राग ओळखता आला असता तर…?
कला-संस्कृती - सतार ते रॉक
केशव परांजपे
  • उ. अल्लादिया खानसाहेब यांचं एक छायाचित्र
  • Sat , 19 November 2016
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti सतार ते रॉक Satar to Rock उ. अल्लादिया खान किशोरी आमोणकर Kishori Amonkar बागेश्री

शास्त्रीय संगीत ऐकायचं तर राग ओळखता यायला पाहिजेत. का? आपल्याला राग ओळखता येत नाहीत, असा गंड तुम्हाला आहे का? मग हा किस्सा ऐका. (बहुधा) १९४५ साली मुंबई विद्यापीठाच्या कोवासजी जहांगीर हॉलमध्ये शास्त्रीय संगीताच्या विक्रमादित्य कॉन्फरन्सचं आयोजन केलं गेलं होतं. त्या काळातले झाडून सारे बुजुर्ग, संगीताचे मानदंड गायक-वादक या संमेलनात सहभागी झाले होते. त्यावेळी मैफलींना वेळेचं बंधन नसायचं. रात्र संपली म्हणून मैफल संपवावी लागे! दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक कलाकार मैफलीत श्रोते म्हणून हजर असत. संमेलनांमध्ये सहभागी कलाकार तर संमेलनाचे तीन-चार-सात दिवस संमेलनस्थळी तळ ठोकून असायचे; एकमेकांच्या मैफली ऐकायचे. तर, त्या ऐतिहासिक गौरवशाली विक्रम कॉन्फरन्सच्या सांगतेच्या सत्राचे गायक होते संगीतसम्राट उ. अल्लादिया खान, जयपूर-अत्रौली घराण्याच्या ‘बिकट’ गायकीचे प्रवर्तक. त्यांच्यामागे तंबोऱ्यावर होत्या सूरश्री केसरबाई केरकर आणि चिरंजीव भुर्जीखानसाहेब.

खानसाहेबांचं वय तेव्हा नव्वदीच्या घरात होतं; पण त्यांच्या गाण्याचा आवेग असा काही होता की, मागच्या दोन मातब्बर शिष्यांना मध्ये तोंड घालता येत नव्हतं. एकामागून एक ‘बिकट’ आवर्तनं डौलदारपणे समेला येत होती. खानसाहेबांची मैफल ही सर्वच संगीत-अभ्यासकांसाठी पर्वणी असायची. वातावरणात त्यांच्याबद्दलचा आदर आणि अचंबा (ऑ) भरलेला असायचा, तसाच तो त्यावेळीही होता. प्रत्येक जाणकार त्यांच्या स्वरांची अनुपम, अनवट गुंफण न्याहाळत अंदाज घेत असायचा की, खानसाहेब कोणता राग आळवत आहेत. तशी शोधक नजरानजरी त्याही मैफलीत चालू होती. श्रोते माना डोलावताना गायकीबद्दल “हीच ती-हीच ती” आणि रागाच्या ओळखीबद्दल “नेति नेति” म्हणत होते. शेवटी विद्वान, मातब्बर सरोदिये हफीज अली खान यांनी अल्लादिया खानसाहेबांना मैफलीतच गाणं चालू असताना विचारलं – “आपण कोणता राग गात आहात?” त्यावर अल्लादिया खान म्हणाले, “हफीज, अरे मी ‘रामकली’ गातो आहे.” यावर हफीज अली खान म्हणाले, “खानसाहेब, तुमच्या रामकलीची शोभा काही औरच आहे!”

हा किस्सा एवढ्या विस्तारानं सांगितला, कारण त्यात नोंद घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण माझा मुद्दा आपल्या लक्षात आला का, की प्रसंगी बड्याबड्यांना राग ओळखता येत नाहीत! उ. हफीज अली खानसाहेब ही काही छोटी असामी नव्हे! तर ‘रागानाभिज्ञता पापमुक्ती’चा पास मिळाला ना?

पूर्वीच्या म्हणजे राजे-रजवाड्यांच्या काळात शास्त्रीय संगीत-मैफलींना मोजकेच श्रोते असत. शास्त्रीय संगीत जवळजवळ सामान्य माणसासाठी नव्हतंच! (हीच परिस्थिती नाट्य, काव्य, नृत्य अशा जन्म ललितकलांच्या बाबतीतही होती.) साहजिकच अशा मर्यादित वर्तुळात उच्चभ्रू म्हणून प्रवेश मिळण्याचे व्यक्त-अव्यक्त निकष होते. जाणकारी हा ही एक महत्त्वाचा निकष होता. अगदी राजे-रजवाडेच नाही, तर त्यानंतरच्या काळात, कोठीवर जाणाऱ्या तालेवारांची रसिकताही सुजाण असायची.

आता काळ तसा नाही. कलेची गंगा सांप्रतच्या काळात सर्वसामान्य जनसागराला जाऊन मिळाली आहे. ‘जाणकारी’ हा निकष आता राहिला नाही. त्याची जागा हळूहळू संवेदनशीलता घेऊ लागली आहे. रागाचं नाव किंवा शास्त्र माहिती असण्यापेक्षा शास्त्रीय संगीत ऐकण्याची मानसिकता हा निकष अधिक महत्त्वाचा बनतो आहे. ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, होणारही नाही, पण सुरू मात्र नक्की आहे.

स्वातंत्र्याच्या आसपास शास्त्रीय संगीतांचे दरबार लोप पावले आणि काही प्रमाणात नाट्यगृहांत शास्त्रीय संगीताचे प्रयोग लागू लागले. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे मोजकी संमेलनं, जलसे होऊ लागले. पण खऱ्या अर्थानं शास्त्रीय संगीत मध्यमवर्गापर्यंत पोचवलं ते म्युझिक सर्कल्सनी. आपलं शास्त्रीय संगीत हे मुळात चेंबर म्युझिक आहे असं अनेक जाणत्यांचं निरीक्षण आहे. म्हणजे ५०-१०० श्रोत्यांमध्ये कलाकाराच्या दृष्टिसंपर्कात हे संगीत रंगतं, खुलतं! हा वाढीव दिवाणखाना म्युझिक सर्कल्सनी उपलब्ध करून दिला. तीन-चार तासांपासून ८-१० तासांपर्यंत मैफली घडू लागल्या. माफक शुल्कात मध्यमवर्गीय श्रोता अभिजात संगीत ऐकू लागला. वृत्तपत्रांतून समीक्षा होत होती, आकाशवाणीवरून शास्त्रीय संगीत प्रसारित होत होतं आणि शहरांत निदान चार-पाच चौरस किलोमीटर क्षेत्रात संगीत शिक्षणाचा वर्ग भरत होता.

या सर्व परिस्थितीत श्रोत्याची अभिरूची घडत होती, रसिकता बनत होती, जाणकारी वाढत होती. म्युझिक सर्कल्सच्या त्रैमासिक मैफलींतसुद्धा गाणं सुरू झालं की, ‘राग कोणता?’ याचा अंदाज बांधणं, कुजबूज, चुळबूळ, पक्की ओळख पटली की, दिलखुलास दाद (की सुटकेचा श्वास) असा माहोल असायचा. श्रोत्यांनाच काय, साथीदारांनाही राग कोणता, ताल कोणता हे गायक-कलाकाराकडून आधी कळत नसे!

या रागओळखी खेळात एक गंमत आहे! राग ओळखून, तो माहीत असून त्याच्या घेतल्या जाणाऱ्या आस्वादात एक अधिकची समृद्धता आहे. ‘बागेश्री’ रागात पंचम (प) हा स्वर अल्प आहे, असा शास्त्राचा नियम आहे. एका विशिष्ट पद्धतीने ‘प’ हा स्वर या राग गायनात गुंफला जातो. ती पद्धत रूढ आहे. ती तुम्हाला ठाऊक आहे. पण एखादी किशोरी आमोणकर तो पंचम काही वेगळ्याच पद्धतीनं गुंफत जाते. तुम्हाला हे कळतं. तुमची बुद्धी तुमच्या लक्षात आणून देते की, हे काहीतरी वेगळं घडतंय, हे उमगणं एक वेगळा आनंद देतं. हे सर्व ठीक आहे, पण पंचम वेगळ्या पद्धतीनं घेतला हे लक्षात येण्याचा आनंद हा बागेश्रीच्या आनंदाचा मुख्य गाभा असू शकतो का? नक्कीच नाही. बागेश्री रागात ‘ग’ हा स्वर शुद्ध लागतो की, कोमल हे माहीत नसून, किंबहुना ऐकू येणारा राग बागेश्री आहे हेही माहीत नसून आनंद मिळत नाही का? उत्तर असं आहे की, अमर्याद आनंद मिळतो आणि तो संगीताचा खरा आनंद आहे.

एक प्रश्न उभा राहतो की, श्रोत्याला जर रागाचं नावबिव माहीत असण्याची गरज नाही, तर गायकानं तरी कशाला वर्षानुवर्षं मेहनत करावी? सगळा आनंदाचा मामला… या प्रश्नाचं उत्तर अनेक पातळ्यांवर द्यावं लागतं. शेकडो वर्षांच्या परंपरेनं कणाकणानं जी विद्या, जी कला माणसानं आत्मसात केली, ती जतन करायची की नाही? श्रोत्याला आनंद आणि कलाकाराला पोटपाणी एवढंच पाहायचं का? जतन-संवर्धन, मेहनत, तपश्चर्या, स्वार्थत्याग, शास्त्र, शिस्त, अस्सलपणा, परंपरासिद्धता या सगळ्याचं काय करायचं, या सगळ्याची काय गरज? बाजाराचा मागणी-पुरवठ्याचा कायदा अशी ग्वाही देऊ शकतो का, की जे संगीत अधिक कष्टसाध्य (निदान हा वस्तुनिष्ठ निकष लावू या) ते अधिक विकलं जाईल, तेच टिकून राहील आणि हिणकस, कमी प्रतीचं (तुलनात्मक) बाजाराबाहेर फेकलं जाईल? प्रत्यक्षात बाजार उलटी ग्वाही द्यायला जणू तयार आहे. म्हणूनच अभिजात कलांचं संवर्धन, जतन हे सामाजिक, सांस्कृतिक कर्तव्य आहे.

राग कळला नाही तरी एवढं तर कळू शकतं की, या कलाप्रस्तुतीत माणसाच्या अनेक जन्मांचं संचित आहे. कुणीही उठावं, सेटवर उभं राहून (किंवा स्टुडिओत जाऊन) काही शिकावं आणि कलाकारी करून मोकळं व्हावं, असं हे काम नाही. सेटवर उभं राहून शिकणं सोपं नाही. तो कलाकार खूप गुणी असावा लागतो. पण कलेचं काय? तपश्चर्येनं आत्मसात केलेली ती गोष्ट आहे का?

‘मला राग कळत नाही’ म्हणून रागाचा ध्यास घेऊन बसलेल्याशी माझं काहीच नातं नाही? मूठभरांची मिरासदारी संपावी हे उत्तमच. पण मिरासदारी बरोबर त्या मुठीत असलेलं सांडून जावं की जतन करावं? आणि मग लोकशाहीत जतनाचा राजमार्ग कोणता?

श्रोत्याला रागाचं नाव माहिती नसून चालेल, मग गायकाने वर्षानुवर्षं तपश्चर्या का करावी या प्रश्नाचं पुढचं उत्तर सूक्ष्म पातळीवर आहे. वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येनं गायक रागसंगीताच्या अधिक जवळ जातो, त्याचं गाणं अधिक नेमकं, अधिक परिपूर्ण होत जातं आणि अशा गायनाची ताकद खूप अधिक असते. श्रोत्यावर रागगायनाचा जो असर होतो, तो बोधपूर्व मतावर अधिक असतो. त्याच्याशी श्रोत्याच्या बुद्धिगम्य कळण्याचा तसा फारसा संबंध नसतो. श्रोत्याला अधिक आनंद देण्यासाठी गायकाने तपश्चर्या करणं गरजेचं आहे.

श्रोत्याला सहजपणे, सुनिश्चितपणे तपश्चर्येनं गाणं अधिक आनंदाचा अनुभव देतं का? याबाबतीत श्रोत्याच्या कळण्याचा प्रश्न कळीचा आहे. रागाचं नाव कळणं नव्हे, तर ऐकलेल्या संगीताच्या अनुभवांचा असर काय ते कळणं! अधिक आनंद, वरच्या पातळीचा आनंद, आनंदातले हे तर-तम श्रोत्याला कळतात का? रोजच्या धकाधकीत कळत नाहीत, पण जरा मनाला ‘कान’ दिला तर हळूहळू कळू लागतं.

श्रोत्याला आनंदातील तर-तमता कळली नाही, तर लोकशाहीत अभिजात कलेचं भवितव्य नक्की धोक्यात आहे असं समजावं.  एवढा तात्त्विक, जसा जास्तच गंभीर, खल केल्यावर अजूनही “राग ओळखता आला असता तर…?” हा मोह आहे का? असू दे. जरूर असू दे, काही हरकत नाही. राग कसा ओळखायचा त्याचाही विचार करू.

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख