अजूनकाही
ज्येष्ठ बालसाहित्यिक (कै.) भा. रा. भागवत यांचा मानसपुत्र म्हणून ओळखला जाणारा 'फास्टर फेणे' एकेकाळी रसिक वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. आपल्या अनेक साहसी उपक्रमांमुळे कौतुकास्पद बनलेल्या 'फास्टर फेणे'नं घराघरांत स्थान मिळवलं होतं. सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा हा लोकप्रिय 'फास्टर फेणे' सध्याच्या काळात रुपेरी पडद्यावर आणणं तसं खूप अवघड होतं. मात्र दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि या 'फास्टर फेणे'ला 'मास्टर ब्लास्टर फेणे' करण्यात चांगलं यश मिळवलं आहे. अर्थात भा. रा. भागवत यांचा 'फास्टर फेणे' हा किशोरवयीन होता. त्यामुळे तो मुलांमध्ये विशेष प्रिय होता. मात्र त्याला रुपेरी पडद्यावर आणताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी त्याला साहजिकच वयानं मोठं केलं आहे.
शिवाय त्याचे वेगवेगळे साहसी कारनामे दाखवण्याऐवजी त्याच्याकडून एका गंभीर विषयाचं रहस्य 'फास्टर' पद्धतीनं उलगडून दाखवलं आहे. त्यामध्ये पटकथा आणि संवाद लेखक क्षितिज पटवर्धन यांचाही वाटा तेवढाच महत्त्वाचा मानावा लागेल. मुख्य म्हणजे पडद्यावर भा. रा. भागवत यांची व्यक्तिरेखा दाखवून त्यांच्याच साक्षीनं त्यांच्या मानसपुत्राची (‘फास्टर फेणे’) कथा साकारण्याची कल्पना अतिशय छान पद्धतीनं आकाराला आली आहे.
आपल्या आईबरोबर बनेश्वरला (फुरसंगी नव्हे) राहणारा बन्या फेणे हा वैद्यकीय प्रवेश चाचणी परीक्षा देण्यासाठी म्हणून पुण्यात भागवत आजोबांकडे राहायला येतो. आणि आपल्या पहिल्याच भेटीत भागवत आजोबांच्या घरी झालेल्या किरकोळ चोरीचा एखाद्या व्यावसायिक डिटेक्टिव्हप्रमाणे तातडीनं तपास करून त्यांच्यावर इम्प्रेशन पाडतो. वैद्यकीय प्रवेश चाचणी परीक्षा द्यायला निघालेल्या बन्याची, परीक्षा केंद्रावर धनेश लांजेकर या गरीब परंतु हुशार विद्यार्थ्यांशी ओळख होते. परंतु पेपर देऊन बाहेर पडताच त्याला या धनेश लांजेकरनं एकाएकी आत्महत्या केल्याची खबर मिळते. त्यावर त्याचा विश्वास बसत नाही म्हणून बन्या, लांजेकरच्या आत्महत्येच्या घटनेची अधिक चौकशी करायला जातो, तेव्हा त्यामागची अनेक रहस्यं उघडकीस येतात आणि या परीक्षेमागे फार मोठं 'रॅकेट' आहे, हे त्याला कळून चुकतं. या 'रॅकेट' मागे असलेल्या 'अप्पा'च्या टोळीचा तो कसा पर्दाफाश करतो, त्याची वेगवान कहाणी 'फास्टर फेणे'च्या रूपानं पडद्यावर पाहायला मिळते.
बन्या उर्फ 'फाफे'ला गुप्तहेरासारखा तपास करण्याची आवड आहे आणि मनात आणलं तर तो ते काम लगेच करू शकतो, हे सुरुवातीच्या काही घटनांपासून प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यास लेखक-दिग्दर्शकाला चांगलं यश मिळालं आहे.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
अर्थात चित्रपटातील खुनाचं रहस्य फार गूढ पद्धतीनं सादर करण्यात आलेलं नाही. ते अतिशय सरळ मात्र वेगवान पद्धतीनं सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे कथा अधिक उत्कंठावर्धक होण्यास मदत झाली आहे. पहिल्या चोरीच्या तपासाच्या वेळी बन्याला भेटलेला 'भू-भू' नावाचा छोटासा मित्र, अवचित भेटलेली बालमैत्रीण अबोली, जी त्याला रहस्य उलगडण्याच्या कामात नंतर सतत मदत करते. अंबादास रिक्षावाला आदी पात्रं कथेच्या दृष्टीनं आवश्यक ठरली आहेत. 'फास्टर फेणे'ची संपूर्ण कथा पुण्यात घडते. त्यानिमित्त घडवण्यात आलेलं 'पुणे दर्शन' खूपच छान आहे. फक्त एका ठिकाणी तुळजापूरच्या मेडिकल कॉलेजचा संदर्भ आहे, मात्र तेथील मेडिकल कॉलेज पुण्याइतकंच जुनं कसं असू शकेल याचा विचार केलेला दिसत नाही. तेवढी एक त्रुटी या चित्रपटात ठळकपणे जाणवते.
वयानं फार मोठा आणि फार लहानही न वाटणारा अमेय वाघ यानं 'फास्टर फेणे'च्या भूमिकेत उत्तम कामगिरी केली आहे. या भूमिकेसाठी त्याची केलेली निवड अतिशय योग्य होती हे त्यानं सिद्ध करून दाखवलं आहे. 'अप्पा'च्या खलनायकी ढंगाच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णी यांनीही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांची देहबोली, कुत्सितपणे हसण्याची पद्धत आणि संवादफेक, यामुळे त्यांचा 'अप्पा' चांगला लक्षात राहतो. अभिनेते दिलीप प्रभावळकर हेही भा. रा. भागवत यांच्या भूमिकेत शोभून दिसले आहेत. शुभम मोरे (भू-भू), सिद्धार्थ जाधव (अंबादास रिक्षावाला), अबोली (पर्ण पेठे) आदींच्याही भूमिका चांगल्या झाल्या आहेत. अबोलीची भूमिका कथेच्या दृष्टीनं महत्त्वाची वाटते, मात्र त्यादृष्टीनं ती अधिक विकसित करण्याची गरज होती.
या चित्रपटात एकही गाणं नाही मात्र पार्श्वसंगीत रहस्यपटाला साजेसं आहे. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट अतिशय उत्तम ठरला आहे. त्यामध्ये मिलिंद जोग यांच्या छायाचित्रणाचा मोलाचा वाटा आहे असं म्हणावं लागेल.
एकंदरीत, 'फास्टर फेणे' हा चित्रपट सर्वच दृष्टीनं 'मास्टर ब्लास्टर' ठरला असून, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्धीत नव्यानं भर पडली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment