अजूनकाही
सचिन कुंडलकर यांच्या घरी मी स्मिताचा गौतम राजाध्यक्षांनी काढलेला फोटो पाहिला होता... तिची केसांची एक बट डोळ्यांवर आलेला. त्या स्वर्गीय फोटोचा सचिनच्या 'गंध' चित्रपटातील एका कथेत आलेला उल्लेख ऐकून रोमांचित व्हायला होतं. सोनाली कुलकर्णी त्या फोटोवरून हात फिरवते, तेव्हा दोन दिव्य व्यक्तिमत्त्वं एकरूप झाल्याचा भास होतो. मला त्यावेळी स्केचेस काढण्याचं वेड लागलं होतं. स्मिताचा तो फोटो इंटरनेटवरून मिळवून त्याचं स्केच करण्याचा मी प्रयत्न केला, पण नाही जमलं. मी नाद सोडून दिला. 'मूर्तिमंत अस्मिता' या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुषार दळवी जेव्हा म्हणतात, “स्मिता होती पाऱ्यासारखी.” तेव्हा हीच गोष्ट लख्खकन आठवली. स्केचमध्ये मला पकडताच नाही आलं तिला.
माझा दिग्दर्शक मित्र सुरेश शेलारच्या हट्टाखातर आणि स्मिताच्या प्रेमाखातर स्मिताच्या ३१व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं 'मूर्तिमंत अस्मिता' हा दृकश्राव्य कार्यक्रम पाहण्याचा योग आला आणि मी नखशिखान्त थरारून उठलो. पृथ्वीवरचे पाय सोडून काही तास स्वर्गलोकाची सफर करून आल्याचा एक शब्दातीत अनुभव. कार्यक्रमाची सुरुवात होते 'मूर्तिमंत अस्मिता' या सुधीर मोघे लिखित आणि अविनाश-विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेल्या सुंदर गीतानं. या गीताला आशा भोसले यांनी स्वरसाज चढवला आहे. तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर यांचं निवेदन सुरू होतं आणि आपली रोलर कोस्टर राईडसुद्धा. 'गगन सदन तेजोमय' या पहिल्या गीतातच स्मिताचा सुंदर चेहरा पडदा झळाळून टाकतो, तेव्हा 'सृजन तूच, तूच विलय' या ओळी तिच्यासाठीच लिहिल्यासारख्या वाटतात.
ललिता ताम्हणे यांचं लेखन, यशवंत इंगवले यांचं दिग्दर्शन, अविनाश-विश्वजीत यांचं संगीत, तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर यांचं निवेदन आणि सोनाली कर्णिक, अर्चना गोरे, सरिता राजेश आणि मंदार आपटे यांचं गायन अशा सर्व परिपूर्ण बाबींनी नटलेला हा कार्यक्रम म्हणजे एक न चुकवावी अशी मैफल. ललिता ताम्हणे यांचे स्मिताशी असलेले ऋणानुबंध आणि शब्दांपलीकडची मैत्री त्यांच्या लेखनात सहज परावर्तित झाली आहे.
स्मिताचा बालपणापासूनचा प्रवास, तिचं अभिनेत्री म्हणून करिअर, राष्ट्रीय पुरस्कार या सगळ्या गोष्टींनी पूर्वार्ध नटला आहे आणि नंतर व्यावसायिक चित्रपटांत तिचा प्रवेश, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळं, तिचं आई होणं आणि नंतर मृत्यू अशा घटनांनी उत्तरार्धाला एक वेगळंच वळण दिलं आहे. फक्त अभिनेत्री म्हणून नाही, तर एक उत्तम माणूस म्हणून स्मिता किती थोर होती, हे हा कार्यक्रम अनुभवताना जाणवतं.
‘स्पर्श’च्या अनुभवानं तिचं कोलमडून जाणं काळीज पिळवटून टाकतं. साहित्य, समाजसेवा, छायाचित्रण अशा विविध क्षेत्रांतील तिची मुशाफिरी आपल्याला चकित करून टाकते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करताना शबानाच्या नावावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवणाऱ्या स्मिताचं मन आभाळाएवढं होतं, हे वेगळं सांगायला नकोच. श्याम बेनेगल, अरुण खोपकर, नसिरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन, आशालता, जब्बार पटेल यांच्या मुलाखतींच्या तुकड्यांतून स्मिता उलगडत जाते, पण कार्यक्रम शेवटाकडे येतो, तेव्हा मात्र पुन्हा ती अगम्य वाटू लागते.
कालच्या कार्यक्रमात पहिल्या स्व. स्मिता पाटील स्मृती पुरस्कार सोहळ्याचाही अंतर्भाव होता. रेखाजी मा. आनंदजी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रतीक बब्बरला उद्देशून म्हणाल्या, “तू खूप भाग्यवान आहेस. तुला तिच्या सहवासाची ऊब नऊ महिने मिळाली.” स्मिता गेल्यावर स्मिताच्या 'वारिस' चित्रपटासाठी डबिंग करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच. ते रेखाच करू जाणे. स्मिताबद्दलचं अपार प्रेम आणि कृतज्ञता रेखाच्या शब्दांतून व्यक्त होत होती.
अमृता सुभाषला मिळालेला कौतुक पुरस्कार हा त्या पुरस्काराचाच सन्मान आहे, असं मला वाटतं. स्मिताच्या बहिणीनं अमृताला भेट म्हणून दिलेल्या स्मिताच्या ओढणीबद्दल अमृतानं आपले अनुभव सांगितले, तेव्हा त्या उत्कट प्रेमानं सारा श्रोतृवृंद गहिवरला असेल.
स्मृती पुरस्काराच्या मानकरी रेखाजी आणि कौतुक पुरस्काराची मानकरी अमृता सुभाष, या दोघीही पुरस्काराच्या खऱ्या मानकरी का आहेत, हे कार्यक्रम पाहताना जाणवत होतं. आकाशाला गवसणी घालत असतानाही या दोघींचेही पाय जमिनीवर आहेत. स्मिताप्रमाणेच. आणि माणूस म्हणूनही या दोघी स्फटिकासारख्या निर्मळ मनाच्या आहेत. स्मितासारख्याच. त्यामुळे कालच्या कार्यक्रमाला स्मिताचेच आशीर्वाद लाभल्याचं जाणवत होतं. स्मिता होती, आहे आणि राहील... तशीच... मूर्तिमंत अस्मिता...
.............................................................................................................................................
लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment