अजूनकाही
काही वर्षांपूर्वी जेव्हा भारतात केवळ दूरदर्शन होतं आणि ‘झी’सारखं एखादं चॅनेल नुकतंच बाळसं धरत होतं, तेव्हा अचानक पाकिस्तानी मालिका फार लोकप्रिय झाल्या होत्या. 'धूप किनारे'सारख्या पाकिस्तानी मालिकांनी भारतीय प्रेक्षकांना वेडं केलं होतं. एक प्रौढ वयाचा डॉक्टर आणि त्याच्या प्रेमात पडणारी त्याची विद्यार्थिनी या दोघांच्या संबंधांवर ही मालिका आधारलेली होती.
नंतरच्या काळात भारतात दूरदर्शन-व्यतिरिक्त अनेक वाहिन्या सुरू झाल्या. स्टार प्लस, सोनी, झी या हिंदी आणि झी मराठी, स्टार प्रवाह, इटीव्ही म्हणजेच आताचं कलर्स मराठी यांसारख्या वाहिन्यांमुळे दैनंदिन मालिकांची एक प्रचंड मोठी लाटच आली. या लाटेनं भारतातलं संध्याकाळचं आयुष्यच बदलून टाकलं. स्त्रिया आणि वयस्कर स्त्री-पुरुष स्वतःचं वेळापत्रक मालिकांच्या भोवती रचायला लागले. अजूनही तीच परिस्थिती कायम आहे.
दोन वर्षांपूर्वी झी उद्योगाने 'जिंदगी' ही नवीन वाहिनी सुरू केली. या वाहिनीवर मुख्यत्वे पाकिस्तानी मालिका दाखवल्या जाणार होत्या. त्यानुसार ही वाहिनी सुरू झाली. सुरुवातीच्या काळात तिला फारसा प्रेक्षकवर्ग नव्हता; पण काही काळानंतर या वाहिनीवरून 'ज़िंदगी गुलज़ार है' ही मालिका दाखवली जायला लागली आणि या वाहिनीची टीआरपीची गणितं एकदम बदलून गेली. असं या मालिकेत काय होतं?
पाकिस्तानमध्ये दोनच सामाजिक वर्ग आहेत. एक अति श्रीमंत, तर दुसरा निम्न वर्ग. पाकिस्तानमध्ये मध्यमवर्ग अस्तित्वातच नाही. त्यामुळे पाकिस्तानी मालिकांचा एक फॉर्म्युला ठरलेला असतो - गरीब नायक आणि श्रीमंत नायिका किंवा गरीब नायिका आणि श्रीमंत नायक. या मालिकेतही असंच होतं. श्रीमंत घरातला लाडका मुलगा. त्याला स्वतःच्या पुरुष असण्याचा अभिमान, कदाचित किंचित गर्वच आहे. 'बायकांनी स्वतःच्या मर्यादेत राहावं', अशा मताचा तो आहे. गंमत म्हणजे, तो अगदी मोकळ्या घरात वाढलेला आहे. त्याची आई कराचीतली सामाजिक कार्यकर्ती आहे. ती बुरखा घालत नाही, मेकअपमध्ये असते आणि बाहेर कामालाही जाते. त्याच्या बहिणीलाही आई-वडलांनी मोकळेपणाने वाढवलेलं आहे. तिला मैत्रिणींबरोबरच मित्र आहेत. ती त्यांच्याबरोबर रात्री उशीरापर्यंत पार्ट्या करते. नायकाला, ज़ारूनला हे अजिबातच मान्य नाही. त्याला ते मनापासून आवडत नाही. त्याच्या आईने घराकडे, बहिणीकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्याला वाटतं. वेळ येते, तेव्हा तो तसं सुचवतोही. त्याचे वडील उदारमतवादी असले, तरी बायकोचं घराकडे होणारं दुर्लक्ष त्यांना दिसतं, त्याविषयी ते तिच्याशी बोलायचाही प्रयत्न करतात, पण त्यावेळी ते तिच्या लक्षात येत नाही.
जारून स्वतः मात्र अतिशय स्वच्छंदी आहे. त्याला मुलींना पटवता येतं, कारण तो देखणा तर आहेच, पण त्याचबरोबर चार्मिंग आहे. त्याची बोलण्याची ढब, त्याचा खानदानीपणा, त्याची तहजीब या सगळ्यामुळे तो मुलींवर पटकन इम्प्रेशन पाडतो. त्याला अनेक मैत्रिणी आहेत. त्यातल्या काही त्याच्या गर्लफ्रेंड्सही होत्या. सध्या त्याची अस्मारा नावाची मैत्रीण आहे. ती त्याच्या प्रेमात आहे. त्याला मात्र तिच्याबद्दल तसं काही वाटत नाही, पण तरीही अस्माराला तो 'विद्यापीठात कसे कपडे घालू नयेत', याबद्दल ठणकावून सांगत असतो. थोडक्यात, आजच्या भाषेत सांगायचं तर हा नायक ‘मेल शॉवनिस्ट पिग’ आहे.
नायक श्रीमंत, तर नायिका गरीब हे ओघानेच आलं. नायिका कशफ. नायिका धरून तिघी बहिणी आहेत. तिची आई सरकारी शाळेत शिक्षिका आहे. तिच्या वडलांनी दोन लग्नं केलेली आहेत. वडील फक्त पैसे मागायला आईकडे येत असतात. नायिकेला या सगळ्या प्रकाराचा मनस्वी तिटकारा आहे. सगळं जग जालिम आहे, यावर तिचा मनापासून विश्वास आहे. तिला विद्यापीठात एमबीएला प्रवेश मिळतो. ती विद्यापीठात जायला लागते आणि अर्थातच तिला तिथं नायक भेटतो. ही नायिका रूपानं सामान्य, अगदी साधे कपडे घालणारी, डोक्यावरून दुप्पटा घेणारी आहे, पण ती बुद्धिमान आहे.
यथावकाश नायकाचा आणि अस्माराचा साखरपुडा होतो. तिचं मुलांबरोबर राहणं-फिरणं नायकाला आवडत नाही आणि तो लग्न मोडतो. तोपर्यंत नायिका त्याच्या खिजगणतीतही नसते; पण मित्रमैत्रिणींशी पैज लावून तो तिला पटवायला बघतो. कशफला ते कळतं आणि ती त्याच्या थोबाडीत ठेवून देते.
दोन वर्षांनी दोघंही पाकिस्तानी सिव्हिल सर्व्हिसमध्ये लागतात आणि एका कामाच्या निमित्ताने त्यांची भेट होते. तोपर्यंत जारून थोडासा प्रगल्भ झालेला असतो. आयुष्याबद्दलच्या त्याच्या कल्पना मात्र त्याच असतात. जेव्हा तो स्वतःच्या भावी पत्नीबद्दल विचार करतो, तेव्हा त्याच्या कशफच डोळ्यासमोर येते. तिच्यात काडीचाही बदल झालेला नाही. ती अजून आयुष्यावर तशीच वैतागलेली आहे. ती तसेच रंगहीन कपडे घालतेय. ती तशीच डोक्यावरून दुप्पटा घेतेय; पण तरीही पारंपरिक विचारांच्या जारूनला तीच स्वतःच्या पत्नीच्या जागी दिसते. तो त्याच्या प्राध्यापकांच्या मागे लागून कशफला पटवण्यात यशस्वी होतो. तिच्याशी लग्न करतो.
ही मालिका आपल्या मालिकांपेक्षा इथं वेगळी होते. स्वतंत्र विचाराच्या नायिकेचं व्यक्तिमत्त्व लग्नानंतर बदलत नाही. 'पुरुष हाच घराचा प्रमुख असतो आणि असला पाहिजे', असं जेव्हा नायक लग्नानंतर तिला सांगतो, तेव्हा ती त्याला ठणकावून सांगते, 'मी फार स्वतंत्र विचारांची नसले, तरी मी 'पांव की जूती' होणार नाही.' हळूहळू जारून विचारांनी जास्त मुक्त होत जातो. स्वतंत्र बाण्याची नायिका त्याच्या प्रेमात पडायला लागते. तोपर्यंत तिने एक 'उत्तम स्थळ' म्हणूनच जारूनकडे बघितलेलं असतं. तो तिच्या घरी राहायला येतो, तेव्हा 'त्याला एसी मिळणार नाही' या भावनेने कशफचा जीव कासावीस होतो, तर तिच्या त्या निम्न वर्गातल्या साध्या घरात जारूनला ऊब जाणवते. त्याला ते सगळं आवडतं. अर्थात, नंतर दोघांमधले मतभेद, दोघांचं विभक्त होणं आणि परत एकत्र येणं हे सगळं ओघाने येतंच.
ही मालिका भारतात इतकी लोकप्रिय का झाली? किंबहुना जगात ज्यांना-ज्यांना हिंदी भाषा कळते, त्या सगळ्या लोकांमध्ये ही मालिका इतकी प्रचंड लोकप्रिय का झाली? ‘जिंदगी’वर ही मालिका अनेकदा दाखवली गेली आणि प्रत्येक वेळी ती तितक्याच प्रेमाने बघितली गेली. या प्रेक्षकांमध्ये मालिकांचे नेहमीचे प्रेक्षक तर होतेच, पण त्याचबरोबर उच्चभ्रू वर्गातले, बुद्धिजीवी वर्गातले जे लोक एरवी मालिकांना तुच्छ समजतात, अशा अनेकांनी ही मालिका पुन्हा पुन्हा बघितली. तर हे असं कसं घडलं? मला जे जाणवलं ते असं आहे –
पाकिस्तानी मालिका या फार कमी काळात संपतात. म्हणजे १५ ते २५ एपिसोड्समध्ये मालिका संपते. त्यामुळे त्या लांबण लावत नाहीत. आठवडाभर एकच दिवस दाखवत नाहीत.
मालिकेतलं चित्रण अगदी वास्तववादी असतं. मालिकेतली पात्रं खरी वाटतात. ती कर्कशपणे ओरडत नाहीत, चित्रविचित्र कपडे घालत नाहीत, ती पात्रं ज्या परिस्थितीतली असतात, तशीच दिसतात आणि वावरतात. त्यांची घरंही त्यांच्या सामाजिक परिस्थितीला अनुसरूनच असतात. नाहीतर आपल्याकडे मुंबईत बंगला आहे असं दाखवतात किंवा बेताच्या परिस्थितीच्या माणसाच्या घरात क्रॉकरी वगैरे दाखवतात. असं पाकिस्तानी मालिकांमध्ये बहुतेकदा नसतं. अपवाद प्रत्येक गोष्टीला असतातच. मध्यंतरी एका मराठी मालिकेतली, खेड्यात शिक्षिका असलेली नायिका रोज केस ब्लोड्राय करत असल्याचं दाखवलं होतं. मी जेव्हा हे लिहिलं, तेव्हा अनेकांना 'खेड्यातल्या बाईने केस ब्लोड्राय करू नयेत', असं माझं म्हणणं आहे, असं वाटलं. माझं म्हणणं इतकंच होतं की, जरा तरी वास्तववादी दाखवा की! खेड्यातल्याच काय शहरातल्या, अगदी बाहेर काम करणार्या बायका तरी रोज केस ब्लोड्राय करतात का? नाही ना! नायिकेला सतत इतकं ग्लॅमरस का दाखवायला हवं?
'जिंदगी गुलजार है'मध्ये उर्दू भाषेचा गोडवाच इतका आहे की, त्यातील संवाद खिळवून ठेवतात. ते पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटतात. ही अतिशय मधुर भाषा भारतातून जवळपास हद्दपार झाली आहे, याचं वाईट वाटतं.
'जिंदगी गुलजार है'चं सगळ्यात मोठं यश अभिनेत्यांच्या निवडीत होतं. कशफची आई, जारूनचे आई-वडील-बहीण, त्यांचे प्राध्यापक आणि मुख्य म्हणजे कशफ आणि जारूनचं काम करणारा अभिनेता यांची निवड चपखल आहे. ज्या फवाद खानला परत पाठवण्यावरून मध्यंतरी वादळ उठलं होतं, त्याने जारूनच्या भूमिकेत अक्षरशः प्राण ओतला आहे. कशफ झालेल्या सनम सईदनेही फार समजुतदारपणे भूमिका केली आहे.
पाकिस्तानी मालिका दाखवणं बंद करून लोक बघणं बंद करतील का? तर इतक्या दर्जेदार मालिका इंटरनेटवर सहज बघण्याचा पर्याय लोकांना आहेच की! असो. पण भारतीय मालिकांच्या तुलनेत वास्तववादी चित्रण करणाऱ्या पाकिस्तानी मालिका म्हणूनच मला तरी उजव्या वाटतात.
लेखिका ‘डिटीजल कट्टा’ या ऑनलाइन नियतकालिकाच्या संस्थापक संपादक आहेत.
sayali.rajadhyaksha@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment