‘…बाळासाहेब’ पाहताना मी रडलो, पण…
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
यश एनएस
  • चित्रपटाचं पोस्टर
  • Sun , 13 November 2016
  • जाऊंद्याना बाळासाहेब गिरीश कुलकर्णी Girish Kulkarni अजय-अतुल Ajay-Atul Marathi Films मराठी सिनेमा

'जाऊंद्याना बाळासाहेब'मधल्या शेवटच्या सीनमध्ये काहीतरी खूप ओळखीच सापडलं आणि मी बऱ्याच वर्षांनी एखादा चित्रपट बघताना रडलो. याचा अर्थ मला असं अजिबात म्हणायचं नाही की, हा चित्रपट खूप चांगला आहे. खरं तर असं नसूनही त्याचा माझ्यावर प्रभाव पडला. याबाबत मी इतकंच सांगू इछितो की 'जाऊंद्द्याना बाळासाहेब'बद्दलची माझी मतं कदाचित वस्तुनिष्ठ नसू शकतात. तरी मी ती इथं प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटाचा टीझर मी 'सैराट' (तीनदा) बघायला गेलो असताना पाहिला. त्या आधी मी त्याच्याबद्द्ल बरंच ऐकलं होतं, पण तो कशाबद्दल असेल याची काही कल्पना नव्हती. टीझर बघितल्यावर मी सगळ्यांना सांगत सुटलो की, 'हा चित्रपट भारी satire असणारे. गिरीशने तो नेहमीसारखा भारीच लिहिला असणारे.' सगळ्यांना सांगण्यामागे त्यांनी तो बघावा ही इच्छा तर होतीच, पण महत्त्वाचा हेतू हा होता की, मी कसं टीझर बघून चित्रपट चांगला आहे हे सांगू शकतो, हे सर्वांना नेहमीसारखंच कळावं! टीझर बघून माझी खात्री पटली की, आपल्या शहरात ज्या लोकांची होर्डिंग्ज आहेत आणि ज्यांचं वागणं बघून आपल्याला राग येतो, 'त्या लोकांची' हा चित्रपट नक्कीच विकेट घेणार.

मात्र गिरीश कुलकर्णीने माझी ही असुरी इच्छा चांगलीच हाणून पाडली, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या लिखाणाच्या एका महत्त्वाच्या यशावर बोट ठेवायचं तर, तो त्याच्या प्रत्येक चित्रपटातील पात्रांविषयी सहानुभूती निर्माण करतो. बाळासाहेबसारखं पात्र 'जाऊंद्द्या ना बाळासाहेब'मध्ये त्याने खूप सुंदर रंगवलं आहे. या पात्राचा त्यातील प्रवास आणि त्या प्रवासाचा अंत यामुळे आपण त्याच्याशी कधी जोडले जातो हे कळत नाही. ज्या पुरुषांना बाळ असल्यापासूनच 'साहेब' ही पदवी दिली जाते आणि कोणाशीही सहानुभूत होण्याची ताकद दिली जात नाही ते पुरुष मोठे झाल्यावर स्वार्थी, बालिश आणि हिंसक वागतात यात त्यांची काय चूक? शेवटी कला आणि शिक्षण यांचं आपल्या समाजात झालेलं प्रतिगमन याचा 'बाळासाहेब' निर्माण करण्यात मोठा वाटा आहे. त्याच बरोबर सर्व भागातल्या स्त्रियांच्या परिस्थितीत होणारी अपुरी सुधारणा हे पण एक मोठं कारण आहे. त्यामुळे हे प्रतिगमन फक्त 'बाळासाहेबसारख्यांची' समस्या नाही.

दुर्दैवानं इतका खोल विचार मांडू शकणाऱ्या या चित्रपटातील इतर पात्रं उथळ वाटतात. बाळासाहेबची गोष्ट जशी वळते तशी ही पात्रं वळतात. त्यामुळे बाकीच्या नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होत नाही आणि काही काळ निर्माण झाला तरी खूप वरवरचा वाटतो. परिणामी श्रीकांत यादव, किशोर चौगुले आणि भाऊ कदमसारखे समर्थ अभिनेते असूनही त्यांना त्यांची क्षमता दाखवायला फारशी संधी मिळत नाही. या चित्रपटाबद्द्लच्या बऱ्याच लेखांमध्ये गिरीशबरोबर सई ताम्हणकर, रीमा लागू, दिलीप प्रभावळकर इत्यादींची नावं घेतली गेली, पण कुठल्याही चित्रपटाबद्दल बोलताना त्याची कथा आणि रचनेसाठी कुठली पात्रं आणि अभिनेते महत्त्वाचे आहेत यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. असो.

श्रीकांत यादवचं 'हायवे'मधील काम संस्मरणीय होतं. या चित्रपटातही त्यानं चांगलं काम केलं आहे. असाच विश्वास आता किशोर चौगुलेच्या कामाबद्दलही वाटू लागला आहे. भाऊ कदमसारख्या गुणी कलाकाराला त्याच्या 'चला हवा येऊ द्या' आणि इत्यादी शोमध्ये फारसा न्याय मिळत नाही हे त्याची या चित्रपटातील भूमिका पाहून कळतं. अलीकडच्या काळात दिलीप प्रभावळकर हे अभिनेता म्हणून साचेबद्ध होत चालले आहेत की, काय असं वाटत असलं तरी या चित्रपटातली त्यांची छोटीशी भूमिकाही त्यांच्या खऱ्या क्षमतेची आठवण करून देते. बाळासाहेब व त्याच्या मित्रांना सोडून जर एखादं पात्र प्रभावी पद्धतीनं उभं राहिलं असेल तर ते म्हणजे आण्णासाहेबांचं. मोहन जोशींनी ही भूमिका केली आहे. त्यांच्यासारखा कठोर आणि भीतीदायक अभिनय क्वचितच कुणाला जमत असेल.

आणि सगळ्यात शेवटी मला न आवडलेलं पात्र सांगायचं झालं तर ते मनवा नाईकचं. या पात्रात पुण्यातील कला-प्रेमी, उदारमतवादी आणि थेटपणाची साचेबद्ध संकल्पना कुटून भरली आहे. थोड्या वेळाने ती खूप गोड आणि अवास्तविक वाटू लागते. मला कुठेतरी हे पात्र का घेतलं आहे हे समजलं, पण बाळासाहेबच्या आयुष्यात बदल घडवणारी आणि त्याची व्यक्त होण्याची सुरुवात करून देणारी व्यक्ती अजून वेगळी रंगवली असती तर त्याच्यात होणारे बदल जास्त खरे वाटले असते.

'जाऊंद्याना बाळासाहेब' प्रवचनात्मक नक्कीच वाटू शकतो. यातील बरीच दृश्यं त्यातला मुद्दा खूप थेट मांडतात. कलेची आवड निर्माण झाली किंवा 'चांगली पुस्तकं' वाचता/ऐकता आली म्हणजे बदल घडेल या शहरी कल्पना वाटतात. कला आणि शिक्षण प्रमुख आहेत यात वाद नाही, पण त्या बरोबर मोठ्या सामाजिक बदलाचीही गरज असते. कला आणि शिक्षण मोकळेपणे घेताना जे सांस्कृतिक आणि सामाजिक अ‍डथळे निर्माण होतात तेही सांगण्याची गरज असते. एक उदाहरण द्यायचं तर बाळासाहेब आणि त्याच्या मित्रांमध्ये अजिबात नसलेली सत्तास्पर्धा. प्रत्यक्षात असं नसतं. हजारो वर्षांपासून समाजातील काही वर्गांकडे असलेल्या शक्ती आणि संसाधनांच्या साठ्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही. तसेच जोडीला चालत आलेली पुरुष-प्रधान संस्कृती आणि जातिव्यवस्थेनं तिला दिलेली बळकटी. 'जाऊंद्याना बाळासाहेब' हा चित्रपट हे भान देण्याचा चांगला प्रयत्न आहे, पण तो त्यात कमी पडतो असं वाटतं. हा चित्रपट भाऊसाहेब, अप्पासाहेब, अण्णासाहेब, दादासाहेब, बाळासाहेब अशा किती जणांवर परिणाम करेल याची शंका वाटते.

असो. आपण चित्रपटाबद्दल बोलतोय, त्यात समाजशास्त्र नको!

या चित्रपटातील गाण्यांबद्दल काही न बोलणं हा अन्याय ठरेल. लोकांना काय आवडेल याचा कल ओळखणं गिरीश-उमेशच्या टीमला नेहमीच जमलंय. परिचित पाकिटात नवीन भेट देण्यात ते दोघं तज्ज्ञ आहेत! त्यामुळे 'डॉल्ल्बीवाल्या' किंवा 'Bring It On' या गाण्यांच्या वैशिष्टपूर्ण संगीताबरोबर त्यात येणारे शब्द वेगळे व चलाख आहेत. टिपिकल लोकप्रिय गाण्यांचा फॉर्म उचलूनच या चित्रपटातली गाणी तयार केली आहेत. पण ती पुरोगामी आणि उन्नत करणारी आहेत. हा खूपच चांगला बदल आहे. हे इतर चित्रपटांना का नाही जमू शकत?

सिनेमॅटोग्राफी आणि एडिटींग काही दृश्यांचा अपवाद वगळता फार उल्लेखनीय नाही. काही दृश्यं काटेकोरपणे संकलित केली असती तर चित्रपट अधिक परिमाणकारक झाला असता. कॅमेरा एखाद्या पात्राच्या चेहऱ्यावर थोडा कमी काळ रेंगाळला असता किंवा दृश्यांचा क्रम थोडा बदलला असता तर? अर्थात हे सगळं असलं तरी हेही वाटत राहतं की, गिरीश लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या सगळ्या भूमिका एकाच वेळी कशा काय निभावू शकतो?

नेमकं सांगायच झालं तर शेवटच्या स्टेज सीनच्या वेळेस मला रडू आलं. Martin Scorsese च्या 'The King Of Comedy'ची आठवण झाली. त्यात रुपर्ट पपकिन खूप प्रयत्नानंतर त्याची कला सादर करायला लागतो. इतका वेळ मूर्ख, बालिश वाटणाऱ्या आणि स्वप्नात जगणाऱ्या रुपर्टची दुसरी बाजू आपल्याला दिसायला लागते. तेव्हा आपण त्याचं दु:ख बघून रडतोच, पण आधी त्याच्यावर जे हसलेलो असतो त्याबद्दलही आपल्याला वाईट वाटू लागतं. बाळासाहेब आणि रुपर्टमध्ये खूप फरक असला तरी त्या शेवटच्या दृश्यातली वेदना आणि प्रामाणिकपणा माझ्यापर्यंत पोहचला. हा चित्रपट अजून चांगला बनला असता तर कदाचित या भावना अजून भिडल्या असत्या.

असो. तरीही हा चित्रपट मला दोनदा बघायला मजा आली.

 

लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.

yashsk@gmail.com

Post Comment

Neelima Kadam

Sun , 13 November 2016

Hi Yash A very well written article. It was a pleasure to see this movie in theatre with you. I also liked the last scene in movie and it was very touching and emotional. Thanks for expresssing your thoughts beautifully above.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख