मान्सून शूटआउट : हा निओ-न्वार ड्रामा चुकवता कामा नये
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार 
  • ‘मान्सून शूटआउट’ची पोस्टर्स
  • Sat , 23 December 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मान्सून शूटआउट Monsoon Shootout नवाजउद्दीन सिद्दीकी Nawazuddin Siddiqui अनुराग कश्यप Anurag Kashyap

तब्बल चार वर्षं एखादा चित्रपट अडकून पडणं तापदायकच. आणि एखादा चित्रपट असा अडकणं अनुराग कश्यपला बऱ्यापैकी सवयीचं आणि त्याहून जास्त त्रासदायक झालेलं आहे. अमित कुमार लिखित आणि दिग्दर्शित 'मान्सून शूटआउट'ची २०१३ मध्ये 'कान' फिल्म फेस्टिव्हलमध्ये बरीच हाइप निर्माण झाली होती आणि बरंच कौतुकही झालं होतं. भारतात मात्र हा चित्रपट गेली चार वर्षं प्रदर्शित होण्याची वाट पाहत होता. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर तो गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. 

चित्रपट आदि (विजय वर्मा) या नव्यानेच भरती झालेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या फिल्ड ट्रायलभोवती फिरतो. त्याची ही ट्रायल म्हणजे त्याला खान (नीरज काबी) या जराशा चलाख आणि नावाजलेल्या अधिकाऱ्याचा सहकारी म्हणून काम करायचं आहे. आणि खान सध्या 'शिवा' (नवाजउद्दीन सिद्दीकी) या मारेकऱ्याला पकडण्याच्या तयारीत आहे. 

खानचा प्लॅन तयार आहे. तो आदिला सोबत घेऊन त्याच्या पहिल्या एन्काउंटर असाइनमेंटवर चाललाय. पण तिथं झालेल्या काही गोंधळानंतर आदिला थेट त्या शिवाचा पाठलाग करावा लागतो. सोबत जोरदार पाऊस पडतो आहे. आदि शिवाचा पाठलाग करत मुंबईच्या झोपडपट्टीच्या भागात, रेल्वे ट्रॅकजवळ येऊन पोहचलाय. आता शिवा त्याच्या समोर उभा आहे. त्याच्या समोर तीन पर्याय आहेत. एक म्हणजे त्याच्यावर गोळी झाडायची, दुसरा म्हणजे त्याला सोडून द्यायचं आणि तिसरा म्हणजे याहून वेगळा काहीतरी पर्याय निवडायचा. 

अर्थात हे सर्व काही क्षणांत करायचे आहे. आणि तसंही त्यानं कुठलाही पर्याय निवडला तरी त्याचा शेवट थेट बॅक ऑफिसमध्ये बदली होण्यानंच होणार आहे. पण इथं काय होणार यापेक्षा ते कसं होणार, याला जास्त महत्त्व आहे. आणि त्याचं म्हणजे ‘मान्सून शूटआउट’. 

सुरुवातीच्या सीनपासूनच नीरज काबीचा खान एक धूर्त, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून प्रभावीपणे उभा राहतो. नवाजुद्दीनबाबत गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरंच पाणी गेलं असलं तरी तेव्हाचाही त्याचा परफॉर्मन्स आपल्यासमोर एक जबरदस्त गुन्हेगार उभा करण्यात यशस्वी होतो.

पण या सर्वांव्यतिरिक्तही वेगळा उठून दिसतो तो विजय वर्माचा आदि. तिन्ही प्रकारचे पर्याय निवडल्यानंतर जरी प्रत्येकच कलाकार तीन वेगळ्या प्रकारच्या भूमिका बजावत असले तरी तिन्ही मार्गावरील अगदी मवाळ ते धूर्त अशा सर्व मानसिकता असलेला आदि तो तितक्याच ताकदीनं आपल्यासमोर घेऊन येतो. 

बऱ्याच दिवसांनी बॉलिवुड चित्रपटात मुंबई स्वतः एक पात्र म्हणून दिसली आहे. शिवाय मुंबईच्या पावसालाही यात महत्त्वाचं स्थान आहे. एकूणच चित्रपटात निओ-न्वार वातावरण निर्माण करण्यासाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. 

चित्रपटाचं साउंड डिझाइन आणि राजीव रवीचं छायांकन लाजवाब आहे. खासकरून पावसातील सीन्स आणि बारमधील साउंड रेकॉर्डिंग आणि शेडी लाइट्समधील दृश्यांचं चित्रण इथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. शिवाय संकलनाबाबतही चित्रपट उजवा आहे. 'ट्रान्जिशन सीन्स'मधील संकलनातील फास्ट कटस लगेच लक्षात येतात आणि त्या सीनमध्ये प्रत्यक्ष हिंसा न दाखवताही थरकाप उडवतात. 

चित्रपटात तिन्ही वेगवेगळ्या पर्यायांचे तीन वेगळे परिणाम आपल्यासमोर मांडले जातात. अर्थात त्यातही काही की, पॉइंट्स सारखेच राहतात. शिवाय तिन्ही पर्याय निवडल्यानंतर होणारा शेवट आपल्याला आणि आदिला साधारण एकाच जागी घेऊन येतो. पण यानंतर शेवटी जो ट्विस्ट येतो, तो चित्रपटाच्या एकूण प्रभावात अजूनच भर घालतो. आणि काहीतरी 'आउट ऑफ द बॉक्स' पाहिल्याचं समाधान देऊन जातो. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट आउट अँड आउट प्रायोगिक तत्त्वावर सुरू राहत नाही. तर मध्ये ऑकवर्ड आणि ब्लॅक कॉमेडी, आदि आणि अनुमधील (गीतांजली थापा) थोडंसं रोमँटिक नातं, ‘पल’ हे चित्रपटाच्या थीमशी नातं सांगणारं आणि दोन-तीन वेळा बॅकग्राऊंडला चालणारं गाणं, यामुळे कमर्शियल चित्रपटाचे फंडे वापरून सामान्य प्रेक्षकाला कंटाळा न येण्याची काळजी घेत पटकथेवरील पकड घट्ट ठेवत दीड तास खिळवून ठेवण्यात, प्रसंगी आश्चर्यचकित करण्यातही यशस्वी होतो. 

शेवटच्या काही दृश्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावरील भाष्यही अंतर्मुख करणारं आहे. मॉरल ग्राउंडसचा विचार करत; संदिग्ध वातावरणात गुन्हेगाराला पकडणं, सोडणं किंवा तो कायद्यातील तरतुदी व त्रुटी वापरून बाहेर पडण्याची असलेली शक्यता या सर्वांचा विचार करत काम करणं, याचाही विचार करायला चित्रपट भाग पाडतो. शिवाय तिन्ही वेळी आदिचे वरिष्ठ त्याला विचारतात, तसं शेवट खरोखर इतका महत्त्वाचा आहे का? कारण शेवट काहीही झाला तरी तिथपर्यंत पोचणं महत्त्वाचं. मग तिथं नैतिक मूल्यं वगैरे गोष्टी खरंच विचार करण्यालायक आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जातो. 

पण त्याचं उत्तरही अर्थातच दिलं जातं. कारण कायद्याच्या त्रुटी, त्यांचा गुन्हेगारांकडून होत असलेला वापर, या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी शेवटी न्याय मिळवून देणं, याला जास्त महत्त्व आहे. 

थोडक्यात बरंच काही सांगून जाणारा, दीड तास खिळवून ठेवणारा आणि कथा उलगडताना बऱ्याच नवीन प्रकारे हाताळणी केलेला हा निओ-न्वार ड्रामा चुकवता कामा नये. कारण असे प्रयोग बॉलिवुडमध्ये वारंवार होत नाहीत. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख