पद्मावत : कलम, आज उनकी जय बोल 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार 
  • ‘पद्मावत’चं एक पोस्टर
  • Mon , 29 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie पद्मावत Padmaavat पद्मावती Padmaavati

गेल्या काही महिन्यांपासून ते अगदी कालपर्यंत (आणि कदाचित हे लिहीत असतानाही) पूर्वाश्रमीचा 'पद्मावती', आणि आताचा 'पद्मावत' या चित्रपटावरून होत असलेले आरोप-प्रत्यारोप आणि गदरोळानंतर 'यासाठी हा खटाटोप होता तर!' असं वाटतं. आणि अर्थातच अपेक्षित असल्याप्रमाणे या खटाटोपाला काही अर्थच नव्हता आणि हा गदारोळ गरजेचाही नव्हता, असं मत तयार होतं. 

मुळात याविषयी बोलताना ही कथा म्हणजे इतिहास की कल्पना इथपासून सुरुवात होते. पण आपण आपल्यापुरता हा प्रश्न बाजूला ठेवून, याकडे चित्रपटाच्या सुरुवातीला 'डिस्क्लेमर'मध्ये सांगितल्याप्रमाणे 'इतिहासाचं सिनेमॅटिक लिबर्टी घेत केलेलं चित्रण' अशा दृष्टीनं पाहू. तर हा चित्रपट 'मलिक जायजी' यांनी पंधराव्या शतकादरम्यान लिहिलेल्या 'पद्मावत' या नावाच्या महाकाव्यावर आधारित आहे. या काव्यातील गोष्ट आणि इतर काही ठिकाणी लिहिलेली गोष्ट आणि नंतर इतिहासात सुवर्णाक्षरांनी वगैरे नोंदवलेली गोष्ट अशी या एकाच कथेची किंवा तथाकथित इतिहासाची बरीच रूपं दिसून येतात. ज्यात अर्थातच बरीच तफावत आहे. त्यामुळे भन्साळींनी केलेलं रूपांतर चूक की बरोबर हे ठरवायला कुठलंही परिमाण नाही. त्यामुळे याकडे फक्त एक चित्रपट म्हणून पाहिल्यास बरं पडेल. 

तर 'पद्मावत'ची कथा साधारण १३व्या शतकातील आहे. ज्यात सिंघालची राजकुमारी पद्मावतीच्या (दीपिका पदुकोण) सौंदर्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. तर याच राज्यात चितोडगडचा राजा महारावल रतन सिंह (शाहिद कपूर) येतो. आणि शिकार करताना त्याची भेट पद्मावतीशी होते. खरं अपघातानं भेट होते म्हणणं योग्य ठरेल. शिकार करण्यात निपुण असणाऱ्या रूपवान पद्मावतीला पाहून आणि तिचा एक बाण लागून रतन सिंह शब्दशः घायाळ होतो. आणि अर्थातच तो तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. 

तर दुसरीकडे अल्लाउद्दीन खिलजी (रणवीर सिंग) हा घात करून दिल्लीच्या तख्तावर विराजमान होतो. आणि मेवाडच्या याच नवीन सुनेची, अर्थात पद्मावतीच्या सौंदर्याची ख्याती त्याच्यापर्यंत पोहचते. तो तिला मिळवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो. त्यातून त्याच्यात व रावल घराण्यात झालेला संघर्ष आणि पर्यायानं युद्धाची कथा म्हणजे पद्मावत. 

आता हे कथानक किती क्लिशे आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. तरीही कथानकाऐवजी त्याची हाताळणी कशी असेल यासाठी चित्रपट पाहण्याची इच्छा होऊ शकते. पण इथं तर ही हाताळणीही काही विशेष प्रभाव पाडू शकत नाही. कारण भन्साळी 'बाजीराव मस्तानी' आणि त्याच्या यशाची पुनर्निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात येतं. तेही एकवेळ ठीक आहे. पण 'बाजीराव मस्तानी'मध्ये होती, तशा बऱ्याच उजव्या पटकथेचा इथं अभाव आहे. बरीच लांबलेली दृश्यं, अति-नाट्यमयता वगैरे गोष्टींमुळे एकूण प्रभाव कमी होतो किंवा बऱ्याचदा पडतही नाही. 

दीपिका तिला मिळालेली भूमिका चांगली निभावते. पण त्यातही तिचा वावर फार सुखावणारा आहे असं नाही. उलट जवळपास सगळं कथानक तिच्याभोवती फिरत असूनही तिला तितकं फुटेज न मिळाल्यानं चित्रपट तिची खिल्लीच उडवतो. तर दुसरीकडे रणवीरच्या खिलजीला जणू 'लार्जर दॅन लाइफ' बनवण्याचा प्रयत्न करतो. रणवीरला यासाठी फार काही विशेष करावं लागलं असेल असं वाटत नाही. कारण तो रणवीर वाटतो. तो खऱ्या आयुष्यात किंवा बॉलिवुडच्या पुरस्कार सोहळ्यात किंवा अगदी 'बाजीराव मस्तानी'मध्येही जसा होता तसाच वाटतो. फक्त बदलतो तो पेहराव आणि काही वेळा दिसणारा त्याचा खराखुरा आणि फारसा लाउड नसलेला परफॉर्मन्स. शिवाय यात 'मल्हारी'सारखंच एक गाणंही आहे. किती तो पुनर्निर्मितीचा अट्टाहास!

शाहिद यात अगदी रणवीरइतका उच्छाद मांडणारा नसल्यानं जरा बरा वाटतो. पण बहुतांशी सगळीच पात्रं लिखाणात तितकीशी चांगल्या रीतीनं उतरली नसल्यानं आणि अगदी पद्मावती आणि रावलमधली केमिस्ट्रीदेखील फार परिणामकारक नसल्यानं सगळं वातावरण नाट्यमय राहतं. बॉलिवुडमधील मेनस्ट्रीम चित्रपटातील अभिनेत्रींचा उल्लेख करताना बऱ्याचदा त्यांना शोभेची बाहुली किंवा विनोदानं 'बार्बी डॉल' म्हटलं जातं. इथं हेच शाहिदविषयी लागू पडतं. तो इथं 'जी. आय. जो.' (G. I. Joe) अॅक्शन फिगर वाटतो. आणि जॉनी ब्रावो किंवा पॉपाय (popeye) सारखा वावरतो. असं पोट आत घेऊन, छाती काढून परंपरा, प्रतिष्ठा अनुशासन वगैरेंवर बोलतो.

अदिती राव हैदरीनं साकारलेली 'मेहरुनिसा'देखील फार मोठी भूमिका नसल्यानं आणि त्याहून जास्त इतर पात्रांप्रमाणेच याही पात्राची खोली तितकीशी नसल्यानं फार प्रभावी वाटत नसली तरी तिच्या वाट्याला आलेलं काम उत्तम प्रकारे करते. 

हे सगळं तरी अपेक्षित होतं. 'मलिक कफुर'च्या भूमिकेत असलेल्या जिम सर्भ मात्र वेगळा आणि प्रभावी परफॉर्मन्स देऊन जातो. पण होमोसेक्शुअल असणारा हा माणूस फक्त खिलजीचं बायसेक्शुअल असणं दाखवण्यासाठी आणि काही विनोद उकळवण्यासाठी उभा केला गेलाय का, असा प्रश्नही पडतो. तो बाजूला ठेवल्यास जिमचा परफॉर्मन्स आवडला नाही असं होणार नाही. 

भन्साळी प्रॉडक्शन्सची भव्यदिव्यता जरी दिसत असली तरी त्यातील कृत्रिमपणा काही वेळा खटकत असला तरी काही अफाट दृश्यं आणि भन्साळींची खासीयत असलेले सेट्स यातही यात आहेतच. त्यामुळे आर्ट डायरेक्शन, सिनेमॅटॉग्राफी वगैरेंच्या अभ्यासासाठी हा चित्रपट पाहावा असा झालाय.

बाकी चित्रपटाची लांबी बरीच आणि कथानक पाहता अनावश्यकरीत्या अधिक वाटते. शिवाय बऱ्याचदा (आणि वेळोवेळी) केलं जाणारं 'राजपूत' या संज्ञेचं उदात्तीकरणदेखील खटकत राहतं. आणि हे उदात्तीकरण सध्या देशभर सुरू असलेल्या हिंसक घटनांमुळे हास्यास्पद ठरतं. 

आणि या सर्व गोष्टींमुळे बऱ्याचदा दिसणारी उत्तम सिनेमॅटोग्राफी, काही दृश्यं, दीपिकाचे काही चांगले सीन्स यांकडे दुर्लक्ष होतं किंवा खरं तर दुर्लक्ष होतं म्हणण्यापेक्षा यातील दोषांचं पारडं यातील चांगल्या गोष्टींपेक्षा जास्त असल्यानं ते दोष ठळकपणे जाणवतात. आणि मग चित्रपट म्हणून पद्मावत म्हणावा तितका प्रभावी वाटत नाही. 

रामधारी सिंह 'दिनकर' यांची एक कविता आहे. तिचं नाव 'कलम, आज उनकी जय बोल' असं आहे. जी अर्थातच त्या काळी समाजातील काही गौरव करण्यालायक असलेल्या संज्ञांचा दाखला देत, त्याविषयी काही चांगल्या बाबी सांगते. पण आज फोल आणि अंध व्यक्तिपूजा किंवा एखाद्या वाईट बाबीचं होत असलेलं उदात्तीकरण पाहून उपरोधिकपणे या कवितेचा उल्लेख करावासा वाटला. असो.

बाकी तरीही समोर कुठलाच पर्याय नसल्यानं म्हणा किंवा या वादामुळे निर्माण झालेल्या (किंवा करवून घेतलेल्या) उत्सूकतेपोटी कुणाला हा चित्रपट पाहायचा असल्यास त्याला आपण काय सांगणार? After all it's a free country. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यात अगदी 'कुण्णी'ही हस्तक्षेप करण्याचं काही कारण येत नाही. अगदी न्यायालयदेखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि चित्रपटाच्या बाजूनं आहे. पण बाकी चित्रपट पहायला जाताना आपण कुठल्या राज्यात आहोत याची एकदा खात्री करून घ्या म्हणजे झाल! कारण आपल्याला स्वातंत्र्य जरी असलं तरी ते मिळेलच याची खात्री नाही ना! 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख