फिरंगी : आणखी एक कंटाळवाणा, तथाकथित पीरिअड ड्रामा 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘फिरंगी’चं पोस्टर
  • Sat , 02 December 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie फिरंगी Firangi कपिल शर्मा Kapil Sharma

२०१७ मध्ये आपण सुमारे पावणेतीन तासांचा चित्रपट बनवत असू, तर आपल्या पटकथेवर आणि दिग्दर्शनावर ठाम विश्वास असावा. आणि हाच विश्वास 'फिरंगी'चे दिग्दर्शक राजीव धिंगरा यांनाही असावा. पण विश्वास ही डोळे झाकून ठेवण्याची गोष्ट नव्हे, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला असावा. आणि त्यांचा हाच सोयीस्कर विसर कंटाळवाण्या 'फिरंगी'ला मोठ्या आत्मविश्वासानं आपल्यासमोर घेऊन येतो. 

मुळात हा चित्रपट ‘लगान’चा सुमार रिप ऑफ आहे, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नाहीच. बरं, ‘लगान’सारखा असेना का. पण त्यासाठी चांगली पटकथा नको का? उलट चित्रपट नको तिथं ‘लगान’मधील सीन्स रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करून आपलं अजूनच हसं करून घेतो, ही अजूनच निराळी गोष्ट. 

चित्रपटाची सुरुवातच मुळी अमिताभ बच्चनच्या नॅरेशननं होते. तो आवाज आपल्याला त्या काळात, अर्थात १९२० मध्ये घेऊन तर जातो. पण सुरुवातीचाच सीन फक्त हास्यात विरून नेण्यात लेखक- दिग्दर्शक राजीव धिंगरा समाधान मानतात. खरं तर ज्या सीननं चित्रपटासाठी एक गंभीर, किंवा कमीत कमी पूरक वातावरण निर्माण करायला हवं, तो विनोदी अंगानं जातो. आणि चित्रपट एक चांगलं 'फर्स्ट इम्प्रेशन' पाडण्यापासूनच माती खातो. 

यानंतर कुठलंच ट्रान्जिशन वगैरे वापरण्याची गरज न वाटल्यानं, आपण राजवाड्यातून थेट रेस कोर्सवर येतो. आणि आपली ओळख होते मंगतराम (कपिल शर्मा) ऊर्फ मंगाशी. ज्याचा परिचयही अर्थातच विनोदी पद्धतीनं होतो. थोडक्यात, चित्रपट कोणत्या दिशेनं जाणार हे सांगण्याइतपत टिपिकल मार्गानं तो पुढील अडीचेक तासांचा प्रवास करत राहतोच. 

पुढे मंगा त्याच्या एका मित्राच्या (इनामुलहक) लग्नासाठी दुसऱ्या गावात जातो. तिथं, अर्थातच, तो एका मुलीच्या, सरगीच्या (इशिता दत्ता) प्रेमात पडतो. आणि मग चित्रपट प्रेमकथेच्या मार्गानं वाटचाल करू लागतो. मित्राचं लग्न झाल्यावर मंगा पुन्हा आपल्या गावी परततो. आणि त्याला अनपेक्षितरीत्या (आणि काहीच्या काही अफाट कारणानं) ब्रिटिश सरकारची नोकरी मिळते. मग मंगाचं कुटुंब त्याच्या लग्नाची बोलणी करायला सरगीच्या घरी जातात. तिचे वडील (राकेश शर्मा) याला होकार देतात. पण देशभक्त आजोबा, लालाजी (अंजन श्रीवास्तव) तो ब्रिटिश सरकारचा गुलाम आहे म्हणत नकार देतात. 

मग मंगाचं एकच ध्येय बनतं, ते म्हणजे सरगीशी लग्ना करणं. त्यासाठी अनेक खटाटोप होतात. मात्र यासाठी कथेत देशभक्ती, इंग्रजांचा अत्याचार वगैरे अनेक गोष्टी येतात. आणि आधीच ढिसाळ असलेल्या पटकथेचं रूप अजूनच वाईट होतं. 

आता ही कथाही इथं अर्धवट आणि तुकड्यातुकड्यात सांगायचं कारण म्हणजे खरं तर चित्रपटही असाच आहे. अनेक विनोदी, गंभीर (असण्याचा आव आणणारा), देशभक्तीपर दृश्यांचे तुकडे एकत्र करून जोडलेला आहे. त्यामुळे तो कोणत्या अंगानं जातो त्याचा विचारच न केलेला बरा. शिवाय, कथेविषयी जरासं बोलायचं म्हटलं तरी हाती काहीच लागणार नाही. त्यामुळे त्याचा विचारच करायला नको. 

आशुतोष गोवारीकरनं 'लगान' पीरिअड ड्रामा फिल्म म्हणून जरी समोर आणला असला, तरी त्यात त्यानं सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे, हे आधीच मान्य केलं होतं. किंवा क्वेंटिन टॅरंटिनोनं 'इनग्लोरियस बास्टर्ड्स' हा चित्रपट बनवल्यावर तो 'अल्टरनेट हिस्ट्री' म्हणून, आणि उपहासात्मक आहे, हे सांगितलं होतं. 

इथं मात्र 'फिरंगी' पीरिअड अ‍ॅक्शन कॉमेडी ड्रामा या पद्धतीनं समोर आणलाय किंवा तसं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुळात तो पीरिअड म्हणावा का, इथपासून प्रश्नांना सुरुवात होते. बरं, पीरिअड आहे असं म्हणावं तर यात पात्र, कथा वगैरे गोष्टी ठिसूळपणे समोर येतात. म्हणजे आपल्या नायकाचं यात चित्रपटातील एकमेव ध्येय काय तर नायिकेशी लग्न करणं. हे करण्यासाठी मग उपकथानक म्हणून देशभक्ती वगैरेंची जोड. ही जोडदेखील वरवरची. त्यामुळे तेदेखील बाजूलाच पडतं. आणि शेवटदेखील प्रियदर्शन या दिग्दर्शकाच्या चित्रपटांप्रमाणे होतो. त्यामुळे एक हा चित्रपट आपल्यावर काही विशेष ठसा उमटवतो, असं होत नाही.

चित्रपटातील विनोदी दृश्यं पाहून टीव्हीवर चालणाऱ्या विनोदी कार्यक्रमांतील स्क्रिप्ट्स बरी असं म्हणायची वेळ येते. समलैंगिक संबंधांवरील आणि गैरसमजातून निर्माण झालेले (किंवा जबरदस्तीनं निर्माण केलेले) रटाळ विनोद, उगाच नावापुरती येणारी अ‍ॅक्शन, या गोष्टी चित्रपटात काही विशेष योगदान देतात, असाही दिग्दर्शकाचा गैरसमज असावा. 

चित्रपटातील गाणीही ना ठळकपणे समोर येतात, ना चित्रपटात फारशी प्रभावी वाटतात. उलट आधीच नको तितक्या लांबलेल्या चित्रपटाची लांबी वाढवण्याचं काम ही गाणी करतात. 

कपिल शर्मा इथं फक्त ठीकठाक म्हणता येतो. पण खरं वाईट वाटतं ते कुमुद मिश्रा, राकेश शर्मा ते अगदी अंजन श्रीवास्तवसारखी तगडी स्टारकास्ट वाया घालवल्याचं. पण त्यालाही काही इलाज नाहीच. इशिता दत्ता, मोनिका गिल यांना तर फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणून कामी आणलं गेलं. 

थोडक्यात, एखाद्या चित्रपटात असतील-नसतील ते सगळे दोष 'फिरंगी'मध्ये एकत्रितपणे दिसून येतात. कपिल शर्मा तर चित्रपटाला वाचवू शकत नाहीच. पण कुमुद, राकेशसारखे कलाकारही अगदीच वरवरच्या पद्धतीनं लिहिलेली पात्रं आणि दृश्यांमुळे काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे या आठवड्यात तरी समोर पिक्सारचा 'कोको' किंवा 'मर्डर ऑन ओरिएंट एक्सप्रेस'सारखे पर्याय समोर असताना या 'फिरंगी'च्या वाटेला न गेलेलंच बरं. 

.............................................................................................................................................

निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ,

देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख