अजूनकाही
रूढ चित्रपट परीक्षणांच्या वाटेला न जाता, रूढ टीकाखोरपणाच्या जंजाळात न फसता आणि चित्रपट रसग्रहणाच्या नावाखाली मूळ चित्रपटाचीच कथा देत न बसता, काही मोजकी निरीक्षणं नोंदवत, त्यातून योग्य तेच निष्कर्ष काढत ‘सिने-सौंदर्या’चा आस्वाद घेणारं नवं कोरं साप्ताहिक सदर... दर शनिवारी
.............................................................................................................................................
एनलायटनमेंटच्या काळात राज्यशास्त्रात दोन महत्त्वाच्या वैचारिक शाखा पुढे आल्या. पहिली होती थॉमस हॉब्सची, ज्याच्या विचाराचा पाया हा माणसाच्या मूळ स्वभावाला वाईट समजण्यावर आधारित होता. तर दुसरीकडे होती जॉन लॉकची शाखा, जी मनुष्याला कोरडी पाटी समजते (टॅबुला रासा). ज्या वरती चांगल्या गोष्टींचे, अनुभवांचे संस्कार होऊ शकतात. हे आठवण्याचं कारण म्हणजे एका आठवड्याच्या फरकानं येणारे, पुण्यात बनलेले ‘CRD’ आणि ‘कासव’ हे दोन सिनेमे.
‘CRD’ हा धर्मकीर्ती सुमंत लिखित सिनेमा कुठेतरी हॉब्सच्या विचारांवरती जाणारा, एक्झिस्टेन्शियल सिनेमा; तर सुमित्रा भावे लिखित ‘कासव’ ही मनुष्याला कोरं करून त्याला परत सह-अनुभूत करायला शिकवत जाणारी लॉकच्या धारणेला साजेशी अशी कलाकृती. (दोन्ही सिनेमांचं जवळपास प्रदर्शित होणं आणि त्याच्या सबंधित माणसं एकमेकांच्या जवळची असणं. एवढाच काय तो सबंध मी दोन्हीमध्ये लावलाय. तो इतर कुठल्याही पातळीवर समजू नये.)
या लेखाचा उद्देश आहे, यातल्या दुसऱ्या प्रकारचा सिनेमा बनवणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीच्या आजवरच्या कामाकडे एक नजर टाकणं.
‘कासव’च्या रूपानं १३ वर्षांत चौथ्यांदा मराठी सिनेमाला सुवर्णकमळ मिळवून देणारी ही दिग्दर्शकद्वयी गेली बावीस वर्षं मराठी सिनेमात काम करत आहे. १५ सिनेमे, कैक लघुपट, टेलिव्हिजनवरील मालिका असं प्रचंड काम त्यांनी करून ठेवलंय आणि अजूनही करत आहेत. उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकरपासून आज वरुण नार्वेकर, आलोक राजवाडे यांच्यासारखे सहदिग्दर्शक… आनंद मोडकांपासून मध्ये शैलेन्द्र बर्वे आणि आज साकेत कानेटकरपर्यंतचे संगीत दिग्दर्शक. अशी मराठी सिनेमाची एक नव्हे तर दुसरी पिढीही आज त्यांच्यासोबत काम करत आहे. शिकत आहे. असं या जोडीचं प्रचंड मोठं योगदान मराठी सिनेमाला आजवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे मिळालं आहे.
आता त्यांच्या प्रत्यक्ष कामाकडे म्हणजे त्यांच्या सिनेमाकडे वळताना सर्वाधिक स्पष्ट दिसणारी गोष्ट म्हणजे या सिनेमांचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तो मांडण्याची पद्धत. मी ‘प्रश्न’ हा शब्दप्रयोग ढोबळ पद्धतीनं केला आहे, कारण इथं प्रश्न मानसिक, आरोग्यासंबधी, सामाजिक या सर्व प्रकारचे असतात. त्यामुळे तसं पाहता विषयांचं कसलंही बंधन यांच्या सिनेमांना नाहीये. सामाजिक किंवा राजकीय प्रश्नही अत्यंत वैयक्तिक पद्धतीनं मांडण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. आणि त्याच वेळेला ‘कासव’सारखा अत्यंत वैयक्तिक विषय ते एका डिप्रेशनच्या केसशी स्पेसिफिक न ठेवता अधिक वैश्विक करू शकतात.
यांच्या सिनेमांत प्रश्न कसे वैयक्तिक पातळीवर नेऊन दाखवले जातात याचं उदाहरणच द्यायचं झालं तर ‘हा भारत माझा’ हा चित्रपट योग्य राहील. हा चित्रपट आहे २०११ साली झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलन आणि उपोषण काळात घडणारा. भ्रष्टाचार हा इथला मूळ प्रश्न. जो वरकरणी राजकीय दिसतो, पण चित्रपट कथा मांडताना दाखवतो ते वैयक्तिक पातळीवरचे भ्रष्टाचार. अगदी नात्यांमधलेही. अण्णांच्या उपोषणाचे दिवस आणि त्या दरम्यानची एका कुटुंबाची ही कथा. ज्याचा शेवट होतो तो माणसाच्या चांगुलपणावरील प्रचंड विश्वासानं. आपली चूक समजण्याच्या क्षमतेवरती विश्वास ठेवत. थोडंसं अति आशावादी असं हे चित्रण वाटू शकेल. पण त्यामागे सुमित्रा भावेंची असणारी सामाजिक कार्यातली पार्श्वभूमीही समजून घ्यावी लागेल. ज्यातून हा आशावाद त्यांच्या प्रत्येक सिनेमात झिरपताना दिसतो.
बऱ्याचदा प्रश्न तात्कालिक असतात. कधी ते त्या विशिष्ट परिस्थितीत उद्भवलेले असतात. पण कलेचं काम असतं ते या प्रश्नांना काळाच्या पलीकडे नेऊन पाहणं. त्यांना सार्वकालिक करणं. आणि सुमित्रा भावेंचं लिखाण नेमकं हेच करताना दिसतं. म्हणून ‘कासव’ केवळ आजकालच्या पिढीचा प्रश्न म्हणून समोर येत नाही. तर माणसाच्या माणसाशी जोडलेलं असण्याच्या सार्वकालिक भावनेपर्यंत आपल्याला नेऊन ठेवतो. ‘संहिता’मध्ये काळ बदलला तरी माणसं वेगळ्या परिस्थितीत परत तशीच वागताना दिसतात. त्यामुळे वेळ बदलली तरी प्रश्न सार्वकालिक आहे, हे समोर येत जातं.
प्रश्न मांडताना अजून एक होणारी चूक म्हणजे पीडित आणि जुलूम करणारा अशी काहीतरी ढोबळ मांडणी केलेली असते. मग कधी त्या व्यक्ती असतात, कधी परिस्थिती, तर कधी एखादी संस्था (उदा. ‘एक कप च्या’मध्ये सरकारी संस्था) शोषणकर्ती असते. पण त्यांना दोष देण्यानं प्रश्न सुटतो, असं कधीच भावे-सुकथनकरांच्या सिनेमात दिसणार नाही. ‘दोघी’मध्ये परंपरा आणि परिस्थिती दोन्ही दोषी आहेत. पण त्याचा सढळ द्वेष दिसणार नाही. ‘घो मला असला हवा’मध्ये राधिकाच्या पात्राला जो नवरा हवाय, त्यासाठी केलेलं तिचं तिचं छोटंसं बंड आहे. पण त्यात वडलांचा द्वेष नाहीये. राधिकाच्या पात्राचा स्वतःचा तो स्त्रीवाद आहे. आणि त्याचा कॉमिक अंगानं जाणारा तिच्या प्रयत्नांचा तो प्रवास आहे.
प्रश्नाचा सांगोपांग आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हावा, त्यावर बोलता यावं हा त्यांच्या सर्व संहितांमध्ये दिसून येणारा प्रयत्न. त्यासाठीच अधिकाधिक पात्रं ते संहितेत आणत जातात. थोडक्यात, ‘नितळ’ हा सिनेमा. हा ‘त्वचेवरील कोड’ या विषयवरील सिनेमा. ज्यासाठी ही दिग्दर्शकद्वयी आपल्यासमोर एक मोठं कुटुंब उभं करते. आणि त्या कुटुंबात अशा कोड फुटलेल्या व्यक्तीला नेऊन बसवते. यावरती कुटुंबातील प्रत्येकाच्या व्यक्त होण्यानं, अधिकाधिक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते सर्व इथे महत्त्वाचे ठरतात. जसं की, नीना कुलकर्णीचं पात्र सुंदर असूनही सौंदर्याला आणि त्याच्या उपयोगाला निकालात काढतं. कोणी सौंदर्याची व्याख्या बदलू पाहतं. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या चर्चांची शक्यता इथं घडवून आणली जाते. तेच ‘वास्तुपुरुष’बद्दलही म्हणता येईल.
विशेष बाब म्हणजे त्यांचे मागचे तीन सिनेमे म्हणजे ‘संहिता’, ‘अस्तु’ आणि ‘कासव’ पाहताना, आधीच्या सिनेमासारख्या बोलून सर्व गोष्टींची मीमांसा करण्याची गरज त्यांच्यासाठी कमी होत जाताना दिसतेय. हे तीनही सिनेमे अधिक वैयक्तिक पातळीवर जातात. आणि शब्दांसोबत प्रतीकात्मकता, दृश्यात्मकता यांचा वापर अधिकाधिक करताना दिसतात.
‘चाकोरी’ या त्यांच्या लघुपटाच्या शेवटी मुलीच्या पायातली पैंजण गळून पडतं. आणि हे दृश्यच स्वातंत्र्याचं प्रतीक ठरतं. त्यांचा हाच प्रतीकांचा वापर आता अधिकाधिक प्रगल्भ होत चालला आहे. वरती उल्लेख केल्याप्रमाणे यांच्या सिनेमातली हत्ती आणि कासव यांसारखी प्रतीकं त्या विषयाला, त्या प्रश्नाला कालातीत बनवतात. विषयाची मर्यादा केवळ त्या प्रश्नाभोवती न ठेवता ती बरीच पुढे घेऊन जातात. ज्यामुळे ‘संहिता’पासूनचा त्यांचा सिनेमा अधिक प्रगल्भ, अधिक वैयक्तिक वाटतो.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
आणि शेवटाला त्यांच्या पात्रांबाद्दलची सर्वांत महत्त्वाची आणि सुरुवातीला सांगितलेली गोष्ट म्हणजे त्यांची सर्व पात्रं ही मुळात चांगली माणसं असतात. समोरच्या व्यक्तीच्या दुःखाला जाणून घेण्यास ते तयार असतात. (हे मी केवळ ‘कासव’बद्दल बोलत नाहीये) अगदी द्वेषास पात्र व्यक्तीचा द्वेष करण्याआधीही त्या पात्राच्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा ते प्रयत्न करतात. एखाद्याशी सहानुभूत होऊ न शकण्याचा त्यांना त्रास होतो. यासंबंधी मला ‘संहिता’मधला एक प्रसंग फार आवडतो. जेव्हा राणी, राजाशी अफेअर असणाऱ्या गायिकेला बोलावून हे सांगण्याचा प्रयत्न करते की, ‘तू माझ्यापुढे काहीच नाहीयेस’. पण मुळात या गायिकेत असं नक्की काय आहे हे जाणून घेण्याची तिची इच्छाही आहे. (रेंच्या ‘चारुलता’सारखी ही राणीही या प्रसंगाच्या वेळी कपड्यावर एम्ब्रॉयडरी करत असते. चारुलतासारखीच समान आवडी निवडीचं कोणीतरी राणी शोधत असेल का?) भावे-सुकथनकर जोडीचा सिनेमा म्हणजे अशा सर्व चांगल्या माणसांचा सिनेमा असतो.
अशा प्रकारे विषयात, सादरीकरणात वैविध्य आणत काम करणारी ही जोडी सिनेमाच्या आर्थिक, विपणन, वितरण या अंगांना अनुल्लेखानंच टाळते असं वाटू शकतं. किंवा तशी बऱ्याच जणांची तक्रारही असते. याचा अर्थ त्यांनी या गोष्टींना बगल दिलीय असा मात्र करून घेऊ नये. त्याउलट सिनेमा पोहोचवण्यासाठी त्यांनी मूळ प्रवाहातील पद्धतींपेक्षा वेगळे मार्ग शोधले. कारण त्यांच्या दृष्टीनं वितरण हे मूळ प्रवाहापेक्षा खूप वेगवेगळ्या पद्धतीनी केलं जाऊ शकतं. ज्यात त्यांचे बरेच प्रयोग करून झालेत.
अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलपणे पाहणारी आणि त्याला कालातीत असं स्वरूप देत कथा मांडणारी ही जोडी कासवाप्रमाणेच शांतपणे पण अविरत काम करत पुढे जात आहे. आणि ‘कासव’ला मिळालेलं सुवर्णकमळ म्हणजे ते अत्यंत योग्य मार्गानं जात आहेत याचं द्योतकच.
लेखक सुदर्शन चव्हाण पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
chavan.sudarshan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment