अजूनकाही
मानवी संस्कृतीत हिंसेला महत्त्वाचं स्थान आहे. हिंसा केव्हा न्याय्य ठरते, हिंसा केव्हा अनिवार्य ठरते, हिंसा न करता जगता येणं शक्य आहे का वगैरे प्रश्न हजारो वर्षांपासून वादाचे वा चर्चेचे आहेत. आपल्याकडे भगवान महावीर व भगवान गौतम बुद्ध यांनी याबद्दल विस्तृत चर्चा केलेली आहे. अहिंसेला एका तत्त्वाचा, एक मूल्याचा दर्जा दिला आहे. पाश्चात्य संस्कृतीत हाच प्रयत्न येशू ख्रिस्तानं केला. त्यानं जर एक गालावर मारलं असेल, तर दुसरा गाल पुढे करा आणि शत्रूला जिंका वगैरे उपदेश केलेला आहे.
आधुनिक जगतात महात्मा गांधींनी हाच प्रयत्न करून पाहिला. गांधीवादात अहिंसेला फार महत्त्वाचं स्थान आहे. गांधीजींनी १९२० साली सुरू केलेली असहकाराची चळवळ एका खेड्यात हिंसाचार झाला म्हणून काँग्रेसमधील सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा रोष पत्करून मागे घेतली होती. अहिंसेची चर्चा आजही करावी लागते. उलटपक्षी काही अभ्यासक असं सांगतात की, महासंहारक अण्वस्त्रांच्या छायेत वावरत असलेल्या आजच्या जगाला अहिंसेची नितांत गरज आहे.
हिेंसेचा मुद्दा राजकीय क्षेत्रात तर फारच महत्त्वाचा ठरतो. प्राचीन काय किंवा अर्वाचीन काय, राजकारणात राजकीय शत्रूचा खून करणं किंवा करवून घेणं हे सतत घडत असतं. काही अभ्यासक दाखवून देतात की, ९० टक्के रोमन सम्राटांचा खून झाला होता. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात कॉ. पानसरे व डॉ. दाभोलकरांचे झालेले खून राजकीय आहेत या शंका नाही.
भारतात महात्माजींचा उदय होर्इपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यानं किंवा पक्षानं अहिंसेबाबत ठसठशीत भूमिका घेतली नव्हती. ख्रिस्ती जगतात या संदर्भात झालेले बदल समजून घेण्यासाठी काही तपशील समोर ठेवणं अगत्याचं आहे. येशू ख्रिस्तानं पूर्ण अहिंसेचा पुरस्कार केलेला होता. त्यानुसार सुरुवातीची सुमारे तीनशे वर्षं ख्रिस्ती समाज अहिंसेला मानत होता. ख्रिस्तानंतरच्या तिसऱ्या शतकात म्हणजे शेवटचा रोमन सम्राट काँस्टेंटिनच्या काळात ख्रिस्ती धर्मगुरू संत अगस्टीन (इ.स ३५४-४३०) यानं ख्रिस्ती धर्मतत्त्वांत मोलाची भर घातली. यासाठी त्यानं ‘न्याय्य युद्ध’ (just war) अशी तात्त्विक संकल्पना मांडली.
याचा साधा अर्थ असा की, जर तुमच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला असेल तर जीव वाचवण्यासाठी तुम्ही हिंसा करू शकता. तेव्हापासून ख्रिस्ती जगतात हिंसेला समर्थन मिळालं. ९/११ च्या हल्ल्यानंतर जेव्हा अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अफगाणिस्तानवर बॉम्बेहल्ले सुरू केले, तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की, आमचं हे ‘न्याय्य युद्ध’ आहे. आपल्या देशातही महाभारतातील युद्धादरम्यान कृष्ण अर्जुनाला गीता सांगून न्याय्य कारणांसाठी आप्तस्वकियांना ठार मारणं कसं योग्य आहे याचं विवेचन करतो. थोडक्यात ‘न्याय्य युद्ध’ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे.
विसाव्या शतकानं दोन महायुद्धं बघितली. दुसरं महायुद्ध सरताना जगानं अण्वस्त्रांची भयानक संहारकशक्तीही बघितली. तेव्हा पुन्हा एकदा अहिंसेबद्दल चर्चा सुरू झाली. त्याच दरम्यान भारतानं अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवलं. परिणामी शुद्ध स्वरूपातील अहिंसा, न्याय्य कारणांसाठी केलेली हिंसा वगैरे संकल्पनांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. आल्बेर काम्यूनं (१९१३-१९६०) ही न्याय्य युद्धाची संकल्पना समोर ठेवून १९४९ साली ‘द जस्ट अॅसॅसिन्स’ हे नाटक लिहिलं. या नाटकाला १९०५ साली रशियात झालेल्या क्रांतीची पार्श्वभूमी होती.
कार्ल मार्क्सनं ठोसपणे हिंसेला नाकारलं नाही. परिणामी क्रांती करताना खुनखराबा होणं किंवा क्रांतीच्या शत्रूंना यमसदनाला पाठवण्यात काही गैर आहे असं मानलं जात नाही. काम्यूच्या नाटकात रशियन समाजवादी पक्षाचे पाच क्रांतिकारक रशियाच्या राजाला जिवंत मारण्याचा कट करत असतात. काम्युचं नाटक या प्रत्यक्ष घटनेवर आधारित आहे. काम्युच्या नाटकात हिंसा, हिेंसेची गरज वगैरेंची तात्त्विक चर्चा आहे. राजकीय कार्यात हिंसेचा वापर हा गांधीवाद व मार्क्सवाद यांच्यातला महत्त्वाचा फरक आहे.
काम्यूच्या साहित्यात मानवाला त्रस्त करणाऱ्या अशा तात्त्विक प्रश्नांची चर्चा असते. या संदर्भात त्याचं चटकन आठवणारे पुस्तक म्हणजे ‘मिथ ऑफ सिसिफस’. काम्युच्या ‘द जस्ट अॅसॅसिन्स’ला समोर ठेवून कोलकोत्याच्या ‘मॅड अबाऊट ड्रामा’ (मॅड) या नाट्यसंस्थेनं ‘अ हिस्टरी ऑफ बुचर्स’ हे दोन तास चालणारं इंग्रजी नाटक सादर केले आहे.
नाटकातील काही प्रसंग जरी बंगालीत सादर केलेले असले तरी नाटक इंग्रजी आहे. या नाटकाचे प्रयोग पृथ्वी थिएटर्समध्ये झाले. हे नाटक ‘द जस्ट अॅसॅसिन्स’चं भाषांतर नाही किंवा रूपांतरही नाही. ‘अ हिस्टरी ऑफ बुचर्स‘नं यापेक्षा मोठा कॅनव्हॉस घेतला आहे. या नाटकात जगभर महत्त्वाच्या प्रसंगी झालेला हिंसेचा वापर चर्चेस घेतला आहे.
रिणामी यात अब्राहम लिंकनचा खून करणारा ली ओस्वाल्ड येतो, तसंच १९६८ मध्ये डॉ. मार्टिन लुथर किंग (ज्युनियर) चा खून करणारा जेम्स रे येतो. भारतातील भगतसिंगही आहे. यात १९६२ साली घडलेला क्युबन मिसार्इल क्रायसेस आहेत, तसंच जून १९८९ मध्ये बीजिंगच्या तिनानमेन चौकात लोकशाहीवादी निदर्शनं झाली होती, त्याचेही संदर्भ येतात. थोडक्यात हे नाटक प्रेक्षकांकडून एका विशिष्ट गांभीर्याची अपेक्षा ठेवतं.
हे नाटक अरित्रा सेनगुप्ता यांनी लिहिलं असून त्यांनीच दिग्दर्शनही केलं आहे. त्यांनी मूळ नाटकाची प्रकृती लक्षात घेत पुनर्लेखनात वर्तमानकाळातील अनेक संदर्भ दिले आहेत. यामुळे नाटक अगदी आजचं वाटतं. हे सेनगुप्तांच्या पुनर्लेखनाचं यश आहे.
हे एक प्रकारे समूह नाटक असल्यामुळे यातील कलाकारांचा उल्लेख एकत्र करणं क्रमप्राप्त ठरतं. यात अद्रिजा मुझुमदार, देबांजन चटर्जी, अनुशा विश्वनाथन, शर्मिष्ठा पांडे, सौम्या मुखर्जी वगैरेंनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. काम्युच्या नाटकात ठराविक पात्रं आहेत, तर या नाटकात अनेक पात्रं आहेत- जी देशकालपरिस्थिती ओलांडून प्रेक्षकांसमोर येतात. परिणामी या नाटकात भूमिका करणाऱ्या नटांना अनेक पात्रं रंगवावी लागतात. यात नुसतंच अभिनय कौशल्य पणाला लागत नाही, तर नटांना त्या त्या पात्रांची तात्त्विक भूमिकासुद्धा समजून घ्यावी लागते.
या नाटकात मध्यंतरानंतर येशू ख्रिस्ताला सूळावर चढवलं होतं, तसं नेपथ्य केलं आहे. रंगमंचावर उभा केलेला क्रूस प्रेक्षकांना दोन हजार सतरा वर्षं मागे घेऊन जातो. या नाटकाचं नेपथ्य अभेरी दत्ता यांनी केलं आहे. जवळपास सर्व नाटकाच्या पूर्वाधात एकच नेपथ्य आहे, तर मध्यंतरानंतर थोडे बदल केले आहेत. शिवाय या नाटकात पार्श्वसंगीत महत्त्वाचं ठरतं. अनेक प्रसंगांतील कारुण्य समोर आणण्यासाठी पार्श्वसंगीत उपयोगी ठरतं. या नाटकाचं पार्श्वसंगीत अतिफ अॅली दागमन यांनी केलं आहे, तर प्रकाशयोजना दिग्दर्शक अरित्रा सेनगुप्ता यांची आहे.
काम्युच्या जगप्रसिद्ध नाटकाचं पुनर्लेखन करणं आणि त्याला आधुनिक संदर्भांत पेश करणं याला एका प्रकारची बौद्धिक हिंमत लागते. ही हिंमत लेखक अरित्रा सेनगुप्ता यांनी दाखवली आहे. यासाठी त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून, जगाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे प्रसंग निवडून, या दोन तास चालणाऱ्या नाटकात बसवले आहेत. परिणामी नाटक संपतं, तेव्हा प्रेक्षकांना हिंसेबद्दल विचार करावा लागतो.
मी हे नाटक बुधवारी तीन जानेवारीला बघितलं. तेव्हा महाराष्ट्रात भीमा-कोरेगावची घटना व त्यानंतर त्याचा राज्यभर उमटलेला हिंसक प्रतिसाद वातावरणात होता. त्यामुळे अरित्रा सेनगुप्ता यांनी लिहिलेले व दिग्दर्शित केलेलं नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय वास्तव यांच्यातील संबंध अधोरेखित होत होता.
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment