अजूनकाही
डॅमिएन शिफ्रॉनच्या (Damián Szifron) 'वाइल्ड टेल्स'ची टॅगलाइनच मुळी 'वन डे वुई कॅन ऑल लूझ कंट्रोल' अशी आहे. आणि त्याची पोस्टर्सदेखील अशीच यात काहीतरी अफाट घडणार, असं सांगणारी आहेत. त्यामुळे चित्रपट सुरू होतो. समोर स्पॅनिशमध्ये जे काही चाललंय ते सबटायटल्स वर लक्ष ठेवून पाहत बसावं लागतं. अर्थात इथं थोडाफार फरक वगळता भाषिक मर्यादा आड येत नाहीत. कारण समोरील प्रत्येक घटना स्पेनमध्येच काय तर आपल्या आसपासही कुठेतरी घडू शकते किंबहुना घडली असेल, इतका ठाम आणि वैश्विक अॅप्रोच चित्रपटभर कायम राहील, याची काळजी लेखक-दिग्दर्शक डॅमिएन घेतो.
वाइल्ड टेल्सची थीम तशी साधी सोपी आहे. जी 'अपॉकलिप्टिक रिव्हेंज' या टर्म अंतर्गत सांगता येते किंवा सांगितली जाते. या अर्जेंटेनियन अँथॉलॉजी चित्रपटात एकूण सहा शॉर्ट्स आहेत. ज्या अगदी दहा ते तीस मिनिटं इतक्या लांबीच्या आहेत. पण या सहाही शॉर्ट्स 'वर्षानुवर्षे दाबून ठेवलेला किंवा एखाद्या क्षणिक घटनेनं निर्माण झालेला राग, त्या रागातून त्यातील प्रमुख पात्रानं परफेक्ट प्लॅनिंगनंतर किंवा अगदी स्पॉन्टॅनिअसली केलेली कृती आणि तिचे परिणाम' (हुश्श!) या साधारण वन लायनरनं बांधून ठेवल्या आहेत. आणि असं करताना त्यांची केलेली मांडणी, त्यांचं लेखन आणि सादरीकरण निव्वळ थक्क करणारं आहे.
चित्रपटाची सुरुवातच 'पास्तरनाक' (किंवा स्पॅनिशमध्ये पा-थ-र-ना-क) या शॉर्टने होते. एक मॉडेल-कम-अभिनेत्री (María Marull) प्लेनवर चेक इन करते. प्लेनमध्ये तिची ओळख एका संगीत समीक्षकाशी (Darío Grandinetti) होते. पुढे त्यांच्या संवादात तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराचा उल्लेख येतो. जो योगायोगानं समीक्षकाच्याही ओळखीचा असतो. आणि पुढेही या शॉर्टमध्ये आपल्याला सुरुवातीला योगायोग वाटणाऱ्या घटना घडतात. पण तिच्या शेवटी, किंवा खरं तर अर्धी पूर्ण होत आल्यावर जो गौप्यस्फोट होतो, तो आपल्याला आतापर्यंत जे काही घडलेलं आहे ते पुन्हा एकदा आठवून पाहण्याला भाग पाडतो. आणि 'अपॉकलिप्टिक रिव्हेंज' ही टर्म काहीच्या काही अफाट पद्धतीनं जस्टिफाय होते.
ही शॉर्ट इथंच संपते आणि स्टार्टिंग क्रेडिट्सना सुरुवात होते. ज्यात आपल्याला एका जबरदस्त थीम साँगच्या सोबतीनं जंगली प्राण्यांच्या स्टिल फ्रेम्स दिसतात. आणि थेट दुसऱ्या 'द रॅट्स' या शॉर्टला सुरुवात होते.
आपण एका रेस्टॉरंटमध्ये येऊन पोहचतो. ज्यात एक वेट्रेस (Julieta Zylberberg), एक कुक (Rita Cortese) आहे. सोबत नुकताच आलेला एक जरासा सार्कास्टिक आणि उद्धट वर्तन करणारा ग्राहक (César Bordón) आहे. मग त्या कुकला आणि आपल्यालाही कळतं की, तो ग्राहक त्या वेट्रेसच्या ओळखीचा आहे. पण त्यांचा भूतकाळ काही चांगल्या घटनांवर आधारलेला नाही. कारण तो तिच्या यापूर्वीच्या शहराच्या भागातील एक माफिया असतो. आणि त्याच्यामुळेच तिच्या वडिलांनी आत्महत्या केलेली असते. त्यानंतरही त्यानं तिच्या कुटुंबाची पाठ सोडलेली नसल्यानं त्यांनी स्थलांतर केलेलं असतं. थोडक्यात इथंही काहीतरी वेगळं वळण येणार आहे, हे तर नक्की आहे. पण ते कसं याला जास्त महत्त्व आहे.
या शॉर्टफिल्मच्या शेवटानंतर 'रोड टू द हेल' सुरू होते. ज्यात 'दिएगो' (Leonardo Sbaraglia) आपल्या नवीन गाडीतून प्रवास करतच असतो की त्याची गाठ 'मारिओ' (Walter Donado) या एका कुदळखोर व्यक्तीशी पडते. जो विनाकारण त्याचा रस्ता अडवत असतो. ज्यात दिएगो त्याला शिव्या देऊन पुन्हा आपल्या मार्गी लागतो. त्यानंतर तो जरी त्यापासून दूर गेला, किंवा किमान त्यानं तसं करण्याचा प्रयत्न जरी केला तरी पुढील दहा मिनिटांत काही अनपेक्षित आणि झटपट घडणाऱ्या गोष्टींमुळे ही शॉर्ट जराशा अ(न)पेक्षित वळणानं आणि ब्लॅक ट्रॅजिक कॉमेडी असलेल्या एका जबरदस्त आणि जराशा पोएटिक फ्रेमनं संपते.
चौथी शॉर्ट म्हणजे 'बॉम्बिता'. ज्यात व्यवस्थेला आणि त्यातील भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या 'सिमोन फिशर' या (Ricardo Darín) एका इंजिनिअरला आपण भेटतो. सुरुवातीला तोही इतरांप्रमाणेच हा सगळा जाच सहन करत असतो. मात्र आयुष्यात घडलेल्या बऱ्याच अनपेक्षित, क्षणिक घटनांनंतर तो बराच रागावतो. आणि त्याच्या याच रागाच्या त्यानं केलेल्या वापराची गोष्ट म्हणजे बॉम्बिता.
पाचवी शॉर्ट 'द डील' या नावाची आहे. जी साधारण एका बड्या प्रस्थाच्या (Oscar Martínez) मुलाची हिट अँड रन केस आणि फेक गुन्हेगार उभा करण्याची तयारी यावर आधारित आहे. जो विषय आपल्याकडेही फारसा नवीन नाही. पण ही शॉर्ट एक्झिक्युशन आणि लिखाणाच्या जोरावर तितकीच महत्त्वाची आहे आणि ती तितक्याच चांगल्या पद्धतीनं उभी राहते. अर्थात याच्या विषयामुळे यावर फारसं बोलता येणार नाही, कारण ते जरासं स्पॉयलर देणारं ठरेल.
आणि आता उरते शेवटची आणि कदाचित या चित्रपटातील सर्वांत महत्त्वाची आणि तितकीच अफाट शॉर्ट, 'टिल डेथ डू अस अपार्ट'. ज्यात आपण एका लग्नाचे साक्षीदार आहोत. सगळीकडे आनंदीआनंद आहे, उत्सवाचं वातावरण आहे. पण अचानक आपल्याला आणि यातील ब्राइड, 'रोमिना'ला (Érica Rivas) कळतं की तिच्या आताच, पाचेक मिनिटं आधी झालेल्या नवरा आणि काही वर्षांपासूनचा प्रियकर, 'एरियल'नं (Diego Gentile) तिच्यावर चीट केलं आहे. आणि त्यांचं लग्न ठरूनही त्याचे त्याच्या एका कलीगशी शारिरीक संबंध होते. अर्थात हे कळाल्यावर रोमी जे काही करते, ते म्हणजे 'टिल डेथ डू अस अपार्ट'.
मुळात हे या चित्रपटातील शॉर्ट्सचं स्वतंत्र, अतिशय कमी शब्दात केलेलं स्पॉयलर फ्री वर्णन झालं. पण यातील प्रत्येक शॉर्ट याहून अधिक आणि खूप काही भाष्य करणारी आहे.
मग यातील गॅब्रिअल पास्तरनाक असो किंवा सिमोन असो वा इतर कुठलंही पात्र असो, ते आपल्याच समाजातील विविध लोकांचं प्रतिनिधित्व करतात. मग इथं त्यांनी केलेलं काम किंवा गुन्हा किंवा कुठलंही कृत्य तितकंसं महत्त्वाचं ठरत नाही. तर त्याउलट त्याचं वैश्विक पातळीवर रिलेटेबल ठरणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण खोलवर विचार करता पडद्यावरील पात्रानं त्या परिस्थिती आणि पार्श्वभूमीवर केलेलं कृत्य आपणही केलं असतं किंवा कदाचित तशी परिस्थिती निर्माण झाल्यास करू, इतपत रिअॅलिजम यातील घटनांमध्ये आढळून येतो. (अर्थात 'द डील'चा अपवाद वगळता. मात्र तिथंही बहुतांशी लोकांचं सरकारी यंत्रणेतील लूपहोल्स वापरणं किंवा लाच देणं, यासारख्या गोष्टी कॉमन आहेतच.)
We're all a little bit mad, but we're just pushing the limits. हीच गोष्ट मला 'नाइटक्रॉलर' (२०१४) पाहताना जाणवली. म्हणजे त्यातही सुरुवातीला नायक कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे स्वतःच्या स्वप्नांसाठी काहीही करण्यास तयार असतो. जो खरं तर आपला मानवी स्वभावविशेष आहे. मात्र फरक तेव्हा पडतो, जेव्हा तो आपल्या स्वप्नांसाठी सर्व मर्यादा ओलांडून, अक्षरशः काहीही करत, वेळ पडता खून करण्यासही माग- पुढे पाहत नाही.
हेच थोड्या फार फरकानं इथंही लागू पडते. अर्थात इथं स्वप्नं, वगैरे मुद्दा नसलं तरी मानवी स्वभावविशेष आणि दोष यांची या सर्वच शॉर्ट्समधील हजेरी एक जमात म्हणून आपल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी आणि अमुक एका विशिष्ट वेळी इतर वेळी विदारक भासणारी काही कृत्यं करण्याची तयारी, आणि मानसिकता अधोरेखित होते.
थोडक्यात हा चित्रपट अगदीच आउट ऑफ द बॉक्स किंवा अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता असली तरी यातील घटना अगदीच अशक्य नाहीत.
या शॉर्ट्स (यातील काही किंवा काही) काहीशा प्रेडिक्टेबल आहेत असं काहींचं मत आहे. मात्र हिचकॉक म्हणतो तसं - There's no terror in the bang, it's in the anticipation of it. हेच काही प्रमाणात इथं जरा वेगळ्या प्रकारे लागू होतं. कारण बऱ्याचदा यातील एखाद्या शॉर्टमधील घटना प्रेडिक्टेबल वाटते. मात्र तरीही नंतर पुढे मात्र काहीतरी वेगळंच घडतं. त्यामुळे पुढे काय होणार याऐवजी ते कसं होणार आणि आपण विचार केला तसं झाल्यासही तिथपर्यंत जाण्यापूर्वी कथानक किती वेगळ्या वाटा निवडणार किंवा निवडतं, हे पुढे लक्षात येतंच. शिवाय शेवटी या सर्व शॉर्ट्सची मांडणी आणि लेखन यात आपल्याला गुंतवून ठेवण्यात लेखक यशस्वी होतो, हे महत्त्वाचं.
मला हा दिग्दर्शक (किमान या चित्रपटाबाबत तरी) आणि टॅरंटिनो यांच्यात एक, खरं तर दोन साम्यं जाणवली. एक म्हणजे या दोघांमध्ये ब्लॅक कॉमेडी हा समान धागा जाणवला. आणि दुसरं म्हणजे चित्रपटाच्या साउंडट्रॅकच्या निवडीबाबत मला दोघांचंही कौतुक करावंसं वाटतं. कारण दोघेही आपल्या चित्रपटामध्ये नव्या, जुन्या किंवा नव्यानं तयार केलेल्या गाण्यांचा अफाट सुंदर वापर करताना आढळतात. मग यात अगदी डेव्हिड गुट्टाच्या 'टायटॅनिअम'पासून ते 'ब्राह्म्स'च्या सिम्फनीपर्यंत सर्व काही आलं.
एकूणच ब्लॅक कॉमेडीनं परिपूर्ण, त्याची मांडणी, लेखन आणि दिग्दर्शनात नावीन्यपूर्ण असलेला हा चित्रपट एक अँथॉलॉजी फिल्म म्हणूनही कमाल आहे. किंबहुना मी पाहिलेल्या अँथॉलॉजी फिल्म्सपैकी सर्वोत्कृष्ट आहे. यातील सर्वच शॉर्ट्स पुन्हा पुन्हा पाहण्यालायक असल्यानं आणि दर वेळी पाहिल्यानंतर त्या काहीतरी नवीन विचार मनात आणत असल्याने दर वेळी तितक्याच फ्रेश वाटतात.
थोडक्यात स्पॅनिश असला तरीही हाही चित्रपट भाषेच्या मर्यादांपलीकडे जाऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. शिवाय यातील कंटेंट इतका रिच आहे की हा कुणीच चुकवू नये, असं वाटतं. त्यामुळे एकदा तरी पहावाच असा हा चित्रपट आहे. कारण दुसऱ्यांदा पाहा हे सांगायची वेळ तो आणणार नाही!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment