अजूनकाही
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मध्ये अप्पासाहेब बेलवलकरांच्या पत्नीच्या कावेरीच्या तोंडी एक महत्त्वाचा संवाद आहे. ती म्हणते ‘आपली मुलं वार्इट नाहीत. आपलं म्हातारपण वार्इट आहे.’ यातून व्यक्त होतो तो समाजजीवनात म्हाताऱ्या आर्इ-वडिलांचं काय करायचं? हा ज्वलंत प्रश्न, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, सर्व लाड पुरवले, त्यांना केवळ ते आता म्हातारे झाले, त्यांची शरीरं थकली म्हणून हिडीसपिडीस करायचं? प्रसंगी त्यांच्यावर शारिरीक अत्याचार करायचे? अशा ज्वलंत प्रश्नांना हात घालत फ्लोरियन झेलर (जन्म - १९७९) या तरुण फ्रेंच नाटककाराचं ‘द फादर’ हे नाटक.
फ्लोरियन झेलर हा फ्रान्समध्ये महत्त्वाचा नाटककार समजला जातो. त्याच्या अनेक कादंबऱ्यांना व नाटकांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्या ‘द फादर’चं इंग्रजी भाषांतर ख्रिस्तोफर हॅम्पटन यांनी केलं आहे. हे नाटक परेश रावल यांनी नसिरुद्दीन शहाला वाचायलं दिलं. या नाटकाचे प्रयोग नसिरुद्दीनच्या ‘मोटली प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात आले. नाटकाचं दिग्दर्शन व त्यातील ‘आंद्रे’ ही प्रमुख व्यक्तिरेखा नसिरुद्दीन शहानं साकारली आहे. हे अगदी ताजं नाटक आहे, जे २०१२ मध्ये लिहिलं गेलं.
आंद्रे या ज्येष्ठ नागरिकाला दोन मुली असतात. तो निवृत्त पोलिस अधिकारी असतो. मुख्य म्हणजे तो विधुर आहे व मुलीबरोबर राहत असतो. नाटकातील कळीचा मुद्दा म्हणजे आंद्रेला डिमेंशिया (म्हणजे स्मरणशक्ती अधूनमधून दगा देण्याचा) हा भयानक आजार झालेला आहे. यामुळे त्याला सांभाळणं फार अवघड असतं. आंद्रे वयोमानानुसार अधिकाधिक हट्टी होत जातो. त्याच्या सोबतीला त्याची मुलगी अॅन एक नर्स ठेवण्याचा विचार करत असते. तिच्या लक्षात आलेलं असतं की, तिला एकटीला आंद्रेला सांभाळणं आणि स्वतःच्या जीवनाचा व करिअरचा विचार करणं शक्य नाही. आंद्रेला हे फारसं आवडत नाही. पण त्याचं काहीही ऐकून घेतलं जात नाही व एका नर्सची नेमणूक होते.
आंद्रेला कधी मुलीचा संशय येतो, तर कधी नर्सचा. त्याला सतत वाटत राहतं की, त्याचं मनगटी घड्याळ नर्स चोरते. घड्याळ अर्थात चोरीला गेलेलं नसतं तर ते आंद्रेच्या पायजाम्याच्या खिशात असतं. आंद्रे एक सूचक वाक्य बोलतो. तो म्हणतो ‘एक घड्याळ माझ्या हातात आहे, तर दुसरं माझ्या डोक्यात सुरू आहे.’ हळूहळू त्याच्या डोक्यातील घड्याळ काम करेनासं होतं आणि त्याचा आजार गंभीर होत जातो. त्याच्या या असह्य कटकटींना कंटाळून आधीची नर्स इझाबेला सोडून जाते.
तो चिडचिड करतो व इतरांवर अविश्वास दाखवतो. या दरम्यान त्याचा जावर्इ व त्याच्यात गप्पा होतात. जावर्इ त्याला स्पष्ट शब्दांत सुनावतो की, आंद्रे अतिशय स्वार्थी आहे. त्याला इतरांना आनंदात बघता येत नाही. जावर्इ दाखवून देतो की, ते पती-पत्नी मागच्या वर्षी सुट्टीसाठी बाहेर गावी जाणार असतात. पण ऐनवेळी आंद्रे प्रकृती बिघडल्याची बतावणी करतो आणि त्यांना सुट्टी रद्द करावी लागते. असे आरोप व असे प्रसंग अमिताभ बच्चन व दीपिका पदुकोन यांच्या भूमिका असलेल्या ‘पिकू’ चित्रपटातही आहेत.
अशा नाटकांचा शेवट पारंपरिक पद्धतीनं करता येणार नाही. परिणामी नाटकाच्या शेवटी आंद्रेला रुग्णालयात भरती केलं जातं. तो सवयीप्रमाणे नर्सशी वाद घालतो. लहान मुलासारखा वागतो. हे सर्व बदल प्रेक्षकांना बघवत नाहीत. हे नाटकाचं ढोबळमानानं कथानक.
नाटकाचं यश म्हणजे यात पेशंटबद्दल म्हणजे आंद्रेबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटत नाही. उलटपक्षी अनेक प्रसंगी त्याच्याबद्दल राग निर्माण होतो. या नाटकात नाटककारानं अनेक प्रसंगी खरं काय व खोटं काय याबद्दल संभ्रम ठेवला आहे. उदाहरणार्थ नाटकातील एका प्रसंगात आंद्रे व अॅन बोलत असताना ती वडिलांना सांगते की, ती लवकरच लंडनला जाणार आहे. आंद्रे नाराजीनंच हे मान्य करतो. पण नंतर दुसऱ्या प्रसंगात अॅन असं काही बोलणं झालं हेच अमान्य करते. इथं आंद्रेप्रमाणेच प्रेक्षकही बुचकळयात पडतात. हा प्रसंग प्रेक्षकांच्या साक्षीनंच रंगमंचावर होतो. आता मात्र अॅन काही तरी नालायकपणा करत आहे, अशी प्रेक्षकांची भावना होते. ‘द फादर’मध्ये असे अनेक प्रसंग आहेत.
नाटकाचं दिग्दर्शन नसिरुद्दीन शहानं केलं आहे. त्याचा रंगमंचावर गेली अनेक दशकं वावर आहे. त्याच्या कामात अनुभवसंपन्न सफार्इ आहे. या नाटकाची चर्चा करताना त्याच्या प्रकाशयोजनेची खास चर्चा करावी लागते. प्रकाशयोजना अर्घ्या लाहिरी यांची आहे. त्यांनी नाटकाची प्रकृती लक्षात घेऊन आणि प्रसंगांचं भावनिक तापमान लक्षात ठेवत प्रकाशयोजना केली आहे. त्यांचं खास कौतुक करावं लागेल.
प्रकाशयोजनेप्रमाणेच नाटकाच्या नेपथ्याची चर्चा महत्त्वाची आहे. यात रत्ना पाठक-शहा, अनुराधा पारेख-बेनेगल व अर्घ्या लाहिरी यांचा सहभाग आहे. या मंडळींनी रंगमंचाच्या जमिनीवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावल्या आणि त्यातून किचन, हॉल, आतील खोली वगैरेंचं सूचन होतं. शिवाय दिग्दर्शक नसिरुद्दीननं अनेक ठिकाणी मार्इमचा वापर करून प्रसंग उभे केले आहेत. यात तसं नवीन काही नसलं तरी या तंत्राचा प्रभावी वापर इथं दिसून येतो.
एका पातळीवर हे नाटक बघणं हा अतिशय अस्वस्थ करणारा अनुभव ठरतो. त्यात दिग्दर्शक म्हणून नसिरुद्दीननं सर्व नाट्यघटक इतके व्यवस्थितपणे वापरले आहेत की, नाटकाचा परिणाम गडद होतो. जोडीला त्याचा अभिनय. अनेक वर्षांपूर्वी त्याच्या ‘मॉटली’तर्फे सादर झालेल्या ‘वेटिंग फॉर गोदो’ किंवा ‘डियर लायर’ किंवा ‘भीष्मोत्सव’ या भीष्म सहानींच्या कथांच्या सादरीकरणात एक कथा सादर करणारा नसिर आधी बघितला आहे. या सर्व भूमिकांत आंद्रेची भूमिका त्याच्या कारकिर्दीचा कळस ठरेल अशी आहे. त्याला अॅनच्या भूमिकेतील रत्ना पाठक-शहा यांनी तशीच जबरदस्त साथ दिली आहे. त्यांच्या जोडीला फैझल रशिद, भावना पानी, त्रिशला पटेल व सयान बॅनर्जी यांनी मोलाची साथ दिली आहे.
तरीही काहीतरी खटकत राहतं. हे खटकणं नाटकाच्या कथानकाबद्दल आहे. काही समीक्षकांनी आंद्रेची तुलना शेक्सपियरच्या ‘किंग लियर’शी केली आहे. यात फारसं तथ्य नाही. ‘किंग लियर’ची शोकांतिका मानवनिर्मित आहे, तर आंद्रे प्रकृतीच्या पातळीवर लाचार आहे. त्याच्या आजूबाजूला असलेली मंडळी वार्इट नाहीत, पण त्याच्या आजारपणाला कंटाळलेली आहेत. म्हणूनच त्याची मुलगी आणि जावर्इ एक प्रकारे त्याच्या मृत्यूची वाट पाहत असतात. असं ‘किंग लियर’बद्दल नाही. लियरची प्रकृती तशी धडधाकट असते. त्याला मुलींनी केलेला विश्वासघात सहन होत नाही. म्हणून तो पुन्हा तलवार उपसतो व सूड घेण्यास सज्ज होतो. उलटपक्षी आंद्रे एका भयानक आजारापायी लाचार आहे. या नाटकातून आंद्रेचा आजार काढून घेतला तर नाटक उभं राहू शकत नाही. नाटककारानं डिमेंशियासारखा भयानक आजार नाटकाच्या केंद्रस्थानी ठेवल्यामुळे नाटककार म्हणून त्याच्या समोरची आव्हानं अगदी जुजबी झाली आहेत. नाटककाराचा पुढचा प्रवास सोपा झाला.
अर्थात हे आक्षेप संहितेबद्दल आहेत. एक प्रयोग म्हणून ‘द फादर’चा प्रयोग अप्रतिम होतो याबद्दल वाद नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment