अजूनकाही
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेमे, स्पर्धा, निरनिराळ्या चर्चा- मुलाखतींचे फोरम, फिल्म बाजार या सगळ्याचा सोहळा असतो. पिफही त्याला अपवाद नाही. मात्र, पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. (पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवाला असलेला तरुणाईचा सहभाग). इथं होणाऱ्या मराठी सिनेमांच्या स्पर्धेसाठी जे ज्युरी असतात, त्यात कोणीही मराठी भाषिक नसतं. देशाविदेशातून आलेले, सिनेमाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेले हे ज्युरी आपला सिनेमा पाहताना काय विचार करतात, काय शोधतात, त्यांना काय सापडतं हे पाहणं इंटरेस्टिंग असतं असं महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांना वाटतं आणि ते खरंही आहे. काही वर्षांपूर्वी, परदेशातल्या एका दिग्दर्शकानं एका सिनेमाविषयी बोलताना म्हटलं होतं, ‘अमुक एका सिनेमात आई-वडिलांबरोबर जेवणारा मुलगा दरवाजावरची बेल वाजते तेव्हा आईला दार उघडायला सांगतो. आमच्याकडे असं होणार नाही.’ ‘आमच्याकडे होतं, कारण इथं मुलांनी आईला गृहीत धरण्यामध्ये अपमानास्पद असं काहीच नसतं,’ मी त्यांना म्हटलं होतं. या वर्षी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘पिंपळ’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचं आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पारितोषिक देताना ज्युरींनी म्हटलं, “आजच्या भारतासाठी महत्त्वाच्या आणि तरीही वैश्विक प्रश्नाला हात घालणारा हा सिनेमा आहे. स्वत:च्या मुळांशी आणि संस्कृतीशी प्रामाणिक राहूनही माणसानं बदलायचं कसं? जगाशी नातं सांगण्याचा प्रयत्न करायचा कसा? आयुष्यातला अखेरचा काळ समरसून जगण्याचा प्रयत्न करत असतानाच स्वत:च्या मर्यादांना सामोरं जाणाऱ्या एका वयस्क पुरुषाची कहाणी या सिनेमानं आम्हाला सांगितली आहे.”
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342
.............................................................................................................................................
आपल्याला माहीत नसलेल्या भाषेतला सिनेमा पाहताना आपण सर्वस्वी सबटायटल्सवर अवलंबून असतो. त्यामुळे काही वेळा सिनेमातले बारकावे, न्युआन्सेस, निसटण्याची शक्यता असते. एका वर्षी सुप्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासरवल्ली पुण्याला आले होते. त्यांच्या एक सिनेमावर बोलत असताना ते मला म्हणाले होते, “या सिनेमात माझी एक व्यक्तिरेखा जी कविता म्हणते ती तमिळमध्ये आहे, कन्नडमध्ये नाही. आणि त्यामागे कारण आहे. पण तुम्हाला मुळात भाषा बदललेलीच जाणवणार नाही, तर त्यामागचं कारण लक्षात येणं दूरच!”
कासरवल्लींचं म्हणणं शंभर टक्के पटणारं असलं, तरी सबटायटल्सशिवाय पर्याय नसतोच ना. त्यातून जे उमगतं, पडद्यावरच्या चित्रांमधून जे दिसतं ते मनाला भावलं की, दिग्दर्शक यशस्वी झाला म्हणायचं!
या वर्षीच्या पिफमधल्या अशाच दोन अतिशय इंटरेस्टिंग सिनेमांविषयी इथं सांगायचंय.
पहिला सिनेमा होता आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला. जॅम (Djam) हा टोनी गॅटलिफ यांचा सिनेमा त्यांच्या आजवरच्या सिनेमांच्या जातकुळीतलाच म्हणायला हवा. रिबेटिको हा ग्रीक संगीतातला एक प्रकार. शहरी आणि लोकाभिमुख. विशेषत: गरिबांचं मन या गाण्यांमधून व्यक्त होतं. १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते साधारण १९५०च्या दशकापर्यंत हे संगीत ग्रीसमध्ये खूप लोकप्रिय होतं. मधल्या काळात ते हरवून गेल्यासारखं झालं असलं, तरी १९६०च्या उत्तरार्धात आणि ७०च्या पूर्वार्धात त्याचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
सिनेमाचा काळ मात्र आजचाच आहे. काकुरगॉस हा खलाशी आपल्या सावत्र मुलीला, जॅमला, तुर्कस्तानात- इस्तानबूलला जायला सांगतो इथं सिनेमा सुरू होतो. त्यांच्या बंद पडलेल्या बोटीचा एक दुर्मीळ भाग आणणं हे जॅमचं काम असतं. म्हटलं तर हा तिच्या प्रवासाचा सिनेमा आहे. म्हटलं तर तिच्या रिबेटिकोवरच्या प्रेमाचा आहे. म्हटलं तर ग्रीसच्या आजच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा वेध आहे. आणि म्हटलं तर सिरियातून स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची पार्श्वभूमीही आहे. शिवाय हे सगळं दाखवताना एक मस्त गोष्टही दिग्दर्शकानं सांगितलीये. जॅमच्या भन्नाट, जिप्सी टाईप व्यक्तिरेखेच्या माध्यमातून.
ग्रीकच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम काकुरगॉसच्या रेस्टॉरंटच्या व्यवसायावरही झालाय. कोणत्याही क्षणी त्याच्यावर टाच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची बोट लवकरात लवकर सुरू होणंही गरजेचं आहे.
जॅम इस्तंबूलला पोचते. इथं तिची गाठ पडते अअॅव्हरीलशी. फ्रान्सहून आलेली ही तरुण मुलगी सिरियाच्या सीमेवर आलेल्या विस्थापितांना मदत करण्याच्या उदात्त हेतूनं येते खरी, पण मित्रानं फसवल्यामुळे हताश झालेली असते. फ्रेंच सोडून दुसरी कुठलीही भाषा अॅव्हरीलला येत नाहीये. जॅम तिला मदत करते आणि अॅव्हरील तिच्या मागेमागे तिच्या बरोबर प्रवास करू लागते. इस्तंबूल ते ग्रीसमधलं जॅमचं घर असलेलं लेसबॉस बेट या त्यांच्या प्रवासात आलेले अनुभव म्हणजे हा सिनेमा.
जॅम म्हणजे उत्साहाचा धबधबा आहे. तिचं गाणं, तिचा जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, तिचे रागलोभ... सगळंच लोभस आहे. ही भूमिका करणाऱ्या डॅफने पताकिया या अभिनेत्रीनं जॅमची व्यक्तिरेखा जिवंत केलीये. इतकी की तिच्याबरोबर आपण हसतो, तिच्या दु:खात आपणही सहभागी होतो. सावत्र वडिलांबरोबरचं तिचं नातं आपणही अनुभवतो. सिनेमा पाहून बाहेर पडताना बराच काळ ही जॅम आपल्या मनात रेंगाळत राहते.
‘जन फाम’ किंवा ‘माँपारनासे बिएनव्हेन्यू’ या सिनेमाच्या केंद्रस्थानीही एक मुलगी आहे. जॅमइतकी तरुण नाही. तिशी ओलांडलेली. दहा वर्षं एका मुलाबरोबर राहिल्यानंतर अचानक एक दिवस त्यानं तिच्यावरचं आपलं प्रेम संपून गेलंय असं सांगितल्यामुळे सैरभैर झालेली. असं काही आपल्या आयुष्यात होईल याची तिनं कधी कल्पनाही केलेली नाही. आणि आता अचानक ते आयुष्य जगण्याची वेळ तिच्यावर आलीये. आईशी कधीच पटलेलं नसल्यामुळे ते दरवाजे बंद आहेत. सोबत आहे फक्त एक मांजर. मैत्रिणीकडे राहण्याचा प्रयत्न असफल होतो. नोकरी नाही. पैसे नाहीत. कोणतंही शिक्षण नसल्यामुळे काम काय करायचं हाही प्रश्न आहे. मुळात जगायचंच कसं हाच प्रश्न आहे. पॅरिसच्या त्या झगमगाटात सगळं काही हरवून बसलेली पॉला.
हळूहळू ती आपल्या विखुरलेल्या आयुष्याचे तुकडे गोळा करायला लागते. कधी कोणाला खोटं सांगते, कधी मिळेल ते काम स्वीकारते, कधी अनोळखी पुरुषापाशी मन मोकळं करू पाहते, कधी बेबी सिटर म्हणून काम करणाऱ्या मुलीबरोबर लहान होऊन जाते. कधी ती आपण कसे नॉर्मल आहोत हे दाखवायचा आटोकाट प्रयत्न करते, तर कधी मेट्रोमध्ये भेटलेली मुलगी तिला आपली बालमैत्रीण समजते, तेव्हा ती ते अमान्यही करत नाही. आयुष्य अचानक असुरक्षित झाल्यामुळे पॉलाच्या वागण्यात विक्षिप्तपणा आलाय. आला दिवस ढकलणं एवढंच सध्या तिच्या हातात आहे. आणि तीच तिची धडपड आहे. इतकी वर्षं फोटोग्राफर असलेल्या प्रियकराची मैत्रीण एवढीच ओळख असणारी पॉला अशा परिस्थितीत बावचळून न गेली तरच नवल.
स्वत:शी पुन्हा एकदा नव्यानं ओळख करून घेण्यापर्यंतचा ज्युलिआचा हा प्रवास ‘मॉनपारनासे बिएनव्हेन्यू’मध्ये आपल्याला दिसतो. हा सिनेमा थोर नाही. पण गुंतवून ठेवणारा आहे. पॉलाच्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पाडणारा आहे.
सिनेमाची लेखक आणि दिग्दर्शक आहे लिओनॉर सिएरेल. ला फेमी या फिल्म स्कूलमधून तिनं शिक्षण घेतलंय. हा सिनेमा करताना ती स्वत: गरोदर होती. या सिनेमाच्या सगळ्या महत्त्वाच्या विभागांची धुरा बायकांनी सांभाळलेली आहे. कॅमेरा, सेट डिझाईन, ध्वनी, संगीत हे सगळं बायकांनी केलेलं आहे. कदाचित म्हणूनच पॉलासारखी तगडी व्यक्तिरेखा तिनं लिहिली. पॉलाची भूमिका करणाऱ्या लेतिशिआ डॉशनेही अतिशय समर्थपणे ती साकारली आहे.
.............................................................................................................................................
लेखिका मीना कर्णिक चित्रपट समीक्षक आहेत.
meenakarnik@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment