पॅडमॅन : एका साध्या माणसाच्या अभूतपूर्व यशाची कथा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार 
  • 'पॅडमॅन' सिनेमातला (अक्षय कुमार) आणि वास्तवातला (अरुणाचलम मुरुगनांथम)
  • Sat , 10 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie पॅडमॅन Padman अक्षय कुमार Akshay Kumar सोनमू कपूर Sonam Kapoor राधिका आपटे Radhika Apte अरुणाचलम मुरुगनांथम Arunachalam Murugunatham

तसं पाहिलं तर 'पॅडमॅन' हा एक चरित्रपट आहे. ही दरवेळीप्रमाणे वादात अडकवून प्रसिद्ध करण्यालायक चरित्रपट तर नाहीच. आणि सुदैवानं तसं करण्याचा प्रयत्नही झाला नाही. हा चरित्रपट सिनेमॅटिक लिबर्टी घेतो, तीही सदर व्यक्तीच्या परवानगीनुसार आणि तशी डिस्क्लेमरही सुरुवातीला येतेच. मग यात अगदी स्थळकाळापासून ते नवीन पात्रं कथेत आणण्यात आणि काही पात्रं गाळण्यापर्यंत सर्व गोष्टी करण्यात आल्या आहेत. पण आधीच सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टींवर चर्चा करण्याची गरज नाही. कारण चित्रपटाचा मूळ उद्देश आहे एका व्यक्तीच्या नवल वाटायला लावणाऱ्या आपल्या ध्येयापर्यंतच्या प्रवासाची गोष्ट समोर आणणं आणि त्यातून त्याचा मुद्दा सर्वांसमोर मांडणं. आणि सुदैवानं हा चित्रपट या दोन्हीही गोष्टी योग्यरीत्या आणि बऱ्याच संयतपणे पूर्ण करतो. 

तर ही कथा आहे मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या 'लक्ष्मी चौहान'ची (अक्षय कुमार). त्याचं अलीकडेच लग्न झालं आहे. आणि आताशा त्याला त्याची पत्नी, 'गायत्री'मुळे (राधिका आपटे) स्त्रियांची मासिक पाळी आणि त्या निमित्तानं घरात आढळणारे बरेच समज-गैरसमज यांच्याशी जास्त जवळून परिचय होतो आहे. आणि यातूनच, गायत्री आणि घरातील इतर स्त्रियांनी 'सॅनिटरी पॅड्स' वापरावेत म्हणून प्रयत्न सुरू करतो. 

मात्र त्याची किंमत 'गायत्री'ला खटकते. त्यामुळेच 'लक्ष्मी' स्वतः 'सॅनिटरी पॅड्स' बनवायला सुरुवात करतो. अर्थात त्याला यात लगेच यश मिळतं अशातला भाग नाही. पण स्वतःच्या पत्नीचा त्रास सहन न झाल्यानं आणि भविष्यातील आजार वगैरे गोष्टी लक्षात घेऊन तो करत असलेले प्रयत्न, हळूहळू त्याला पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं किती गुंतागुंतीची आहेत हे जाणवतं. आणि त्यानं सुरू केलेला हा प्रवास हळूहळू अनेक मानापमान, अडचणींनंतर देशपातळीवर जाऊन पोहचण्याची गोष्ट म्हणजे 'पॅडमॅन'. 

'शमिताभ' आणि 'की अँड का'च्या अपयशानंतर 'आर. बाल्की'ला 'पॅडमॅन'च्या रूपात पुन्हा एकदा त्याचा फॉर्म गवसला आहे असं म्हणता येईल. चरित्रपट असली तरी यावरही दिग्दर्शक म्हणून बाल्कीचा ठसा जाणवतो. तोही खासकरून चित्रपटाच्या मध्यंतरानंतर. सुरुवातीला हास्यात विरून जाणारा 'पॅडमॅन' मध्यांतरानंतर आणखी प्रभावीपणे आपला आलेख उंचावतोच. पण त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे 'लक्ष्मी'ची गोष्ट आणखी संयतपणे समोर मांडतो. ज्यात त्याचा मध्य प्रदेश ते इंदौर आणि तिथून दिल्लीचा प्रवास, त्याची धडपड सोबत 'परी'च्या (सोनम कपूर) मदतीनं स्वतःचे 'सॅनिटरी पॅड्स' जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पोहचवणं वगैरे गोष्टींचा समावेश होतो. 

'पॅडमॅन' खरं तर अरुणाचलम मुरुगनांथम या भारतातील नावाजलेल्या 'इनोव्हेटर'ची गोष्ट सांगतो. पण ती साध्या सरळ पद्धतीनं, आम्ही काहीतरी मोठं करत आहोत, असा आव न आणता आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारी पब्लिसिटी कॅम्पेन न बनता सांगितली जाते. ज्यात लेखक बाल्की आणि स्वानंद किरकिरे स्वतःचे इनपुट्स देत ही कथा आणखी सविस्तरपणे आणि सिनेमॅटिक रूपात समोर आणतात. 

ही कथा एका साध्या माणसानं मिळवलेल्या अभूतपूर्व यशाची आहे. त्याचं जीवन साधं आहे. बायकोवर निरपेक्ष प्रेम करणारा, गावात त्याच्या कामामुळे प्रतिष्ठित असलेला, स्वतःच्या 'स्टेटस'चा न्यूनगंड नसलेला लक्ष्मी 'गाय नेक्स्ट डोअर' या संज्ञेचं मूर्त रूप म्हणता येईल. पण मुळातच प्रश्न विचारण्याची आणि त्यांची उत्तरं स्वतः शोधायची सवय असलेली व्यक्ती, जेव्हा आपलं पौरुषत्व बाजूला ठेवून आपल्या पत्नीसाठी काहीतरी करू पाहतो, तेव्हा त्याला वेड्यात काढलं जातं. पण त्याहून जास्त आपली तीच पत्नी, आपलं कुटुंब आणि आपला सन्मान त्याला गमवावा लागतो. मग आणखी पेटून उठत जिथून या सर्व गोष्टीला सुरुवात झाली, त्याच गोष्टीच्या साहाय्यानं आपण गमावलेली प्रत्येक गोष्ट परत मिळवण्याचं आणि त्याहून जास्त म्हणजे स्वतःचा मुद्दा सर्वांपर्यंत पोहचवण्याचा निश्चय करणारा लक्ष्मी आपल्याला आपल्याहून वेगळा वाटत नाही. त्याची कथा आधीच प्रस्थापित असलेल्या माणसाची नसून शून्यापासून सुरुवात करत आभाळाला भिडण्याची आहे. आणि तीच आपल्याला भावते. 

अक्षय कुमार या पात्रात आपला जीव ओततो. तो जवळपास पूर्ण चित्रपटभर अक्षय न वाटता 'लक्ष्मी' वाटतो. तो तसा आव आणत नाही तर ते पात्र समर्थपणे साकारतो. मला अक्षयबाबत एक गोष्ट नेहमीच कमालीची वाटत आलेली आहे, ती म्हणजे त्याच्यासोबत असणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या कलाकारासोबतची, आणि एकूणच त्या पात्रासोबतची त्याची केमिस्ट्री. याची गेल्या काही वर्षातील बरीच उदाहरणं देता येतील. ज्यात अगदी 'खट्टा मीठा' ते आताच्या या 'पॅडमॅन'चाही समावेश करता येईल. 

राधिका आपटेही 'गायत्री' म्हणून शोभते. अर्थात तिचं पात्र प्रथा, परंपरा घट्ट आवळून बसलेलं असतं त्यातील काही गोष्टींमुळे काही वेळा तिनं साकारलेली गायत्री जरा जास्त नाट्यमय वाटते. पण तरीही ती चित्रपटात वेगळी उठून दिसते, हे महत्त्वाचं. 

याखेरीज सोनम कपूर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. ज्यात ती तिच्या परीनं चांगलं काम करते. हे पात्र अरुणाचलम यांच्या इंग्लिश ट्युटरवर आधारित आहे. जिच्याकडे ते काही काळासाठी आकर्षित झाले होते, असं त्यांनी मान्य केलं आहे. ती थेट इंग्लिश ट्युटर म्हणून नसली तरी एक तबलावादक आणि एमबीए केलेली, बरीच लिबरल, 'लक्ष्मी'ला मदत करणाऱ्या स्त्रीच्या रूपात समोर येते. 

'पीसी श्रीराम'चं छायाचित्रण उल्लेख करावं इतकं चांगलं आहे. ज्यात मध्य प्रदेश, इंदौर ते अगदी न्यू यॉर्क एरियल शॉटसमधून आपल्यासमोर आणलं जातं. एकूणच छायाचित्रण चित्रपटाला पूरक ठरतं. याखेरीज 'अमित त्रिवेदी'चं पार्श्वसंगीत उत्तम आहे. त्याची गाणी तर उत्तम आहेतच. अर्थात त्याचं पार्श्वसंगीत बहुतांशी वेळा चांगलं आणि सीन्सना पूरक असलं तरी बऱ्याचदा ते लाउड ठरतं. बहुतांशी भारतीय चित्रपटांबाबत ही गोष्ट नेहमीच दिसून येत असते. इथंही दुर्दैवानं ती उणीव आहे. मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करता येणं नक्कीच शक्य आहे. 

आर. बाल्की पुन्हा फॉर्मात आला आहेच. पण सोबतच लेखक म्हणून स्वानंद किरकिरेदेखील त्याचा सहाय्यक म्हणून असणं चित्रपटाच्या दृष्टीनं बरंच चांगलं ठरलं. ट्विंकल खन्नाच्या एका कथेवर आधारित असलेली याची पटकथा बरीच बांधेसूद आहे. शिवाय संवाद मस्त जमून आले आहेत. 

'युनायटेड नेशन्स'मध्ये लक्ष्मीनं दिलेल्या भाषणाचं दृश्य चित्रपटात बरंच महत्त्वाचं ठरतं. या दृश्याचं तितक्याच ताकदीनं लिहिलेलं असणं यातील अक्षयच्या परफॉर्मन्सला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. आणि पुन्हा यानंतर 'पॅडमॅन' या गाण्याचं असणं याहून चांगला शेवट या चित्रपटाला लाभला नसता. कारण लक्ष्मीच्या अद्वितीय यशाचं कौतुक करण्याहून वेगळा सन्मान तो काय असेल! 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......