‘कॉमन मॅन’च्या वाटेवर
अजितचं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आणि लक्षणीय नाटक म्हणजे आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’. पण मुळात ही त्याची कल्पना नव्हती. पुण्याचे अनिल जोगळेकरांनी ‘कॉमन मॅन’ची संहिता फार पूर्वीच तयार करून ठेवली होती. त्याचे एक-दोन प्रयोगही त्यांनी केले, पण ते फारसे यशस्वी झाले नव्हते. अनिल जोगळेकरांची कुठल्याशा स्पर्धेच्या वेळी भेट झाली आणि अचानक ‘कॉमन मॅन’चा विषय निघाला आणि अजित ते चांगलं करू शकेल असं भविष्यही त्यांनी वर्तवलं. अजितनं त्यांच्याकडून नाटकांची संहिता मिळवली. ती छोटीशीच होती, पण विशेष म्हणजे ते एकपात्री होतं.
आतापर्यंतच्या नाट्यनिर्मितीच्या अनुभवातून फारसा पसारा नसलेल्या, शक्यतो एकपात्रीच्याच तो शोधात असल्यानं त्याला ते आवडलं. एवढंच नाही तर या संहितेचं इंग्रजी भाषांतर गौतम जोगळेकरनं केलं असल्याची माहितीही त्यांनी दिली. अजितनं लगेच ती इंग्रजी संहिता मिळवली. त्याला त्यात करण्यासारख्या भरपूर शक्यता जाणवल्या.
स्वभाव तसा आळशी असला तरी एक गोष्ट करायची म्हटली की, जीव तोडून त्याच्या पाठी लागण्याचाही अजितचा स्वभाव असल्यानं त्यानं तीन ते साडेतीन महिने त्या संहितेवर काम केलं. एकपात्री ‘कॉमन मॅन’ इंग्रजीत उभा करण्याच्या दृष्टीनं प्रत्यक्ष आर. के. लक्ष्मण यांच्या कार्टून्सचा वापर अपरिहार्य होता. त्यातील काही अनिल जोगळेकरांनी पुरवली, तर काही अजितनं शोधाशोध करून मिळवली. त्यांचं प्रमाण, योग्य जागा ठरवल्या. सव्वातासाचा प्रयोग करण्यासाठी दुसऱ्या काही साधनांचाही वापर करावा लागेल याची जाणीव झाली. मग बंकिम अविनाश परांजपे या त्याच्या हौशी गायक कंपोजर मित्राची मदत घ्यायचं ठरवलं. सुदैवानं गौतम जोगळेकरनं त्यातल्या काही गोष्टी लिरिकल शैलीत लिहिल्या होत्या. बंकिमनं त्यांना छान चाली लावून दिल्या. अजितची मैत्रीण आणि प्रख्यात ओडिसी नर्तिका झेलम परांजपे हिनं मग त्या लिरिक्सना साध्या सोप्या लयबद्ध पदन्यासाची जोड देण्याचा आग्रह केला.
अजित प्रेक्षकांना विचारतो, “यू वाँट माय रेसिडेंशिअल अॅड्रेस?” तिथं गौतम जोगळेकरांनी लिहिलेलं लिरिकल गाणं वापरलं- ‘…नायदर हिअर, नॉर देअर, बट आर अॅम एव्हरी व्हेअर…’ या लिरिकल ओळींना बंकीमनं पॉप संगीताच्या लयीत चाल बांधून ट्रॅक केला आणि थोड्याशा लयबद्ध स्टेप्स घेत अजितनं ते सादर केलं. या हलक्या-फुलक्या पद्धतीनं सादर केलेल्या निवेदनातच प्रेक्षक आपलेसे होत, प्रयोगाकडे खेचले जात आणि सव्वातासापर्यंत प्रयोगाची रंगत वाढत जाई असंही अजित रंगवून सांगतो.
लक्ष्मण आणि ‘कॉमन मॅन’ दोघांची कार्टून्स समोरासमोर आणून ते एकमेकांशी संवाद साधतात आणि ‘...नो बडी कॅन सेपरेट अस… वुई आर इनसेपरेबल’ वगैरे... एका कार्टूनमध्ये आर. के. कॉमन मॅनच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. म्हणजे ‘क्रिएटर अॅन हिज क्रिएशन - एक साथ.’ अशा अनेक प्रकारच्या युक्त्या वापरून अजितनं त्याच्या ओरल ड्रामा बरोबरच प्रयोगाची दृश्यमूल्यं वाढण्याचाही भरपूर प्रयत्न केला होता.
संपूर्ण कार्यक्रमाची कार्टून्स, व्हिज्युअल्स, म्युझिक ट्रॅक यांची एक सलग डिव्हीडी तयार केली. ज्यात सेकंद टू सेकंद असं क्रू शीट तयार करून त्याच्याबरोबर त्याच लाइव्ह स्पीच, यांच्या पुन्हा कसून तालमी केल्या. प्रयोगात कुठलीही तडजोड न करता तांत्रिक बडेजाव कमी केल्यानं संगीताचा माणूस व्हिडिओचा माणूस, पडद्याचा माणूस, प्रकाशयोजनेची दोन माणसं हे सारं मनुष्यबळ कमी झालं. प्रयोगातील मोकळ्या जागा सोडून डीव्हीडी तयार केली. तिच्यासोबत भरपूर सराव केल्यामुळे खूप बंधनं असूनही अजितनं ती लीलया पेलली. उलट त्याचं अवधान, कसब आणि अभिनय या साऱ्यांचाच एकत्रित कस लागत असल्यानं, आव्हानं पेलण्याची सवय असलेल्या अजितला प्रयोगात नवा आनंद मिळत गेला. प्रयोगागणिक प्रेक्षक वाढत गेला. प्रयोगाबद्दल बोललं जायला लागलं. तंत्रज्ञांची, बॅकस्टेजवाल्यांची फौज कमी झाल्यानं छोट्या-छोट्या शहरांत कमी मनुष्यबळावर प्रयोग करणं आणि प्रयोगातलं सातत्य ठेवणं शक्य झालं.
आर. के. लक्ष्मण यांच्यासाठी पुण्यात स्वतंत्र प्रयोग
याच सुमारास अजितला वाटलं की, ‘कॉमन मॅन’च्या जनकाला हा प्रयोग दाखवावा. प्रकृतीस्वास्थ्याच्या आणि प्रवास न झेपण्याच्या त्यांच्या अडचणीमुळे अजितनं प्रयोगाची डिव्हीडी करून त्यांच्याकडे पाठवून दिली. त्यांनी ती डिव्हीडी बघितली आणि ताबडतोब अजितला फोन केला. त्यांनी अजितच्या साऱ्या प्रयोगाचं कौतुक केलं- ‘अजित आय लाइक्ड युवर शो, एव्हरी थिंग इज नाईस, बट आर डोंट लाईक युवर लास्ट अपिल... इट लुक्स व्हेरी प्रीटी...’ अजितनं त्यांना काय करावं म्हणून सल्ला विचारला. आर.कें.च्या सडेतोड आणि थोड्याशा फटकळ स्वभावानुसार त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता फर्मावलं... ‘यू शूड कट इट.’ अजितनं शातंपणे ऐकून घेतलं आणि स्वत: आर. के. लक्ष्मण यांनी प्रत्यक्ष प्रयोग बघावा अशी विनंती केली. मग त्यांच्या सोयीच्या तारखेला अजितनं पुण्यातलं एस. एम. जोशी सभागृह बुक केलं आणि ‘कॉमन मॅन’चा प्रयोग लावला.
व्हिलचेअरवर आ. के. लक्ष्मण यांची प्रेक्षागृहात व्यवस्था केली गेली. प्रयोगानंतर अजितच्या मनात धाकधूक होतीच, पण आर. के. लक्ष्मण यांनी प्रयोगाची, त्यातल्या बारकाव्यांची, सादरीकरणातील उर्जेची स्तुती केली. अजितनं शेवटच्या स्वगताबद्दल विचारताच त्यांनी अतिशय उत्तेजित, चढ्या सांगितलं, ‘नो नो, इट साउंडस गुड अॅट द एंड. यू रिटेन इट अँड कीप ऑन परफॉर्मिंग एव्हरीव्हेअर’.
शंभराव्या प्रयोगालाही आर. के. लक्ष्मण सहपरिवार आले. संपूर्ण प्रयोग बघितला, एन्जॉय केला, प्रयोगानंतर आस्वादनाच्या स्वरूपात चार शब्द बोलले. हे सारं त्यांची प्रकृती फारशी बरी नसताना. अजितनं आर. के. लक्ष्मण यांना अगदी पहिला प्रयोग दाखवला तिथपासून तो ५० वा मुंबईतला प्रयोग, अहमदाबादचा प्रयोग, पुण्याच्या आयुकामधला प्रयोग हे आर. के. लक्ष्मण यांनी पाहिल्याचं आठवतं. नाट्याच्या इतिहासात एका लेखकानं आपल्या निर्मितीचे असे पाच प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष बघण्याची घटना दुर्मीळ असावी. यानंतर अजितला मुद्दाम पुण्याच्या घरी बोलावून त्याला त्यांचं कॉफी टेबल बुक स्वाक्षरी करून भेट दिलं. हे वेगळे ऋणानुबंध. एवढ्या जिनियस सोबतचा हा सहवास नाटकामुळे लाभला याचं अजितला विशेष अप्रूप आहे.
पुण्याच्या आयुकातील प्रयोग : दोन दिग्गजांची भेट
पुढे पुणे विद्यापीठाच्या आयुका सभागृहात प्रयोग झाला, त्याच्यासाठीही ते पोचले होते. आयुकामध्ये इंटरनॅशनल सायन्स मीटचं आयोजन करण्यात आलं होतं, तिथं हा शो मुद्दाम ठेवला होता. या प्रयोगाला लक्ष्मण तर आले होतेच, पण डॉ. श्रीराम लागूही पोचले होते. प्रयोगानंतर डॉक्टर आत आले आणि ‘व्हॉट अॅन अॅक्टर यू आर! तुमचा हा प्रयोग बघून तुमचा हेवा वाटला बुवा. ...आय वॉज कान्शसली वॉचिंग द परफॉरमन्स, लुकिंग फॉर सम फॉल्ट समव्हेअर. बट यू गेव्ह अ फ्लॉलेस परफॉरमन्स... नॉट ओन्ली धिस, आय वॉज द फर्स्ट इन द ऑडिटोरियम टू स्टँडअप, अॅन्ड गिव्ह स्टॅडिंग ओव्हेशन.’ अजित नंतर वाकून नमस्कार करायला खाली वाकला, तेव्हा डॉक्टरांनी त्याला थांबवलं, ‘... ना ना.. तुम्ही हे काय करताय… आज हा मान तुमचा आहे...’ लगेच त्यांनी अजितला विचारलं की आर. के. अजून असतील का?... होकार देताच डॉक्टर म्हणाले, ‘माझी ओळख करून देणार का?’ अजितसाठी हा फार मोठा धक्का होता. एका महान कलाकाराशी एका प्रतिभावान अभिनेत्याची ओळख करून देणं... हा योगच होता.
‘गडकरी ते मतकरी’
‘गडकरी ते मतकरी’ हे कसं सुचलं याची कुळकथा सांगताना अजित म्हणाला, ‘सुनिताताई देशपांडे पु. ल. देशपांडे यांना कुठल्याही नाटकाचे ५० प्रयोग झाल्यानंतर ते आता पुरे झालं. भाईनं नवं काहीतरी करावं असा आग्रह धरायच्या. माझ्या डोक्यातही बहुधा तसंच काहीसं आलं असावं. ‘कॉमन मॅन’ आता पुरे, नवं काहीतरी करावं. कारण ‘कॉमन मॅन’चे १५०च्या आसपास प्रयोग झाले होते.’ मग अजित पुन्हा नव्या कार्यक्रमाच्या शोधावर निघाला. सर्वप्रथम त्याचं लक्ष गेलं ते मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांमधील लोकप्रिय स्वगतांवर. आर.के.च्या तिरकस, राजकीय-सामाजिकदृष्ट्या नितांत प्रभावी व्यंगचित्रांचा जसा नाट्यप्रयोगाच्या दृष्टीनं विचार केला गेला नाही, तसाच मराठी रंगभूमीवरील या स्वगतांना एकत्रितपणे सादर करण्याचा प्रयत्न का झाला नसावा याचं त्याला आश्चर्य वाटलं.
२००९ साली वयाच्या ५८ व्या वर्षी अजितनं हा वेगवेगळ्या आठ स्वगतांना सादर करण्याचा घाट घातला. त्या निमित्तानं त्यानं साऱ्या लोकप्रिय नाटकांचा पुन्हा धांडोळा घेतला. अजितला हाही प्रश्न पडला की, एवढ्या प्रभावी स्वगतांना एकत्रित करण्याचा कुणी का विचार केला नसावा. आणि एक सक्षम विद्यार्थी असल्यानं त्याचं उत्तरही त्यानंच दिलं. कदाचित प्रथितयश नटांनी हा विचार यासाठी केला नसेल की, यातून एक्सपोज होण्याची त्यांना भीती वाटली असावी. कारण या प्रत्येक नाटकाची भाषाशैली, सादरीकरणाचा बाज या सहजी साधण्याच्या गोष्टी नक्कीच नव्हत्या. शिवाय पूर्वसुरींच्या ख्यातनाम नटाची प्रत्येक भूमिकेवर एक नाममुद्रा कोरलेली होती. तुलनेची भीतीही होतीच.
साऱ्या संहितांची निवड करून आठ स्वगतं सादर करण्याचं अजितनं ठरवलं. सगळ्यात मोठं आव्हान त्याच्या समोर होतं ते ‘वेड्याचं घर उन्हात’ या कानेटकरांच्या नाटकातील २२ मिनिटांच्या स्वगताचं. अजित फार पूर्वीपासूनच दादासाहेबांच्या या प्रभावी, अनेक भावदशा व्यक्त करणाऱ्या आव्हानात्मक स्वगताच्या प्रेमात होताच. नंतर हळूहळू सादरीकरणाचा सुटसुटीत फॉर्म सापडला. प्रत्येक स्वगताची पार्श्वभूमी कळण्यासाठी त्या त्या नाटकाविषयीचं आणि त्यातील स्वगताचं महत्त्व प्रेक्षकांना उलगडावं म्हणून निवेदनाचा भाग घातला गेला.
त्याच्या वयाला, अनुभवाला अनुरूप पात्रांची स्वगतं निवडली. यात ‘फुलराणी’मधला दगडोबा साळुंखे त्याचं खूप आवडलेलं पात्र, ज्यात पु.लं देशपांडे यांनी आपल्या आयुष्यातली जगण्यातली सारी फिलॉसॉफी ओतली आहे ते निवडलं. विजय तेंडुलकरांच्या ‘अशी पाखरे येती’मधला अरुण सरनाईकचं पहिलंच प्रेक्षकांशी संवाद साधणारं स्वगत निवडलं. नंतर ‘सूर्यास्त’मधला गायकवाड निवडला. ‘नटसम्राट’मधलं नाटकाच्या सुरुवातीचं प्रेक्षकांशी संवादाचं स्वगत निवडलं. ‘पती गेले गं काठीयावाडी’मधला जोरावर सिंगचा प्रवेश घेतला.
अजितनं ‘गडकरी ते मतकरी’च्या सादरीकरणात कुठला फिलॉसॉफिकल, कलात्मक किंवा शैलीबद्ध असा क्रम लावला नाही. प्रत्येक स्वगत हे वेगळ्या शैलीतलं असूनही कुठे प्रयोगाच्या प्रवाहात विक्षेप आला नाही. प्रत्येक स्वगताचा तोल राखत, प्रयोग उत्तरोत्तर रंगत जायचा. प्रत्येक स्वगत सुरू होण्यापूर्वी चार-पाच मिनिटांचं निवेदन अजितनं प्रेक्षकांच्या सोयीसाठी लिहून काढलं होतं. यात नाटककार, नाटक, नाटकातील त्या पात्राचं स्थान, त्या स्वगताची पार्श्वभूमी आणि प्रत्यक्ष त्या स्वगताची भावावस्था यांची माहिती दिली होती. ज्यायोगे ते स्वगत स्वीकारण्याची प्रेक्षकांची तयारी व्हायची. अनपेक्षित असा धक्का म्हणून एकापाठ एक स्वगत येत नसत. अजित अगदी सहजी, विनासायास त्या त्या भूमिकेत समरस व्हायचा. तणावरहित पद्धतीनं आपल्या लवचिक देहयष्टीच्या, आवाजाच्या हुकमतीच्या आणि उत्तम वाचिकांच्या बळावर प्रत्येक भूमिका साऱ्या बारकाव्यानिशी सादर करायचा.
प्रत्येक पात्रासाठी अजित पात्रानुरूप वेशभूषेत आणि रंगभूषेत थोडेफार बदलही करायचा. यामुळे प्रत्येक स्वगताच्या मध्ये त्याला पाच मिनिटांचा विश्राम मिळायचा. वेगवेगळ्या वर्गाच्या प्रेक्षकांसाठी ‘गडकरी ते मतकरी’चे प्रयोग झाले.
व्यावसायिक नाटकाचं व्यवस्थापन
अजितनं त्याच्या स्वत:च्या संस्थेव्यतिरिक्त इतर अनेक नाटकांमधून छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. व्यावसायिक नाटकाचे शोज चालवण्यात किंवा बंद पडण्यात व्यवस्थापकाचा फार मोठा वाटा असतो. अजितनं मात्र मागचा सारा अनुभव लक्षात घेऊन दिनू पेडणेकर या अनुभवी व्यवस्थापकाची नियुक्ती केली होती. पेडणेकर मित्रच असल्यानं त्यानं सारं व्यवस्थित केलं.
कुठलाही त्रास झाला नाही. ‘पति गेले गं काठीयावाडी’, ‘कॉमन मॅन’, ‘एज्युकेटिंग रीटा’ या नाटकांची व्यवस्था अजित स्वत:च बघायचा. ‘पति गेले’मधील कलाकार तसे मदत करायचे. पण ‘सोलो शोज’ सुरू झाल्यावर पत्नी, रोहिणी खंबीरपणे अजितच्या पाठी राहून नाट्यप्रयोगाच्या पूर्वतयारीपासून तो प्रत्यक्ष प्रयोगांची व्यवस्था चोखपणे बघायची. खरं म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच रोहिणीनं अजितला नाटक करण्याची सूट दिली आणि प्रत्यक्ष त्याला मदतही केली.
नॉन व्हेज करमणूक : ‘एक चावट संध्याकाळ’
समाजाची अभिरुची बदलत चालली आहे याचं प्रत्यंतर ‘कॉमन मॅन’ आणि ‘गडकरी ते मतकरी’च्या प्रयोगांमधून अजितला आलं. वर्तमानपत्रांतून भरभरून कौतुक झालं. तरी पण दोन्हीही फार जड वाटतात अशा प्रतिक्रियांना उत्तर म्हणून किंवा उतारा म्हणून काहीतरी अगदी नॉनव्हेज जोक्सच्या स्तरावरचं काही करावंसं अजितला वाटलं. योगायोगानं नाटककार अशोक पाटोळे यांच्याशी त्याची चर्चा झाली आणि दोघांनी मिळून काहीतरी स्टॅन्डअप कॉमेडीसारखं करण्याचा निश्चय केला. अशोक पाटोळे एक सक्षम नाटककार, पण त्यानं त्याच्याकडे जोक्स वगैरे नसल्याचं सांगितलं. ती पूर्ती करण्याची जबाबदारी अजितनं उचलली. वॉटसअॅपवर, नेटवर एवढेच नाही तर ओशोंचे भरपूर जोक्स आहेत. वर ओशोंचं तत्त्वज्ञान आहे की मानवाला परमेश्वरापर्यंत नेण्याचं ‘सेक्स’ जसं एक प्रभावी साधन आहे, तसं ‘जोक्स’देखील आहे. विनोदामुळे तुमचे ताणतणाव सैलसर होतात आणि तुम्ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाता, असं त्यांचं तत्त्वज्ञान होतं. यामुळे ओशो त्यांच्या प्रवचनांमध्ये, भाषणांमध्ये भरपूर जोक्स सांगायचे. पण नाटकाचा फॉर्म काही सुचत नव्हता. अशोक एक दिवस उत्साहात आला आणि सांगायला लागला की, एक प्रोफेसर आणि एक डॉक्टर, एक सायकॉलॉजिस्ट आणि एक सेक्सॉलॉजिस्ट गप्पा मारतात. प्रोफेसरच्या विद्यार्थीनीनं ‘शिवराळ वाक्प्रचार आणि चावट विनोद’ या विषयावर पीएच.डी. करायला घेतली आहे आणि या दोन गोष्टींचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक परिणाम यावर तिला मदत कशी करायची, अशा नोटवर नाटक सुरू करायचं ठरलं.
‘एक चावट संध्याकाळ’चे प्रयोग सुरू झाले. त्यावर उलटसुलट चर्चा, वैचारिक मारामाऱ्या सुरू झाल्या. या प्रकारात आपल्या समाजातल्या तद्दन ढोंगी लोकांचे खरे चेहरेही दिसले. प्रयोगांची आखणी करताना पहिले २५ प्रयोग केवळ पुरुषांसाठी ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यात अश्लील विनोदांचा भरणाही थोडा अधिक ठेवला.
अजित आणि अशोक पाटोळे या जोडगोळीनं या विनोदी चुटके, विनोदी किस्से यांनी ओतप्रोत भरलेल्या विनोदी स्टॅन्डअप कॉमेडीच्या अंगानं जाणाऱ्या या प्रहसनाचे ३०० प्रयोग केले. तिकीट विक्रीही बऱ्यापैकी व्हायची, प्रेक्षक मनमुराद हसायचे, लोटपोट होऊन दाद द्यायचे. हे नाटक बंद झाल्यावर प्रेक्षक तर सोडाच रंगमंदिराचे डोअरकीपर्सही विचारायला लागले की, अहो, आपलं ते ‘चावट संध्याकाळ’ बंद का केलं? म्हणजे हलकंफुलकं पाहण्याची प्रवृत्ती किती वाढली, दूरदर्शन आणि अन्य माध्यमामुळे असेल कदाचित पण हे प्रकर्षानं जाणवायला लागलं.
फायनल ड्राफ्टची संधी हुकली आणि ‘एज्युकेटिंग रीटा’ सिद्ध झालं
अजितला गिरीश जोशी यांचं ‘फायनल ड्राफ्ट’ इंग्रजी भाषेत सादर करण्याची तीव्र इच्छा होती. परंतु गिरीश कर्नाड त्याचा अनुवाद करणार आणि मोहन आगाशे त्यात भूमिका करणार आहेत आणि ही निर्मिती विचाराधीन असल्यानं दुसऱ्या कुणाला त्याचे अधिकार देता येणार नाहीत, असं सांगण्यात आलं. खरं म्हणजे अजितनं दोन दिवसात त्या नाटकाचा आपल्या स्वत:च्या आनंदासाठी इंग्रजी अनुवाद मोबाईलवर रेकॉर्डसुद्धा केला होता. याच काळात अजितनं ‘एज्युकेटिंग रीटा’ हा चित्रपट बघितला. त्याला तो खूप भावला. लगेच त्यानं इंग्रजी नाटकाची संहिता आणली. त्यानं त्याच क्षणी निर्णय घेतला की, हे नाटक करायलाच हवं. डॉ. प्रज्ञा शास्त्री या देखण्या, विनोदाची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्रीला विचारलं. तिनं नाटक वाचून तात्काळ होकार दिला. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आल्या.
व्यावसायिक स्तरावर हे नाटक करण्याच्या दृष्टीनं उत्तम सेट डिझाइन केला गेला, संगीत रेकॉर्ड केलं, अनुरूप वेशभूषा डिझाइन केली. प्रयोगाच्या परवानगीसाठी लेखकाच्या एजंटला पत्र पाठवलं. प्रकाशकानं त्यांच्या भारतातील एजंटशी संपर्क करायला सांगितलं. अजितनं संपर्क साधला, रीतसर परवानगी घेतली. प्रयोग सुरू केले. प्रयोग उत्तम होत होते, पण दुर्दैव आडवं आलं. त्या एजंटचं आणि प्रकाशकचं बिनसलं आणि प्रकाशक सॅम्युअल फ्रेंच यांनी कळवलं की, पौंडांमध्ये प्रति प्रयोग पुढील रॉयल्टी पाठवावी. जवळपास १०,००० रुपये प्रति प्रयोग पाठवणं अर्थातच शक्य नव्हतं. नेपथ्य, प्रयोगाचा खर्च, जाहिरात हे सारं आर्थिक गणित येणाऱ्या प्रेक्षक संख्येच्या तुलनेत खूप अधिक असल्यानं १५ प्रयोगानंतर ते नाटक खेदपूर्वक बंद केलं गेलं.
पत्नी रोहिणीचा मोठा आधार
अजित पत्नी रोहिणीच्या अभिनय संपन्नतेचं कौतुक करतो आणि आपल्यामुळेच तिला कदाचित बॅकसीटवर जावं लागलं अशी रुखरुखही बोलून दाखवतो. पण त्याच वेळी तो हेही मान्य करतो की, नाटक या माध्यमाविषयी ती तेवढी उत्सुकही नव्हती. अग्रक्रम देण्याइतपत तर कधीच नव्हती. शिवाय तिचा स्पष्टवक्तेपणा, जो या क्षेत्रात फारसा उपकारक नाही. शिवाय दोघांनीही या क्षेत्रात असणं कदाचित हिताचं ठरलं नसतं. त्यामुळे संगतमतानं अजितनं थिएटर करावं आणि रोहिणीनं घर सांभाळावं असं ठरलं असावं.
अजित रोहिणीचा अतिशय गौरवानं उल्लेख करतो. रोहिणी ही मुळात चांगली अभिनेत्री, उत्तम स्मरणशक्ती, अफाट वाचन, अतिशय महत्त्वाचं म्हणजे शिस्त. अजितला तिच्या आस्वादक सहभागाचा त्याच्या वाटचालीत फार मोठा लाभ झाला. रोहिणीच्या शिस्तीचा अजितच्या व्यक्तिगत आणि कलागत जीवनावर चांगलाच वचक राहिला, त्यामुळे त्याच्या कामात एक व्यावसारिक शिस्त आली.
(समाप्त)
.............................................................................................................................................
लेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.
sontakkem@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhanupadma L
Sun , 21 January 2018
हा काय केळकरांसाठी केलेला जाहिरात + पब्लिसिटी एक्सरसाइज होता काय ? प्राध्यापकसाहेबांनी PR agency वगैरे सुरू केली की काय मराठी अॅक्टर्ससाठी ?