अजूनकाही
आजच्या प्राथमिक आणि एकूणच शिक्षणाचा दर्जा घसरत चाललेला असताना आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना कसं द्यावं, हे दिग्दर्शक प्रवीण डाकरे यांच्या ‘लेझीम’ या शैक्षणिक लघुपटातून पाहायला मिळतं.
खेडोपाडी ग्रामीण विभागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी असे प्रयत्न आज होताना दिसत नाहीत. त्यांच्यातल्या कलागुणांना हेरून त्याप्रमाणे शिक्षण देणाऱ्या शाळा आणि शिक्षक सध्याच्या घडीला दुर्मीळ होत चालले आहेत. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
ओम (ओम बिबेकर) हा लहान मुलगा या लघुपटातील मध्यवर्ती पात्र आहे. तो शाळेला जात नसतो. कारण त्याला आवडेल असं शाळेत काहीच नसतं. त्याची आवड वेगळीच असते. शाळेच्या पहिल्याच दिवशी सगळ्या नवीन मुलांचं स्वागत झाडाची रोपं देऊन होतं, पण “मला नाय शिकायचं...” म्हणत ओम रोप न घेता पळून जातो आणि सगळे आश्चर्यचकित होऊन बघत राहतात.
त्यानंतर तो प्रत्येक वेळेला शाळेतून पळून जातो. त्याचे आई-वडील (प्राजुली साळुंखे, डॉ. शिवाजीराव चौगुले) हे सामान्य शेतकरी असतातत. आपल्या मुलानं मोठं होऊन साहेब बनावं अशी त्यांची इच्छा असते. पण काही केल्या मुलगा शाळेत जात नसल्यानं त्यांचीही चिंता वाढते.
अशातच एकदा केंद्रप्रमुख साहेब शाळेला भेट देतात, तेव्हा शिक्षक ही बाब त्यांच्या लक्षात आणून देतात. मग केंद्रप्रमुख सांगतात की, पारंपरिक पद्धतीनं शिकवण्यापेक्षा मुलांना आवडेल अशा पद्धतीनं म्हणजेच खेळ, संगीत, कला यांच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना शिकवा म्हणजे त्यांना खऱ्या अर्थानं शिक्षणाची आवड निर्माण होईल आणि मुलं नियमितपणे शाळेत येतील. आणि इथून पुढे सुरू होतो एक आनंददायी शिक्षणाचा प्रवास.
ओम शाळेत यावा म्हणून शिक्षक काय करतात? ओम शाळेत येतो का? त्याला शाळेची आवड लागते का? त्याच्या सामान्य आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं कळण्यासाठी हा लघुपट एकदा तरी पाहावा.
दिग्दर्शक प्रवीण डाकरे यांनी अतिशय योग्य रीतीनं हा विषय हाताळलाय. कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, संकलन आणि गीतकार अशा जवळ जवळ सर्व जबाबदाऱ्या प्रवीण डाकरे यांनी लीलया आणि कौशल्यानं एकहाती पेलल्यात. ओम बिबेकर या लहान अभिनेत्यानं अतिशय सहज वावर केलाय. ओमच्या आईच्या भूमिकेत प्राजुली साळुंखे आणि वडिलांच्या भूमिकेत डॉ. शिवाजीराव चौगुले यांनी दमदार कामगिरी केली आहे. प्रवीण डाकरे, अरुण पवार, हरिभाऊ घोडे यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्यात.
जयदीप डाकरे याचं सुमधुर संगीत हा या लघुपटाचा खरा प्राण आहे. ‘आवाज घुमला’ हे प्रवीण डाकरे आणि अपूर्वा डाकरे, श्रद्धा आणि सानिका सिमाल या सहकाऱ्यांच्या आवाजातील अतिशय सुंदर गाणं. वारंवार ऐकावं असं हे नादमधुर गाणं अक्षरशः वेड लावतं. तसंच संजय लोहार यांचं पार्श्वगायन उत्तम जमून आलं आहे. एकूण शिक्षक आणि पालकांनी हा लघुपट चुकवू नये असा आहे.
.............................................................................................................................................
लघुपट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
.............................................................................................................................................
लेखक संजय दादू पोळ कवी व माहिती अधिकार कार्यकर्ता असून निसर्ग-पर्यावरण या विषयांचा अभ्यास करतात.
sanjaydpaul@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pravin Dakare
Mon , 15 January 2018
खुप खुप धन्यवाद... माझ्या शाळेतील ही घटना मी शाॅर्टफिल्म रुपी मांडण्याचा प्रयत्न केला... नक्कीच ही प्रेरणादायी स्टोरी सर्वांना आवडेल.