‘सिक्रेट सुपरस्टार’ : एका सांगितीक स्वप्नपूर्तीची अनुभूती 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘सिक्रेट सुपरस्टार’मधील काही दृश्यं
  • Sat , 28 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie सिक्रेट सुपरस्टार Secret Superstar

'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट कुठलीही जहाल स्त्रीवादी भूमिका घेत नाही. शिवाय कुठलाही मोठा बदल घडवत असल्याचा आव न आणता, समाजानं पांघरलेला दांभिकतेचा बुरखा संयत आणि समंजसपणे फाडतो. 

इन्सिया (झायरा वासीम) ही एक पौगंडावस्थेतली, बडोद्यात राहणारी मुलगी आहे. गायिका होणं, हे तिचं स्वप्न आहे, पण वडलांच्या धाकामुळे आणि त्यांच्या डॉमिनेटिंग स्वभावामुळे तिचं हे स्वप्न अर्धं राहण्याची शक्यता आहे, पण तिची समजूतदार आई नजमा (मेहेर वीज), तिला हे स्वप्न पूर्ण करून भरारी घेण्याचं फक्त बळच देत नाहीये, तर तिच्या या स्वप्नं पाहण्याच्या वृत्तीत स्वतःचंच एक रूप पाहते आहे. स्वतःला मारहाण करणाऱ्या पतीपासून लपवून नजमा आपल्या मुलीचं स्वप्न जपते आहे. तिच्यासाठी शक्य असेल-नसेल ते करते आहे. 

पण तिच्या या स्वप्नांआड तिचे वडील (राज अर्जुन) येत आहेत. आणि ज्याचे संदर्भ आपण अगदी सुरुवातीपासून ऐकत असतो, तो शक्ती कुमार इथेच येतो. या शक्ती कुमारच्या (आमीर खान) रूपानेही कथेत एक तिसरा कंगोरा निर्माण होतो. कारण एके काळचा हिट संगीतकार असलेल्या शक्ती कुमारवर आता फ्लॉप आणि चारित्र्यहीनतेचा शिक्का बसलाय. त्यामुळे त्याच्या करिअरवर नाही म्हटलं तरी एक टांगती तलवार आहे. मग त्याचा स्वतःमधल्या हरवलेल्या चार्मचा शोध, इन्सिया करत असलेला स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग आणि तिच्या आईचं इन्सियामध्ये स्वतःला शोधणं अशा तीन पातळ्यांवर हा चित्रपट चालतो, पण या तीनही कथा कुठेच ठिगळ लावून एकत्र केल्यासारखं वाटत नाहीत, हेच या चित्रपटाचं खरं यश म्हणता येईल. 

शिवाय चित्रपट फक्त एका मुलीची स्वप्नं यांपुरता मर्यादित न राहता स्त्रियांचं आजही केलं जाणारं शोषण आणि त्यांच्यावरची बंधनं यावर भाष्य करतो, आणि असं करतानाही तो या मुद्द्याचा किंवा यापुढे तत्त्वांचा कुठेच भडिमार करत नाही. उलट कथेच्या ओघात आणि रूपकांचा वापर करून  भाष्य करण्यात येतं. 

म्हणजे इन्सिया मुंबईहून बडोद्याला येत असताना त्या फ्लाइटचं नाव 'आझाद एअर' असणं आणि त्याचं सिम्बॉल ओरिगामी कलेतले पक्षी असणं, हा फक्त योगायोग नसून रूपकांचा एक उत्तम वापर आहे. 

विशेष म्हणजे, दिग्दर्शक 'अद्वैत चंदन'चा हा पहिलाच चित्रपट आहे. यातली कथानकाची उत्तम हाताळणी, भावनिक आवाहनासोबतच विनोदी दृश्यं इत्यादी गोष्टींचा ताळमेळ यातून त्याचं दिग्दर्शकीय कौशल्य दिसून येतं. 

संगीत हा एक महत्त्वाचा भाग असलेल्या चित्रपटांमध्ये बऱ्याचदा नेमकं याच भागाकडे दुर्लक्ष होतं, पण इथे मात्र तसं होत नाही. अमित त्रिवेदीचं संगीत, पार्श्वसंगीत सुमधुर आहे. ते कुठेच कथानकात अडथळा निर्माण करत नाही. गाणी एक अल्बम म्हणून फार उत्कृष्ट नसली, तरी कथानकात ती ज्या तऱ्हेनं ब्लेंड होतात, ते महत्त्वाचं ठरतं. ‘मेरी प्यारी अम्मी’ आणि ‘मैं चाँद हूँ’ ही दोन गाणी तर विशेष उल्लेख करावीशी आहेत. 

गाण्यांचं चित्रण, मिक्सिंग उत्तमच. शिवाय चित्रणाबाबत विशेष आवडून जातं ते गाणं म्हणजे 'नचदी फिरा'. याचं चित्रण खरोखर अप्रतिम झालंय. म्हणजे राउंड ट्रॉली वापरून, गाण्यातल्या चढ-उतारानुसार बदलणारा कॅमेरा अँगल वगैरे मस्त आहे. थोडक्यात, कॅमेरा वर्क तर उत्तम आहे. 

याशिवाय महत्त्वाचं म्हणजे, यातली पात्रं लिखाणात छानपैकी उतरली आहेत आणि ती तितक्याच सहजतेनं पडद्यावर साकारली गेली आहेत. अल्लड, खट्याळ, नव्यानेच प्रेमात पडलेली, आईवर प्रेम करणारी इन्सिया असो किंवा आपल्या मुलीच्या स्वप्नपूर्तीमध्ये मदत करणारी, शेवटी बंड करणारी नजमा असो किंवा व्यावसायिक कारणांमुळे आपलेपण गमावून बसलेला, वरवर फ्लर्ट करणारा, हसरा आणि क्लासी शक्ती वगैरे सर्व मुख्य आणि सपोर्टिंग पात्रं उत्तमरीत्या पडद्यावर दिसतात. 

यात रागीट, बायकोला मारहाण करणारा बाप आणि इन्सियावर एकतर्फी प्रेम करणारा चिंतन वगैरे सर्व पात्रं लक्षात राहतात. 

खासकरून इन्सिया आणि नजमातलं दाखवलेलं नातं सुखावणारं आहे. त्यांच्यातली केमिस्ट्री तर आपल्याला प्रत्येक मायलेकीत किंवा प्रत्येक आई आणि मुलात सापडेल इतकी सहज आणि निखळ आहे. अभिनयाबाबत बोलायचं झाल्यास यातल्या प्रत्येक कलाकाराची निवड योग्यच आहे, याची साक्ष त्यांचं काम देतं. झायरा वासीम, मेहेर वीज, राज अर्जुन या सर्वांचीच कामं मस्त आहेत. प्रत्येक पात्रात त्यांच्याशिवाय इतर कुणाची कल्पनाच करवत नाही. आमिरचा शक्ती कुमारही खासच आहे. यातही त्याने एंड क्रेडिट्समध्ये धमाल आणलेली आहे. त्याचं पात्र तर लोकांना इतकं आवडलं की, फक्त त्याचा आवाज ऐकून बाहेर जात असलेले प्रेक्षक आत येत 'सेक्सी बलिये' गाणं पाहताना दिसले. 

अर्थात, कथानकात काहीच चुका नाहीत, असंही नाही. तिचं अचानक युट्यूब सेन्सेशन बनणं, काही दिवसांतच बातम्यांमध्ये तिच्याबद्दल होणारी चर्चा, तिला आलेला शक्ती कुमारचा मेल वगैरे गोष्टी फार पटकन घडतात असं वाटत राहतं, पण याने कथानकात कुठे अडथळा निर्माण होत नाही किंवा या गोष्टी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या कथानकावर परिणाम करत नाहीत. शिवाय या चुका कथानकाच्या ओघात फारशा लक्षातही येत नाहीत. त्यामुळे दुर्लक्ष करण्यालायक आहेत. 

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

'सपने देखना तो बेसिक है' असं म्हणत हा चित्रपट फक्त एक व्यावसायिक उद्देश समोर न ठेवता, त्याहून पलीकडे जाऊन आणि अतिशय सहजतेनं, अनाहूतपणे सामाजिक भान जपतो. सोशल मीडियाचा प्रभाव आणि उपयोग, पौगंडावस्थेत उमलणारं प्रेम, या गोष्टी हा चित्रपट संयतपणे दाखवतो. तो समाजानं पांघरलेला बुरखा फाडत नाही, तर तो बुरखा अलगदपणे काढण्याचा प्रयत्न करतो. 

सध्या तरी लोकांचा ओढा 'गोलमाल अगेन'कडे जास्त असला, तरी माउथ पब्लिसिटीवरून हा चित्रपट त्याला चांगलीच टक्कर देणार, हे नक्की. 

शिवाय शेवटच्या दृश्यातली इन्सिया आणि नजमाची मिठी ही या वर्षातल्या काही सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक मोमेंट्सपैकी एक आहे. त्यामुळे ती रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी चुकवण्याचं पातक करू नये. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख