'न्यूटन' :  भारतीय लोकशाहीचा 'चमत्कारी' प्रत्यय   
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी 
  • 'न्यूटन'ची पोस्टर्स
  • Mon , 25 September 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie न्यूटन Newton राजकुमार राव Rajkummar Rao अमित मसूरकर Amit Masurkar

'भारतीय लोकशाही' हा इतर जगाच्या दृष्टीनं एक चमत्कार मानला जातो. भारतासारख्या खंडप्राय देशात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुका, त्या निवडणुकांदरम्यान घडणारं-बिघडणारं अनेकविध पक्षांचं राजकारण, निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेतर्फे निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि सर्वसामान्य जनतेचा मतदानावर आणि पर्यायानं लोकशाहीवर असलेला ठाम विश्वास हे सर्व लक्षात घेता हा खरोखरच 'चमत्कार' मानला पाहिजे. आणि कदाचित हा 'चमत्कार' असल्यामुळेच भारताच्या या लोकशाही व्यवस्थेत असंख्य त्रुटीही आहेत. अनेकदा त्या ठळकपणे नजरेस पडतात. विशेष म्हणजे या त्रुटीला राजकीय, सामाजिक, शासकीय अशा अनेक प्रकारच्या यंत्रणा कारणीभूत आहे. 'हम करे सो' वृत्तीमुळे प्रत्येक जण स्वतःच्या नजरेतून या लोकशाही व्यवस्थेकडे पाहतो आणि ती राबवण्याचा प्रयत्न करतो. दिग्दर्शक अमित मसूरकर यांच्या 'न्यूटन' या नव्या हिंदी चित्रपटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील लोकशाही शासनप्रणालीबाबत अतिशय सुंदर आणि मार्मिक भाष्य करण्यात आलं आहे. हे भाष्य करत असताना हा चित्रपट अनेक प्रश्नांचं मोहोळ उठवून जातो. त्याची उत्तरं अर्थात आपल्यालाच शोधावी लागतात.  

'न्यूटन' असं चमत्कारिक नाव असलेल्या चित्रपटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही व्यवस्थेला 'हात' घातला आहे, असं प्रथमदर्शनी वाटत नाही कारण 'न्यूटन' (राजकुमार राव) हे एका शासकीय कर्मचाऱ्याचं नाव आहे. वास्तविक त्याचं नाव नूतनकुमार असं आहे, मात्र त्याचं इंग्रजीवर अति प्रेम आहे आणि त्यातून त्यानं आपलं 'न्यूटन' असं नामकरण केलं आहे. एका लोकसभा निवडणुकीदरम्यान एक शासकीय कर्मचारी म्हणून त्याला जे अनुभव येतात, त्याची 'गाथा' म्हणजे   हा चित्रपट आहे. 

हा न्यूटन अतिशय प्रामाणिक आहे. शिवाय तो तत्त्वनिष्ठ आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच भरपूर हुंडा मिळत असतानाही होणारी पत्नी ही सोळा वर्षांची 'अजाण' आहे, हे कळताच तो ते लग्नच नाकारतो. (लग्नाच्या बैठकीनिमित्त झालेले 'संवाद' हे सध्याच्या सामाजिक व्यवस्थेचं भेदक दर्शन घडवतात.) तर अशा या न्यूटनला लोकसभा निवडणुकीनिमित्त निर्वाचन अधिकारी म्हणून दुर्गम भागात जाण्याची जबाबदारी येते. त्याला जिथं जायचं असतं, तो भाग पूर्णपणे नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली असतो. त्यामुळे तिथं निवडणूक घेणं हे फार जोखमीचं काम असतं. कारण नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचं आवाहन त्या भागातील जनतेला केलेलं असतं. त्यामुळे अतिशय दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रावर मतदान होईल की नाही, याबाबत सर्वच जण साशंक असतात.

मात्र न्यूटन एक प्रामाणिक शासकीय अधिकारी म्हणून हे आव्हान स्वीकारतो. आणि अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत तो त्या मतदानकेंद्रावर जातो. या वेळी त्याच्यासमवेत लोकनाथ (रघुवीर यादव) आणि मलको (अंजली पाटील) नावाची स्थानिक महिला कर्मचारी असे अन्य मदतनीस असतात. न्यूटन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निमलष्करी दलाचा अधिकारी आत्मासिंग (पंकज त्रिपाठी) याच्यावर असते. या आत्मासिंगचा निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच फार वेगळाच असतो. त्यामुळे मतदान होण्यावरून न्यूटन आणि आत्मा सिंग यांच्यात 'संघर्ष' होतो. हा संघर्ष नेमका कशावरून होतो हे पाहण्यासाठी हा 'न्यूटन' पडद्यावर पाहायलाच हवा. कारण हा संघर्षच लोकशाहीव्यवस्थेवर मार्मिक भाष्य करत संबधित यंत्रणेचं सम्यक दर्शन घडवतो. 

'ब्लॅक ह्युमर' हे या चित्रपटाच्या कथेचं मुख्य अंग आहे आणि छोट्या-छोट्या प्रसंगातून ते वेळोवेळी प्रकट होतं. शिवाय अतिशय मोजक्या आणि अर्थपूर्ण संवादातून समाजव्यवस्थेवर चांगले कोरडे ओढणारं भाष्य चित्रपट पाहताना मजा आणतं.

एका प्रसंगात न्यूटन, आपल्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी प्रकट केलेली नकारात्मक बाजू पाहून मलकोला 'तूही त्यांच्यासारखीच निराशावादी आहेस का?’ असा प्रश्न विचारतो. त्यावर ती उत्तर देते- 'नाही मी आदिवासी आहे'. तसंच मतदान केंद्रावर रिकाम्या वेळात पत्ते खेळणारा लोकनाथ जेव्हा 'पंजी' (पाच) काढून याला फारशी किंमत नाही असं सांगतो, त्याच वेळी त्याला उत्तर देताना मलको हाताचा पंजा दाखवून त्याची नंतर मूठ आवळते आणि पाचची किंमत किती मोठी आहे, हे सांगून या 'पाच'नंतरच 'सहा' येतो असे म्हणून ती डोक्याकडे (सिक्स्थ सेन्स) हात नेते.

याशिवाय अशा भागातील गोरगरीब मतदारांची कैफियत न्यूटनला  सांगताना मलको म्हणते, ''मतदान केलं तर हे गरीब मतदार नक्षलवाद्यांच्या आणि नाही केलं म्हणून पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणेच्या रोषाला बळी पडतात.’ हे वास्तव किती भयानक आहे याचीही यावरून कल्पना येते. याउलट अशा वातावरणातदेखील मतदान किती शांततेत चाललं आहे हे दाखवण्यासाठी काही परदेशी पत्रकारांना घेऊन आलेला वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या टीव्ही चॅनेलला कसा 'स्टाईल मारून' मुलाखत देतो, हे दृश्य तर लोकशाहीची चांगली खिल्ली उडवून जातं. तर आपली सुरक्षा ज्याच्या हातात आहे त्या सुरक्षाप्रमुखासह सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखून धरून मतदारांना मतदान करायला सांगणारा न्यूटन पाहून प्रामाणिक निवडणूक अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य पार पडताना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागतं याचंही दर्शन या चित्रपटाद्वारे घडतं.

विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला भूभाग दाखवताना चित्रपटात कोठेही फारसा हिंसाचार नाही. सुरुवातीला एका राजकीय उमेदवाराची हत्येचा प्रसंग वगळता गोळीबार तर नाहीच नाही. तरीसुद्धा संपूर्ण चित्रपटात दहशतीची वातावरणनिर्मिती करण्यात छाया दिग्दर्शकाला चांगलं यश आलं आहे.  
दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी चित्रपटात जाणीवपूर्वक संवाद कमी ठेवून अन्य गोष्टी 'बोलक्या' करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे सर्वच कलाकारांनी 'कायिक' अभिनयावर जास्त मेहनत घेतल्याचं जाणवतं.

राजकुमार राव यानं न्यूटनची भूमिका अफलातून केली आहे. 'बरेली की बर्फी'नंतर त्याच्या वाट्याला ही आणखी एक चांगली भूमिका आली आहे. ती त्यानं खूप छान वठवली आहे. रघुवीर यादव यानं निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या आणि नाईलाज म्हणून ड्युटीवर आलेल्या लोकनाथच्या भूमिकेत मजा आणली आहे. पंकज त्रिपाठी यानं सुरक्षाप्रमुख बनलेल्या आत्मा सिंगच्या भूमिकेत 'जान' आणली आहे, तर अंजली पाटील मलकोची भूमिका अक्षरशः जगली आहे! 
चित्रपटाच्या शेवटी ‘चल, तू अपना काम कर...’ हे गाणंही समर्पक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकानं प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं काम केल्यास भारतीय लोकशाही आणखी बळकट होऊ शकते, हा त्याद्वारे दिला गेलेला संदेश अनमोल आहे.

त्यामुळे 'ऑस्कर’वारीला गेलेला हा चित्रपट प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकानं पाहण्याची गरज आहे. 

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......