'मेन डोन्ट क्राय' आणि इतर काही छोट्या-मोठ्या गडबडी
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शेलार
  • ‘पिफ' उर्फ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल
  • Mon , 15 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र पिफ PIFF पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल Pune International Film Festival

ओपनिंग फिल्म

चित्रपट असो वा इतर कोणतीही गोष्ट, आपल्याकडे बहुतांशी वेळा लोकांना त्याविषयी अगदी मूलभूत बाबींपासून समजवण्याची गरज भासते. फिल्म फेस्टिव्हलमधील प्रेक्षकांना तरी या गोष्टी समजावण्याची गरज नसावी, असा माझा एक गोड गैरसमज होता. पण तोही या 'पिफ'च्या ओपनिंगलाच दूर झाला. फिल्म फेस्टिव्हलच्या ओपनिंग फिल्मविषयी बहुतांशी प्रेक्षक उत्सुक दिसून येतात. 'पिफ'बाबतीतही हीच परिस्थिती होती. चित्रपटाचं स्क्रिनिंग व्हायला नियोजित वेळेपेक्षा उशीर होऊनही चित्रपटगृह पूर्ण भरलं होतं. शिवाय लोक पायऱ्यांवरही बसले होते. अशात पाचशे लोकांची कॅपॅसिटी असलेल्या चित्रपटगृहातून चित्रपट सुरू असताना तीसेक लोक उठून गेले. जे अर्थातच शोभणारं दृश्य नव्हतं. असो. 

तर Alen Drljević दिग्दर्शित 'मेन डोन्ट क्राय' या बोस्नियन-स्लोवेनियन चित्रपटानं ‘पिफ’ला सुरुवात झाली. आणि प्रत्येक उत्तम संकल्पनेचा श्रीगणेशा ज्या प्रकारे अपेक्षित असतो, तसंच झालं. बहुतांश जणांना हा चित्रपट आवडला. चित्रपटाचा साधारण प्लॉट म्हणजे युगोस्लाव युद्धातील काही माजी सैनिक एका ग्रुप थेरपी सेशनमध्ये एका पीस सेंटरमध्ये राहत आहेत. ज्यात त्या सर्वांना भूतकाळात, युद्धाच्या वेळी त्यांनी केलेली, पाहिलेली किंवा त्यांच्यासोबत घडलेली काही ना काही घटना छळत आहे. आणि तीच विसरण्याचा प्रयत्न ते करत आहेत. 

हे होत असताना त्यांचं त्या पीस सेंटरमधील आयुष्य, त्यांची मैत्री, भांडणं आणि त्यांना आपल्याला पछाडत असलेला भूतकाळ विसरता येतो की नाही याची गोष्ट म्हणजे 'मेन डोन्ट क्राय'. यातील दृश्यं, त्या सैनिकांचा भावनिक कल्लोळ, वगैरे ज्या पद्धतीनं टिपला आहे, तो थेट पडद्यावरच पाहणं योग्य आहे.  

नियोजनातील अभावाचा पुनःप्रत्यय 

'पिफ'मधील चित्रपट पाहण्यासाठी ‘आधी या, सीट मिळवा’ असा साधारण संकेत असल्यानं काही अपवाद सोडता बऱ्याचदा रांगा लावल्या जातात. पण प्रश्न रांगांचाही नाही, तर कुठल्या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज घेऊन स्क्रिनिंग ठेवण्याचा आहे. 

उदाहरणार्थ, १२ जानेवारी रोजी 'फास्टर फेणे' हा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मराठी चित्रपट महोत्सवाच्या एका ठिकाणी पहिल्या आणि सव्वापाचशे सीट्स असलेल्या स्क्रीनला होता. तर 'Djam' हा 'टोनी गटलिफ' दिग्दर्शित फ्रेंच चित्रपट दुसऱ्या स्क्रीनला. मात्र महोत्सवात मराठी चित्रपट पाहणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे. त्यात ‘फास्टर फेणे’ सुमारे महिनाभर चित्रपटगृहांमध्ये होता. तो सर्वांनी पाहिला असण्याची होती. त्यामुळे फास्टर फेणेला प्रेक्षकसंख्या कमी होती, तर या दुसऱ्या फ्रेंच चित्रपटाला सर्वांत मोठी रांग होती. दुसरी स्क्रीन लहान असल्यानं त्यात सीट्स आणि पायऱ्या धरून चारेकशे लोक बसले आणि इतर दोनेकशे लोकांना आता प्रवेश मिळाला नाही. थोडक्यात या गोष्टी दरवर्षी घडत असल्यानं अशा शक्यतांचा संयोजकांनी विचार करायला हवा. जेणेकरून एका चांगल्या महोत्सवाला केवळ नियोजनाच्या अभावामुळे लोकांच्या टीकेला तोंड द्यावं लागणार नाही. 

श्रद्धांजली 

दरवर्षी एनएफएआयच्या संयोजनानं काही मान्यवर कलावंतांना श्रद्धांजली म्हणून 'ट्रिब्यूट' अंतर्गत त्यांचे काही चित्रपट दाखवले जातात. या वर्षी यात रीमा लागू, कुंदन शाह, विनोद खन्ना, शशी कपूर, नीरज व्होरा इत्यादी कलावंतांना ट्रिब्यूट देत आहेत. ज्याअंतर्गत ‘मैंने प्यार किया’, ‘कभी हाँ कभी ना’ इत्यादी चित्रपट दाखवण्यात येत आहेत. 

निवड समिती आणि चित्रपट निवडीवरून तापलेल वातावरण

यावेळी 'पिफ' तरी वादाला किंवा टीकेला कारणीभूत ठरणार नाही अशी अपेक्षा होती. पण पुन्हा चित्रपटांची निवड, निवड समिती आणि निवड झालेले काही चित्रपट यांच्यामुळे हाही महोत्सव चित्रपटप्रेमींच्या टीकेला कारणीभूत ठरला आहे. यावेळी पॅनोरमा किंवा इतर काही ठिकाणी स्क्रिनिंग झालेले चित्रपट डावलून 'फास्टर फेणे', 'मुरांबा'सारख्या काही कमर्शियल चित्रपटांचा फेस्टिव्हलमधील समावेश यामागील मुख्य कारण आहे. ज्यावरील चर्चा थेट निवड समितीवरील सदस्य बदलण्यापर्यंत जाऊन ठेपली. 

मुळात या टीकेत बरंच तथ्य आहे. कारण बहुतांशी चित्रपटांचं आयुष्य हे फिल्म फेस्टिव्हलपुरतंच मर्यादित राहतं. आणि असे चित्रपट मग प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे असं पुन्हा पाहणं संभाव्य नसलेले चित्रपट पाहण्यासाठी फेस्टिव्हल हे एकमेव माध्यम प्रेक्षकांसमोर असतं. अशा वेळी इथंच अगदी कमर्शियल आणि नावाजलेले आणि बहुतांशी लोकांनी आधीच पाहिले असण्याची शक्यता असलेले चित्रपट पुन्हा दाखवण्यात आले तर इतर अंडररेटेड चित्रपटांकडे फिल्म फेस्टिव्हल्सदेखील दुर्लक्ष करतात, असा समज पसरेल. 

व्यावसायिक चित्रपट विरुद्ध कलात्मक चित्रपट हा वाद तसा जुना आणि न संपणारा आहे. आणि त्यांच्यातील नक्की कुणाला प्राधान्य द्यावं, हा मुद्दाही. पण कुणाला स्थान द्यावं, यापेक्षा यातील कोणता चित्रपट पटकथा, संवाद वगैरे निकषांवर जास्त उत्तम आहे, हा विचार करून निवड करणं योग्य आहे. अर्थात इथंही व्यावसायिक चित्रपटांची किंवा खरं तर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालेल्या चित्रपटांची निवड याच निकषांवर झाली असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यावर शंका घेण्यापर्यंत ठीक असलं तरी थेट निवड समितीमधील सदस्य बदलण्याची भाषा करणं योग्य नाही. 

कारण ‘पिफ’चं काम महाराष्ट्र शासनाकडे आहे. शासनाच्या हस्तक्षेपानंतर झालेल्या संस्थांचे सदस्य किंवा अध्यक्ष यांच्या निवडी फार योग्य पद्धतीनं झाल्या आहेत असंही नाही. त्यामुळे ही चर्चा आणखी वाढत गेली तर कदाचित निवड समिती बदलेलही. मात्र त्याजागी इतर अपात्र लोकांची वर्णी लागली तर मात्र तेलही गेलं अन् तूपही गेलं अशी अवस्था होईल. त्यामुळे सध्यातरी चित्रपटांच्या निवडीबाबत फार तर नाराजी व्यक्त करावी. पण थेट निवड समिती बदलण्याची मागणी करणं तितकंसं योग्य वाटत नाही. 

रेट्रोस्पेक्टिव्ह श्रेणीतील चित्रपट 

रेट्रोस्पेक्टिव्ह कॅटेगरी अंतर्गत इंगमार बर्गमन आणि राज कपूर दिग्दर्शित काही निवडक चित्रपट 'एनएफएआय'मध्ये दाखवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ज्यात बर्गमनच्या 'समर विद मोनिका', 'सॉडस्ट अँड टिन्सेल', 'द सायलन्स', 'ऑटम सोनाटा', 'ठरू अ ग्लास डार्कली' या आणि राज कपूर यांच्या 'श्री ४२०', 'संगम', 'बॉबी', 'माय नेम इज जोकर' या चित्रपटाचा समावेश होता. 

या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला (११ जानेवारी रोजी) दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्यासोबतच रणधीर कपूर आणि ऋषी कपूर हेदेखील उपस्थित होते. ज्यांच्या आणि 'आरके फिल्म्स'च्या सौजन्यानं या प्रॉडक्शनच्या काही दुर्मिळ चित्रपटांची रिळ 'एनएफएआय' या संस्थेला जतन करण्याची संधी मिळाली. 

विद्यार्थी विभाग

शिवाय शनिवारी (१३ जानेवारी) ‘स्टुडंट सेक्शन’ अंतर्गत लाइव्ह अॅक्शन आणि अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म्सची स्क्रिनिंग झाली. ज्यात भारत, इंग्लंड, अमेरिका, बल्गेरिया, चीन, फिनलंड, कॅनडा, अर्जेंटिना, इस्राएल, डेन्मार्क, ब्राझिल, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी वगैरे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणांतील नामांकित फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या शॉर्ट फिल्म्सची स्क्रिनिंग झाली. ज्यात काही तांत्रिक अडचणींमुळे झालेला उशीर वगळता इतर सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. अर्थात या बाबीही निव्वळ तांत्रिक होत्या असं नाही. कारण यात झालेल्या चुका टाळता येण्याजोग्या होत्या. कारण शॉर्ट फिल्म्स सोबतच इतरही एक-दोन स्क्रीन्सचा साउंडदेखील बंद होता. आणि समोरची एक शॉर्ट फिल्म पूर्ण होऊन गेली, शिवाय दुसरीदेखील अर्धी उरकली तरी संयोजकांना अनेकदा कळवूनही स्क्रिनिंग थांबवलं गेलं नाही. त्यामुळे तेथील प्रेक्षक जरा संतापले होते. जवळपास हीच बाब दुसऱ्या एका स्क्रीनबाबतीतही घडल्याचं नंतर कळालं. असं असलं तरी चूक लक्षात आणून दिल्यावरही संयोजकांकडून झालेली दिरंगाई नक्कीच अपेक्षित नव्हती. उलट यामुळे उगाचच महोत्सवाविषयी एक नकारात्मक चित्र तयार होण्याची दाट शक्यता वाटते.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख