अजूनकाही
गांधी म्हणाले होते, ‘खेड्याकडे चला!’, ‘खरा भारत खेड्यात वसतो’ अशी वाक्यं ऐकायला छान वाटतात. ती वापरून वापरून अगदी गुळमुळीत होऊन गेली आहेत, पण उमजली मात्र नाहीत. ते हे म्हणाले तेव्हा सत्तर टक्के भारत खरंच खेड्यात राहायचाही. पण आज अर्धा महाराष्ट्र शहरात आला. एका राज्याची वीस टक्के जनता घरं सोडून स्थलांतरित झाली आणि त्याबद्दल फारसं कोणी बोललंही नाही. आजही ‘सामाजिक प्रश्न’ या नावाखाली सामान्य माणसांमध्ये शहरीकरणावर कितपत चर्चा घडून येते? थोडीबहुत चर्चा होतेही, नाही असंही नाही, पण शहरीकरण या प्रश्नाबद्दलचं म्हणावं तेवढं गांभीर्य आपल्याला अजून तरी उमजलेलं नाहीये. कारण आपण त्याचा जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून स्वीकार केलाय. म्हणूनच एकीकडे गावं, खेडी आक्रसत चाललेली दिसतात, तर त्याच वेळेला शहरं तुंबत चालली आहेत. वाहणारी नदी थांबलीय आणि शहरातल्या लोकल मात्र अहोरात्र वाहू लागल्या आहेत. यावर काहीतरी उपाय असेल? नदीला परत वाहतं करण्याची आज आपल्याला गरज आहे आणि त्याबद्दलच बोलतो संदीप सावंत यांचा ‘नदी वाहते’ हा सिनेमा.
विषयांचं नावीन्य संपून तुंबलेल्या मराठी सिनेमाला ‘श्वास’च्या रूपानं परत वाहतं करणाऱ्या संदीप सावंत यांचा ‘नदी वाहते’ हा दुसरा सिनेमा. तीन अंकी नाटक किंवा कादंबरीसारखं पसरट नाट्य अवलंबणाऱ्या मराठी सिनेमाला ‘श्वास’सारखी छोटीशी कथाही किती सुंदर चित्रपटात माध्यमांतरित होऊ शकते याचा प्रत्यय ‘श्वास’नं आणून दिला. त्यानंतर प्रयोग करण्याचं एक उत्तम वातावरण मराठी सिनेमात बनलं आणि सुदैवानं अजूनही ते उत्तमरीत्या टिकून आहे. ‘नदी वाहते’ हाही असाच एक वाखाणण्याजोगा प्रयोग.
प्रयोगांचं वातावरण असणारी भारतातली अशीच दुसरी इंडस्ट्री म्हणजे मल्याळम सिनेमाची. तिचा विकास होण्याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक होतं. ते त्यांचं नव-वास्तववादाची कास पकडणं. सावंतांचा ‘नदी वाहते’ हा सिनेमाही आजच्या काळातल्या मराठी सिनेमासाठी शक्यतांचं अजून एक दार उघडतो, ते या नव-वास्तववादाच्या स्वरूपानेच. (अर्थात ‘कोर्ट’सारखे या जॉन्रमधले नितांत सुंदर प्रयोगही आपल्याकडे झालेले आहेतच!)
एका लेखकानं म्हटलं आहे, “साहित्य या प्रकारात कथा तुमच्याकडे असते, त्यातून तुम्हाला वाचणाऱ्यासाठी जग उभं करावं लागतं. तर चित्रपटामध्ये कॅमेरा ऑन केला की, जग तुमच्या समोर असतं. कथा मात्र तुम्हाला शोधत जावी लागते.” इथं सावंत आपल्यासमोर काही घटना फक्त मांडत जातात. ते जग दाखवत जातात. कथा शोधण्याचे कष्ट मात्र आपल्यालाच घ्यावे लागतात. आणि तीच खरी मजा आहे, ‘नदी वाहते’सारखे सिनेमे पाहण्याची.
‘नदी वाहते’ सुरू होतो आणि आपल्याला एका गावातल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टीमध्ये नेऊन बसवतो. कुठल्याही पात्राची खास अशी ओळख करून दिलेली नाही की, कथेची रूढार्थानं म्हणावी अशी सुरुवात नाही. गावात नेहमीच घडत असतात, तशा काही घटना चालू होतात आणि आपल्याला अलगद (इंग्लिशमध्ये ‘फ्लाय ऑन दी वॉल’ म्हणतात तसं!) तिथं नेऊन बसवलं जातं.
त्यामुळे आपण त्रयस्थही राहतो आणि त्या परिस्थितीचा भागही होतो.
सध्याच्या काळातील खेड्यांचे अनेक प्रश्न आहेत. केवळ शेतीवर घर चालणं कठीण झालंय. (वास्तविक पाहता ते कुठल्या काळात चालायचं? कमाल जमीन धारण कायद्याआधी शेती काही जणांच्या हातातच एकवटलेली होती. आणि बाकीचे आपापले छोटे-मोठे उद्योगधंदे करायचे. त्यातूनच खेड्यांची, गावांची स्वतःची आर्थिक इको-सिस्टम चालत राहायची. असो.) त्यामुळे शेती विकणं, रोजगार किंवा मोलमजुरीसाठी शहराकडे धाव घेणं, या गोष्टी चालू आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार सावंतांनी पात्रांच्या निवडीत, त्यांच्यासमोरील परिस्थिती उभी करतानाच केलाय. त्यामुळे त्यांना त्यावर वेगळं बोलून दाखवण्याची गरज पडत नाही. या सर्व समस्या उघड दिसूनच येतात. पण या सिनेमाचं कौतुक करावं अशी गोष्ट म्हणजे तो या प्रश्नांवर थांबत नाही. त्यावर स्वतःचं उत्तर मिळवण्याचा तो प्रयत्न करतो.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
बऱ्याच वेळा असा सिनेमा उपदेशपर होण्याची भीती असते. किंवा समोरच्या परिस्थितीवर प्रचंड एककल्ली रागही त्यातून दिसून येऊ शकतो. पण ‘नदी वाहते’ असं काहीही होऊ देत नाही. प्रमुख पात्रं कोणाला काही उपदेश करायला जात नाहीत आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सामील होण्याचा पर्याय समोर असूनही त्या मार्गाला जात नाहीत. या पात्रांनी स्वतःची स्वतः काही उत्तरं शोधली आहेत. आणि तीच उत्तरं सर्व काही आहेत असा आवही त्यात नाही. ते प्रयत्न क्रांतिकारक नसले तरी प्रामाणिक आणि व्यवहार्य वाटत राहतात.
खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. पण म्हणजे नक्की काय? मोठे उद्योग, साखर कारखाने चालू करणं? मोठ्या उद्योगांनी किती गावकऱ्यांचा फायदा होतो? आणि कितपत होतो? त्यात जमिनी किती जातात? आणि मुळात विकास म्हणजे मोठ्या कंपन्या येणं, हा विचारच मुळी एकरेषीय नाहीये का? त्याऐवजी प्रत्येकानं आपला छोटासा का होईना जोडधंदा शोधणं. त्यात काम करून पैसे मिळवणं यावर सिनेमा भर देतो. आणि या सर्वाना रूपक ठरते ती नदी.
विकास म्हटलं की धरण बांधून एकदाच नदी संपूर्णपणे अडवायची आणि तिच्या पाण्याचा हवा तसा वापर करायचा हेच डोक्यात येतं. पण यालाच वेगळा विचार दिला जातो, तो छोटे छोटे बांध घालून, हवी तेवढी वापरून नदी पुढे वाहती ठेवाण्याचा. हा सिनेमात केवळ नदीसंदर्भात मांडलेला वाद आहे. पण याचाच मोठ्या पातळीवर विचार केल्यास उद्योग म्हणजे मोठे उद्योगच स्थापायचे की, आपापले छोटे किंवा जमतील तसे उद्योग शोधायचे आणि खेडी, त्यांची अर्थव्यवस्था चालती ठेवायची या पातळीवरही तो दिसत जातो.
सिनेमाच्या नावाप्रमाणेच कॅमेराही कायम प्रवाही राहतो. पात्रंही तशीच सतत काम करणारी. कित्येक प्रसंगांत कॅमेरा पात्रांसोबत वाहत राहतो. आणि पात्रंही थांबत नाहीत. जो स्थूलपणा आज खेड्यांना आलाय तो इथं मुद्दामहून दाखवला जात नाही. अर्धवट शिक्षण, शेतीबाबतचा निरुत्साह, सततच्या अपयशामुळं आलेला निराशावाद आज खेड्यांतील तरुणांत दिसून येतो. पण सिनेमा ते दाखवत नाही. कारण नदी आणि खेडी आज थांबली हे वास्तव त्याला माहिती आहे, पण तिला वाहती करणंही तितकंच शक्य आणि सोपं आहे, हे नवं वास्तव तो आपल्याला दाखवू इच्छितो. वास्तववादी असला तरी या नव्या वास्तवाची अपेक्षा तो ठेवतो.
लेखक सुदर्शन चव्हाण पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
chavan.sudarshan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment