फा.फे.पासून फ्रँचाईज सिनेमा-पर्व सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
पवन नंदकिशोर गंगावणे
  • ‘फास्टर फेणे’ची पोस्टर्स
  • Sat , 04 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie फास्टर फेणे Faster Fene

बोटावर मोजण्याइतकी उदाहरणं वगळता हे वर्ष मराठी सिनेमांसाठी यथातथाच राहिलं. 'सैराट'नंतर खरं तर ही मरगळ सुरू झाली होती. ‘सैराट’नं मिळवलेल्या प्रचंड यशानंतर तिकीट खिडकीवर इतर कुठलाही सिनेमा फारसा कमाल करू शकला नाही. सिक्वेल आणि फ्रँचाईज सिनेमा हा हॉलिवुडमध्ये खूप प्रसिद्ध प्रकार आहे. हिंदीतही गेल्या दशकात या प्रकाराचा शिरकाव झालाय. मराठी सिनेमांनीही सिक्वेल्समध्ये नशिब आजमावून पाहिलंय. 'मुंबई-पुणे-मुंबई'चा तिसरा भाग लवकरच येत असून त्यातून एका जोडप्याची प्रेमकहाणी टप्प्याटप्प्यानं सांगितली जात आहे. रवी जाधव यांनीही त्यांचा 'टाईमपास' हा सिनेमा दोन वयोगटांत विभागून त्याचे दोन भाग केले होते. 'झपाटलेला २' आणि 'अगं बाई अरेच्चा २' च्या स्वरूपात काही अनावश्यक सिक्वेलसुद्धा येऊन गेले. कारण हे सिनेमे एक तर एकच कथा दोन भागांत सांगणारे होते किंवा नुसतेच पहिल्या प्रसिद्ध असलेल्या सिनेमाचं नाव वापरून पैसे कमवू पाहणारे होते.

त्यामुळे खऱ्या अर्थानं फ्रँचाईज सिनेमाचं पर्व सुरू करण्याच्या क्षमता असलेला सिनेमा अजून मराठीत झालेला नाही. एक असं पात्र जे प्रेक्षकांना पुनःपुन्हा सिनेमागृहात खेचून आणेल, ज्याचे वेगवेगळे किस्से-कारनामे पाहण्यात प्रेक्षक रममाण होतील, हे अजून मराठी सिनेमात झालेलं नाही. पण आता ही बॉक्स-ऑफिसची मरगळ दूर करण्यासाठी आणि प्रेक्षकांना एक खरंखुरं जिव्हाळ्याचं पात्र देण्यासाठी नवसंजीवनी बनून ‘तो’ आलाय, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि तो आलाय प्रचंड गती घेऊन....ट्टॉक्!

भा.रा. भागवतांच्या सुप्रसिद्ध पात्राला घेऊन रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीनं नवीन पिढीसाठी नव्या रूपात ‘फास्टर फेणे’ आणला आहे. तब्बल २० पुस्तकं नावावर असलेला आणि एक अख्खी पिढी गाजवलेला फा.फे. मोठ्या पडद्यावर वयानंही मोठा होऊन आलाय. त्याची कथा आजच्या काळात दाखवली असल्यानं तो सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत होऊन आलाय.

रोमांच आणि साहसाची ओढ असलेला बनेश फेणे एक परीक्षा देण्यासाठी भागवतांच्या घरी पुण्यात येतो, पण एका केसमध्ये तो असा गुरफटतो की, ती त्याच्या कारकिर्दीची 'पहिली परीक्षा' ठरते. या प्रवासात त्याला एक मोठा शत्रू, तर अनेक मित्रही भेटतात. क्षितिज पटवर्धनांनी लिहिलेली ही फा.फे.ची कथा भागवतांच्या पुस्तकातून घेतलेली नसून पूर्णपणे स्वतंत्र आहे.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

मुख्य पात्र वर्धिष्णू झालेलं असलं तरी फा.फे. त्याची मुळं विसरलेला नाहीये. तो या सिनेमातही केस उलगडताना करताना त्याच्या मित्रांची मदत घेतो, नेहमीची धावपळ करतो, 'य' म्हणतो आणि ‘ट्टॉक्’ही करतो. सिनेमात अगदी सहजपणे येणारे फुरसुंगी आणि प्रतापगढचे संदर्भ चेहऱ्यावर स्मितहास्य आणतात.

सिनेमा अशा बारीकसारीक तपशिलांनी भरलेला आहे. या फा.फे.चा एक रहस्यकथा बनण्यापेक्षा एक साहसकथा बनण्यावर जास्त भर आहे. हा सिनेमा एक रहस्यकथा म्हणून सादर केला गेला  असता, तर त्यातला अॅडव्हेंचर अॅस्पेक्ट दबला गेला असता. जो साहसी फास्टर फेणे वाचकांनी पुस्तकांतून वाचलाय, तोच प्रेक्षकांना देता यावा, याची पटकथालेखकानं पुरेपूर काळजी घेतली आहे. म्हणूनच यातल्या रहस्याचा विस्तार जरी मोठा असला तरी तो एकदम गूढ न बनवता फा.फे.च्या वयाला, त्याच्या बुद्धिमत्तेला शोभेल अशाच प्रकारे कथा विनण्यात आलीये.

फा.फे. शरीरानं जरी दुबळा असला तरी तो त्याच्या बौद्धिक चातुर्यानं गुंडांना लोळवतो, हे स्मार्ट लिखाण फा.फे.ला विशेष तर बनवतंच, पण कुठलेही साईड ट्रॅक म्हणजे उगाचच येणारे कॉमिकल ब्रेक, गाणी, प्रेमाचं वळण, काहीतरी इमोशनल ड्रामा असं काही यात होत नाही. कदाचित पटकथा आणि संवादही क्षितिज पटवर्धन यांनीच लिहिलेले असल्यानं सिनेमा भरकटत नाही.

गिरीश कुलकर्णींच्या जाड आवाजाचा आणि त्यांच्या फोर्सफुल संवादफेकीचा खलनायकी स्वरूपातही वापर केला जाऊ शकतो, हा विचार आजवर इतर कुणी केला नसावा. पण नेहमी प्रेमळ वाटणाऱ्या या चेहऱ्यावर कुलकर्णींनी अशा काही भावछटा रंगवल्या आहेत की, या आप्पापेक्षा दुष्ट माणूस जगात दुसरा नाही असं वाटतं. पण हा आप्पा नुसताच क्रूर नाहीये, तो धूर्तसुद्धा आहे आणि ही गोष्ट त्याला खूप खतरनाक बनवते. छोटीमोठी कारस्थानं करत राजकारण खेळून, ब्लॅकमेलिंग करून एक-एक पायरी चढत वर आलेला आप्पा पाहताना जाणवतं की, असे अनेक आप्पा समाजात आपल्या अवतीभोवती वावरत असतात. त्या सर्वांचा आप्पा प्रतिनिधी आहे. विचित्र हास्य असो वा धूर्तपणा गिरीश कुलकर्णींनी तो प्रभावीपणे केलाय की, तो बऱ्याचदा फा.फे.लाही वरचढ ठरतो. मराठीतल्या सर्वोत्तम व्हिलनमध्ये आप्पाचाही समावेश व्हायला हरकत नाही. कुलकर्णींनी हा सिनेमा गाजवलाय, यात कुठलीही अतिशयोक्ती नाही.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

.............................................................................................................................................

टीव्ही सिरियल्स असो, सिनेमांतल्या छोट्या-छोट्या भूमिका, नाटकं किंवा वेब सिरीजमधील काम, अमेय वाघनं आपलं वेगळेपण दाखवून दिलं होतं. पुरुषोत्तम करंडक स्पर्धांमधून पुढे आलेल्या तरुण कलाकारानं मागील काही वर्षांत जीव तोडून मेहनत केलीये. आता त्याला आधी 'मुरांबा' आणि आता 'फास्टर फेणे'च्या स्वरूपात त्याची फळं भेटत आहेत. अमेयनं हे सिद्ध करून दाखवलंय की, सातत्यानं मेहनत करत राहिलं तर यश तुमच्यापर्यंत येतंच. आज स्टार बनलेला आणि उद्या सुपरस्टार बनण्याची क्षमता असलेला अमेय वाघ अनेक तरुणांसाठी आज प्रेरणास्थान  बनला आहे.

फा.फे.सारखं आयकॉनिक पात्र करण्यासाठी त्यानं चांगलीच मेहनत घेतलीये. बहुतेक सगळे स्टंट त्यानं स्वतःच केलेत आणि बरीच धावपळसुद्धा केलीये. बनेश फेणेच्या पात्रात त्याचा वावर खूपच सहज वाटतो. गिरीश कुलकर्णींसारख्या ताकदीच्या नटासमोरही अमेय कमी पडता नाही. उलट आप्पा आणि फा.फे.ची जुगलबंदी खास आहे.

सहाय्यक कलाकारांच्या भूमिकेत ‘रईस’मधला शुभम मोरे अगदीच नैसर्गिक वाटलाय आणि 'भुभु'च्या भूमिकेत त्यानं जी निरागसता आणलीये, त्याने हे पात्र चांगलं खुलून आलंय. सिद्धार्थ जाधवचा 'अंबादास' लक्षात राहणारा आहे. पर्ण पेठे, श्रीकांत यादव यांनी आपापल्या भूमिकेत चांगलं काम केलंय.

या व्यतिरिक्त सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर संदीप पाटील यांनीही कॅमेओ केलाय. (त्यासाठी फा.फे. दुसऱ्यांदा पाहावा लागेल.) भा.रा. भागवतांच्या रूपात दिलीप प्रभावळकरांना घेऊन फा.फे. हे पात्र नेमकं अस्तित्वात कसं आलं हे दाखवून पटवर्धन यांनी कमालीची प्रगल्भता दाखवलीये.

ड्रोनने केलेली सिनेमॅटोग्राफी, काही स्लो-मोशन शॉट्स फा.फे.ची प्रॉडक्शन व्हॅल्यू वाढवतात. मनोहर वर्माची साहसदृश्यं चांगली आहेत. फा.फे. हिंदी सिनेमांपेक्षा कुठे कमी आहे असं वाटत नाही. उलट फा.फे.चा भारदस्तपणा जागोजागी दिसून येतो. सिनेमाचं पार्श्वसंगीत सुंदर आहे, ते सगळ्यांनाच खूप आवडतंय आणि ते लवकरच युट्युबवर अपलोड होणार आहे, ही आनंदाची बाब आहे.

या सिनेमात एक छोटीशी कमतरता ही आहे की, तिसऱ्या प्रसंगाकडे वळताना त्याची गती थोडीशी मंदावते, पण तिचा एकंदरीत सिनेमावर फारसा परिणाम होत नाही हे नक्की. आदित्य सरपोतदारांनी चांगलं दिग्दर्शन केलं असून त्यांनी इतरांकडूनही चांगलं काम करून घेतलंय. त्यांनी मराठी प्रेक्षकांना एक असं साहसी पात्र दिलंय, ज्याचे पुढचे भाग प्रेक्षकांची प्रचंड मागणी येऊन बनवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फास्टर फेणेपासून मराठीत फ्रँचाईज सिनेमांचं पर्व सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं झालं तर ती मोठीच उपलब्धी असेल.

.............................................................................................................................................

लेखक पवन नंदकिशोर गंगावणे जिल्हा परिषद, बुलडाणा इथं इंजिनीयर म्हणून कार्यरत आहेत.

g.pavan018@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Nandkishor Gangawane

Sat , 04 November 2017

जबरदस्त चित्रपट समीक्षण आहे. एक एक पैलु अतिशय सुंदर शैलीत मांडले आहे. मी तर चित्रपट पहिला आहेच पन माझ्या सर्व मित्रांना है समीक्षण पाठवीणार आहे जेणेकरून त्यांनी हा सिनेमा मिस करू नये.


Nandkishor Gangawane

Sat , 04 November 2017

जबरदस्त चित्रपट समीक्षण आहे. एक एक पैलु अतिशय सुंदर शैलीत मांडले आहे. मी तर चित्रपट पहिला आहेच पन माझ्या सर्व मित्रांना है समीक्षण पाठवीणार आहे जेणेकरून त्यांनी हा सिनेमा मिस करू नये.


Nandkishor Gangawane

Sat , 04 November 2017

जबरदस्त चित्रपट समीक्षण आहे. एक एक पैलु अतिशय सुंदर शैलीत मांडले आहे. मी तर चित्रपट पहिला आहेच पन माझ्या सर्व मित्रांना है समीक्षण पाठवीणार आहे जेणेकरून त्यांनी हा सिनेमा मिस करू नये.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख