अजूनकाही
‘Please Stand for the National Anthem’
कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आजवर कधीही न दिसलेला हा फलक या वर्षी इफीमध्ये प्रत्येक सिनेमाच्या आधी दिसू लागलाय. दिवसाला किमान तीन ते चार सिनेमे बघणाऱ्यांना तेवढ्या वेळा राष्ट्रगीतासाठी उभं रहावं लागतंय. आणि हे असं आठही दिवस चालणार आहे. त्यासाठी दर वर्षी वाजणारी सिग्नेचर ट्यून बाद करण्यात आलीये.
ही ट्यून फार बरी होती अशातला भाग नाही, पण त्याची जागा ‘जनगणमन’नं घेण्याची खरंच गरज होती का? दिवसातल्या प्रत्येक क्षणी आपण आपल्या देशभक्तीचं असं प्रदर्शन करत राहण्याची आवश्यकता होती का? आहे का? त्यातून नेमकं काय साध्य होणार आहे? इफ्फीला येणारे प्रेक्षक या आधी कमी देशभक्त होते आणि आता अचानक रोज चार वेळा राष्ट्रगीत ऐकल्यामुळे त्यांच्यातलं देशप्रेम उचंबळून येऊ लागलंय, असं काही महोत्सवाचं आयोजन करणाऱ्यांना वाटतंय का? जगातल्या कुठल्याही चित्रपट महोत्सवामध्ये हे घडत नाही. याचा अर्थ तिथले लोक आपल्या देशावर कमी प्रेम करतात का? मुळात देशप्रेम व्यक्त करायचं तर त्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य बजावणं अधिक महत्त्वाचं की, ही अशी दाखवेगिरी करणं? जागतिक सिनेमे पाहून आपल्या स्वत:च्या कक्षा रुंदावणं योग्य की, देशभक्तीच्या कोत्या व्याख्येत अडकून पडणं?
दुर्दैवानं या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीयेत. पण नियमितपणे इफ्फीला येणाऱ्यांमध्ये या निर्णयाची चेष्टा होतेय एवढं मात्र नक्की.
इफ्फीच्या आयोजनाविषयी दर वर्षी काही ना काही तक्रारी असतातच. आणि ते स्वाभाविकही असतं. एवढा मोठा महोत्सव आयोजित करायचा तर त्याला उपस्थित राहणाऱ्यांचं शंभर टक्के समाधान होऊच शकत नाही. पण तरीही या वर्षी काही गोष्टी ठळकपणे जाणवताहेत. सरकार म्हणून आपलं अस्तित्व अधोरेखित करण्याचा हावरटपणा या वातावरणात विसंगत वाटतोय. उदाहरणार्थ, महोत्सवाच्या मोराचे बदललेले रंग. महोत्सवामधल्या सिनेमांची माहिती देणाऱ्या कॅटलॉगवरच्या मोराच्या पिसाऱ्यात भगवा रंग आलाय. मोरपिशी रंगात भगवा कधी सामील झाला? म्हटलं तर हा बदल बारीकसाच आहे, पण म्हटलं तर जाणीवपूर्वक आपला अजेंडा रेटण्याचाही आहे.
रिकामे स्टॉल्स
तीच गोष्ट आयनॉक्सच्या आवारात असलेल्या स्टॉल्सच्या बाबतीत. इथला एक स्टॉल चक्क ‘मन की बात’चा आहे. जागतिक सिनेमा साजरा करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या उत्सवात पंतप्रधानांच्या ‘मन की बात’चा काय संबंध? इथं येणाऱ्या प्रेक्षकांना, तुम्ही ‘मन की बात’ ऐकता का? त्यात कोणत्या विषयांवर बोललं गेलं पाहिजे? अशासारखे प्रश्न का विचारले जावेत? हँडलूमच्या साड्यांचा आणि दागिन्यांचाही एक स्टॉल इथं आहे. कशासाठी? टॅरोट कार्ड रिडरचा बोर्डही इकडे दिसतोय. या स्टॉलचं प्रयोजन काय?
टॅरोट कार्ड रिडर स्टॉलचं प्रयोजन काय?
बरं, जे स्टॉल्स असायला हवेत ते बंद होताना दिसताहेत. काही वर्षांपूर्वी गोव्यातल्या गावांमधून बचत गट चालवणाऱ्या बायका आपला स्टॉल लावत असत. तिथं फिश करी-राईस, तळलेले मासे, आंबोळ्या, असे खास गोव्याचे आणि काही कोकणातले पदार्थ अगदी रास्त भावात मिळत. जगभरातून आणि भारतातल्या विविध भागांतून महोत्सवाला येणाऱ्यांसाठी ही एक मेजवानी असायची. गेल्या वर्षीपासून अचानक हे स्टॉल्स बंद झाले.
आयनॉक्सच्या आवारातच एका भल्या मोठ्या जागेत एकाच हॉटेलवाल्याचा स्टॉल लागू लागला. छोले भटुरे, आलु पराठा, बटर चिकन असे पंजाबी पदार्थ तिथं मिळू लागले. खूप महाग. या वर्षी त्याच जागी आणखी काही स्टॉलवाल्यांना जागा दिल्या आहेत. यात गोव्यातलेही काही आहेत. पण तीन-चार दिवस झाले नाहीत, तोच त्या मंडळींनी आपला गाशा गुंडाळलेला दिसला. म्हणजे, दोन सिनेमांच्या मध्ये वेळ कमी असला तर आता पंजाबी पदार्थ खाण्यावाचून लोकांसमोर पर्याय नाही. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची, घरातल्या बायकांना उत्पन्न मिळवून देण्याची ही संधी का वाया घालवली जातेय? ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्यानं म्हणे इतर कोणाचाही स्टॉल असता कामा नये अशी अटच घातली होती, असं गेल्या वर्षी आम्हाला सांगण्यात आलं होतं. या वर्षीही तेच घडलं असणार.
एनएफएआयच्या स्टॉलला भेट देताना नाटककार सतीश आळेकर आणि नाट-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर
मात्र, दर वर्षीप्रमाणे एनएफएआयनं कला अकादमीमध्ये आपला स्टॉल लावलाय. जुन्या सिनेमांची पोस्टर्स पाहताना आपण त्या काळात जातो. भारतीय सिनेमाची एक छोटीशी झलक त्यातून बघायला मिळते. महोत्सवाच्या वातावरणाचा तो स्टॉल एक भाग बनून गेलाय. तीच गोष्ट फिल्म्स डिव्हिजनच्या स्टॉलची. जुन्या जुन्या डॉक्युमेंटरीजच्या सीडीज इथं विकायला असतात. एनएफडीसीच्या काही सिनेमांच्या सीडीजही दिसतात. येणारे जाणारे तिथं डोकावतात. सीडीज हाताळतात. एखाद्या डॉक्युमेंटरीविषयी हिरीरीनं चर्चा होताना ऐकू येतात. विशेषत: सिनेमा शिकणारी मुलं तिथं घोटाळताना पाहिली की बरं वाटतं.
लॉरेन्स विल्सन आणि त्यांच्या स्टॉलवरील एक फलक
अशाच एका स्टॉलमध्ये माझी गाठ पडली लॉरेन्स विल्सन यांच्याशी. दक्षिण गोव्याच्या टोकाला असलेल्या काले-सांगे जवळ राहणारे. कॅमेरा ऑपरेटर म्हणून लॉरेन्स यांनी काम केलंय. चित्रीकरणासाठी वापरले जाणारे जुने जुने कॅमेरे, प्रोजेक्टर, स्लाईड प्रोजेक्टर त्यांच्या स्टॉलवर दिसत होते. आपण कधीतरी कॅमेरामन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एक कॅमेरा विकतही घेतला होता. पण पुण्या- मुंबईतल्या चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना आपला जम बसवता आला नाही. सुरुवातीला त्यांनी मिमिक्री केली, नाचगाणं केलं, सिनेमांमधून छोट्याछोट्या भूमिका केल्या. पण जे शिकायचं होतं ते शिकता आलं नाही.
आता गोव्यातल्या वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये ते आपला स्टॉल लावतात. त्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आर्थिक मदत जमवतात. स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येकाशी लॉरेन्स विल्सन मनापासून, भरभरून बोलतात. चित्रपटांवर आणि चित्रपटसृष्टीवर आपलं किती प्रेम आहे हे सांगतात. मोठमोठ्या दिग्गजांशी झालेल्या भेटींची आठवण काढतात. मात्र, आपली कदर झाली नाही याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर दिसत राहते.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287
.............................................................................................................................................
लेखिका मीना कर्णिक चित्रपट समीक्षक आहेत.
meenakarnik@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment