक्रम केवळ शनिवार-रविवारपुरतेच मर्यादित केले आणि सगळा जोर दैनंदिन मालिकांवर दिला.
दैनंदिन मालिकांमुळे झालं काय की, जो वयस्कर प्रेक्षक आहे त्याचा कंटाळा कमी झाला. मोबिलिटी कमी झाली असताना आ वासून असलेल्या दिवसाचं काय करायचं हा प्रश्न सोडवला गेला. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात संध्याकाळी सात ते दहा ही ना ती वाहिनी सुरू असते. यावेळातल्या मालिका तर बघितल्या जातातच, पण या मालिका दिवसभरात जितक्यांदा पुन्हा दाखवल्या जातात तितक्यांदा त्या परत बघितल्या जातात. एरवी संध्याकाळी एकमेकांच्या घरी बिनदिक्कतपणे जाणारे लोक आता मालिकांच्या वेळांचा हिशोब करून आपले कार्यक्रम ठरवतात. आमच्या कॉलनीतल्या आज्या रोज संध्याकाळी खाली कट्ट्यावर बसतात, पण मालिकांची वेळ झाली की सगळ्या जणी घाईनं आपापल्या घरी जातात.
मालिकांमध्ये असं काय असतं की, लोक त्यात इतके गुंततात? मला आठवतंय शाळेत असताना ना.सी. फडकेंचा एक धडा आम्हाला मराठीत होता. ललितलेखन (इथे Fiction या अर्थी) माणसाला का आवडतं अशा आशयाचा तो धडा होता. लोकांना प्रत्यक्ष जे करता, वागता येत नाही ते ललित लेखनात त्याला अनुभवायला मिळतं म्हणून त्याला ललितलेखन आवडतं असा काहीसा त्या धड्याचा आशय होता. मालिकांचंही तसंच असेल का? काही प्रमाणात असेलही. पण ज्या अतिरंजित मालिका असतात त्यातलं प्रत्यक्षात काहीतरी खरं असतं का? उदाहरणार्थ झीवरच्या ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत लग्नाच्या विधींच्या वेळी नायक आपल्या बायकोचा हात धरतो आणि त्याला ती गरोदर असल्याचं कळतं. आता ही किती हास्यास्पद गोष्ट आहे? पन्नासच्या दशकातल्या चित्रपटांमध्ये नाडी बघून दिवस गेल्याचं कळलेलं दाखवायचे. पण केवळ नाडी बघून दिवस गेले आहेत की नाही हे सांगणं शक्य आहे का? तर शास्त्रीयदृष्ट्या नाही. पण तरीही नावं ठेवत ठेवत ही मालिका बघितली जातेच.
मालिकांची मोठी गंमत असते. दैनंदिन मालिका असल्यामुळे त्यात रोज काय दाखवणार? मग त्यात रोज नाश्ता, जेवण, चहा हे येतंच. एखादी रेसिपीही येते. पाहणाऱ्या माणसाला आपणही त्यात सहभागी आहोत असं वाटायला लागतं. काही मालिकांमधला एक दिवस तीन-चार दिवसही चालतो. मालिकांमधल्या नायक-नायिका इतकंच नव्हे तर अगदी वयस्कर आई-वडील, आजी-आजोबा यांच्या कपड्यांची फॅशन येते. त्यांच्या केशरचना कॉपी केल्या जातात. मालिकांमधल्या घरांसारखं डेकोर केलं जातं. फर्निचर केलं जातं. तसे रंग घराला दिले जातात. माझा मेव्हणा अजय भाळवणकर झी मराठीचा प्रोग्रामिंग हेड होता. तेव्हा एकदा आमची चर्चा झाली होती. मालिकांमुळे घरांमधली रंगसंगती, फर्निचर हे किती बदललं आहे. लोकांना आता आपली घरं नीटनेटकी कशी ठेवावी वाटतात हे त्यानं सांगितलं होतं. त्यानं ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचं उदाहरण दिलं होतं. या कार्यक्रमात आदेश बांदेकर ज्या घरी जातात त्या घराचं डेकोर बघ असं अजय मला म्हणाला होता. या घरांमधली स्वयंपाकघरं किती नीटनेटकी असतात. घराला चांगले पडदे लावलेले असतात, चांगल्या चादरी घातलेल्या असतात, डायनिंग टेबल असतं. मालिकांचा फार मोठा प्रभाव आपल्या एकूण आयुष्यावर पडलेला दिसतो.
बहुतेक सगळ्या मालिका या स्त्रीप्रधान असतात. कारण या मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग गृहिणी हा आहे. या मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या स्त्रीपात्रांचे प्रकार ठरलेले असतात. एक म्हणजे अगदी गरीब गाय अशी नायिका. उदाहरणार्थ ‘अवघाची संसार’, ‘कुंकू’ या मालिका. दुसरी म्हणजे अगदीच तडकफडक अशी नायिका, जिला सगळ्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची सवय आहे. उदाहरणार्थ ‘होणार सून मी या घरची’मधली नायिका. कजाग सासू आणि प्रेमळ सासू असे स्त्रीपात्रांचे ढोबळ प्रकार करता येतील. मग त्यात कजाग पण प्रेमळ सासू वगैरे उपप्रकारही असतात. पुरुष पात्रांना मालिकांमध्ये बहुधा नगण्य महत्त्व असतं.
मालिका बनवण्यामागे केवढे तरी कष्ट असतात. मालिकेची कथा, पटकथा, संवाद, संगीत यासारख्या किती तरी गोष्टींवर मालिकांचं यश अवलंबून असतं. खरंतर मालिकांचं विश्व एवढं पसरलेलं आहे, त्यात इतक्या लोकांचे हात गुंतलेले असतात. लिहिणारा वेगळा असतो. त्याला प्रत्यक्षात आणणारा दिग्दर्शक वेगळा असतो. अभिनय करणारे वेगळे असतात. संगीत, कॉस्च्यूम्स, सेट, मेकअप अशा किती तरी गोष्टी वेगवेगळे लोक सांभाळत असतात. त्यात चॅनलची गणितं असतात, हस्तक्षेप असतो. रोज चालणाऱ्या मालिकांमधले लोक तर बिचारे सतत दावणीला बांधलेले असतात. हे सगळं आपल्यापैकी बऱ्याच जणांना थोडंफार माहीत असतंच. पण वर म्हटलं तसं त्यात आपण भावनिकदृष्ट्या इतके गुंतलेले असतो की कळतं पण वळत नाही असं होतं.
कित्येक लोक मालिकांच्या या पडद्यामागच्या व्यवहारापासून अनभिज्ञ असतात. पण ज्या लोकांना याविषयी पूर्ण माहिती असते तेही त्यात फार गुंतून जातात. माझंच उदाहरण सांगते. मला मालिका बघायला आवडतं. मला ओळखणारे असे बरेच लोक आहेत की, त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. म्हणजे मालिकांमध्ये दाखवतात ते सगळं खोटं, बरेचदा उथळ असतं हे माहीत असूनही मी त्या कशा बघते असं त्यांना वाटतं. पण मालिका बघणं मला आवडतं हे मान्य करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. ‘होणार सून मी या घरची’ सुरुवातीला मला फार आवडायची. पण नंतर नंतर त्यात पाणी घालून ती वाढवली जायला लागली तेव्हा ती बोअर व्हायला लागली. या मालिकेत आईचं काम करणारी सुहिता थत्ते तेव्हा आमच्या बाजूच्याच कॉलनीत राहायची. ती भेटली की, ‘अग, किती बोअर झालीय तुमची मालिका, बंद करा की!’, असं मी तिला सांगायचे. आता खरं तर मालिका बोअर होते आहे यात सुहिताचा काय दोष? ती फक्त त्यात अभिनय करत होती. ती मालिका लिहीतही नव्हती किंवा दिग्दर्शितही करत नव्हती. मुख्य म्हणजे मला या सगळ्याची जाणीव होती. अभिनय हा सुहिताचा व्यवसाय आहे हे मला कळत असतंच. मालिका बंद झाली तर तिचं आर्थिक नुकसान आहे हेही मला कळत असतं, पण असं असलं तरी हे सांगितल्यावाचून राहावत नाही हेही खरं.
माझा मेव्हणा, अजय आधी तारा, मग झी मराठी नंतर झी हिंदी आणि आता सोनी टीव्हीला आहे. तो सध्या सोनी टीव्हीचा व्हाइस प्रेसिडेंट आहे. मालिकांच्या डे टू डे कामात त्याचा फारसा सहभाग नसतो. असं असलं तरी तो काम करत असलेल्या ज्या वाहिनीवरच्या मालिका मी बघते, त्याचा रिपोर्ट त्याला पोहोचवेतच. जेव्हा मी एखादी मालिका चांगली आहे असं सांगते तेव्हा ती मालिका चालणार नाही असं तो म्हणतो. कारण माझ्यासारख्या प्रेक्षकासाठी तो मालिका बनवत नाही. ज्या प्रेक्षकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून मालिका बनवल्या जातात, त्या प्रेक्षकवर्गात मी नाही असं तो म्हणतो. सध्याचंच उदाहरण म्हणजे सोनी वरची ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ नावाची मालिका मी पाहते. मला ती आवडते. मग मी अजयला बऱ्याचदा माझं त्याबद्दल काय म्हणणं आहे ते त्याला नको असलं तरी सांगत असते. म्हणजे कुठल्या मालिकेतला अभिनेता चांगला किंवा वाईट आहे इथपासून ते संवाद कसे आहेत इथपर्यंत.
मध्यंतरी पुण्याला गेले होते. ‘नटरंग’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आदी चित्रपटांतून काम केलेली अभिनेत्री विभा देशपांडे ही आमच्या कुटुंबाची मित्र आहे. तर त्या दिवशी आम्ही तिच्या आईकडे नाश्ता करत होतो. तेव्हा मनीषाताईनं म्हणजे तिच्या आईनं विभाच्या कंपनीची निर्मिती असलेल्या मालिकेतला एक अभिनेता कसे कपडे घालतो याबद्दल तक्रार केली. त्याविषयी बरंच बोलणं झालं. आता खरं तर विभाच्या कंपनीनं मालिकेची फक्त निर्मिती केलेली आहे. विभानं ती लिहिलेली नाही किंवा दिग्दर्शितही केलेली नाही. पण तरीही आम्ही त्याबद्दल बराच वेळ खूप चर्चा केली. शेवटी विभा शांतपणे म्हणाली की, ‘मी या मालिकेचे कॉस्चूम्स केलेले नाहीत.’
अनेकदा असंही होतं की, एखाद्या लेखकाची, दिग्दर्शकाची, अभिनेत्री किंवा अभिनेत्याची आपल्या मनात एक विशिष्ट प्रतिमा असते. म्हणजे आपण त्यांना एक ठराविक प्रकारचं काम करताना बघितलेलं असतं. त्यांची चाकोरी मोडून ते काही करू पाहतात तेव्हा आपल्याला कुठेतरी ते आवडत नाही. खरं तर तो त्यांच्या कामाचा भाग आहे. म्हणजे समांतर रंगभूमीसाठी नाटक लिहिणाऱ्या एखाद्या लेखकानं तद्दन गल्लाभरू अशी मालिका लिहिली की, ते आपल्याला रूचत नाही किंवा एखाद्या उत्तम अभिनेत्रीनं एखाद्या भडक मालिकेत काम केलं की ते आपल्याला आवडत नाही. असं का होत असावं? कारण तो त्यांच्या कामाचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता पडताळून बघणं यात चूक काय आहे?
सोशल मीडियामुळे टीव्ही मालिकांची वेगळ्याच स्तरावर प्रसिद्धी होते. मालिकांमधले दोष काढून त्यावर विनोद पाठवणं हा प्रकार व्हॉटसअॅपसारख्या माध्यमावर जोरात चालतो. ‘होणार सून मी या घरची’ मधली नायिका, जान्हवी बराच काळ गरोदर दाखवली गेली. म्हणजे मालिकेतल्या सगळ्या समस्या संपेपर्यंत बिचारीची सुटका झाली नाही. यावरून व्हॉटसअॅपवर इतके काही विनोद गाजले की बस्स. सध्या ‘जय मल्हार’ या मालिकेवरच्या विनोदांना असाच ऊत आलेला आहे.
मी वर ज्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेचा उल्लेख केला, त्यात सुप्रिया पिळगावकर काम करताहेत. मध्यंतरी मी त्यांची मुलाखत बघितली. मालिकेत सगळं चांगलं कधी होईल असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्यानं त्यांना विचारला होता. त्यावर इतकी घाई काय आहे, सगळं चांगलं झालं तर दाखवणार काय असं उत्तर त्यांनी दिलं होतं. ते किती खरं आहे!
एखादी मालिका बघताना त्यातल्या कथेत सगळं काही आलबेल व्हावं असं आपल्याला पहिल्या भागापासून वाटत असतं, पण जर तसं असेल तर मालिका कशी चालू राहील? मालिकेतली पात्रं स्थिरस्थावर करणं, नंतर त्यातल्या मुख्य पात्रांनी प्रेमात पडणं, त्या प्रेमाची मजा, मग त्यात काही कारणानं येणारं वितुष्ट, ते आणणारी विघ्नसंतोषी पात्रं, मग ते वितुष्ट दूर होणं, कदाचित त्यांचं लग्न, लग्नानंतरच्या समस्या असं सगळं झालं नाही तर त्यात रंगत कशी येणार? पण रोज आपण मालिका पाहताना आपल्याला त्या शेवटचा दिस गोड व्हायचीच आस असते. मालिकांमध्ये प्रेक्षकांचं इतकं गुंतून जाणं हेच मालिकांच्या यशाचं रहस्य आहे असं मला वाटतं.
लेखिका ‘डिटीजल कट्टा’ या ऑनलाइन नियतकालिकाच्या संस्थापक संपादक आहेत.
sayali.rajadhyaksha@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sunil Valavalkar
Thu , 03 November 2016
It is my belief that Aadesh Bandekar of Home Minister don t go to various homes , this serial is been shoot at one studio where different Sets are located and every episode been shoot at different sets in the same Studio... .