अजूनकाही
आपल्या भावविश्वात ‘आर्इ’ म्हणजे साने गुरुजींनी रंगवलेली ‘श्यामची आर्इ’. मुलांसाठी सतत त्याग करणारी, त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी वगैरे. एकदम आदर्श आर्इ. या प्रतिमेचा आपल्या भावविश्वावर एवढा जबरदस्त पगडा आहे की, या प्रतिमेच्या बाहेर आर्इ एक व्यक्ती आहे वगैरे गोष्टी आपल्या गावीही नसतात. म्हणूनच जेव्हा रोना मन्रो (जन्म - १९५९) यांचं ‘आयर्न’ हे इंग्रजी नाटक बघण्याची संधी मिळाली, तेव्हा भावविश्वातील प्रतिमेच्या संदर्भात अनेक अडचणीत आणणारे प्रश्न मनात उपस्थित झाले.
रोना मन्रो या नाटककार असून रेडिओ व दूरदर्शनासाठी मालिका लिहितात. त्यांचं गाजलेलं नाटक म्हणजे ‘द जेम्स प्लेज’. ‘आयर्न’ नाटकात त्यांनी आर्इ-मुलगी यांच्यातील संबंधांना हात घातला आहे. हा नातेसंबंध वास्तविक पाहता फार जवळचा असतो. पण या नाटकातील आर्इ खुनी आहे व आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे. येथपासूनच कथानकाचं वेगळेपण जाणवायला लागतं. या नाटकाचा पहिला प्रयोग २००२ साली एडिंबर्गमध्ये झाला होता.
‘आयर्न’चा प्रयोग मुंबर्इस्थित ‘रेज प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेतर्फे सादर केला असून या नाटकाचं दिग्दर्शन अर्घ्या लाहिरी यांनी केलं आहे. हे प्रयोग महालक्ष्मीच्या ‘जी ५ ए’ या छोटेखानी, पण अशा प्रयोगांसाठी आदर्श अशा नाट्यगृहात झालं. या नाटकात एकंदर चार पात्रं आहेत. पंचेचाळीस वर्षांची आर्इ, तिची पंचवीस वर्षांची अविवाहित मुलगी, पुरुष तुरुंगाधिकारी व महिला तुरुंगाधिकारी. या पात्रांच्या माध्यमातून नाटककार रोना मन्रो व दिग्दर्शक अर्घ्या लाहिरी यांनी एक जिवंत नाट्यानुभव सादर केला आहे.
फे गेली पंधरा तुरुंगात आहे. तिच्यावर पतीच्या खुनाचा आरोप सिद्ध झालेला आहे. तिनं स्वयंपाकघरात नवऱ्याला चाकू मारून त्याचा खून केलेला असतो. न्यायालयात ती स्वतःच्या बचावासाठी एक शब्दही बोलत नाही. तिची सासू तिच्याविरुद्ध साक्ष देते. अन्य पुरावे ग्राह्य धरून तिला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा होते.
ती गेली पंधरा वर्षं तुरुंगात असते. एवढ्या काळात तिला कधी कोणी भेटायला आलेलं नाही. एक दिवस कळतं की, तिची तरुण मुलगी, जोझी तिला भेटायला आली. या एका घटनेनं फेचं भावविश्व ढवळून निघतं. इथून नाटकाला सुरुवात होते.
कोणत्याही तुरुंगात असतात, तसे या तुरुंगातही कैद्यांना भेटण्याचे कडक नियम असतात. ते माहिती नसल्यामुळे सुरुवातीला महिला तुरुंगाधिकारी जोझीला भेट नाकारते. पण जेव्हा तिला कळतं की, जोझी खूप दुरून आली आहे आणि आज प्रथमच तिच्या आर्इला पंधरा वर्षांनी भेटणार आहे, तेव्हा ती नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांची भेट होऊ देते.
हा प्रसंग एकदम स्फोटक आहे. तब्बल पंधरा वर्षांनंतर आर्इ-मुलगी समोरासमोर येतात. आर्इ तुरुंगात जाते, तेव्हा जोझी अकरा वर्षांची असते. आता पंधरा वर्षांनंतर ती आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या आर्इला भेटत असते. आपल्या सर्वांप्रमाणेच जोझीनंसुद्धा कधी तुरुंग बघितलेला नसतो. माय-लेकी समोरासमोर येतात. मागे दोन्ही तुरुंगाधिकारी पहाऱ्यावर असतात. सुरुवातीला हवापाण्याची गोष्टी होतात. दोघीही एकमेकींचा अंदाज घेत असतात. आर्इच्या मनात एकच प्रश्न- आता पंधरा वर्षांनी आपल्या मुलीला आपली आठवण का आली? तर मुलीच्या मनात एकच प्रश्न असतो - आपल्या आर्इनं आपल्या वडिलांचा खून का केला आणि खटल्यादरम्यान ती एकही शब्द का बोलली नाही. असे अस्तित्वाशी चिकटलेले प्रश्न पहिल्या भेटीत उलगडणारे नसतात. त्यानंतर त्यांच्या अनेक भेटी होतात.
या भेटी व त्यादरम्यान महिला तुरुंगाधिकारी व फे यांचे संबंध, असं वेगळं जग प्रेक्षकांसमोर येतं. महिला तुरुंगाधिकाऱ्याला एक अपत्य असतं, पण नवरा नसतो. फे-जोझी या माय-लेकींच्या गप्पांतून लक्षात येतं की, या दोघी जरी वर्तमानात जगत असल्या तरी त्यांच्या मनावर भूतकाळाचं प्रचंड मोठं ओझं आहे. जोझीला लहानपणाच्या काही गोष्टी अजिबात आठवत नाहीत. त्या ती आर्इच्या मदतीनं जिवंत करते. फेला कळतं की, ती तुरुंगात गेल्यानंतर तिच्या सासूनं आपल्या मुलीच्या मनात आपली काळीकुट्ट प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यांच्या गप्पा सहसा एका टेबलाभोवती होतात. ते टेबल बघता बघता त्यांच्यातील अंतराचं प्रतीक होतं.
हे नाटक सुरुवातीला एखाद्या रहस्यमय नाटकासारखं वाटतं. खून कोणी व का केला वगैरे प्रश्नांची उत्तरं शोधणारं हे नाटक आहे, असं वाटत असताना लक्षात येतं की, ‘आयर्न’ एवढं साधं व बटबटीत नाटक नाही. यात मानवी संबंधांचा खोलवर विचार केला आहे. माणसाच्या हातातून जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणानं खुनासारखा गंभीर गुन्हा घडला की, त्या व्यक्तीबरोबरच इतरांची आयुष्यं कशी उदध्वस्त होतात वगैरेंची यात चर्चा आहे.
पंधरा वर्षांनी भेटायला आलेल्या मुलीबद्दल आर्इच्या मनात फक्त संशयच नसतो, तर तिच्याबद्दल एक प्रकारचा रागसुद्धा असतो. पंधरा वर्षं तुरुंगात काढल्यानंतर फेमध्ये कडवटपणा आलेला असतो. आपल्या मुलीच्या आयुष्यात आता बॉयफ्रेंड नाही म्हटल्यावर तर तिच्या कडवटपणाला पारावर उरत नाही. ती जोझीला म्हणते, ‘तू संध्याकाळी काय करतेस? मला तपशिलात सांग. दूरदर्शनच्या करमणुकीपेक्षा हे ऐकणं जास्त धमाल असेल’. अशा संवादांतून तिचं रागानं भरलेलं मन समोर येतं.
जोझीला आर्इच्या मदतीनं हळूहळू तिच्या आजीनं तिच्यापासून व प्रेक्षकांसमोर लपवलेला भूतकाळ समोर येतो. यातून सासू-सुनेचं आपल्याला चिरपरिचित जग दिसतं. त्यांच्या गप्पांत आर्इ तिला ‘तुझे वडील किती चांगले होते, तुझे किती लाड करायचे’ वगैरे सांगायची. जोझीच्या मनातील प्रश्न प्रेक्षकांच्या मनातही असतो - एवढा नवरा चांगला होता तर तिनं खून का केला? नाटक जसजसं पुढे सरकतं, तसतसे मायलेकी एकमेकांचे लचके तोडतात.
आपली आर्इ न्यायालयात काहीच का बोलली नाही, हे हुडकून काढण्यासाठी जोझी त्याच गावात छोटीशी नोकरी करते आणि आर्इचा खटला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ती स्थानिक वृत्तपत्रांच्या जुन्या फायलींचा अभ्यास करते. जोझी बरीच माहिती मिळवते. तिच्या लक्षात येतं की, चांगला वकील दिला तर आर्इची शिक्षा माफ होऊ शकते. जोझीचे प्रयत्न जेव्हा आर्इला कळतात, तेव्हा ती फार भडकते व जोझीला फाडफाड बोलते. एवढंच नव्हे तर पुन्हा माझ्या भेटीला येऊ नको असंही सांगते. ती हे करू शकते, कारण तुरुंगाच्या नियमांनुसार कैदी ठरवतात कोणाला भेटायचं व कोणाला नाही.
नाटक संपतं तेव्हा आर्इ तुरुंगात असते. जोझीच्या मनावरील भूतकाळाचं भूत उतरलेलं असतं. ती तुरुंगाधिकाऱ्याला भेटून आर्इसाठी बँकेत असलेल्या पैशातून तिच्या इतर गरजा भागवल्या जाव्यात, अशी व्यवस्था केल्याचं तर सांगतेच. शिवाय ती आता यापुढे कधीही आर्इला भेटायला येणार नसल्याचं सांगते. नाटक संपतं.
प्रेक्षकांना नाटकाच्या प्रभावातून बाहेर यायला बराच वेळ लागतो. भारतीय प्रेक्षकांना माय-लेकीचं असं नातं बघण्याची सवय नाही. आता उदारीकरणाच्या काळात जुनी मूल्यं फार झपाट्यानं मागे पडत आहेत. त्यामुळे हळूहळू आपले प्रेक्षकही मानवी जीवनातील अंर्धाया जागा बघायला तयार होत आहेत.
नाटकातील चारही पात्रांनी उत्तम अभिनय केला आहे. शेरनाझ पटेल (आर्इ), दिलनाझ इराणी (जोझी), मेहेर अचारिऱ्याधर (महिला तुरुंगाधिकारी) व केन्नी देसार्इ (पुरुष तुरुंगाधिकारी) या चौघांच्या दर्जेदार अभिनयामुळे या नाटकाची परिणामकारकता फार वाढली आहे. आर्इ व मुलगी यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी तर केवळ लाजबाब. शेरनाझ पटेल मुंबर्इतील इंग्रजी रंगभूमीवरील आदरणीय नाव. त्यांच्या अभिनयातील सफार्इ थक्क करणारी आहे. पंधरा वर्षांनंतर आपली मुलगी का भेटायला आली असेल, या प्रसंगातील त्यांचं भावदर्शन अप्रतिम आहे. आर्इ ज्या तऱ्हेनं मुलीचे लचके तोडते, हे प्रेक्षकांना बघवत नाही आणि तरी तिचा राग येत नाही. पंधरा वर्षं जी मुलगी आपल्याला विसरली होती, ती अचानक समोर आल्यावर राग, प्रेम, माया वगैरे उसळून आलेल्या विविध भावना शेरनाझ पटेल यांनी समर्थपणे व्यक्त केल्या आहेत. जी बार्इ गेली पंधरा वर्षं आपल्या ताब्यात आहे, ती मुलगी आल्यावर आपल्या कह्यातून जाते की काय या भीतीनं ज्या प्रकारे महिला तुरुंगाधिकारी कारवाया करते, तो प्रकार मेहेर यांनी छान सादर केला आहे. हे पात्र बघताना १९७५ साली आलेल्या ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या चित्रपटातील नर्स मिल्ड्रेड रॅचेद या पात्राची आठवण येते. मिल्ड्रेड तिच्या ताब्यात असलेल्या मानसिक रुग्णांवर सत्ता गाजवत असते, तर ही महिला तुरुंगाधिकारी तिच्या ताब्यात असलेल्या फेसारख्या कैद्यांवर. स्त्रीतील ही सत्तापिपासू वृत्ती अंतर्मुख करते.
सरतेशेवटी दिग्दर्शक अर्घ्या लाहिरी यांचा खास उल्लेख केला पाहिजे. त्यांनी तुरुंगातील निराशजनक वातावरण दिग्दर्शनातून आणि प्रकाशयोजनेतून व्यवस्थित उभं केलं आहे. एवढेच नव्हे तर रंगमंचावरील प्रकाशयोजना तुरुंगातील निराशजनक वातावरण व्यवस्थित उभे करते. अशी नाटकं बघणे म्हणजे आपल्यासमोर प्रतिभावंत नाटककारांनी धरलेला आरसाच असतो.
.............................................................................................................................................
नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप
पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.
ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment