अजूनकाही
आपल्याकडील शैक्षणिक धोरणात कुठेच एकवाक्यता नसल्यामुळे शिक्षणक्षेत्रात खूपच समस्या आहेत. 'धरसोडीचं धोरण' हेच वैशिष्टय असणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील समस्यांवर आजपर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अनेक दुर्गम भागात आजही 'एक शिक्षकी' शाळा आहेत, मात्र त्याही बंद होण्याची टांगती तलवार त्यांच्यावर नेहमीच असते. कारण त्या शाळेशी संबधित सर्वच घटकांची उदासीनता त्याला कारणीभूत ठरते.
'उबुंटू' या नवीन मराठी चित्रपटात 'एक शिक्षकी' शाळेचं दुखणं मांडण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला. या चित्रपटामागे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते नेल्सन मंडेला यांच्या गाजलेल्या 'उबुंटू' या वाक्प्रचाराची प्रेरणा आहे. नेल्सन मंडेला यांनी साऱ्या जगाला उद्देशून दिलेल्या 'उबुंटू' या संदेशपर आफ्रिकन शब्दाचा अर्थ आहे, 'मी आहे, कारण आम्ही आहोत'. थोडक्यात या शब्दातून समाजशक्तीची ताकद किती असते, हे अधोरेखित करण्यात आलं आहे.
आपल्याकडील 'जे राव न करील, ते रंक करील' या म्हणीचाही अर्थ त्याच्याशी मिळताजुळता आहे. त्यामुळे 'उबुंटू' चित्रपटामागील कल्पनेची प्रेरणा उत्तम आहे आणि ती दिग्दर्शक म्हणून पडद्यावर मांडण्याचा पुष्कर श्रोत्री यांनी पहिल्यांदाच केलेला प्रयत्नही चांगला आहे, मात्र सादरीकरणातील अनेक त्रुटींमुळे राज्याच्या शैक्षणिक धोरणाप्रमाणेच तो फसत गेला आहे, असं म्हणावे लागेल.
चित्रपटात ढोबळेवाडी या गावातील 'एक शिक्षकी' शाळेची कथा सांगण्यात आली आहे. या शाळेत जे एकुलते एक शिक्षक (मास्तर- सारंग साठे) आहेत, ते अतिशय प्रयोगशील आहेत. शाळेतील मुलांना विषय समजण्यासाठी प्रामुख्याने ते निसर्गाचा आणि दैनंदिन व्यवहारातील गोष्टींचा जास्तीत जास्त आधार घेतात. गणितातील 'बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार' समजण्यासाठी ते ग्रामीण भागातील मुलांनी आपल्या पिशवीत भरून आणलेल्या चिंचा, बोरे, जांभळे आदींचा खुबीनं वापर करतात. त्यामुळे गणितासारखा अवघड विषयही सोपा होऊन जातो. त्यामुळे मुलंही त्यांच्यावर खुश असतात.
या शाळेची प्रमुख समस्या म्हणजे या शाळेत हजेरीपटावर आवश्यक असलेल्या मुलांची संख्या मात्र त्यामानानं खूपच कमी असते. या शाळेत दररोज जेमतेम १५ ते १७ मुलांची संख्या भरते, मात्र नियमानुसार ती किमान ३५ पर्यंत जाण्याची गरज असते. शिवाय गावातील सरपंच (शशांक शेंडे) आणि इतर गावकरीही शाळेबाबत फार उदासीन असतात. विशेष म्हणजे मुलांच्या प्रयोगशील शिक्षणाचा गावकऱ्यांना फटका बसतो. त्यामुळे चिडलेले सरपंच आणि गावकरी गावातील शाळा बंद करण्यासाठी मास्तरांचा मागे लकडा लावतात, परंतु मास्तरांना शाळा टिकवायची असते. ते मुलांना विश्वासात घेऊन शाळा टिकवण्याची जबाबदारी तुमचीही आहे, असं सांगून त्यांना शाळा चालू ठेवण्याच्या मोहिमेत सहभागी करून घेतात. मुलंही आनंदानं त्या मोहिमेत भाग घेऊन ती मोहीम कशी यशस्वी करतात, त्याचा प्रवास म्हणजेच 'उबुंटू'.
विषय शाळेचा असल्यानं शाळेतील वातावरण, मुलांनी मास्तरांच्या सांगण्यावरून केलेल्या विविध प्रायोगिक शिक्षणाच्या करामती आणि त्यामुळे गावकऱ्यांची झालेली फजिती सुरुवातीला खूप मजा आणतात आणि चित्रपट मध्यंतरापर्यंत चांगली पकड घेतो. मात्र मध्यंतरानंतर पटकथेतील त्रुटी प्रकर्षानं जाणवू लागतात आणि 'उबुंटू' मग 'भरकटू' लागतो. शाळा बंद होण्यापासून वाचवण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सांगलीत हॉटेल कामासाठी मामूनं जबरदस्तीनं नेलेल्या अब्दुल या विद्यार्थ्याला परत गावाकडे आणण्याचाच 'खेळ' सुरू होतो. आणि तो बराच वेळ चालतो. त्यामुळे पकड घेतलेल्या चित्रपटाची कथा विस्कळीत होऊन भरकटल्याची जाणीव होते.
विशेष म्हणजे मध्यंतरानंतर अनेक अतार्किक गोष्टींना सामोरं जावं लागतं. अब्दुलला सांगलीस नेलेल्या त्याच्या मामूच्या हॉटेलचा पत्ता न घेता शाळेतील गौरी या मुलीनं सांगलीस जाणं, तिथं तिला आलेले पोलिसांचे अनुभव आणि अब्दुलला परत गावाकडे आणण्यासाठी तिनं 'आकाशवाणी'चा केलेला वापर तर्कविसंगत वाटतो. शिवाय केवळ गौरीच्या आकाशवाणीवरील वक्तव्यानं शाळा बंद करण्यासाठी टपलेल्या सरपंच आणि इतर गावकऱ्यांचं क्षणात होणारं परिवर्तनही खटकतं. केवळ मुलांच्या प्रयत्नांना वाव देण्यासाठी मास्तरांना त्यांच्या खासगी कामासाठी त्यांच्या गावाकडे पाठवून चित्रपटातील त्यांची 'सेवा' खंडित करण्याचाही प्रकारही रुचत नाही.
कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेली 'प्रार्थना' आणि 'उबुंटू....' ही दोन्ही गाणी चांगली श्रवणीय झाली आहेत. 'प्रार्थना' चांगली असली तरी नंतर तिची सारखी होणारी 'आळवणी' टाळली असती तर बरं झालं असतं.
कलाकारांपैकी प्रमुख भूमिका करणारे सारंग साठे यांनी शाळेची कळकळ असणारा प्रामाणिक मास्तर चांगला रंगवला आहे. शशांक शेंडे सरपंचाच्या भूमिकेत चांगले शोभून दिसतात. गौरी झालेली भाग्यश्री संपकाळ, अथर्व पाध्ये (अब्दुल), कान्हा भावे (संकेत) आणि शाळेतील इतर मुलांचीही कामं चांगली झाली आहेत. गाव आणि आजूबाजूचा परिसर ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. थोडक्यात 'उबुंटू' मागची कल्पना चांगली आहे, मात्र ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच यशस्वी झाली आहे.
लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment