आता मुकेश तिवारीला चांगली भूमिका कधी मिळेल?
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शेलार
  • मुकेश तिवारी
  • Sat , 23 September 2017
  • कला-संस्कृती चलत्-चित्र मुकेश तिवारी Mukesh Tiwari

मित्रांसोबत ‘गोलमाल ३’वर बोलत असताना एकाला नेमका त्यातील ‘वसुली भाई’ आठवला. त्यानं सहज, ‘तो कोण रे वसुली भाई करणारा?’ असं विचारलं. पण त्याचं नाव काही केल्या आठवेना. त्याची इतर सगळी पात्रं एकापाठोपाठ एक डोळ्यासमोरून जात होती – ‘बच्चा यादव’, ‘जगीरा’, वगैरे. पण नाव मात्र आठवत नव्हतं. मग त्याच्याविषयी माहिती शोधायचा प्रयत्न केला. पण विकिपीडिया वगैरेवर त्याचं नाव वगळता कुठेच फारशी माहिती मिळाली नाही.

तर तो अभिनेता म्हणजे मुकेश तिवारी. मध्य प्रदेशमधील 'सागर'मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुकेशचं शिक्षण सागरमध्येच झालं. शिक्षण पूर्ण करत असताना त्याला वेध लागले ते अभिनयाचे. मुकेशनं दिल्लीला येत एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. याच दरम्यान तो काही काळ नाटकही करत होता. १९९४ मध्ये एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बराच काळ तो एनएसडीच्याच नाट्यसंस्थेचा भाग होता. या काळात तो नाटकं करत होता. 

साधारण १९९६-९७ मध्ये राजकुमार संतोषी 'चायना गेट'च्या प्री-प्रॉडक्शन आणि कास्टिंगवर काम करत होता. राजकुमार हा चित्रपट 'अकिरा कुरोसोवा'च्या 'सेव्हन समुराई'ला आदरांजली म्हणून बनवत होता. शिवाय, या चित्रपटावर अनेक हॉलिवुड चित्रपटांचा प्रभाव होता. ‘शोले’मध्ये जशी खलनायक म्हणून अमजद खान या नवोदित कलाकाराला संधी मिळाली, तसं काही करण्याचा विचार संतोषीनं केला असावा. परिणामी 'चायना गेट'मध्ये खलनायक म्हणून वर्णी लागली ती मुकेशची. मुकेशचा तेव्हा आणि अजूनही मेथड अॅक्टिंगवर विश्वास आहे. त्यामुळे त्यानं या भूमिकेच्या पूर्वतयारीसाठी साधारण सहा महिन्यांचा कालावधी मागितला. राजकुमारनंही त्याला तो दिला. आणि त्याचं फळ म्हणून जे काही समोर आलं तो इतिहास आहे. बॉक्स ऑफिसवर हिट न झालेला आणि समीक्षकांनीही बराच झोडपून काढलेला 'चायना गेट' आज नाही म्हटलं तरी कल्ट बनलाय. आणि त्यातील मुकेशचा 'जगीरा' त्याच्या उत्कृष्ट भूमिकांपैकी एक आहे, असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. 

मुळातच मुकेश प्रसिद्धीसाठी हपापलेला नाही. त्याच्या स्वभावातच तो गुण नाही. त्यामुळे बरंच कौतुक आणि पुरस्कार मिळूनही तो प्रसिद्धीपासून लांबच राहिला. त्यामुळे त्याला पुन्हा पडद्यावर एका तगड्या रूपात पाहण्यासाठी वाट पहावी लागली ती प्रकाश झाच्या ‘गंगाजल’ची. 

‘गंगाजल’मधले अजयचे भेदक डोळे जितके आठवतात, तितकाच स्पष्ट आठवतो तो सुरुवातीला त्याच्यासमोर उभा ठाकणारा, मोहन जोशीचा खास असलेला, पण नंतर आत्मभान येऊन योग्य त्या रस्त्यावर चालणारा बच्चा यादव. काही भूमिका या एखाद्या विशिष्ट अभिनेत्यासाठीच बनलेल्या असतात म्हणजे काय ते पाहण्यासाठी मुकेशनं रंगवलेला बच्चा पहावा. ‘गंगाजल’ जितका अजयचा किंवा प्रकाश झाचा आहे, तितकाच तो मुकेशचाही आहे. 

मुकेश बच्चा यादवची भूमिका अक्षरशः जगलाय. जातीय राजकारणात आणि पुढे जाण्याच्या ईर्ष्येत आपली सदसदविवेकबुद्धी आणि कर्तव्यनिष्ठपणा हरवून बसलेला आणि नंतर चुकीच्या कामांसाठी आपला वापर करवून घेतला जातोय याचं आत्मभान आलेला बच्चा यादव त्यानं समर्थपणे साकारला आहे. व्यवस्था बदलण्याचा विचारही मनात न येणारा बच्चा यादव जेव्हा व्यवस्थेविरुद्ध लढू लागतो, तेव्हाचा त्याचा अभिनय पाहत राहावा असा आहे. जेलमध्ये ठेवलेल्या गुन्हेगारांना ‘आँख दिखाता है मादरजात’ म्हणत गंगाजलाचा अभिषेक घालणाऱ्या बच्चा यादवला पाहताना आपला थरकाप उडाला नाही तर नवल.

इतकं सगळं होऊन, त्याच्या पात्राला गडद छटा असूनही जेव्हा त्याच्यावर भ्याड हल्ला होतो, त्यानंतर त्याचं शव पाहताना आपल्या डोळ्यात पाणी येतं.

एकाच भूमिकेबाबत इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया अगदी क्वचितच दिसून येतात. हे असं घडण्यामागे मुकेशनं हे पात्र उभं करताना घेतलेली मेहनत आहे! 

‘चायना गेट’ ते ‘गंगाजल’ आणि ‘गंगाजल’ ते ‘गोलमाल’ हे मुकेशच्या करिअरमधील महत्त्वाचे टप्पे झाले. या मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलंय. ‘चायना गेट’नंतर मुकेशनं जे. पी. दत्ताचा ‘रेफ्युजी’ केला. पुढे दत्तांच्याच ‘एलओसी कारगिल’मध्ये एका कर्नलची भूमिका मिळाली. किंवा राजकुमार संतोषीच्या 'दि लिजंड ऑफ भगत सिंग'मध्ये त्यानं केलेली जेलरची भूमिका कोण विसरू शकेल? आपलं कर्तव्य आणि भावना यांच्या गोंधळात अडकलेला त्याचा हा जेलरही दमदार होताच. 

याच काळातील त्याचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे रोहित शेट्टीचा पदार्पणासाठीचा चित्रपट 'जमीन'. यात मुकेशनं बाबा जहीरची भूमिका केलीय. तो जितका खलनायकी स्वरूपाचा, सनकी आहे, तितकाच विकृतही आहे. यात तो अजय देवगणसमोर ज्या ताकदीनं उभा राहिलाय, ते तोडीस तोड आहे!

यानंतरही ‘टँगो चार्ली’, ‘अपहरण’ यांसारख्या चित्रपटांमधून दिसला. पण यातील बहुतांशी चित्रपटांमध्ये तो खलनायकी छटांच्या, चरित्र भूमिकांमध्ये दिसला. तो विनोदी भूमिकांकडे वळला ते रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’नंतर. पुढे ‘गोलमाल’चे सीक्वेल्स, ‘ऑल द बेस्ट’ वगैरेत दिसला. 

दरवेळी तो काहीतरी नवीन देण्याचा आणि वेगवेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न करतो.

पण असे अभिनेते कितीही प्रयत्न केले तरी टाइपकास्ट होतातच. म्हणजे ‘जगीरा’नंतर त्याला जशा डाकू, खलनायकी स्वरूपाच्या भूमिका ऑफर झाल्या, तशाच बच्चा यादवनंतर पोलिस अधिकाऱ्याच्या. ‘गंगाजल’च्या आधीच्या काळात बहुतांशी खलनायकी स्वरूपाच्या किंवा ग्रे शेडच्या भूमिका करणारा मुकेश साधारण २००६ नंतर विनोदी भूमिकांकडे वळला. त्यानंतर तो रोहित शेट्टीच्या बहुतेक सर्वच चित्रपटांमध्ये दिसला.

‘तू त्याच त्याच दिग्दर्शकांसोबत काम का करतोस’, असं मुकेशला बऱ्याचदा विचारलं जातं. त्यावर तो म्हणतो की, ‘चित्रपट हे अभिनेत्यापेक्षा जास्त दिग्दर्शकाचं माध्यम आहे.’ त्यानं बहुतेक प्रत्येक प्रयोगशील दिग्दर्शकासोबत काम केलंय. प्रत्येक दिग्दर्शक त्याला आधीसारखीच भूमिका देऊ करतो असंही नाही. त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही.

मुकेश दिलेल्या मोजक्याच मुलाखतींमध्ये एक गोष्ट नेहमी सांगतो. ती म्हणजे त्याला स्वतःचं मार्केटिंग करता आलं नाही. अर्थात त्याला याची अजिबात खंत नाही. कारण तो म्हणतो की, 'जास्तीत जास्त भूमिका मिळवणं गरजेचं नाही, तर मिळालेली भूमिका उत्तमरीत्या साकारणं गरजेचं आहे'. आणि तो स्वतः ते करतो, इतकं तर नक्कीच आहे. 

आज मुकेश केवळ हिंदीतच नव्हे तर तेलुगू, पंजाबी आणि भोजपुरी भाषांमधल्या चित्रपटांमध्येही भूमिका करतो आहे. या गोष्टीचा त्याला एक अभिनेता म्हणून अभिमान आहे. एखाद्या चांगल्या कलाकाराबाबत बोलताना असं म्हटलं जातं की, त्यानं त्याचं सर्वोत्कृष्ट काम वगळता बाकी काही केलं नसतं तर बरं झालं असतं. तसंच मुकेशबाबतही आहे. त्यानं फक्त जगीरा आणि बच्चा यादव केले असते तरी खूप होतं. जगीराची त्याची भूमिका पाहून अजूनही काही लोकांना तो खलनायकी स्वरूपाचा आणि भेदक नजरेमुळे भीतीदायक वाटतो; तर बच्चा यादव साकारल्यानंतर बराच काळ एअरपोर्टवर पोलिस त्याची चेकिंग करत नसायचे. तो म्हणतो, "बस्स. एखाद्या कलाकाराला याहून अधिक काय पाहिजे?" अजूनही लहान मुलं त्याला 'वसुली अंकल' म्हणून हाक मारतात. 

तो म्हणतो की भूमिकेच्या लांबीनं त्याला काहीच फरक पडत नाही. कारण एखादा चांगला अभिनेता निव्वळ एका दृश्यामध्येही टाळ्या घेऊन जाऊ शकतो. 

मुकेश प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करतोय वगैरे ठीक आहे. पण तो काय ताकदीचा अभिनेता आहे ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे कदाचित त्याला अजून चांगली भूमिका मिळाली तर तो तिचं सोनं करेल पण सध्या त्याला न्याय देऊ शकेल अशी भूमिका देणारा प्रकाश झा स्वतःचा फॉर्म हरवून व टाइपकास्ट होऊन बसलाय आणि त्याला चित्रपटसृष्टीत आणणारा राजकुमार संतोषी 'खाकी'नंतर कुठेतरी हरवलाय.

त्यामुळे मुकेशला आता चांगली भूमिका कधी मिळेल? ती लवकर मिळावी... 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......