घरंदाज स्वरशुभदा
कला-संस्कृती - सतार ते रॉक
पं. डॉ. राम देशपांडे
  • शास्त्रीय गायिका शुभदा पराडकर
  • Sat , 03 February 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti सतार ते रॉक शुभदा पराडकर Shubhada Paradkar

शास्त्रीय गायिका पं. शुभदा पराडकर आज एकसष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. शुभदाताई सर्वच आघाड्यांवर अत्यंत समाधानी, यशस्वी आणि आनंदी  आहेत व कलासक्त जीवन जगत आहेत. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी व आपले जीवन समृद्ध करावे. शुभदाताई, आज तुम्ही फक्त ६० वर्षांच्या झाल्या आहात. तुम्हाला अजून बरीच वर्षं आमचे कान तृप्त करायचे आहेत. जीवेत् शरदः शतम्!!

.............................................................................................................................................

गेल्या तीस वर्षांपासून मी पंडिता शुभदा पराडकर यांची घरंदाज गायकी ऐकतो आहे. ही अस्सल घरंदाज गायकी ऐकली की, मला साजूक तुपातला शिरा आठवतो. त्या शिऱ्याची गोडी काही औरच! तशी या गायकीची मजा ही अतुलनीयच आहे. ‘घरंदाज’ हा शब्द मी अशासाठी वापरतो आहे की, घराणेबाज आणि घरंदाज या दोन गायकीत फरक असतो. घराणेबाज गायकीत 'बघा, आमच्या घराण्यात असे, असे, गायले जाते' ही दर्पोक्ती असते. मात्र घरंदाज गाण्यात कलाकार नैसर्गिकरीत्याच गात असतो आणि त्यातून त्या गायकीचा घरंदाजपणा आपसूकच दिसत असतो. तो कलाकाराला वेगळा दाखवावा लागत नाही. दुसऱ्या प्रकारच्या अत्यंत आनंददायी अशा ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर गायकीच्या अधिकारी आहेत पं. सौ. शुभदा पराडकर!

एकदा एका गाणं जाणणाऱ्या रसिकांनी म्हटलं होतं की, ‘कै. पं. गजाननबुवांचं गाणं पुरुष स्वरात ऐकायचं असेल तर बुवांचे सुपुत्र मधुकर जोशी व पं. उल्हास कशाळकरांचं गाणं ऐका आणि स्त्रीस्वरात ऐकायचं असेल तर सौ. शुभदा पराडकर यांचं गाणं ऐका.’ या प्रतिक्रियेतून एक अत्यंत चांगली बाब लक्षात येते की, शुभदाताईंनी गजाननबुवांची गायकी पुढच्या पिढीला ऐकवली आणि त्या गायकीचे आमच्या आणि आमच्या पुढील पिढीवर संस्कार केले. हे असे संस्कार आहेत की, जे पुढील पिढीवर होणं हे शास्त्रीय संगीताच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं होतं. राग-स्वर-लय-ताल यांचं अद्वैत असलेली ही गायकी इतकी गहन आहे की, यातली काही थोडी अंगं जरी पुढील पिढीला साध्य झाली तरी त्यांचं कलाकार म्हणून आयुष्य घडेल.

शुभदाताईंनी गजाननबुवांकडे घेतलेली तालीम त्यांच्या गायकीच्या अंगोपांगात ठळकपणे दिसते. कै. पं. बबनराव हळदणकर आणि कै. पंडिता पद्मावती शाळिग्राम-गोखले यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं. पण गजाननबुवांच्या गायकीचा प्रभाव शुभदाताईंच्या गाण्यातून कमी झाला नाही आणि या दोन गुरुंनी तो कमी करायला सांगितलेही नाही. कै. पं. बबनरावांच्या गायकीतील आग्रा घराण्याची सौंदर्यस्थळं शुभदाताईंनी निवडून उचलली. बोलबनावाची विशिष्ट पद्धत, तिहायांची खासीयत आपल्या गाण्यात आणली. कै. पद्मावतीबाईंकडून अस्सल ठुमरी आत्मसात केली व ती जिद्दीने आपल्या मैफलींमधून मांडली. पण तरी खरी सेहवागस्टाईल बॅटिंग पाहायची असेल तर शुभदाताई जेव्हा गजाननबुवांच्या परंपरेतील एखादा राग सुरू करतात, तेव्हा बघायला मिळते. कामोद, हमीर, केदार, छायानट, शहाणा, सोहनी, किती राग सांगू? अशा कितीतरी मैफली मी स्वतः अनुभवल्या आहेत. एकदा का मैफल ताब्यात आली की मग 'हुं' अशी समेवर येतानाची त्यांची मुद्रा पाहणे म्हणजे आनंद, आनंद आणि आनंदच!

शुभदाताईंबद्दल एक गायिका आणि एक व्यक्ती म्हणून माझं निरीक्षण असं आहे की, त्या व्यासपीठावर बसल्या की सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत आणि व्यासपीठावरून उतरल्यावर मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चंद्राची शीतलता अनुभवास येते. अत्यंत प्रेमळ, आनंदी, समाधानी असा त्यांचा स्वभाव आहे. सूर्य-चंद्राचं असं समीकरण फार कमी पाहायला मिळतं.

शुभदाताईंच्या गायकीचे विश्लेषण करायचे म्हटले तर आलाप, बोलआलाप, रागस्वरूप, स्वरोच्चार, स्वरलगाव, बोलांची लयकारी, बोलबनाव, तिहाया, ताना, बोलताना, गमक, मींड, बेहलावा, सौंदर्यदृष्टी, घरंदाजपणा, वजनदारपणा इ. सर्वच अंगांवर त्याचं समान प्रभुत्व आहे. मग गाणं उच्च दर्जाला पोहोचलं नाही तरच नवल.

शुभदाताई गृहिणी म्हणूनही तितक्याच उत्तम आहेत, बरं का! यजमान सतीशदादांची संपूर्ण काळजी घेणे, मुलगी रश्मी, मुलगा रणजित यांची संपूर्ण जबाबदारी घेणे यामध्ये कधीही त्यांनी आपलं गाण्याचं करिअर येऊ दिलं नाही. ‘आपण जसं देऊ तसं आपल्याला मिळतं', या उक्तीनुसार सतीशदादा आणि मुलंसुद्धा ताईंच्या गाण्याच्या मध्ये आडवे आले नाहीत, उलट त्यांच्या सोबत राहिले. सतीशदादांनी त्यांना अनेक वर्षं संवादिनी साथ दिली तर रश्मी आज एक तरुण गायिका म्हणून पुढे येत आहे. कलाकार कौटुंबिक पातळीवरसुद्धा उत्तमरीत्या यशस्वी होऊ शकतो, हे शुभदाताईंनी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध केलं आहे.   

शुभदाताईंचं एक गुरु म्हणूनही कार्य फार मोठं आहे. त्यांच्या अनेक शिष्या आज उत्तम गायिका म्हणून पुढे आल्या आहेत. श्रुती गोखले, शुभदा पावगी, रश्मी पराडकर, ऐश्वर्या राव यासारख्या अनेक शिष्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. शाल्मली खोलगडे, एम. एम. मानसीसारख्या बॉलिवुड स्टारसुद्धा शुभदाताईंच्या शिष्या आहेत.

आज एकसष्टीमध्ये पदार्पण करताना शुभदाताई सर्वच आघाड्यांवर अत्यंत समाधानी, यशस्वी आणि आनंदी  आहेत व कलासक्त जीवन जगत आहेत, असं म्हणावं लागेल.

आमच्यासारख्या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी व आपले जीवन समृद्ध करावे असे वाटते. 

शुभदाताई, आज तुम्ही फक्त ६० वर्षांच्या झाल्या आहात. तुम्हाला अजून बरीच वर्षं आमचे कान तृप्त करायचे आहेत. जीवेत् शरदः शतम्!!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख