अजूनकाही
‘‘एस. दुर्गा’चे दिग्दर्शक एस. शशीधरन आयनॉक्सच्या आवारात निषेध व्यक्त करताहेत. तुम्हाला यायचंय का?’ इफ्फीच्या समारोपाच्या समारंभासाठी निघालेल्या पत्रकारांच्या बसमध्ये डोकावून मी विचारलं.
‘आर दे शोईंग हिज फिल्म?’ एका पत्रकारानं प्रतिप्रश्न केला.
‘नाही. म्हणून तर निषेध आहे. पण तुम्हाला समारोपाच्या ग्लॅमरस सोहळ्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर प्लीज कॅरी ऑन...’ मी उपहासानं म्हटलं आणि आयनॉक्सच्या दिशेनं चालू लागले. एकही जण बसमधून खाली उतरला नाही.
आवाराच्या एका कोपऱ्यात दुपारी अडीच वाजताच्या टळटळीत उन्हात एस. शशीधरन आपल्या एका सहकाऱ्यासह ‘सेव्ह डेमॉक्रसी’चा फलक हातात घेऊन शांतपणे उभा होता. विचारलेल्या प्रश्नांची अतिशय नम्रपणे उत्तरं देत होता.
‘केरळ उच्च न्यायालयानं माझ्या बाजूनं निर्णय दिल्यानंतर न्यायालयाच्या म्हणण्यानुसार काल रात्री पुन्हा एकदा अकरा ज्युरींनी माझा सिनेमा बघितला. आणि तो चित्रपट महोत्सवामध्ये दाखवायला काहीच हरकत नाही असं पत्रही दिलं. हे ते पत्र...’ एस. शशीधरननं आमच्यासमोर त्या पत्राची प्रत धरली.
त्यात म्हटलं होतं, ‘आम्ही, इंडियन पॅनोरामा २०१७चे मूळ ज्युरी आहोत, २४ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापन झालेल्या या ज्युरींनी, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, (यु/ए सेन्सॉर सर्टिफिकेट दिलेल्या) ‘एस. दुर्गा’ हा सिनेमा कला अकादमीच्या ज्युरी थिएटरमध्ये दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ रोजी बघितला.
ज्या अकरा ज्युरींनी हा सिनेमा बघितला त्यापैकी आम्ही, खालील सही केलेले सात ज्युरी अत्यंत ठामपणे या सिनेमाच्या कलात्मक, चित्रपटीय आणि सामाजिक आशयासाठी या सिनेमाची शिफारस करत असून भारताच्या ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरामामध्ये दाखवण्यात यावा.’
सुरेश हेबळीकर, निशिकांत कामत, सतरुपा सान्याल, निखिल अडवानी, हरी विश्वनाथ, रुची नारायण, सचिन चाटे या ज्युरींच्या त्यावर सह्या आहेत.
‘पण तरीही महोत्सवाचे संचालक आम्हाला धूप घालत नाहीयेत. मी त्यांना भेटायचा प्रयत्न करतोय आणि ते मला एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देताहेत. यात आपण न्यायालयाचाही अपमान करतो आहोत, याचीसुद्धा या लोकांना फिकीर नाही.’
एस. शशीधरनच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती. त्याचं म्हणणं होतं, ‘एक दिग्दर्शक म्हणून नाही, तर भारताचा नागरिक म्हणून मी माझ्या परीनं लढण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात गेलो. निर्णय माझ्या बाजूने लागला. मी आज, २८ तारखेला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली आणि आता काही होत नाहीये, असं लक्षात आल्यावर मी हा निषेध करतोय.
‘ही तर अघोषित आणीबाणीच आहे. तुमच्या विरोधात बोलणारे तुमचे शत्रू आहेत असं आज मानलं जाऊ लागलंय. या हिंदुत्ववाद्यांनी काही वाचलेलं नाही. आपल्या पुराणात देवींची वर्णन वाचून पहा, त्यांना कामरुपिणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सेक्सीच ना? त्यांना मुळात हिंदू धर्मच माहीत नाही. पण तरीही मी सेक्सी दुर्गा हे नाव बदलून एस. दुर्गा केलं.’
‘हा सिनेमा तुम्ही यु ट्युबवर का नाही टाकत?’
“ते मी करू शकतोच. केरळातही मी गावोगावी याचे शोज करू शकतो. पण मुद्दा तो नाहीये. इफ्फी किंवा इतर आंतरराष्ट्रीय महोत्सव किंवा राष्ट्रीय पुरस्कार ही व्यासपीठं कलात्मक सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी असतात. तिथं माझी कलाकृती दाखवली जावी ही माझी इच्छा असते. या व्यासपीठांवर माझ्या सिनेमाला स्थान मिळावं असं मला वाटत असतं. म्हणून मग अशा सेन्सॉरशिपच्या विरोधात उभं रहायला हवं असं वाटतं. पण इतकं सगळं करूनही असं घडणार असेल, माझा सिनेमा दाखवलाच जाणार नसेल, तर या सगळ्या लढाईचा काय उपयोग असा प्रश्नही मनात येतो. उद्या मी पुन्हा न्यायालयात गेलो तर एक वकील असल्यामुळे माझा किती वेळ यात खर्च होईल याची कल्पना मला आहे. मुळातला मी सिनेमा बनवणारा माणूस आहे. तेच मला करता आलं नाही तर काय उपयोग? शिवाय, ही मंडळी जर न्यायालयाचा निर्णयही मानत नसतील तर एक नागरिक म्हणून आपण आणखी काय करणार? म्हणून मग मी इथे निषेध व्यक्त करतोय.”
इफ्फीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एस. शशीधरननं वाट बघितली. आपला सिनेमा दाखवला जाईल अशी आशा बाळगली. आणि आता काहीच होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यानं हा निषेधाचा मार्ग स्वीकारला. पण ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून घ्यायचा निश्चयच केलाय त्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे का?
ताजा कलम
समारोपाचा समारंभ दरवर्षीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतल्या थोरामोठ्या कलावंतांच्या हजेरीत साजरा झाला. एस. शशीधरन यांना दुपारी कोणीतरी विचारलं होतं, ‘व्यावसायिक सिनेमावाले तुमच्या बाजूनं काही बोलले का?’ त्यावर तो म्हणाला, ‘व्यावसायिक सिनेमांना कॉर्पोरेटचा पैसा लागतो. कॉर्पोरेट्सना सत्तेच्या जवळ असावं लागतं. ते कसं माझ्या बाजूनं बोलतील?’ त्याच्या आवाजात खंत नव्हती. वस्तुस्थिती सांगत असल्यासारखा तो बोलला होता. समारोपाच्या समारंभातला झगमगाट पाहताना खरोखरच मुख्य प्रवाहातल्या या कलावंतांना एका लहान दिग्दर्शकावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवही नसावी का असा प्रश्न मनात येत होता.
या समारंभात अर्थातच स्पर्धेतल्या विजेत्यांची नावंही जाहीर झाली. सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी असलेला सुवर्णमयुर पुरस्कार दिग्दर्शक रॉबिन कम्पिलो यांच्या ‘120 बीट्स पर मिनिट’ या सिनेमाला मिळालाय. ४० लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून ही रक्कम दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यात वाटली जाते. याच सिनेमामध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या नेउनेएल पेरेज बिस्कायार्त याला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर, पार्वती थिरुवोतुकोट्टुवटा हिला ‘टेक ऑफ’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा रौप्य मयुर पुरस्कार ‘एन्जल्स वेअर व्हाईट’च्या दिग्दर्शिका व्हिवियान क्यु यांना देण्यात आला. दिग्दर्शक महेश नारायणन यांना ‘टेक ऑफ’ सिनेमासाठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. प्रथम दिग्दर्शनाचा रौप्य मयुर पुरस्कार किरो रुसो यांना ‘द डार्क स्कल’करता मिळाला, तर आयसीएफटी युनेस्को गांधी मेडल मिळालं ‘क्षितिज’ या दिग्दर्शक मनोज कदम यांच्या मराठी सिनेमाला देण्यात आलं.
.............................................................................................................................................
लेखिका मीना कर्णिक चित्रपट समीक्षक आहेत.
meenakarnik@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Anil Bhosale
Sun , 28 January 2018
न्यायालयाच्या निर्णयाचा पण इथं आदर केला जात नाही. @Baapu सारखे लोक फालतू प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांचा इथे काय सम्बंध ? अभीव्याक्ती स्वातंत्र्यावर अलीकडे खूप बंधने घातली जातात. सिनेमाच्या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या असतांना ही अशी मुस्काटदाबी केली जातीये.
????? ??????
Wed , 29 November 2017
मुळात मीना कर्णिक आणि स. शशीधरन यांना हे कळायला हवं की चलचित्र पर्यवेक्षण (=सेन्सॉरशिप) सुरुवातच कांग्रेसी राजवटीत म्हणजे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असलेल्या डाव्या राजवटीतच झालेली आहे म्हणून हिंदुत्ववाद्यांवर टिका चुकीची आहे त्यांनी फक्त त्या व्यवस्थेचा वापर केलाय
Milind Kolatkar
Wed , 29 November 2017
‘टेक ऑफ’ ला पुरस्कार मिळाल्याचं वाचून आनंद वाटला. याच संकेतस्थळावर त्याच परीक्षण वाचल्याचं आठवत. त्यानंतर मुद्दाम मिळवून पाहिला. भाषेची अडचण आली नाही. काही दृष्य समजून घ्यावी लागली, पण त्यातून मैत्र वाढले... मी आपल्या लेखनाचा चाहता आहे. साधना मध्येही येणारे आपले लेख वाचायला आवडतात. धन्यवाद. -मिलींद.
Gamma Pailvan
Wed , 29 November 2017
सेक्सी दुर्गा असं नाव ठेवण्यामागे शशीधरन यांचं नेमकं काय उद्दिष्ट आहे? आयेशा, फातिमा वा मेरी, माग्दालेना इत्यादि नावं ठेवून बघा काय होतं ते. -गामा पैलवान
Baapu G
Tue , 28 November 2017
आजकाल कुठेही काही झालं तरी त्याचे बिल हिंदूत्ववाद्यांवर फाडायचे व हिंदूधर्मावर टिका करायची एक फॅशनच आली आहे. तसेच हे करताना , मोदी सरकार अाल्यापासून कसा हे हिंदूत्ववादी लोक लोकशाहीचा गळा घोटत आहेत, सेक्यलरिजम पासून कसा देशाला दूर नेत आहेत वगैरे असे जुने-पुराणे रडगाणं पुन्हा पुन्हा एेकायला मिळते. हे असे आरोप करण्यात जसे टिंपाट , लल्लू दिगदर्शक, संगितकार, लेखक, कलाकार वगैरे मंडळी आहेत, तसेच काही बाटगे, कुडमुडे, बेकार पत्रकारपण आहेत. त्यांना खालील प्रश्न विचारावेसे वाटतात १) सॅटनिक वर्सेस वर जेव्हा बंदी घालण्यात आली तेव्हा लोकशाहीचा गळा घोटला गेला नव्हता का ? २) केरळमध्ये RSS च्या बरयाच हिंदू कार्यकर्त्यांची निघृण हत्या केली गेली. ते लोकशाहीला साजेसे आहे का ? ३) रोहित सरदाना या आजतकच्या पत्रकाराने काही कमेंटस केले म्हणून काही मुसलमानांनी बंगलोरमध्ये धिंगाणा घातला व त्याला मारण्याची धमकी दिली. हे लोकशाहीला साजेसे आहे का ? रोहीतला बोलण्याचा अधिकार नाही का ? या वरिलपैकी कोणत्याही घटनेचा (त्या जास्त गंभिर असूनसुद्धा) कुडमुड्या कलाकारांनी/पत्रकारांनी निषेध केला नाही. यातच त्यांचा दुट्टप्पीपणा दिसून येतो.