‘नदी वाहते’ हा सिनेमा ती कोणाची असावी आणि ती सार्वत्रिक कशी असावी हे सांगतो
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अजय कांडर
  • ‘नदी वाहते…’ या सिनेमाची पोस्टर्स
  • Mon , 25 September 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie नदी वाहते Nadi Vahate संदीप सावंत Sandeep Sawant

नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी
नदीच्या उगमस्तोत्राशी, बांध हा घातला कोणी
नदीवर घालुनी घाव, नदीचा मोडूनि ताव
फूल पत्री नारळांनी, नदीला नटविले कोणी
नदीचे विस्तारले पात्र, नदीचे मोहरले गात्र
नदीच्या वळण वळशांचा, बाज हा मोडला कोणी
नदीवर बांधुनी भिंती, नदीची दडपली छाती
नदीच्या लेकरांना बघ, कसे विस्थापिले कोणी

- अंजली कुलकर्णी

जागतिक स्तरावर विकासाचे मॉडेल म्हणून ज्या-ज्या गोष्टी जगभरातील तज्ज्ञांनी मांडल्या. त्यातून ‘तुमची भूमीच तुम्हाला विकास कसा करायचा हे शिकविते,’ अशीच विकासाची संकल्पना जगासमोर आली. मात्र, मोठमोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली शाश्वत विकास आणि त्यातून उभा राहणारा भूमिपूत्र आजकाल मात्र हद्दपार झालेलाच आढळतो. भूमिनिष्ठा आणि त्यातून छोट्या-छोट्या विकासाच्या संकल्पना राबविताना माणूस स्वयंपूर्ण बनविणे, हेच तर कोणत्याही समूह प्रगतीचे अंतिम उद्दिष्ट हवे. परंतु माणसाला हतबल करून व्यक्तिनिष्ठ विकासाच्या या काळात अशी समूह भावना गळून पडली असतानाच ‘नदी वाहते’सारख्या चित्रपटाची निर्मिती होते ही चांगली घटना आहे.

आपल्या ‘श्वास’ या पहिल्याच चित्रपटाने प्रथमच मराठी चित्रपटाला ऑस्करचे स्वप्न दाखविणारे कोकण सुपुत्र संदीप सावंत यांनीच ‘नदी वाहते’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट कलात्मक चित्रपट आहे म्हणून तो विचारशील माणसांनीच पहायला हवा, असा मात्र समज कोणी करून घेऊ नये. तर तो सर्वस्तरांतील रसिकांनी पहायला हवा. कारण तो चित्रपट म्हणून पाहताना दुसऱ्या बाजूला त्यातून मांडण्यात आलेला विचार हा सार्वत्रिक आणि प्रात्यक्षिक आहे. जेव्हा-जेव्हा माणसांच्या मनावर इतर कोणत्याही कलांपेक्षा चित्रपटासारखी कला अधिक प्रभाव ठेवते, तेव्हा तो प्रभाव एका पिढीपुरता नसतो, तर तो झिरपत झिरपत दीर्घकाळ एकूण समाजावर सकारात्मक परिणाम करीत असतो. ‘नदी वाहते’ हा अशा परिणामांची शृंखला निर्माण करणारा चित्रपट आहे.

चित्रपट म्हणजे थोड्या वास्तवाची अधिकाधिक कल्पित गोष्ट. पण ‘नदी वाहते’ हा या विरुद्ध प्रवाहाचा चित्रपट आहे. म्हणूनच तो फक्त वास्तववादी कहाणी कथन करीत नाही, तर ‘प्रॅक्टिकल’ जगण्याचे बहुपदर विस्तारित नेताना पाहणाऱ्याच्या मनात सभोवतालच्या वास्तवाचे भान नेणीवेच्या पातळीवर आणून देतो. ते भान विचारशील प्रेक्षकाला देतानाच नेमकेपणाने आपले मत मांडता न येणाऱ्याच्या मनातही त्या भानाची कालवाकालव सुरू ठेवतो. अर्थात यामागे संदीप सावंत यांनी साधी-सरळ एकरेषीय केलेली चित्रपटाची मांडणी. गोष्ट साधी सांगताना त्यांनी तिच्या परिणामाला महत्त्व दिल्याने ‘नदी वाहते’चा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. नदीचे माणसाच्या आयुष्यात काय स्थान आहे हे सांगताना त्यांनी मोठ्या नदीची कहाणी सांगितली नाही, यातच त्यांच्या विचारांची प्रगल्भता लक्षात येते. गावातल्या छोट्या नदीची कहाणी सांगताना त्यांनी त्यात तिच्यावर अवलंबून असलेल्या माणसाला महत्त्व दिल्याने आणि नदीकाठचा माणूसच सर्व चित्रपटाच्या केंद्रस्थानी ठेवल्याने प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेली ही कहाणी सार्वत्रिक रूपात प्रभावी ठरते. हेच या चित्रपट निर्मितीचे खरे यश आहे.

नदी संदर्भातला हा सिनेमा असला, तरी हा चित्रपट ‘नदी वाचवा’चा संदेश देतानाच तो तिच्या काठावर असलेल्या माणसांनाच वाचवा, असा संदेश देतो. खरे तर नदी वाचवण्याचे उपाय काय असतात असा प्रश्न पडतो, तेव्हा त्याची दाद फक्त शासनस्तरावर मागण्यासाठी मोर्चे आणि आंदोलनासारखे उपाय अवलंबिले जातात पण याने नदी वाचत नाही, तर नदीची उपयुक्तता प्रत्यक्षात कृतीत आणायला हवी. तीही काठावरच्याच माणसांनी. ‘नदी वाहते’ चित्रपट अशा माणसांचे रूपक आहे. त्यामुळे नेहमीच्या नजरेने या चित्रपटाकडे पाहता येणार नाही.

पाण्यावर मालकी कोणाची असावी हा खरा प्रश्न बदलत्या काळात अधिक चिंतेचा झालेला आहे. पण ‘नदी वाहते’ हा सिनेमा ती कोणाची असावी आणि ती सार्वत्रिक कशी असावी हे सांगतो. नदीचे वाहणे हे खरे तर एकट्या नदीचे वाहणे नसतेच. नदीचा प्रवाह साठवून ठेवला, की तिचे वाहणे थांबते म्हणजे समाजच थांबतो. याचाच अर्थ नदीचे वाहणे साऱ्या समाजाचेच वाहणे असते. हा मौलिक विचार हा चित्रपट ध्वनित करतो. पाणी आणि मानवी नाते सनातन आहे. यातही पाणी आणि बाई या नात्याचा पदर तर घट्टच बांधला गेलेला. बाईचे प्रत्यक्षातल्या पाण्याशी जेवढे नाते तेवढेच, पाण्याच्या समस्येमुळे डोळ्यातल्या पाण्याच्या वेदनेशी निर्माण झालेले नाते तिच्या मनाची जखम अधिक गहिरे करणारे. ‘नदी वाहते’ हा चित्रपट बाईचे हे नाते ठायी-ठायी उलगडून दाखविताना बाईच्या आतल्या तळमळीचा वाहता चेहरा संपूर्ण चित्रपटभर पसरत जातो! ‘भूमी आणि बाई’ या दोन गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. भूमीच्या सर्वाधिक जवळ असते, ती बाईच आणि भूमीशी राजकीय खेळी करताना त्याचा होणारा सर्वाधिक त्रास हा बाईलाच होत असतो. या त्रासाचे एक रूप म्हणूनही आपल्याला या चित्रपटाकडे पाहता येईल.

माणसाची उन्नती ही निसर्गाशी जवळीक साधल्यावरच होत असते. निसर्गावर मानवी आक्रमणाचा आजचा चेहरा भयानक आहे. नदीच्या विकासाच्या नावाखाली मोठ-मोठे प्रकल्प उभारले जात आहेत. पण यात नदी किनाऱ्याची किती गावे उद्ध्वस्त होत आहेत, याची जाणीवच नाही. असे प्रकल्प उभारताना एक वर्ग उंचावत जातो आणि त्याच्यासाठी गावागावात वितंडवादाचे राजकारणही खेळले जाते. पण मूळ भूमीमालक देशोधडीलाच लागतो. यासाठी गाव समूहाला एकत्र करून नदीचा विकास केला, तर नदीचे नैसर्गिक संवर्धन होते, भूमीचा विकास होतो आणि गावातील प्रत्येकाचा विकास होताना माणूस स्वयंपूर्ण होत जातो. त्याचा स्वाभिमान जपला जातो. कोणत्याही विकासात माणसाचे सत्त्व महत्त्वाचेच असते. मात्र, मोठे प्रकल्प राबविले जाताना हे सारेच धुळीला मिळालेले असते.

‘नदी वाहते’ याच पार्श्वभूमीवर माणसाच्या भूमिनिष्ठ जाणिवांची पाठराखण करताना जो भूमीचा मालक तोच तिच्यावरील विकासाचा खरा हक्कदार याकडे निर्देश करताना, स्थानिक पातळीवरचा विकास कसा हवा हे रोल मॉडेल म्हणून तो प्रेक्षकांसमोर येतो. आजच्या मुक्त अर्थ धोरणाच्या काळात चित्रपटासारख्या माध्यमातून असा संदेश देणे म्हणजे गावोगाव असा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनवण्यासाठी झटणाऱ्या सच्चा कार्यकर्त्यांना पाठबळ देणेच होय!

(बेळगाव ‘तरुण भारत’च्या २३ सप्टेंबर २०१७च्या अंकातून साभार.)

.............................................................................................................................................

लेखक अजय कांडर हे कवी व पत्रकार आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......