ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांतील ‘श्यामा’ नावाचं रंगीत स्वप्न
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
आफताब परभनवी
  • श्यामा
  • Sat , 18 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie श्यामा Shyama आफताब परभनवी Aftab Parbhanvi

श्यामाचं लक्षणीय म्हणावं असं गाजलेलं शेवटचं हिंदी गाणं होतं, ‘तेरी दुनिया से दूर, चले होके मजबूर, हमें याद रखना’. या गाण्यालाही आता ५५ वर्षं उलटून गेली आहेत. आता प्रत्यक्ष शारीर रूपानंही श्यामानं या जगाचा निरोप घेतला. (१४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी मुंबईत तिचं निधन झालं.)

श्यामाची कारकीर्द १९४५ च्या ‘झीनत’पासून सुरू झाली. देवआनंद-सुरैय्याच्या ‘शेर’ (१९४९)मध्ये श्यामा होती. ओ.पी.नय्यर अगदी नवखा होता, तेव्हाच्या ‘आसमान’ (१९५२) मध्येही ती होती. पण ती खरी प्रकाशात आली गुरुदत्तच्या ‘आरपार’ (१९५४)मध्ये. 

कारमध्ये रुसलेला देखणा गुरुदत्त आणि त्याला मनवणारा गीता दत्तचा अवखळ सूर ‘ये लो मैं हारी पिया, हुई तेरी जीत रे, काहे का झगडा बालम, नयी नयी प्रीत रे’ हे गाणं श्यामाचंच आहे. श्यामाचा चेहरा तसा साधाच. पण तिच्या साधेपणानंच तिला जास्त संधी मिळवून दिली. मजरूहचे अतिशय साधे शब्द. त्याला समर्पक असं ओ.पी.नय्यरचं संगीत. त्यामुळे ही गाणी चटकन ओठांवर रूळली. गुरुदत्तला त्याच्या चित्रपटातील संस्मरणीय गाण्याचं श्रेय गीतकार-गायक-संगीतकार यांच्या सोबत द्यावंच लागेल.

याच चित्रपटातील शमशादच्या आवाजातील गाजलेलं शीर्षकगीत, ‘कभी आर, कभी पार लागा तीर-ए-नजर’ हेही श्यामावरच आहे. गीता-रफीचं सदाबहार युगलगीत ‘सुन सुन सुन सुन जालिमा, प्यार हमको तुमसे हो गया’पण श्यामाचंच आहे. यातील तिचा वेगळा ड्रेस तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. नर्गिस पाठोपाठ ज्या नायिकेनं आधुनिक कपडे पडद्यावर बिनधास्त परिधान केले, त्यात श्यामाचा क्रमांक वरचा आहे. हे कपडे उत्तान नव्हते, तर पारंपरिक स्त्री प्रतिमेहून वेगळे होते. याच चित्रपटात अवखळ गाण्यांसोबतच गीतानं आर्त स्वरात ‘जा जा बेवफा, कैसा प्यार कैसी प्रीत रे’ आळवलं, तेव्हा तो सूर पडद्यावर साकार करणारी परत श्यामाच होती. तिला अभिनयात मर्यादा होत्या. पण तिनं त्या मर्यादेत राहून चांगल्या अभिनयाचं दर्शन घडवलं.

याच वर्षी हेमंत कुमारच्या संगीतानं नटलेला ‘शर्त’ (१९५४) हा श्यामाचा चित्रपटही गाजला. गीताच्याच आवाजातील ‘न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे’ हे लोकप्रिय गाणं यातलंच. या चित्रपटात श्यामासाठी लता-आशा-गीता तिघींचाही आवाज हेमंतकुमार यांनी वापरला आहे. लता-हेमंत यांच्या आवाजातील युगलगीत ‘देखो वो चांद चुपके करता है क्या इशारे’ अतिशय गोड आहे. 

या चित्रपटातील आशाच्या आवाजातील एक गोड आर्त सुरातील श्यमाचं गाणं दुर्लक्षित राहिलं. राजेंद्रकृष्ण-हेमंत कुमार ही गाजलेली गीतकार-संगीतकार अशी जोडी. ‘नागिन’सारखं लखलखीत यश त्यांच्या नावावर आहे. याच जोडीनं ‘शर्त’मध्ये ‘मेरे हमसफर तुझे क्या खबर, के चला किधर मेरा कारवाँ’ हे गाणं दिलं आहे. चित्रपटात काही गाणी घुसडलेली असतात. पण काही गाणी मात्र चित्रपटाचाच अविभाज्य घटक म्हणून येतात. त्याच्या आशयाला समृद्ध करतात. कथानक पुढे नेतात. हे गाणं याच पठडीतलं आहे. 

पुढे ‘खानदान’ (१९५५) मध्ये ए.आर.कुरेशी नावानं संगीत देणारे तबला उस्ताद अल्लारखां (उस्ताद झाकिर हुसेन यांचे वडील) यांनी आशा भोसलेच्या आवाजात ‘लाखों के बोल सहे’ ही ठुमरी वापरली आहे. ती श्यामावरच आहे. ही ठुमरी निर्मला देवी (अभिनेते गोविंदाची आई) यांनी अतिशय लोकप्रिय केली. 

श्यामाच्या १९५६मध्ये आलेल्या ‘भाई भाई’ चित्रपटाला मदन मोहन यांचं संगीत होतं. मदन मोहन यांची लाडकी गायिका म्हणजे लता मंगेशकर. पण या चित्रपटात गीता दत्तच्या वाट्याला एकच गाणं मदन मोहननं दिलं. आणि गीतानं त्याचं सोनं करून दाखवलं. बाकी सर्व गाण्यांपेक्षा गाजलेलं हे गाणं होतं ‘ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है, वो कौन है जो आकर, ख्वाबों पे छा गया है’. या गाण्यावरील आता काहीसं बालिश शाळकरी मुलीसारखं वाटणारं नृत्य हीच श्यामाची ओळख बनलं. पुढे काही गाजलेल्या गाण्यांवर श्यामानं असेच हातवारे करत नृत्य केलं आहे.

१९५७ ला श्यामाचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. पहिला होता चित्रगुप्तच्या संगीतातला ‘भाभी’. लता-रफीच्या आवाजातील ‘छुपाकर मेरी आंखो को’ किंवा लताच्या आवाजातील ‘जा रे जादुगर देखी तेरी जादुगरी’ ही गाणी तर अभिजातच होती. यातील ‘चल उड जा रे पंछी’ किंवा ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ या प्रचंड गाजलेल्या गाण्यांत श्यामा नव्हती. पण तिचं या गाण्यांइतकं लोकप्रिय ठरलेलं एक गाणं ‘भाभी’त आहे. ते आहे लताच्या आवाजातील ‘कारे कारे बादरा, जा रे जा रे बादरा, मोरे अटरिया पे शोर मचा’. चित्रपगुप्ताला इतकं यश परत कुठल्याच चित्रपटात मिळालं नाही.

१९५७ चा श्यामाचा बॉक्स ऑफिस हिट दुसरा चित्रपट होता राज कपूर-मीना कुमारी सोबतचा ‘शारदा’. याला संगीत होतं सी.रामचंद्र यांचं. लता-आशा यांची उत्कृष्ट अशी जी युगलगीतं आहेत. त्यात वरचा क्रमांक लागतो, तो ‘ओ चांद जहां वो जाये’ या गाण्याचा. साधा अंबाडा, कोपरापर्यंच्या बाह्या असलेलं ब्लाऊज, साडी, मोठं कुंकू, छोटंसं कानातलं अशी मीना कुमारी. तिच्यासाठी लताचा सुरेल आवाज; तर मोकळ्या केसांची, आधुनिक पंजाबी ड्रेस, मोठ मोठे झुमके असलेली, नखरेल डोळ्यांची श्यामा. तिच्यासाठी आशाचा खट्याळ आवाज. फार कमी गाणी अशी असतात की, त्यांचं सगळंच रसायन जुळून येतं. हे गाणं तसंच आहे. सी.रामचंद्र यांची ‘सिग्नेचर’ असलेला तबल्याचा स्वच्छ ठेका या गाण्यात स्पष्ट ऐकू येतो. याच चित्रपटात आशाच्याच आवाजात श्यामाचं अजून एक गाणं आहे, ‘लहराये जीया, बलखाये जीया, आयी है घडी शरमानेकी’. आशाच्या खट्याळ आवाजाला पडद्यावर श्यामानं त्याच खट्याळ अभिनयानं न्याय दिला आहे.   

१९५७ हे वर्षं श्यामासाठी नशीबच घेऊन आलं होतं. याच वर्षी जॉनी वॉकर सोबत तिचा ‘जॉनी वॉकर’ याच नावाचा चित्रपटही आला. याला संगीत ओ.पी.नय्यरचं होतं. यातील इतर मस्तीखोर गाण्यांसोबत गीता-आशा यांच्या युगल स्वरात एक अतिशय छान गाणं आहे. या गाण्याची वेगळी दखल घेतली गेली पाहिजे. दोन मैत्रिणी बागेत नाचत-बागडत आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत. आशा भोसलेचा आवाज यात श्यामासाठी वापरला आहे. एरव्ही गीतकाराबाबत हेळसांड करणाऱ्या ओ.पी.नं यात प्रतिभावंत हसरतची गीतं वापरली आहेत. हे गाणं आहे ‘ठंडी ठंडी हवा, पुछे उनका पता, लाज आये सखी, कैसे दू मैं बता’. एक साधा टॉप आणि खाली आजच्या भाषेतील तीन-चार अशी स्लॅक्स. अशा कपड्यातील नायिका तेव्हा पडद्यावर दिसायच्या नाहीत. बार डान्सर किंवा दुय्यम नायिका यांच्यासाठी हे कपडे असायचे. नर्गिस-श्यामा यांनी हा भेद कमी केला. 

१९५९ ला शंकर जयकिशनच्या संगीतातील ‘छोटी बेहन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यातील नंदाचं लोकप्रिय गाणं ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ किंवा मेहमूदचं गाजलेलं सुबीर सेनच्या आवाजातील ‘मैं रंगीला प्यार का राही’ किंवा रेहमानचं मुकेशच्या दर्दभऱ्या आवाजातील ‘जाऊ कहां बता ए दिल’ ही गाणी रसिकांच्या चांगलीच लक्षात आहेत. पण यातच मन्ना डे-आशाच्या आवाजात एक गोड युगल गीत आहे. हे गाणं ‘बिनाका गीतमाला’मध्ये टॉपला होतं. रेहमान-श्यामावरच्या या गाण्याचे बोल लिहिले होते हसरत यांनी. हे गाणं होतं, ‘ओ कली अनार की ना इतना सताओ, प्यार करने की कोई रीत बताओ’. मन्ना दाचा आवाज या गाण्यात जो लागला आहे, तो पाहून एक शंका येत राहते की, पुढे किशोरकुमारनं जी शैली उचलली, ती अशाच गाण्यांतून तर नव्हे? 

१९६० ला हेमंतकुमारच्या संगीतातील ‘दुनिया झुकती है’मधील ‘गुमसुम सा ये जहां’ (हेमंत-गीता) आणि रवीच्या संगीतातील ‘अपना घर’मधील ‘तुमसे ही मेरी जिंदगी’ (मुकेश-गीता) ही श्यामाची गाणी चांगलीच होती. पण श्यामाचा या वर्षीचा गाजलेला चित्रपट होता रोशनच्या संगीताची बरसात असलेला ‘बरसात की रात’. 

संगीतकार रोशन, गीतकार साहीर,  गायक रफी, अप्रतिम सौंदर्यवती मधुबाला आणि टीका करण्यासाठी का होईना ठोकळा भरत भूषण यांची चर्चा ‘जिंदगी भर नहीं भुलेगी’ या गाण्यासाठी होत राहते. पण इतर  गाण्यांची नाही. याच चित्रपटातील गाजलेली कव्वाली ‘ना तो कारवां की तलाश है’ ही हिंदी चित्रपटांतील उत्कृष्ट कव्वालींपैकी एक. यातील सहभागी इतर कलाकार आणि गायकांचे आवाज यात श्यामासाठी आशा भोसलेचा आवाज आहे, हे लक्षात राहत नाही. हीच नाही तर यातील इतर कव्वाल्यांमध्येही श्यामा आहे. तिनं या कव्वाल्या आपल्या नखरेल अदांनी जिवंत साकारल्या आहेत. ‘मुगल-ए-आझम’मध्ये निगार सुलतानानं जसे कव्वालीत रंग भरले, तशी श्यामाची करामत आहे. या शिवाय लताचं एक अतिशय गोड गाणं याच ‘बरसात की रात’मध्ये श्यामाच्या वाट्याला आलं आहे. साहिरचं हे गाणं आहे, ‘मुझे मिल गया बहाना तेरे दीद का, कैसे खुशी लेके आया चांद ईद का’. 

‘भाभी’ च्या यशानंतर चित्रपटाला नाही, पण संगीताला बऱ्यापैकी यश लाभलेला चित्रगुप्ताचा चित्रपट म्हणजे ‘जबक’ (१९६१). श्यामासोबत महिपाल यात नायक होता. हा पोशाखी बी. ग्रेडचा चित्रपट. पण यातील एक गाणं ‘बिनाका गीतमाला’मध्ये गाजलं. ते होतं लता-रफीच्या आवाजातील -

तेरी दुनिया से दूर 

चले होके मजबूर 

हमे याद रखना 

जावो कही भी सनम

तूम्ही इतनी कसम

हमे याद रखना

नंतर पुढे श्यामाचे चित्रपट येत गेले, पण त्यात तिच्या भूमिका दुय्यम होत्या. शिवाय गाणीही लक्षात राहावी अशी नव्हती. पुढे चित्रपट रंगीत झाला (जबकही रंगीत होता), नवीन तरुण नायिका आल्या आणि जुन्यांची सद्दी संपली. 

गुरुदत्तच्या ‘आरपार’मधून श्यामा आणि शकिला दोघीही साधारणत: एकदाच प्रकाशात आल्या. काय विलक्षण योगायोग! दोघीनींही या जगाचा निरोपही सोबतच घेतला. सप्टेंबरमध्ये शकिलाचं निधन झालं आणि आता नोव्हेंबरमध्ये श्यामानं या जगाला अलविदा केलं.  

.............................................................................................................................................

लेखक आफताब परभनवी हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

ADITYA KORDE

Sun , 19 November 2017

भारी लेख .... ‘ये लो मै हारी पिया’... म्हणताना फक्त गाडीत बसून तिने चेहऱ्यावर जे जे विविध भाव दाखवले आहेत ते पाहून गाणं ऐकायचं विसरायला होतं. या गाण्यात एक प्रसंग आहे. श्यामा ‘लडते हि लडते मौसम, जाये नाही बित रे...’ म्हणत असताना, गुरुदत्त गाडी चालवत असतो अचानक कोणीतरी गाडी समोर येत म्हणून गुरुदत्त पटकन पुढे स्टेअरिंग कडे सरकतो आणि परत मागे सीट कडे येतो तो जसा मागे पुढे सरकतो त्या लयीत श्यामा सुद्धा पुढे मागे सरकते आणि नुसती सरकत नाही तर अगदी तरंगत गेल्यासारखी वाटते. ती त्याच्या चेहऱ्यावरची स्वतःची नजर जरासुद्धा हलवत नाही . मी कितीही वेळा हा प्रसंग पहिला तरी मनाचं समाधान होत नाही. मिडीयाने तिच्या जाण्याची फारशी दाखल घेतली नाही. जाउदे तुम्ही घेतली , बर वाटलं...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख