‘हाफ ब्रीड’ - इंग्लंडमधल्या वांशिक द्वेषाची कहाणी
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘हाफ ब्रीड’मधील नताशा मार्शलच्या काही भावमुद्रा
  • Sat , 02 December 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe हाफ ब्रीड Half Breed Natasha Marshall नताशा मार्शल

जगभर पसरलेल्या विविध समाजांत उच्च-निचतेची भावना प्रबळ असते. त्या त्या समाजात असलेली विविध जातींची, आर्थिक वर्गांची उतरंड पक्की असते. कातडीचा गोरा रंग म्हणजे वरचढ, तर काळा रंग म्हणजे खालच्या लोकांचा वगैरे समजुती आज एकविसाव्या शतकातही तितक्याच प्रबळ आहेत. या समजुती व ही मानसिकता आधुनिक शिक्षण, आर्थिक विकास वगैरे झाल्यावर हळूहळू नाहीशा होतील, असा आशावाद अनेक समाजसुधारकांनी जपला होता. आता मात्र या सर्वांबद्दल मनांत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या संदर्भात जातिव्यवस्थेच्या प्रथेमुळे भारतीय समाज जगभर बदनाम झालेला आहे. आजही भारतातील जवळपास सर्व राज्यांत जातिव्यवस्था अनेक प्रकारचे अन्याय व हिंसाचार करत असते. मात्र जवळपास असेच प्रकार प्रगत, सुशिक्षित, सुसंकृत पाश्चात्य देशांतही होत असल्याचे समोर येतं, तेव्हा मात्र डोकं चक्रावतं.

हे आशयसूत्र असलेला एकपात्री प्रयोग बघण्याचा योग अलीकडेच मुंबर्इत आला. नताशा मार्शल (वय - १७ वर्षे) या ब्रिटिश तरुणीने ‘हाफ ब्रीड’ हा सुमारे दीडतास चालणारा इंग्रजी प्रयोग सादर केला होता. हे नाटक तिच्या व्यक्तीगत अनुभवांवर आधारित आहे. तिची आर्इ निग्रो तर वडील गोरे होते. म्हणूनच नाटकाचे नाव आहे ‘हाफ ब्रीड’. तिचं बालपण इंग्लंडच्या विल्टशायर नावाच्या एका गरीब खेड्यात गेलं. या गावातील वस्तीत निग्रो व गोरे दोन्ही आहेत. नताशाला नट व्हायचं होतं.  आज ती नट झालेली आहे. ‘छोटेशे खेडे ते लंडन’ या प्रवासात तिला लंडनमधील गोऱ्या समाजाकडून आलेल्या अनुभवांचं सादरीकरण म्हणजे एक नाटक. हे नाटक लंडनच्या ‘तलावा थिएटर कंपनी’ आणि ‘सोहो थिएटर’ तर्फे सादर केलं जातं. या नाटकाचे प्रयोग दिल्ली, बंगलोर वगैरे शहरांत झाले आणि दौऱ्याचा शेवटचा टप्पा म्हणजे मुंबर्इत शहरात आठवडाभर झालेले प्रयोग. ‘हाफ ब्रीड’चं दिग्दर्शन मिरांडा क्रॉमेवल यांनी केलं आहे.

नाटकातील पात्राचं नाव आहे जस्मीन व ती स्वतःच्या जीवनाची कहाणी सादर करते. विल्टशायरसारख्या छोट्या खेड्यात जस्मीनसारख्या महत्त्वाकांक्षी तरुणीची घुसमट होत असते. तिथं ती तिच्या गोऱ्या कातडीच्या आजीबरोबर राहत असते. तिचा आशावाद प्रचंड असतो. जस्मीनला आजूबाजूला भयानक दारिद्रय दिसत असतं. यातून सुटका होण्याच्या शक्यता मावळलेल्या असतात. आजूबाजूचे गरीब निग्रो लोक जमेल तसं जगत असतात. जस्मीन हे भयाण वास्तव बघत बघत मोठी होते. तिचे मित्रमैत्रिणी तिच्यासारखेच असतात. सुमारे दीडतास चालणाऱ्या हाफ ब्रीडच्या प्रयोगात जस्मीन हे सर्व जग प्रेक्षकांसमोर आणतं.

इतर निग्रोप्रमाणे जस्मीनला गोऱ्या समाजाकडून पदोपदी मानहानी सहन करावी लागते. शाळेतील रॅगिंग, तिच्या कातडीच्या रंगावरून तिची केली गेलेली हेटाळणी वगैरे कधी विनोदी पद्धतीनं, तर कधी गंभीरपणे नताशा सादर करते.

जस्मीनच्या एका मैत्रिणीचा, ब्रोगानचा मित्र मिशेल जस्मीनचा सतत पाणउतारा करत असतो. या व अशा अनुभवांमुळे जस्मीन विचार करत राहते. त्यामुळे तिला या वातावरणातून बाहेर पडण्याची सतत प्रेरणा मिळत राहते. ब्रोगान तरुणपणीच, विवाह झालेला नसताना गर्भवती होते. अशा प्रसंगांचा सामना करत जस्मीनला बाहेरच्या क्रूर, वांशिक द्वेषानं भरलेल्या जगाचं दर्शन होतं.

सरतेशेवटी जस्मीन गाव सोडायचं ठरवते. तिला लंडनला जाऊन नट व्हायचं असतं. यात तिच्या मनाची ओढाताण होत असते. ती म्हणते- ‘My brain is just confused as confused as my skin. Should I stay here? Or should I try to move to London? Stay. Go. Stay. Go.’ तिला एका ऑडिशनला बोलावलं जातं. यासाठी जस्मीन शेक्सपियरच्या ‘द विंटर्स टेल’ या गाजलेल्या नाटकातील हमॉर्इन या पात्राचा संवाद सादर करण्याचा प्रयत्न करते. या दरम्यान तिची झालेली फजिती वगैरे बघताना एका बाजूला हसू येतं, तर दुसरीकडे प्रेक्षक अंतर्मुख होतो. आपल्याकडे (आजही) अस्तित्वात असलेल्या जातिव्यवस्थेमुळे प्रेक्षकांना जस्मीनचं दुःख, तिची धडपड समजते.

एका प्रसंगी जस्मीन म्हणते, ‘I am that mixed-raced kid, 50/50, on the fence, lukewarm, in-between may be. Trust me, around here I am about as black as it goes’. जस्मीनला पदोपदी तिच्या कातडीच्या रंगावरून केलेले विनोद ऐकावे लागतात. मग ती बसस्टॉपवर उभी असो, हॉटेलमध्ये चहा पित असो, लोकेशन कुठलंही असो, विनोदांची जातकुळी एकच असते. हे सहन करणं फार अवघड आहे.

आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशातून उच्चविद्याविभूषित होऊन आल्यावरही, बडोदा सरकारच्या नोकरीत हाताखाली काम करणाऱ्या शिपायानं फार्इली फेकल्याचा अनुभव आला होता. आजही या सामाजिक व आर्थिक स्थितीत, त्यातही ग्रामीण भागातील, किती बदलली आहे? आजही जे दलित आहेत, तेच गरीब आहेत आणि जे गरीब आहेत तेच दलित आहेत. त्यांच्यावर दररोज होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या आपण दररोज वाचत असतो, टीव्हीवर बघत असतो.

असेच प्रकार पाश्चात्य देशांतही सर्रास घडत असतात. गेली अनेक शतकं (दशकं नव्हे) पाश्चात्य जगतात ज्यू धर्मियांना ज्या प्रकाराचा छळ सोसावा लागला, ते बघता तिथंसुद्धा असे भेदाभेद असतात हे लक्षात येतं.

आधुनिक काळातील महासत्ता म्हणजे अमेरिका. तिथं तर कालपरवापर्यंत निग्रो समाज गुलामगिरीत होता. अब्राहम लिंकन यांना स्वकीयांशी लढून गुलामगिरी संपवावी लागली. तरीही ती खऱ्या अर्थानं संपली नव्हतीच. १९६४ सालापर्यंत अमेरिकन लोकशाहीत निग्रो समाजाला मतदानाचा अधिकार नव्हता! हे तपशील समोर ठेवले म्हणजे जगभर एक समाजसमूह दुसऱ्या समाजसमूहाला गुलाम करत आला आहे, हे सत्य लक्षात येतं. म्हणून असे पूर्वग्रह, वांशिक द्वेष समर्थनीय ठरतात असं नाही.

नताशा सादर करत असलेला ‘हाफ ब्रीड’चा प्रयोग म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. यातील वास्तव ‘आज’चं आहे, एकविसाव्या शतकातील इंग्लंडमधील आहे. याच इंग्लंड/अमेरिकेबद्दल आपल्या लेखक, विचारावंतांनी मराठी समाजाच्या किती भाबड्या कल्पना करून दिल्या होत्या! ‘साहेबाचं काय विचारता!’ असं म्हणत मराठी समाजाला तिकडच्या समाजव्यवस्थेची फक्त उजळ बाजू दाखवली. ‘हाफ ब्रीड’सारखे प्रयोग पाश्चात्य समाजाची काळी बाजू आपल्यासमोर आणतात आणि आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात.

दिग्दर्शक मिरांडा क्रॉमवेल यांनी या प्रयोगात नेपथ्य औषधालाही वापरलं नाही. त्यांनी फक्त कल्पक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत यांच्या आधारे एक जबरदस्त प्रयोग सादर केला आहे. अशा एकपात्री नाटकात सर्व मदार एकाच नटावर असते. ‘हाफ ब्रीड’मध्ये नताशानं जस्मीन व इतर पात्रं सादर केली आहेत. तिच्या शरीरात असलेली तारुण्यसुलभ ऊर्जा कमालीची आहे. तिनं जस्मीनची स्वप्नं, तिला आलेले दाहक अनुभव वगैरे फार सफार्इनं व्यक्त केले आहेत. नेपथ्य, वेशभूषा वगैरे पारंपरिक नाट्यघटक मदतीला नसताना प्रेक्षकांचं लक्ष तासभर पकडून ठेवणं, हे वेगळंच आव्हान आहे. नताशानं ते आव्हान लिलया पेललं आहे.

नताशाला जर योग्य संधी मिळत गेल्या, तर ती १९८५ साली आलेल्या ‘कलर पर्पल’ हा हॉलिवुड चित्रपटातील केली हॅरिसची अजरामर भूमिका सादर करणाऱ्या व्हुपी गोल्डबर्गच्या तोडीची नटी होऊ शकेल.

.............................................................................................................................................

निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ,

देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......