अजून दोन दिवस बाकी आहेत, त्यामुळे इतक्यात फैसला देणं योग्य होणार नाही
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मीना कर्णिक
  • International Film Festival of India\इफ्फी\IFFI
  • Mon , 27 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र इफ्फी IFFI International Film Festival of India एस. दुर्गा S Durga

चित्रपट महोत्सवाचा शेवट जवळ येऊ लागला की, बघितलेल्या सिनेमांची उजळणी सुरू होते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यश अर्थातच तिथं दाखवण्यात आलेल्या सिनेमांवर अवलंबून असतं. आणि ‘गेल्या वर्षी जास्त चांगले सिनेमे होते नाही?’ हे वाक्य हमखास कानावर पडतं. पण खरोखरच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूप काही हाती लागलेलं नाही. हा महोत्सव जरा थंडच होता, असं मत बऱ्याच जणांकडून ऐकायला येतंय. चित्रा पालेकरांच्या मते, ‘सिनेमे चांगले आहेत, पण त्यांचं प्रोग्रॅमिंग योग्य नाही, कारण अनेक चांगले सिनेमे रात्री दहानंतर आहेत आणि एकाच वेळी दोन-तीन चांगले सिनेमे असल्यामुळे निवड करणं कठीण जातंय.’

आतापर्यंत बघितलेल्या सिनेमांमध्ये मनाला भावला आहे तो प्रसिद्ध दिग्दर्शक ज्याँ लुक गोदारच्या जीवनावरचा ‘ल रिडाऊटेबल’ हा सिनेमा. गोदार हा गोदार बनल्यानंतरच्या काळात हा सिनेमा घडतो. आहे बायोपिकच पण म्हणून संपूर्ण आयुष्य हा सिनेमा आपल्याला दाखवत नाही. सिनेमाच्या जगातला महान दिग्दर्शक मानला गेलेला हा माणूस, कला ही सामाजिक बांधिलकी मानणारी हवी असं म्हणून कम्युनिझमच्या प्रेमात पडून सिनेमे बनवू लागला आणि एक प्रकारे त्याची शोकांतिका झाली हे मांडतो. यात त्याचा हट्टीपणा, त्याला वाटणारी असुरक्षितता, मत्सर या सगळ्या मानवी भावना आपल्याला दिसतात. आपल्या देशात बायोपिक करायचा म्हणजे त्या व्यक्तीला हिरो, किंवा सुपरहिरो करायची पद्धत आहे. जरा जरी नायकाची नकारात्मक बाजू मांडली तर ते आपल्याकडे फार पचत नाही. त्यातून तो नायक एखाद्या राजकीय पक्षाचा नेता असेल किंवा लोकांच्या श्रद्धास्थानी असेल तर नाहीच नाही. आपल्या दृष्टीनं तो देव बनून जातो. सुदैवानं पाश्चात्य सिनेमात असं घडतं नाही आणि म्हणून सिनेमातली व्यक्तिरेखा माणूस म्हणून आपल्यासमोर उभी राहते. तिच्या गुणदोषांसकट. दिग्दर्शक मिखेल हझनिव्हिसियसनं दिग्दर्शक गोदार बरोबरच एक माणूस गोदारसुद्धा समोर आणला आहे. या महोत्सवामधली ही सगळ्यात उत्तम फिल्म म्हणायला हवी.

वेगवेगळ्या देशांचे सिनेमे पाहताना तिथली संस्कृती आपण पाहत असतोच, पण त्याबरोबर त्या त्या देशातल्या दिग्दर्शकांना आज कोणते विषय महत्त्वाचे वाटताहेत हेही लक्षात येतं. उदाहरणार्थ, ‘मेरीओनेट’ या कोरियन सिनेमात शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये वाढलेला सेक्स, सोशल मीडियावर पोर्नचा चाललेला धुमाकूळ यावर दिग्दर्शक ली हानुक भर देतो. शाळेपासूनच आजकाल मुलामुलींमध्ये डेटिंग सुरू होतं. मग त्यातूनच शारीरिक संबंध येतात. काही वेळा त्याचं रूपांतर भयानक अनुभवात होतं. तेरा-चौदा वर्षांच्या मिनाला तिचा मित्र घरी नेतो, दारू पाजतो आणि मग आपल्या मित्रांना बोलावून घेतो. एकापाठोपाठ एक सगळे तिच्यावर बलात्कार करतात. त्याचं व्हिडिओ शूटिंग करतात आणि ते पॉर्न साईटवर अपलोडही होतं. त्यातून बक्कळ पैसे मिळवणं हा त्यांचा उद्देश असतो. नंतर नंतर हा सिनेमा एक व्यावसायिक थ्रिलर झाला, हे जरी खरं असलं तर त्यात मांडलेले प्रश्न विचार करायला लावणारे होते.

‘120 बिट्स पर मिनिट’ या फ्रेंच सिनेमात दिग्दर्शक रॉबिन कम्पिलो एड्स झालेल्या, एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असलेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या एका अॅक्टिव्हिस्ट गटाची गोष्ट सांगतो. त्यातल्या एड्स झालेल्या एका तरुण मुलाच्या माध्यमातून. चळवळ करणाऱ्या या मुला- मुलींची सुखदु:ख, मृत्यूची वाटणारी भीती, त्यातून आला दिवस साजरा करण्याची धडपड आणि सरकारशी तसंच एड्सवर औषध तयार करणाऱ्या कॉर्पोरेट औषध कंपन्यांशी होणारा त्यांचा झगडा अत्यंत परिणामकारपणे दाखवण्यात आलाय.

‘लव्हलेस’सारख्या रशियन सिनेमात आपापल्या सुखाचा शोध घ्यायला निघालेल्या जोडप्याची कहाणी आहे. घटस्फोट घ्यायचा आहे, पण मुलगा नकोय असं हे जोडपं. आपल्याकडे अजूनही मूल नकोसं वाटत नसलं तरी उच्च मध्यमवर्गीय शहरी जोडप्यांचा आपलं सुख सर्वोच्च मानण्याकडे प्रवास सुरू झालाय. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गाला मिळू लागलेलं भौतिक सुख आता त्यांना निसटू द्यायचं नाहीये. मग त्यासाठी पैसा हवा, त्याकरता कॉर्पोरेट्समध्ये नोकऱ्या हव्या आणि म्हणून जिवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिवसातले दहा-पंधरा तास काम करणं स्वीकारायला हवं. या सिनेमातला मुलगाच केवळ प्रेमाविना जगत नाहीये, तर ते आई-बापही तसेच जगताहेत. दिग्दर्शक आंद्रे झव्हॅगिनित्सेव या दिग्दर्शकानं यापूर्वी ‘लेव्हिआथन’सारखे अप्रतिम सिनेमे केलेले आहेत. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. त्याची स्वत:ची अशी एक गती आहे, प्रसंग संथ आहेत, पण प्रेक्षकांना बांधून ठेवणारी आहे.

‘एंजल्स वेअर व्हाईट’ हा चिनी सिनेमा एका छोट्याशा शहरातल्या मुलींच्या शोषणावर भाष्य करू पाहतो. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट आणि हाऊस किपिंगचं काम करणाऱ्या दोन तरुण मुली, शाळेत जाणाऱ्या दोन मैत्रिणी आणि त्या शाळेतल्या मुलींवर अतिप्रसंग झाल्यानंतर त्यांची केस लढणारी वकील बाई. म्हटलं तर या सगळ्यांची एक शोकांतिका आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळ्या पातळ्यांवर पुरुषप्रधान समाजाकडून होणारा अन्याय पहायला मिळतो. आणि तरीही हार न मानता आयुष्यात पुढे जाण्याची, स्वप्न बघणं न थांबवण्याची जिद्दही दिसते.

‘पॉमेग्रॅनेट ऑर्चर्ड’मध्ये आपण थेट अजरबैजानच्या गावात जातो. डोळे कमकुवत होऊ लागलेल्या, लाल रंग काळा दिसू लागलेल्या एका दहा बारा वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात डोकावताना त्याच्या आजूबाजूच्या जगाची ओळख होत जाते. त्याची आई, त्याचे आजोबा, मॉस्कोमध्ये कामासाठी गेलेले त्याचे वडील आणि त्याची डाळिंबाची बाग... ही बाग म्हणजे त्याचं जग आहे. रंग हरवत चाललेलं... दिग्दर्शक इल्गार नजफ यांनी खूप तरलपणे हा सिनेमा बनवलाय.

वेगवेगळ्या देशातल्या काही थोडक्या सिनेमांची ही झलक आहे. सगळे सिनेमे काही उच्च प्रतीचे नसतात, आणि तशी अपेक्षाही नसते. पण निदान चार-पाच अप्रतिम सिनेमे मिळावेत, सात-आठ चांगले सिनेमे बघावेत असं नक्कीच वाटत असतं. अजून तरी भारावून जावं असे दोनेक सिनेमे सापडलेत. छान वाटावेत असे चार-पाच आहेत. अर्थात अजून दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे इतक्यात फैसला देणं योग्य होणार नाही.

दरम्यान, ‘एस.दुर्गा’ला न्यायालयानं इफ्फीत प्रदर्शनासाठी मान्यता दिलेली असली तरी आयोजकांकडून वेळकाढूपणा होतोच आहे. आज (२७ नोव्हेंबर) रात्री ज्युरींसाठी पुन्हा एकदा या सिनेमाचा शो होणार आहे. पण मग प्रेक्षकांसाठी तो कधी लावणार? रात्री पावणेअकरा वाजता वगैरे फारशी जाहिरात न करता हा शो उरकून घेतील अशी चर्चा इथं चालू आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

शनिवार-रविवार हे दोन दिवस भरपूर गर्दीचे होते. प्रत्येक शो जवळपास हाऊसफुल जात होता, पण तरीही आयनॉक्सच्या किंवा कला अकादमीच्या आवारात म्हणावा तसा माहोल नाहीये. एक तर इथं गोवन जेवण नाही. गोव्यात येऊन पंजाबी कबाब खाण्यात कोणाला रस असणार? मग सिनेमा संपला की, अनेक जण मार्केटमध्ये जाऊन जेवतात, फार वेळ खर्च न करता. कारण पुन्हा पुढची फिल्म बघायला लाईनमध्ये उभं राहायचं असतं. इतकी वर्ष आयनॉक्सच्या प्रांगणात गोव्याच्या फिशकरी राईस आणि तळलेल्या माशांचे दोनेक स्टॉल्स असत. शिवाय आयनॉक्सला स्वस्त बीअर मिळायची. जेवता जेवता आणि बीअर पितापिता सिनेमावर चर्चा झडायच्या. या वर्षी बीअरच्या स्टॉलवर थेट १२० रुपये मोजावे लागताहेत. स्वाभाविकच तिथं गर्दी कमी दिसतेय. एकूणच महोत्सव आता शेवटाकडे आलाय, त्यामुळेही लोकांना घरी जायचे वेध लागले आहेतच!

.............................................................................................................................................

लेखिका मीना कर्णिक चित्रपट समीक्षक आहेत.

meenakarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......