जगण्याचं बळ देणाऱ्या 'कासवा'ची गोष्ट
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘कासव’ची काही पोस्टर्स
  • Mon , 09 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie कासव Kaasav सुमित्रा भावे Sumitra Bhave सुनील सुकथनकर Sunil Sukthankar

'कासव' हा एक अतिप्राचीन प्राणी असून भारतीय पुराणात तर त्याला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे. 'दशावतारा'मध्ये कासवाचा (कूर्म) दुसरा क्रमांक लागतो. असं म्हणतात की, देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी 'मंदार' पर्वत कासवाच्या पाठीवर ठेवून समुद्रमंथन करण्यात आलं. त्यामुळे ते करायला सोपं गेलं.

या कासवाच्या अर्थातच अनेक प्रजाती असून प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रजनन काळात मादी कासव अंडी घालण्यासाठी समुद्रातून किनाऱ्यावर येतं आणि अंडी घालून लगेच समुद्रात जातं. अर्थात तिला आपली पिल्लं कोणती हे माहीत नसतं. यथावकाश जेव्हा या अंड्यामधून कासवाची पिल्लं बाहेर येतात, तेव्हा तीही त्वरेनं विशाल समुद्राचा आसरा घेतात. समुद्रात जाताना त्यांच्यावर संकटं येतात, तरीही त्यांच्यावर मात करून समुद्राचा आसरा घेण्यासाठी त्यांची सदैव धडपड चालू असते. समुद्रात गेल्यावर त्यांनाही आपली 'आई' नेमकी कोण हे माहीत नसतं. तरीही त्यांचा जगण्याचा निर्धार कायम असतोच. निसर्गाचा हा जीवनक्रम एक महत्त्वाची गोष्ट सांगून जातो की, तुम्हाला फक्त जन्म देण्याचं काम कोणी तरी करतो, बाकीचं जीवन कोणत्याही परिस्थितीत तुमचं तुम्हालाच जगायचं आहे. संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून ओळख असलेल्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी याच आशयाचा आधार घेऊन 'कासव' या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रतीकात्मक चित्ररूपाद्वारे 'जगण्याचं बळ देणाऱ्या 'कासवा'ची सुंदर गोष्ट सांगितली आहे.

जानकी कुलकर्णी या घटस्फोटित महिलेची ही कथा आहे. अमेरिकेत राहणाऱ्या जानकीच्या पतीचं आणि मुलाचं जीवन फार वेगळं आहे. त्यामुळे घुसमटलेली जानकी आपलं स्वतंत्र जीवन जगण्यासाठी पुन्हा भारतात येते. असुरक्षित जगण्याचा धसका घेतल्यामुळे तिची मानसिक अवस्था कधी कधी बिघडते. तिच्यावर वैद्यकीय उपचारही चालू असतात. तरीही आपलं मन रमावं म्हणून ती स्वतःला एका संशोधन प्रकल्पाच्या कामात गुंतवून घेते. कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर कासवांच्या अंड्यांची निगराणी आणि संगोपन करण्यासंबंधीचा हा प्रकल्प असतो. त्यासाठी या केंद्राचे काम पाहणारे दत्ताभाऊ नावाचे निसर्गप्रेमी हे तिचे मार्गदर्शक असतात.

एकदा मुंबईहून कोकणाला प्रकल्पाच्या कामासाठी जात असताना जानकीला मानव नावाचा तरुण बेवारस अवस्थेत सापडतो. हा मानवही आपल्या कुटुंबापासून दुरावलेला असतो. त्याला कोणीही नसतं. त्यामुळे तो आपल्या जीवनाला कंटाळलेला असतो. वैफल्यापोटी तो आत्महत्येचाही प्रयत्न करतो, मात्र दवाखान्यात उपचार चालू असताना तो पळून जातो. आणि नेमका जानकीला एका रस्त्यावर सापडतो. तेथून त्याचा जानकीच्या घरी वेगळा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला आपल्या गूढ आयुष्याबाबत मानव जानकीला थांगपत्ता लागू देत नाही, मात्र हळूहळू तो जानकीच्या कामात रमतो आणि तिला मदतही करतो. जानकीचा त्याला आधार वाटत असतानाच अचानक जानकी त्याला न सांगता आपला घटस्फोट निश्चित करण्यासाठी अमेरिकेला जाते. मानव पुन्हा एकाकी पडतो, मात्र तोपर्यंत त्याला जीवन जगण्याचं बळ मिळालेलं असतं. अशी या चित्रपटाची थोडक्यात कथा आहे. 

निसर्गानं घालून दिलेल्या कासवाच्या जीवन प्रक्रियेवर हा संपूर्ण चित्रपट बेतलेला आहे. आणि त्याचबरोबर कथेमध्ये जानकी आणि मानवच्या आयुष्याची सुरेख गुंफण केली आहे. संवादातून कासवाच्या जीवनप्रक्रियेची माहिती देताना प्रतिकात्मकरीत्या मानवी नात्यांबद्दल परिणामकारक भाष्य केलं आहे. ''कुटुंबातील व्यक्ती परस्परांवर एवढे प्रेम करतात की, नको तेवढ्या त्या परस्परांमध्ये गुंतत जातात आणि त्याबाबत त्यांचा अपेक्षाभंग झाला की त्या दुःखी होतात'' हे सत्य संवादातून चांगलं उलगडण्यात आलं आहे.

मानवला एसटी बसस्थानकात भेटलेला चहावाला परसू हा अनाथ मुलगा हे कथेमधील आणखी एक महत्त्वाचं पात्र. सुरुवातीपासूनच मानव त्याला हिडीसफिडीस करत असतो, मात्र परसू अनाथ, निरक्षर असूनही जीवन जगण्याची त्याची उभारी आणि त्याचे सकारात्मक विचार मानवला जीवनाची गोडी लावण्यास प्रवृत्त करतात. तसंच जानकीचा कारचालक कम नोकर यदु हे पात्रही गरीब असलं तरी हसतखेळत जीवन कसं जगायचं हे त्यालाही समजलेलं असतं. छोट्या छोट्या प्रसंगातून मानवला ही सारीच पात्रं जीवनाचा अर्थ समजावून सांगतात.

.............................................................................................................................................

मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

हे सारं सांगताना चित्रपटाच्या कथेमध्ये कोठेही फारशी नाट्यमयता दिसत नाही. त्यामुळे चित्रपट सुरुवातीपासूनच कासवासारखाच 'कूर्मगती'नं पुढे सरकत राहतो, मात्र पटकथा सकस असल्यामुळे गंभीर विषयातील औत्स्युक कायम राहतं. शिवाय कथेच्या गंभीर विषयाच्या पार्श्वभूमीला अधूनमधून समुद्राची 'गाज' आहे. त्यामुळे विषयातील सखोलपणा आपोआपच दृग्गोचर होते. त्यादृष्टीनं धनंजय कुलकर्णी यांचा कॅमेरा अधिक 'बोलका' झाला आहे. त्यांचं उत्कृष्ट छायाचित्रण ही या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे. साकेत कानेटकर यांनी स्वरबद्ध केलेली दोन हिंदी गाणी आशयपूर्ण असल्यामुळे विषयाच्या  सखोलपणात भर घालणारी आहेत.

सर्वांत मुख्य म्हणजे या चित्रपटातील कलाकारांनी केलेल्या भूमिका. इरावती हर्षे (जानकी), आलोक राजवाडे (मानव), डॉ. मोहन आगाशे (दत्ताभाऊ), किशोर कदम (यदु), देविका दफ्तरदार (मानवची सावत्र आई), संतोष रेडकर (परसू) या प्रमुख कलाकारांनी आपापल्या भूमिका इतक्या सहजपणे केल्या आहेत की, प्रेक्षक कथेमध्ये सहज गुंतून जातो.                                                            

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......