राजकुमार राव : अर्थपूर्ण अभिनयाचा खळाळता झरा (उत्तरार्ध)
कला-संस्कृती - ‘किमयागार’ कलाकार
प्रा. कमलाकर सोनटक्के
  • राजकुमार राव
  • Sun , 14 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti किमयागार कलावंत कमलाकर सोनटक्के Kamlakar Sontakke राजकुमार राव Rajkumar Rao

मराठी-हिंदीतील लक्षणीय कामगिरी केलेल्या, करत असलेल्या कलाकारांचा धांडोळा घेणारं हे साप्ताहिक सदर... दर शनिवारी व रविवारी प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

या लेखाच्या पूर्वार्धासाठी पहा - 

राजकुमार राव : अर्थपूर्ण अभिनयाचा खळाळता झरा (पूर्वार्ध)

सात वर्षांच्या अगदी कमी कालावधीत एका अनोळखी कलावंतापासून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या एका कसबी अभिनेत्यापर्यंतचा राजकुमारचा प्रवास विलक्षण आहे!

राजकुमार एका वेळी हातात तीन-चार सिनेमे असले तरी एका वेळी एकाच सिनेमाचं शूटिंग करतो. कारण प्रत्येक पात्राचा लुक, बेअरिंग, मानसिकता यात एकसंधपणा असावा असं त्याला वाटतं. शिवाय काही भूमिकांसाठी वजन कमी करावं लागतं, तर काहींसाठी वाढवावं लागतं. केशरचना, गेटअप बदलावा लागतो. एक चित्रपट पूर्ण करून आठवडाभराचा ब्रेक घेऊन तो दुसऱ्या चित्रपटाला सुरुवात करतो. सगळ्यात जास्त काळ तो हंसल मेहताच्या ‘ओमेयका’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्यात त्यानं एका दहशतवाद्याची भूमिका केली आहे. त्यासाठी त्याला दाढी वाढवावी लागली. त्यातील त्याचं उमार शेखचं पात्र तसं खूप गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक होतं. त्यानं दोन महिन्यांची दाढी वाढवून पहिलं शेड्यूल पूर्ण केलं. मध्येच ‘ट्रॅप्ड’ सिनेमा आला. तो त्याला सोडायचा नव्हता. म्हणून मग त्यानं दाढी काढून तो सिनेमा केला. परत पुन्हा दोन महिन्यांची दाढी वाढवून ‘ओमेयका’ पूर्ण केला. ‘काई पोचे’साठी त्यानं प्रत्यक्ष ७० दिवस शूट केलं. यातली त्याची भूमिका तशी हलकीफुलकी होती.

राजकुमारला लाईट हार्टेड आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका करायला आवडतात. पण ‘ट्रॅप्ड’सारख्या सिनेमाचं शूटिंग त्याला अधिक भावतं. दिल्लीत असताना मनुष्य स्वभावांचा अभ्यास करण्याची सवय त्याला लागली. मंडी हाऊसहून गुरगावला बसमध्ये प्रवास करताना आपल्या डायरीत भेटलेल्या, पाहिलेल्या माणसांच्या वैशिष्ट्यांची नोंद करण्याची सवय त्याला पुढे खूप कामी आली. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून राजकुमारला हे होमवर्क करण्याची सवय होती. त्याला शालेय जीवनापासूनच अभिनेता व्हायचं होतं. त्याच्याकडे प्लॅन बीचा पर्यायच नव्हता. अभिनय हेच त्याचं एकमेव ध्येय होतं आणि त्याचा त्यानं जागरूकपणे पाठपुरावा केला.

२०१७ - राजकुमारचं वर्ष

२०१७ हे सर्वार्थानं राजकुमारचं वर्ष ठरलं. ‘बहेन होगी तेरी’, ‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’ हे वेगवेगळ्या प्रकृतीचे सिनेमे त्यानं या वर्षात केले. ते गाजले. हे सारं घडत गेलं. यासाठी त्यानं फार काही वेगळे प्रयत्न केले नाहीत. शिवाय त्याच्या दृष्टीनं एका वर्षात किती चित्रपट केले हे महत्त्वाचं नसून कोणत्या गुणवत्तेचं काम केलं हे महत्त्वाचं आहे. आता तो खूप काम करतोय हे खरं असलं तरी हे त्याचं अंतिम ध्येय नाही. दोन वर्षात एक सिनेमा हे त्याचं ध्येय आहे. अर्थात तशी अवस्था यायला अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल. पण लोकांना आपल्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा करावी, अशी स्थिती यावी असं मात्र त्याला वाटतं.

‘शाहिद’, ‘ट्रॅप्ड’, ‘न्यूटन’ या सिनेमांमुळे राजकुमारला खरी ओळख मिळाली असली तरी त्यानं मेनस्ट्रिम सिनेमांतूनही भूमिका केल्या आहेत. ‘काई पोचे’ आणि ‘क्वीन’ तसंच ‘डॉली की डोली’ या सिनेमांमधूनही काम केलं आहे. ‘डॉली की डोली’ आणि ‘क्वीन’ हे सिनेमे फारसे चालले नसले तरी त्यातील त्याच्या भूमिका खूप चांगल्या होत्या. ‘डॉली…’पासूनच त्याला व्यावसायिक सिनेमाच्या ऑफर्स येत होत्या. या सिनेमातील त्याचं मलायका अरोरासोबतचं आयटम साँग आपण विसरू शकत नाही. ‘बहेन होगी तेरी’ हा सिनेमा मात्र त्याला मनापासून आवडला होता. अर्थात तोही व्यावसायिक सिनेमा होता. म्हणून राजकुमारनं तो लाईटली घेतला नाही. त्यासाठी त्यानं वेगळी देहबोली, वेगळा गेटअप, वेगळा अॅटिट्यूड वापरला. तीही भूमिका त्यानं तेवढ्याचं गंभीरपणे केली.

‘शाहिद’ या सिनेमानं राजकुमारच्या करिअरला वेगळं वळण मिळालं, हे खरं असलं तरी त्याची खरी सुरुवात ‘एलएसडी’पासूनच झाली होती. नंतर ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आला. हंसल मेहतांपर्यंत त्याच नाव पोचलं. मात्र ‘शाहिद’नं राजकुमारचं जीवन बदललं. या सिनेमानं त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यामुळे चित्रपटसृष्टीतल्या लोकांचं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं. प्रेक्षकांनाही त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली. पण त्याला स्वत:ला मात्र त्याविषयी फारशी कल्पनाही नव्हती. राष्ट्रीय पुरस्कार कलावंताच्या आयुष्यात काय स्थित्यंतर घडवू शकतो, याविषयी तो पूर्णपणे अनभिज्ञ होता.

हा पुरस्कार मिळवून परत आल्यावर १५६ संदेश आणि पन्नास मिस कॉल्स बघितल्यावर त्याला त्याच्या महत्त्वाची जाणीव झाली. याच सुमारास राजकुमारनं आपलं नाव बदललं. मूळ नाव ‘राजकुमार यादव’ बदलून ‘राजकुमार राव’ केलं. मुख्यत्वे या नावाची बरीच मंडळी हिंदी चित्रपटसृष्टीत होती. पण त्यानं सुरुवातीपासून ‘राजकुमार’ हेच नाव लागवलं. अगदी त्याच्या पासपोर्टवरही केवळ ‘राजकुमार’ हेच नाव आहे. ‘राव’ हे यादवांना टायटल म्हणून हरियाणात वापरलं जातं.

सामान्यपणे अॅक्टर्स स्टार्स होण्याची स्वप्नं बघत असतात, पण राजकुमारला हे पटत नाही. केवळ एका चित्रपटानंही कुणी स्टार होऊ शकतो. पण तुम्ही त्या एका चित्रपटाची वाट बघू शकत नही. तुम्ही केवळ सतत काम करत राहू शकता. तुम्ही केवळ इमानदारीनं तुमचं काम करत राहू शकता. ज्याच्या नशिबात स्टार होणं लिहिलेलं असेल तो होईलच.

राजकुमारला मनोरंजनाच्या क्षेत्रासाठी इंडियन ऑफ द इअर २०१७ हा पुरस्कार मिळाला. या वर्षात तीन अगदी भिन्न प्रकृतीचे सिनेमे करून त्यानं चित्रपटसृष्टीत चैतन्याची एक लाट निर्माण केली. ‘ट्रॅप्ड’ हा शारिरीकदृष्ट्या खूप थकवणारा, जिकिरीस आणणारा अनुभव होता. तर ‘न्यूटन’ हा अतिशय अनपेक्षित अनुभव देणारा सिनेमा होता. ‘बरेली की बर्फी’ हा अगदी हलकाफुलका सिनेमा होता. या सिनेमानं राजकुमारची अभिनेता म्हणून प्रतिमा बदलली. ‘शाहिद’ वगैरेसारख्या सिनेमांनी त्याची कलात्मक चित्रपटांचा अभिनेता ही प्रतिमा बदलून टाकली. ‘बरेली की बर्फी’ साईन करताना आपण लोकप्रिय सिनेमात काम करतोय याच्या मोहापेक्षा ती एक उत्तम स्क्रिप्ट आहे याची त्याला जाणीव होती. पण व्यावसायिक सिनेमा आहे म्हणून त्याच्यासाठी अभिनयात काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. ते पात्र प्रामाणिकपणे करावं, प्रेक्षकांना खरं वाटावं एवढाच त्याचा प्रयत्न होता.

आम्ही सीमा पार करणारच

तुम्ही किती स्वत:च्या विश्वात राहत असलात तरी तुम्ही सभोवतालापासून स्वत:ला लांब ठेवू शकत नाही. ‘पद्मावती’, ‘एस. दुर्गा’सारख्या विवादांपासून स्वत:ला दूर ठेवू शकत नाही. राजकुमारच्या मते कलाविश्वावर एक दडपण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात होत आहेत. त्याच्या मते हे आत्ताच घडतंय अशातला भाग नाही. हे पूर्वीपासून घडत आलंय. अगदी ६०-७०-८०च्या दशकांतसुद्धा कुठल्या ना कुठल्या सिनेमाच्या विरोधात लोकांनी असा विरोध केलेला आहे. कारणं काहीही असोत, विरोध केला होता हे खरं आहे. केवळ भारतातच नाही तर जगभराचा इतिहास पाहिला तरी अशी उदाहरणं दिसून येतील. कलेला आपल्या अस्तित्वासाठी सतत संघर्ष करावा लागला आहे, झगडा करावा लागला आहे. तेच आणि तसंच आजही भारतात घडत आहे. पण म्हणून आम्ही चांगलं, अर्थपूर्ण काम सोडणार नाही. आम्ही चित्रपट करतच राहणार आहोत. आम्ही आमच्या सीमा पार करत राहणारच आहोत.

राजकुमारच्या नव्या प्रकल्पात ‘फन्नेखान’ ऐश्वर्या राय बरोबर येत आहे. ‘ओमेयका’ लवकरच रिलीज होईल. हंसल मेहतांसोबतची हा त्याचा तिसरा सिनेमा आहे. त्यानंतर ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ सोनम कपूर बरोबर येत आहे.

भविष्याबाबत राजकुमारनं फार काही ठरवलेलं नाही. पण तो सांगतो भविष्यात एक दिवस तो निश्चितपणे चित्रपट निर्मिती करेल. दिग्दर्शनही करेल. आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्येही काम करण्याचा त्याचा मानस आहे. राजकुमार फार प्लॅन करून जीवन जगत नाही. केवळ अभिनेता म्हणून सतत काम करत राहणं हीच त्याची भूक होती आणि ती तो पुरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला आपलेच मापदंड झुगारायचे आहेत. स्वत:लाच आव्हान देत राहायचं आहे.

(समाप्त)

.............................................................................................................................................

लेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.

sontakkem@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......