‘कासव’ : एका ‘गे’ तरुणाच्या नजरेतून
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
कबीर
  • ‘कासव’चं पोस्टर
  • Sat , 28 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कासव Kaasav सुमित्रा भावे Sumitra Bhave सुनील सुकथनकर Sunil Sukthankar

‘कासव’ हा अनेक पुरस्कारांनी गौरवलेला, ‘नैराश्य’ या विषयावर भाष्य करणारा सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर दिग्दर्शित नवीन मराठी चित्रपट. मनानं आजारी असलेल्या एका युवकाला (‘निश’ला) कासव-संवर्धनाचं काम करणारी एक अनोळखी स्त्री (जानकी) कसा आधार देते, याची ‘कासव’ या प्रतीकातून सांगितलेली ही गोष्ट आहे.

तसं बघायला गेलं, तर ‘समलैंगिकता’ या विषयाचा चित्रपटाशी प्रत्यक्ष काहीच संबंध नाही, पण अप्रत्यक्षपणे आहे. चित्रपटाचा गाभा असलेलं ‘नैराश्य’ हा बहुसंख्य ‘गे’ तरुणांचा जिवंत अनुभव असतो. अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही, पण तज्ज्ञांच्या मतानुसार ‘नैराश्य’ आणि ‘आत्महत्या’ यांचं प्रमाण गे तरुणांमध्ये दखल घेण्याजोगं असतं.

या पार्श्वभूमीवर, ‘कासव’मधून मला, एका गे तरुणाला, जे चार मौल्यवान धडे मिळाले, ते इतरांना सांगावेसे वाटतात. हे धडे फक्त आशादायी आहेत म्हणून नव्हे, तर कदाचित एखादं अवेळी संपणारं आयुष्य वाचवू शकतील म्हणून.

शरीराचे जसे आजार असतात, तसे मनाचेही आजार असू शकतात.

‘दिसतोय तर व्यवस्थित, मग याला काय धाड भरलीय’ – जानकीचा नोकर नैराश्यात बुडालेल्या आणि विचित्र वागणाऱ्या निशबद्दल अशा स्वरूपाचा प्रश्न करतो. त्या वेळी ‘मनाचे आजारसुद्धा असू शकतात’ असं जानकी उत्तर देते.

आपल्या समाजात मानसिक आजारांची ‘आजार’ म्हणून गणना अभावानेच होते. स्वत:ची ओळख स्वीकारण्याचा संघर्ष, ती ओळख जगाला सांगण्या- न सांगण्याविषयीचा झगडा, समलैंगिकता समजून घ्यायला अपरिपक्व असलेल्या समाजात पावलोपावली लागणाऱ्या ठेचा, अशाश्वत भविष्य – अशी अनेक कारणं गे तरुणाला नैराश्यात ढकलू शकतात. ‘मनानं मी सतत सुदृढच असायला पाहिजे’, हा बिनकामाचा भ्रम न बाळगता, ‘माझं मन कधी कधी आजारी पडू शकतं’, हे वास्तव स्वीकारलं पाहिजे, हा पहिला धडा मला यातून मिळाला.

निशला जेव्हा कधी त्याच्या मनाची दारं उघडावी असं वाटेल, तेव्हा तो उघडेल.

संपूर्ण चित्रपटात जानकी कुठेच निशला आग्रह करत नाही की, त्याने त्याच्या नैराश्याचं कारण सांगावं, घटनांचा तपशील द्यावा. ती फक्त त्याच्या सोबत असते, त्याची काळजी घेते; न बोलता, प्रेमानं, शांतपणे.

‘मी गे आहे’ हे आपल्या जवळच्या लोकांना सांगणं, हा एक लढा असतो. काही जण ते सांगायचं ठरवतात, तर काही जण सांगत नाहीत. जे सांगतात, त्यांनासुद्धा फक्त हे तीन शब्द सांगण्यासाठी कित्येक वर्षं लागू शकतात. ही अशी अवस्था असते की, ‘मी दु:खी आहे’ हे जगाला कळतंय, पण ‘मी का दु:खी आहे’, हे मी सांगू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ‘तपशिलाच्या मागे न धावणारी शांत सोबत’ जगण्याचं कारण बनू शकते - हा दुसरा धडा मला मिळाला. हा धडा फक्त ‘गे’ व्यक्तीसाठी नाही, तर त्याला मदत करू पाहणाऱ्या आजूबाजूच्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.

जेव्हा कासवाची मादी समुद्राच्या बाहेर अंडी घालते, पिल्लांचा जन्म तेव्हाच होतो.

कासवाची मादी किनाऱ्यावर अंडी घालते आणि परत समुद्रात जाते. पिल्लं काही तासांनी अंड्यातून बाहेर येतात आणि समुद्राकडे पळतात. कासवांना अंड्यातून बाहेर यायला जी आवश्यक परिस्थिती लागते, ती समुद्राच्या बाहेर असते; एका खड्ड्यामध्ये. तिथं अंड्याच्या कवचाचा अडसर बाजूला करून पिल्लू बाहेर येतं आणि निसर्गाच्या उपजत ज्ञानानुसार समुद्राच्या लाटेमध्ये गुडूप होतं.

हे कासवाचं पिल्लू म्हणजे नैराश्यातून बाहेर पडलेला गे तरुण. नवीन उमेदीनं, नवीन जन्मानंतर समुद्रात परत जाणारा; पण त्यासाठी समुद्राच्या बाहेर असावं लागतं आणि अंड्याचं कवच फोडावं लागतं, हे महत्त्वाचं. अर्थातच नैराश्यावर आवश्यक उपचार घ्यावे लागतात; बोलावं लागतं; मनात साचलेल्या भावनांचा निचरा करावा लागतो. या सगळ्यासाठी वेळ द्यावा लागतो.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

भारतीय समाजात मानसिक आजारांबद्दल उदासीनता, भीती, गैरसमज काठोकाठ भरलेले आहेत आणि गे तरुण त्याच समाजाचा भाग आहे. त्यामुळेच पर्यायानं उपचारांसाठी ‘नाही’ हेच उत्तर ऐकू येतं. मात्र मला मिळालेला तिसरा धडा असं सांगतो की, समुद्राच्या बाहेर यावं लागणारच; उपचार घ्यावे लागणारच. अंड्याचं कवच फोडलं, तरच नवीन जन्म होऊ शकतो.

निशच्या बरं होण्याचं एक मुख्य लक्षण म्हणजे तो इतरांबद्दल संवेदनशील होतो.

नैराश्यातून बाहेर पडणारा निश त्याच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी करायला लागतो, त्यांना मदत करायला लागतो. कारण जानकी म्हणते, तसा तो दुष्ट नसतो, तो दु:खी असतो.

एक गे तरुण म्हणून माझं आयुष्य संकुचित असतं. माझ्याच आयुष्याचे प्रश्न मला त्रास देत असतात. त्यातून येणारं नैराश्य, चिडचिड हा आयुष्याचा एक भाग असतो. त्यावर उपचार झाले की, या नैराश्यातून बाहेर पडणं जमायला लागतं. त्यानंतर मला आजूबाजूचं दु:ख समजू शकतं. ते दूर करण्यासाठी माझे कधी खारीचे तर कधी हत्तीचे प्रयत्न सुरू होतात आणि माझ्याही आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो.

तर हाच चौथा धडा की, जे आपल्याला गवसलंय ते आपल्यापुरतं न ठेवता वाटून टाकणं. इतर कासवांना समुद्रात परतण्यासाठी मदत करणं.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......