पंकज कपूर : कसदार अभिनयाचा धनी
कला-संस्कृती - ‘किमयागार’ कलाकार
प्रा. कमलाकर सोनटक्के
  • पंकज कपूर यांच्या विविध भावमुद्रा
  • Sat , 03 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti किमयागार कलाकार कमलाकर सोनटक्के Kamlakar Sontakke पंकज कपूर Pankaj Kapoor

राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून प्रशिक्षण घेऊन हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा पंकज कपूर हा एक सशक्त, ख्यातकीर्त, चरित्र अभिनेता. गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी, उपहासपूर्ण व्यक्तिरेखाही तेवढ्याच ताकदीनं सादर करून चित्रपटसृष्टीत एक वेगळं वलय गेली २० वर्ष निर्माण करणारे हरफनमौला अभिनेता म्हणून पंकज कपूर गाजत आहेत. ते उंचीचे, ताशीव शरीरयष्टीचे, सामान्य चेहऱ्याचे, पण आपले प्रभावी डोळे आणि अनेक पट्ट्यांमध्ये सहज फिरणाऱ्या गाजदार आवाजाचे धनी आहेत. प्रत्येक भूमिका आपल्या रंगढंगात सादर करून तिच्यावर आपली नाममुद्रा ते कोरतात. प्रेक्षकांप्रमाणेच सहकलाकारांनाही चक्रावून टाकतात, चकित करतात. अर्धवत्तेचं आणि लोकप्रियतेचं वेगळं विश्व निर्माण करतात.

अभिनयाच्या वाटेवर

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान आणि सव्यसाची अभिनेता म्हणून पंकज कपूर याची आज ख्याती आहे. त्यांची सुरुवात अगदी मध्यमवर्गीय परिवारातून झाली. पंकज कपूर यांचा जन्म लुधियाना शहरात १९५४ साली झाला. इंजिनियरिंगचं शिक्षण पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणारा हा साधारण दिसणारा तरुण कसा एक सशक्त अभिनेता झाला याचा प्रवास मोठा रंजक आहे.

पंकज कपूर यांनी शाळा-कॉलेजच्या दिवसातच अभिनय करायला सुरुवात केली होती. शालेय स्नेहसंमेलनातल्या नाटकात ते नियमितपणे भाग घ्यायचे. हळूहळू महाविद्यालयात आल्यावर त्यांची ही आवड अधिक वाढत गेली. सामान्यपणे नाटकासारख्या बेभरवशाच्या क्षेत्राबद्दल पालकांचं मत त्या काळात फारसं बरं नसायचं. पण पंकज यांचे वडील याला अपवाद ठरले. ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी पंकजला विचारलं की, ‘अगदी स्पष्टपणे सांग, तुला चित्रपटाच्या देदीप्यमान झगमगाटाचं आकर्षण आहे का, खरंच तुला अभिनय कलेची ओढ आहे? जर खरंच ती ओढ असेल तर अशा ठिकाणी जा जिथं अभिनयाचं विधिवत प्रशिक्षण दिलं जात असेल.’

१९७३ साली पंकजनी आपलं इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि महाविद्यालयात ते पहिले आले. त्यांच्या परिवारातील सारे लोक उच्च विद्याविभूषित होते आणि चांगल्या हुद्यावर काम करत होते. पंकज कपूर यांनी आपल्या वडिलांचा सल्ला मानून दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात तीन वर्षांच्या अभ्रासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यांना तिथं शिष्यवृत्तीही मिळाली. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी प्रवेश परीक्षा दिली. साऱ्या तांत्रिक चाचण्यात आणि प्रात्यक्षिकांमध्ये ते उत्तीर्ण झाले, परंतु स्क्रीन टेस्टमध्ये सामान्य चेहऱ्यामुळे त्यांना नापास केलं गेलं.

राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील शिकवण आणि संस्कार

मी राष्ट्रीय नाट्यविद्यालयाच्या कार्यकारिणीवर असताना पंकज कपूर यांनी ‘वारझैक’ या जर्मन नाटकातील मध्यवर्ती भूमिका सादर केली होती. ती आजही ४० वर्षानंतर नजरेसमोरून हटत नाही. केवळ आवाजावरील हुकूमतच नाही, तर आपल्या अंगप्रत्यंगांचा अतिशय शोधक पद्धतीनं वापर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या अभिनेत्यांच्या श्रृंखलेतील वरच्या स्तरावरचा हा तगडा कलावंत. नाटक असो, मालिका असो वा चित्रपट, हाती आलेल्या प्रत्येक पात्राला संहितेच्या, दिग्दर्शकीय संस्कारांच्या पलीकडे जाऊन आपला स्वत:चा जामानिमा ते चढवतात. ठेवणीतल्या हालचाली, अंगचलन आणि आवाजाच्या विवक्षित ढबीत प्रत्येक भूमिका ते अनोख्या पद्धतीनं सादर करतात.

पंकज कपूर हे आपल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला आणि तिथल्या शिक्षकांच्या शिकवण्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात फार महत्त्वाचं स्थान देतात. विशेषत: इब्राहिम अल्काझींचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला हे ते अभिमानानं सांगतात. १९ व्या वर्षी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रवेश मिळण्याला ते खूप महत्त्व देतात. हे संस्कारक्षम वय असल्यानं इथं तांत्रिक अंगाची, नाट्य सिद्धान्तांची तर सखोल ओळख झालीच, पण त्यापेक्षाही शरीर, वाणी, विचार करण्याची पद्धती यावरही खूप काम झालं. या साऱ्याचा पुढे व्यवसायात अतिशय शिताफीनं वापर करता आला.

अल्काझींच्या प्रखर शिस्तीबद्दल, त्यांच्या ‘टास्क मास्तर’ असण्याचे खरे-खोटे अनेक किस्से त्यांच्या काळातील विद्यार्थ्यांच्या नावांवर खपवले जातात आणि त्यात बरेच लोक धन्यता मानतात. पंकज कपूर मात्र अतिशय प्रामाणिकपणे आपलं मत नोंदवतात की, त्यांचं हे भाग्य होतं की अशा प्रकारचा कठोर तपस्वी शिक्षक त्यांना लाभला, ज्यानं केवळ व्यावसायिक प्रशिक्षणालाच नाही तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनालाही एक शिस्त लावली, वळण लावलं; प्रत्येक विषयात ज्ञानदानाबरोबरच त्यांच्या मनात नवं शिकण्याची एक तीव्र जिज्ञासा निर्माण केली, ज्यामुळे पुढील काळात ती त्यांच्या जगण्याचं अविभाज्य अंग बनली. जीवनातील प्रत्येक जबाबदारी समजून-उमजून पार पाडण्याची, सतत नवं काही करत राहण्याची उर्मी त्यांनी जोपासली. योगायोगानं आपल्याला नाटकाचं आणि अभिनयाचं प्रशिक्षण देणारी संस्था काढण्याची संधी भविष्यात कधी मिळाली तर आपण अल्काझी साहेबांच्या शिस्तीचा, पद्धतीचा, प्रत्येकाला त्याच्या पातळीवर जाऊन घडवण्याचा ‘रोल मॉडेल’ म्हणून वापर करू असं ते अभिमानानं सांगतात.

राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील प्रशिक्षण संपल्यानंतर काही वर्ष अनिश्चितीची गेली. या काळात पंकज कपूर यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या रेपर्टरी कंपनीत काम केलं. बाहेरच्या नाटकांमधून कामं केली. ‘रुका हुआ फैसलाचे’ बरेच प्रयोग केले. दूरदर्शनवर काम करण्याबाबत विचारणा होत होती, पण त्यांनी त्या कामाचा मोह काही काळ टाळला.

रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटापासून सुरुवात

याच काळात रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटात त्यांनी गांधीचे दुसरे सेक्रेटरी प्यारेलालची भूमिका केली. पण त्यांच्या याच चित्रपटामुळे त्यांना रेपर्टरीची नोकरी गमवावी लागली. एन.एस.डी.नं आधी तर त्यांना या चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली, पण चित्रपट अर्धा पूर्ण झाल्यानंतर त्यांची ही परवानगी रद्द करण्यात आली. त्यांना रेपर्टरी कंपनी सोडावी लागली. ‘गांधी’ चित्रपटात त्यांनी केवळ प्यारेलालची भूमिकाच केली नाही, तर या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत गांधींची भूमिका करणाऱ्या बेन किंग्जले या अभिनेत्याचे सारे संवाद हिंदी भाषेत डबसुद्धा केले होते. यानंतर त्यांनी शाम बेनेगल यांच्या ‘आरोहन’ या चित्रपटात छोटीशी भूमिका केली. एक उत्तम अभिनेता असल्यानं त्यांच्या भूमिकांची प्रशंसा तर होत होती, पण समांतर चित्रपटात पुरेसा मोबदला मिळत नसल्यानं त्यांना मुंबईतला खर्च भागवणंही कठीण जाऊ लागलं.

‘करमचंद’ मालिकेनं जीवनाची दिशा बदलली

याच सुमारास ‘करमचंद’ नावाच्या रहस्यमय शोध मालिकेसाठी त्यांना विचारण्यात आलं. सुरुवातीला तर त्यांनी नकार दिला. काहीही झालं तरी टेलिव्हिजन करायचं नाही अशी त्यांची धारणा होती. पण जेव्हा सर्व्हायवलचा प्रश्न आला, जेवणाखाण्याचे वांधे व्हायला लागले, तेव्हा चला स्क्रीप्ट काय आहे ते तर बघूया. झालं स्क्रीप्ट आवडलं आणि ‘करमचंद’ मालिका त्यांनी स्वीकारली. पण ते त्यांच्यासाठी ब्लेसिंग्ज इन डिसगाईज सिद्ध झालं.

दूरदर्शनवरील या मालिकेनं त्यांच्या जीवनाला एक वेगळंच वळण दिलं. करमचंद आणि केटी या पात्रांनी लोकप्रियतेचे सारे उच्चांक त्यावेळी मोडीत काढले. आणि मग हळूहळू पंकज कपूर टेलिव्हिजन आणि चित्रपट या दोन्हीही क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करायला लागले. अधूनमधून वेळ मिळेल तसा ते रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचे रंग उधळत राहिले.

चित्रपटात त्यावेळी वस्तुनिष्ठपणे कुठल्या भूमिका त्यांना मिळाल्या असत्या याची त्यांना पुरती जाणीव होती. तरुण असल्यामुळे नायकाच्या मित्राची किंवा नायिकेच्या भावाची असल्याच दुय्यम भूमिका त्यांना मिळाल्या असत्या. त्यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती. जास्तीत जास्त छोटा-मोठा खलनायक. बरं ज्या प्रशिक्षणाची त्याची पार्श्वभूमी होती तिथं, ग्रीक नाटकं, संस्कृत नाटकं, शेक्सपियर, ब्रेख्त, आयनास्को, मोहन राकेश, धर्मवीर भारती अशा लेखकांची नाटकं त्यांनी केलेली होती. चित्रपटातल्या दुय्यम दर्जाच्या भूमिकांच्या चक्रात सापडण्याची त्यांची तयारी नव्हती. अशा वेळी दूरदर्शनसारख्या फार मोठा प्रेक्षक वर्ग असलेल्या लोकप्रिय माध्यमाची दारं त्यांच्यासाठी खुली झाली. करमचंद, फटीचर, कब तक पुकारूं तुझे, फिलिप्स टेन, ऑफिस ऑफिस, जबान संभाल के, लाईफ लाईन या आणि अशा कित्येक सिरियल्समधून त्यांना एकापेक्षा एक सरस भूमिका मिळत गेल्या. या साऱ्या मालिका नितांत लोकप्रिय ठरल्या. कदाचित त्यांच्या नशिबात असाच क्रम लिहिलेला होता.

याच काळात त्यांना ‘एक डॉक्टर की मौत’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर मणिरत्नम यांच्या ‘रोझा’ या लोकप्रिय चित्रपटात त्यांनी भूमिका केली. या भूमिकेनं त्यांना नाव आणि पैसा दोन्हीही मिळवून दिलं. १९७९ मध्ये आलेल्या ‘राह’ या चित्रपटातील भूमिकेसाठी पुन्हा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. 

पंकज कपूर हे अशा अभिनेत्यांपैकी आहेत ज्यांनी समांतर सिनेमाचा जोश बघितला, कमर्शिअल सिनेमाची स्पर्धा बघितली आणि रंगमंचाची जादूही बघितली. या साऱ्या संक्रमण काळाविषयी पंकज कपूर अतिशय संयत अशी भूमिका मांडतात. एवढं प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर काम करण्याची तयारी असून काम न मिळणं, काम मिळालं तर खूपच मर्यादित मोबदला मिळणं. १० वर्ष इंडस्ट्रीत राहूनसुद्धा साधं घर घेण्याची ऐपत नसणं, हा सारा खडतर प्रवास ते त्या ऐतिहासिक चक्राचा भाग मानतात. पण पंकज कपूर कधीही कटू होत नाहीत किंवा कुणा एका घटकाला त्यासाठी जबाबदार धरत नाहीत, किंवा दोषही देत नाहीत. लाईव्ह थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या समोर प्रयोग करणं, त्यांच्या साद-प्रतिसादात वावरणं, टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाल्यावर भरून पावणं हे सारं दूरदर्शनमध्ये दूरान्वयानंही अनुभवायला मिळणं शक्य नसतं. रंगभूमीची शिस्त आणि दूरदर्शनची ‘चलता है’ ही वृत्ती कधीच मेळ खाऊ शकत नाहीत. दूरदर्शनमध्ये पुनरावृत्ती असते. पंकज कपूरला तिथं निरंतरपणे नीरसतेनं तेच तेच दिवस-रात्र करत राहणं हे कंटाळवाणं वाटायचं. पण सुदैवानं त्यांना एकापेक्षा एक सरस भूमिका मिळत गेल्या, त्यांची सर्व स्तरावर प्रशंसा झाली.

इथंही त्यांनी आपली प्रशिक्षणाची वृत्ती सोडली नाही. प्रत्येक नवी भूमिका मिळाल्यावर त्यांच्या मनात एखाद्या नवशिक्यासारखी अस्वस्थता असायची. त्या भूमिकेचा ते आंतर्बाह्य अभ्यास करायचे, ती भूमिका जिवंत करण्यासाठी अपार परिश्रम करायचे. जीवप्राण एकवटून ते प्रत्येक भूमिका जगण्याचा प्रयत्न करायचे. परंतु एवढं करूनही ती भूमिका यशस्वी होईल की नाही, प्रेक्षक तिचं कसं आणि किती स्वागत करतील ही अस्वस्थता त्यांनी निरंतर अनुभवली, भोगली. योगायोगानं त्यांच्या डोळस प्रयत्नांना आणि परिश्रमांना निरंतर यश मिळत गेलं. त्यांची प्रत्येक भूमिका आणि प्रत्येक मालिका प्रेक्षकांना चढत्या क्रमानं आवडल्या, लोकप्रिय झाल्या. या साऱ्या प्रक्रियेत ते आपली ईमानदारी, निष्ठा, परिश्रम आणि डोळस प्रयत्नांना श्रेय देतात. पर्यायानं नाट्यप्रशिक्षणानं जी त्यांची मूस घडवली आणि त्यांनी ती तेवढ्याच तीव्रतेनं जपली, या आपल्या वृत्तीला श्रेय देतात. ही वृत्तीच शेवटी तुम्हाला ते समाधान, ती तृप्ती देतात असमाधान तुम्हाला कुठलीही आर्थिक सुबत्ता, पैसा देऊ शकत नाही, अशी त्यांची धारणा आहे.

‘मकबुल’ चित्रपटापासून भरभराट

सत्तरच्या दशकानंतर दूरदर्शनचा चेहरामोहरा काहीसा दाक्षिणात्य चित्रपटांसारखा व्हायला लागला. एका नव्या प्रकारच्या चित्रपटांचा जमाना सुरू झाला. वेगळ्या प्रकारच्या कथा, वेगळ्या प्रकारची हाताळणी यामुळे पंकज कपूरसारख्या कलावंतांना त्यात वाव मिळायला लागला. ‘एक डॉक्टर की मौत’, ‘मकबुल’, ‘धर्मा’, ‘ब्लू अम्ब्रेला’, ‘मटरूकी बिजली का मन डोला’ असे चित्रपट निर्माण व्हायला लागले. या चित्रपटांमधून पंकज कपूर यांना तोलामोलाच्या भूमिका करायला मिळाल्या. नव्हे त्यांच्यासाठी तशा प्रकारच्या भूमिका लिहिल्या जायला लागल्या.

आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतरही कुठली भूमिका करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही, असं जेव्हा त्यांचे समीक्षक विचारतात तेव्हा आपल्या ३५ वर्षांच्या सक्रिय कार्यकाळात ४०-४५ भूमिका त्यांनी केल्या असतील पण समाजात, जगात असे शेकडो लोक आहेत जे एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. त्यातलं कुठलंही आव्हानात्मक चरित्र करायला त्यांना आवडेल असं ते सांगतात. मात्र अमुकच एक प्रकारची भूमिका करावीशी वाटते असा त्यांचा आग्रह नाही. हां, ज्या भूमिका आतापर्यंत केल्यात, त्यांच्यापेक्षा ती वेगळी असावी असा मात्र त्यांचा आग्रह असेल. एका व्यक्तीला जिवंत करण्यात, त्याला सशरीर, आपलं अस्तित्व देऊन आपल्या प्रेक्षकांपुढे सादर करण्यातला आनंद त्याच्यासाठी अनमोल असेल असं ते मानतात. या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, प्रत्येक भूमिकेचा बाह्य दर्शनाचा भाग, त्याची लय, ढब, अविर्भाव हे शक्यतो त्याच पात्राचे असतील असा पंकज कपूर यांचा कटाक्ष असतो. ते सुनिश्चित करून प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते सर्वार्थानं जिवाचं रान करतात.

कामाची चोखंदळ निवड

पंकजजी कामाच्या निवडीच्या बाबतीत अतिशय चाखंदळ आहेत. येईल त्या कामावर तुटून पडण्याची त्यांची वृत्ती नाही. शक्यतो अशाच निवडक दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं, ज्याच्या कामाच्या पद्धतीबद्दल त्यांना आदर आहे, ज्याच्याकडे चांगली कथा आहे, ऑफर केलेल्या रोलमध्ये वेगळं काही करण्याच्या शक्यता आहे. काही दिग्दर्शकांसोबत दोन-तीन चित्रपटातही त्यांनी काम केलं असं सांगताना त्यांच्यातील परस्पर समज वाढलेली असल्यानं, कामाच्या पद्धतीची दोघांनाही कल्पना असल्यानं, काम करण्याला हुरूप येतो. परिणामही चांगले मिळतात.

स्वत:ला ते भाग्यशाली मानतात की एवढे सारे पुरस्कार, मानसन्मान, ऐेश्वर्य मिळाल्यानंतरही त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत कुठलाही फरक पडला नाही. यासाठी ते ईश्वराचे आभार मानतात. याच तृप्त भावनेतून ते आज कुठल्याही ढाब्यावर बसून मजेत जेवू शकतात, कुठल्याही वाहनानं प्रवास करू शकतात. त्यांच्या सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वाचा त्यांना एक वेगळाच अभिमान वाटतो. आपल्या निर्मात्याच्या सोयीसाठी अगदी दिल्लीच्या चांदनी चौकसारख्या रहदारीच्या बाजारातून पंकजजी एका चरित्राचा अभिनयाचा भाग म्हणून बिनदिक्कत निघून जाऊ शकतात. कुणालाही पत्ता लागण्याच्या आत त्याचं शूटिंग संपलेलं असेल एवढे ते सर्वसामान्यासारखे वाटतात, वागतात आणि प्रत्यक्ष आयुष्यही जगतात.

जेव्हा शाहिद कपूर पंकज कपूर यांच्याकडे येऊन सांगू लागला की त्याला अ‍ॅक्टर व्हायचंय तेव्हा पंकज कपूर यांना आश्चर्य वाटलं. तशी तो नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याची तयारी करत असल्याची कल्पना त्यांना होती, पण शाहिद चक्क त्याला चित्रपटाची ऑफर आल्याचं सांगायला लागला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तो मध्यवर्ती नायकाची भूमिका करतोय हे ऐकल्यावर त्यांना खूप आनंद झाला. शाहिदनं जेव्हा वडील म्हणून त्याच्या बरोबर येऊन कॉन्ट्रक्ट वगैरे साईन करावा अशी विनंती केली, तेव्हा पंकजजीनी त्याला सल्ला दिला की त्यानं स्वबळावर ही भूमिका मिळवली आहे. तेव्हा त्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यानंच साईन करावा म्हणजे तुझं यश-अपयश हे केवळ तुझंच असेल. आता तू तरुण झाला आहेस. तुझे निर्णय तू स्वत:च्या बळावर घ्यायला हवेत. अशीच शिकवण आपल्या तरुणपणी लुधियानामध्ये वडिलांकडून आपल्याला मिळाली आहे. तसाच सल्ला त्यांनी शाहिदला दिला.

पत्नी सुप्रियाची साथ

पंकज कपूर यांचा पहिला विवाह निलिमा अझीम यांच्याशी झाला होता. निलिमांचा त्यावेळी दूरदर्शनवर खूप दबदबा होता. या दोघांच्या विवाहानंतर त्यांना एक मुलगाही झाला. हाच त्यांचा पहिला मुलगा शाहिद कपूर. पंकज कपूर यांचे दुसरे लग्न नामवंत अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्याशी झालं. या लग्नातून पंकज कपूर यांना दोन मुलं झाली.

पंकज कपूर यांना सुप्रियाचा, आपल्या दुसऱ्या पत्नीचा खूप मोठा आधार वाटतो. सुप्रिया एक अतिशय सक्षम अभिनेत्री, जबाबदार गृहिणी आणि मुलांवर भरभरून प्रेम करणारी प्रेमळ आई आहे. एका वर्षी सुप्रियाला ‘रामलीला’तील खलनायिकेच्या भूमिकेसाठी आणि पंकज कपूर यांना ‘मटरूका मन डोला’मधील विनोदी भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्यांचं नॉमिनेशन मिळालं, तेव्हा पंकज कपूरनं सुप्रियाचं भरभरून कौतुक केलं. आणि अशी अपेक्षा व्यक्त केली की फिल्मफेअरची पुरस्कारातली ही रहस्यमयी ‘ब्लॅक लेडी’ सुप्रियाला निश्चित मिळेल आणि योगायोगानं त्या दोघांनाही ते पुरस्कार त्या वर्षी मिळाले हे विशेष.

पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक कपूर हे कलावंत पतीपत्नी सर्वार्थानं एकमेकांना पूरक आहेत. सुप्रिया ही सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री दीना पाठक यांची दुसऱ्या नंबरची मुलगी. रत्ना पाठक शहाची धाकटी बहीण. पंकज कपूरशी त्यांचं लग्न झालं आणि त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहेत. नुकतेच ‘सरकार’ आणि ‘गोलियों की लीला रामलीला’ या चित्रपटात सुप्रियानं अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.

पंकज कपूर यांच्या प्रदीर्घ अभिनय प्रवासात चित्रपटातील यश त्यांच्या वाट्याला बरंच उशिरा आलं हे सत्य असलं तरी त्यांची त्याविषयी फारशी तक्रार नाही. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात पंकज कपूर यांनी दूरदर्शनवर एका पाठोपाठ एक कामं करण्याचा धडाका लावला. त्यांचे समकालीन तेवढेच तोलामोलाचे अभिनेते नासिर आणि ओम पुरी यांनी मात्र झगडत राहणं स्वीकारलं. याबद्दल ते खूप स्पष्टपणे आपली भूमिका मांडतात की, मुख्य प्रवाहातील चित्रपटात त्यांना छोट्या-मोठ्या खलनायकांच्या किंवा नायक-नायिकांच्या भावाच्याच भूमिका मिळतील असं वाटलं. ज्यानं कालिदास, भास, मोहन राकेश यांची नाटकं गाजवली त्यानं अशा दुय्यम भूमिका करणं हे त्यांना रूचलं नाही. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तब्बल १०-१२ वर्षं उत्तम प्रकारे हिंदी थिएटरही केलं होतं.

पंकज कपूर यांनी आता आपल्या दुसऱ्या एका हॉबीला वेळ द्यायचं ठरवलंय. ते आता आपल्या लेखन, वाचनाच्या छंदातून चित्रकारितेसाठी वेळ काढतात. नियमितपणे फावल्या वेळात पेंटिंग्ज करतात. त्यांनी आतापर्यंत ४०च्या आसपास विविध विषयांवर वेगवेगळ्या शैलीत चित्रं काढलीत. १०-१२ त्यांच्या मुलांच्या बेडरूम्समध्ये आहेत. लवकरच त्यांचा आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा विचार आहे. त्यांच्या या छंदाची सुरुवातही मजेशीर पद्धतीनं झाली. एका ख्रिसमसला त्यांच्या मुलांनी त्यांना काही पेंट्स आणि चित्रकलेचं साहित्य भेट म्हणून दिलं. त्यांनी सहज म्हणून चित्रं काढायला सुरुवात केली. आता त्यांचं मन त्यात रमतं, एक आत्मिक समाधान त्यांना त्यातून मिळतं.

‘मौसम’ दिग्दर्शनाचा पहिला अनुभव

पंकज कपूर यांनी ‘मौसम’ हा त्यांचा पहिला-वहिला चित्रपट दिग्दर्शित केला. योगायोगानं त्यांनी आपल्या मुलाला या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत घेतलं. हा चित्रपट तयार व्हायला आणि प्रेक्षकांसमोर यायला थोडा अधिक कालावधी लागला, त्यामुळे बरेच गैरसमज पसरवण्यात आले. त्या साऱ्यांची उत्तरं पंकज कपूर यांनी सात वर्षापूर्वी मोकळेपणानं देण्याचा प्रयत्न केला होता. खरं म्हणजे ‘मौसम’ची ही कथा एअर फोर्समधल्या एका तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असल्यानं स्पेशल परवानग्या घेऊन हे चित्रीकरण बंगलोरमध्ये आर्मीच्या परिसरात करण्यात आलं.

पंकज कपूर यांनी जवळपास तीन वर्षं या स्क्रीप्टवर काम केलं. आपल्या नोट्स काढल्या. प्रत्यक्ष चित्रपट लिहायला त्यांना सहा महिने लागले. चित्रपट रंजक आहे. अतिशय समकालीन आहे. मूलतया ही एक हळुवार लव्ह स्टोरी आहे. एअरफोर्समधील अधिकाऱ्यांच्या जीवनातील बराच भाग असल्यानं प्रत्यक्ष चित्रीकरणात एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांचंही खूप मार्गदर्शन पंकजजींना झालं. सारी दृश्यं वास्तव वाटून त्यांचा प्रभाव अधिक वाढला.

त्यांच्या भावी चित्रपटांमध्ये ‘हॅपी’ आणि ‘ऑफिस ऑफिस’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आणखीन काही संहिता विचाराधीन आहेत.

‘थिएटर ऑन’ नाट्यसंस्थेची स्थापना

स्टेज आणि थिएटर हे जरी पंकज कपूर यांचं पहिलं प्रेम असलं तरी ते आपल्या मालिका, चित्रपट, चित्रपटनिर्मिती, चित्रपट दिग्दर्शन या साऱ्यांच्या व्यस्ततेतून थिएटरसाठी वेळ काढू शकले नाहीत. शिवाय करण्याजोगी चांगली नाट्य संहिता मिळणं ही त्यांची खूप मोठी अडचण होती. त्यांच्या ‘थिएटर ऑन’ ही संस्था काढण्यामागची प्रेरणा त्यांना गतकाळात घेऊन जाते. अगदी तरुण असताना अशा शीर्षकाची नाट्यसंस्था असावी असं त्यांचं स्वप्न होतं. ते आता प्रत्यक्षा उतरलं. त्यांच्या मुलांच्या संमतीनं, सहभागातून. ज्यांनी खूप थिएटर केलंय अशा मित्रांच्या अनुभवाचा लाभ घेऊन, तरुण रक्ताला, त्यांच्या विचारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा त्यांचा मुख्य उद्देश आहे. इतरांपेक्षा फार वेगळं, स्पेक्टॅर्येक्युलर वगैरे करण्याचा त्यांचा विचार नाही. तात्कालिक समस्यांना वाचा फोडणारं, रिलेव्हंट, लोकांशी जोडणारं असं काही करण्याचा त्यांचा मानस आहे.

पंकज कपूर यांनी २० वर्षांपूर्वी लिहिलेल्या कादंबरीचं वाचनही त्यांनी नुकतंच अनेक ठिकाणी केलं. स्त्रियांच्या समस्यांविषयी त्यांना खूप काही वाटायचं. लहान मुली, बालिकांपेक्षा त्यांच्या माता, मावश्या, त्यांच्या आज्या यांच्या समस्यांविषयी लिहिण्याचं त्यांच्या मनानं घेतलं. ४०-५०-६० वर्षांच्या महिलांचं काय? तरुण मुली शिक्षणाच्या, कामाच्या निमित्तानं बाहेर, परदेशातही जातील. पण या पाठी राहिलेल्या महिलांचं काय? हा प्रश्न त्यांना सतावतो. त्यांनी आपली मुलगी ‘सना’ हिच्या सोबत हे नाटक केलं.

त्यांच्या संस्थेच्या निर्मितीत सना आणि रूहान ही त्यांची दोन्ही मुलं सक्रियपणे काम करताहेत. आपली मुलं मोठी झालीत आणि आपल्या आवडीच्या क्षेत्यात आलीत, स्वेच्छेनं त्यात काम करीत आहेत, ही त्यांच्यासाठी फारच समाधानाची बाब आहे.

प्रेरणास्त्रोत

पंकज कपूर आपल्या प्रेरणास्त्रोतांविषयी सांगताना आपल्या वडिलांचा उल्लेख मोठ्या सन्मानानं करतात. त्यानंतर राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक इब्राहिम अल्काझी आणि तिथले सारे शिक्षक यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला घडवलं हेही सांगतात. याच्या नंतर जागतिक स्तरावरचे सारे अभिनेते, दिग्दर्शक ज्यांचे चित्रपट ते बघत आले, ज्यांनी त्यांना प्रेरित केलं, विचार करायला लावलं, त्यांची दृष्टी प्रगल्भ केली. चांगलं साहित्य, चांगलं संगीत, नृत्य, दृककला साऱ्यांनी दृष्टी दिली. साऱ्या गोष्टी ज्यांचा नवनिर्मितीशी संबंध येतो, त्या साऱ्या गोष्टी जेवढं तुम्ही सजगपणे बघता, आत्मसात करता तेवढं तुम्ही समृद्ध होत जाता. त्यांनीच त्यांना सदैव जागृत ठेवलं. आजही त्यांची शिकण्याची प्रक्रिया तेवढ्याच निष्ठेनं सुरू आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.

sontakkem@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......