अजूनकाही
आपल्या देशात आजही अनेक जाती उपेक्षित असून खडतर जिणं जगत आहेत. भटकंती करत जगणारा पारधी समाज हा त्यापैकीच एक. ब्रिटिश राजवटीत पारधी समाजावर 'गुन्हेगारी जमात' असा जो शिक्का बसला, तो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं उलटली तरीही कायम आहे. त्यामुळे आजही कुठं चोरी झाली अथवा दरोडा पडला की, पोलीस आजूबाजूच्या पारधी वस्तीत जातात आणि तेथील काही जणांना पकडून आणून त्यांनी चोरी केली असो वा नसो त्यांच्यावर अत्याचार करून गुन्ह्याची कबुली घेण्याचा प्रयत्न करतात.
तर दुसरीकडे हा पारधी समाज रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धेच्या जोखडात अडकून पडलेला आहे. जात-पंचायतीसारखं समांतर शासन यंत्रणेचं 'भूत' या समाजाच्या मानगुटीवर बसलेलं आहे. त्यामुळे समाजातील स्त्रियांना हलाखीचं जीवन जगावं लागतं.
'बंदुक्या' या नवीन मराठी चित्रपटात याच समाजाची कथा आणि व्यथा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक जाती-जमातींना प्रकाशझोतात आणणारे प्रसिद्ध दलित साहित्यिक (कै.) रामनाथ चव्हाण यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित असून लेखक-दिग्दर्शक राहुल चौधरी यांनी 'बंदुक्या'मधून प्रथमच पारधी समाजाचं वास्तव मोठ्या पडद्यावर चित्रित केलं आहे.
वास्तविक 'बंदुक्या' हे नाव या चित्रपटातील प्रमुख खलनायकी पात्राचं आहे. मात्र चित्रपटाची कथा लक्षात घेता चित्रपटाचं हे नाव सार्थ ठरत नाही. चित्रपटाची कथा त्याच्याभोवती फिरत असली तरी या पात्राचं नाव चित्रपटाला देण्याचा दिग्दर्शकाचा नेमका हेतू स्पष्ट होत नाही. (अमीर खानच्या 'गझनी' या चित्रपटाचं नावही त्यातील प्रमुख खलपात्राचंच होतं. परंतु तो चित्रपट पाहिल्यानंतर ते योग्य वाटत होतं!)
तसं पाहता 'बंदुक्या' ही एक उत्कट प्रेमकथा आहे. समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरेच्या वणव्यात एका प्रेमाची आहुती कशी पडते, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. आणि प्रेमाच्या या आहुतीला 'बंदुक्या' हे पात्र कारणीभूत ठरणारं आहे. त्यामुळेच कदाचित चित्रपट पाहिल्यानंतर 'बंदुक्या' हे चित्रपटाचं नाव सार्थ वाटत नाही. परंतु या प्रेमकथेद्वारे अनिष्ट रूढी, परंपरा यांचं जोखड मानेवर घेऊन २१ व्या शतकात जगणाऱ्या पारधी समाजाचं पडद्यावर मांडलेलं भीषण वास्तव बराच काळ स्मरणात राहतं.
पोलीस आणि आजूबाजूचे लोक यांच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी आज इथं, तर उद्या तिथं, अशी भटकंती करत 'पाला'वर राहणाऱ्या पारधी वस्तीमधील 'आवल्या' (निलेश बोरसे) आणि 'तोलक' (वासंतिका वाळके) यांची ही प्रेमकथा आहे. वस्तीमध्ये दारूचा धंदा करणाऱ्या सुरंगाचा (आतिशा नाईक) आवल्या हा एकुलता एक मुलगा. तरुण आवल्याचे विचार खूप वेगळे आहेत त्याला 'चोरी-चपाटी'चा तिटकारा आहे. त्यामुळे कष्ट करून चांगलं जीवन जगावं आणि रूढी-परंपरेनं ग्रासलेल्या आपल्या समाजातून बाहेर पडावं असं त्याला वाटतं. तोलकचेही विचार त्याच्याशी मिळतेजुळते असल्यामुळे दोघांचं प्रेम जमतं.
मात्र त्यांच्या लग्नाला तोलकचा बाप असलेल्या डोरल्याचा (शशांक शेंडे) खूप मोठा अडसर आहे. कारण समाजाच्या रितीरिवाजानुसार डोरल्याला चोरीचपाटी करून तुरुंगात गेलेलाच जावई पाहिजे. एकदा तरी तो तुरुंगात गेलेला पाहिजे, हीच त्याची त्याचा जावई होण्याबाबतची प्रमुख अट असते.
वस्तीवरील 'बंदुक्या' (नामदेव मुरकुटे) हा आडदांड आणि गुंडगिरी करणारा तरुण चोरीचपाटी आणि दरोडा घालण्यात तरबेज असतो. त्यामुळे तो नेहमीच तुरुंगाच्या वाऱ्या करतो. त्याच्याही मनात तोलक भरलेली असते. शिवाय समाजातील रितीरिवाजानुसार मुलीच्या बदल्यात डोरल्याला पैसे देण्याची 'बंदुक्या' जवळ ऐपत असते, जी आवल्याजवळ नसते. मात्र नंतर आवल्या या दोन्ही अटी पूर्ण करतो आणि 'बंदुक्या' तुरुंगात असताना आवल्या-तोलकचं लग्न होतं.
परंतु डोरल्याला उरलेले पैसे देण्याच्या आताच सुरंगाचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो आणि ते पैसे परत मिळावेत म्हणून डोरल्या आवल्याकडे तगादा लावतो. आवल्याकडे तेवढे पैसे नसतात म्हणून डोरल्या जात-पंचायतीकडे तक्रार करतो आणि जात-पंचायतीचा प्रमुख आवल्याला त्याची पत्नी तोलक गहाण ठेवून डोरल्याला पैसे देण्याचा आदेश देतो. तोलकच्या प्राप्तीसाठी आधीपासून प्रयत्न करणारा 'बंदुक्या' डोरल्याला पैसे देऊन तोलकला आपल्या घरी घेऊन जातो. तोलकच्या सुटकेसाठी आवल्या तेवढे पैसे कसे जमवतो, त्यासाठी काय करतो आणि 'बंदुक्या'कडे गहाण ठेवलेली तोलक त्याला कुठल्या अवस्थेत परत मिळते, हे पाहण्यासाठी 'बंदुक्या' प्रत्यक्षच पाहायला हवा.
वर्षानुवर्षं या समाजावर कसा अन्याय होतो, हे सांगणारी या चित्रपटाची सुरुवात आकर्षक झाली आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाचे संवाद अतिशय 'बोल्ड' आहेत. ते पारधी समाजाचं 'जगणं' अधिक जिवंत करतात. शिवाय या संवादामुळे कथा प्रभावी होण्यास मदत झाली आहे. कृष्ण कुमार सोरेन यांचं छायाचित्रणही खूप बोलकं आहे. परीक्षित भातखंडे यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही कथेला साजेशी आहेत. मुख्य म्हणजे सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत. नामदेव मुरकुटे यांचा 'बंदुक्या' संपूर्ण वस्तीवर आपला धाक आणि दरारा निर्माण करण्यात चांगला यशस्वी ठरला आहे. त्याच्यासारख्या 'वाघा'ची नंतर 'शेळी' का होते, हे फक्त एका वाक्यात सांगण्याऐवजी प्रसंगातून दाखवलं असतं, तर अधिक चांगलं झालं असतं.
'बंदुक्या'च्या मानानं आवल्या झालेला निलेश बोरसे अभिनयात कमी पडतो. त्याचे 'बंडखोर विचार' अधिक प्रभावीपणे मांडण्याची गरज होती. तोलकच्या भूमिकेतील वासंतिका वाळके आणि सुरंगा झालेल्या आतिशा नाईक यांनी आपल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे.
डोरल्या ही या चित्रपटातील एक प्रमुख व्यक्तिरेखा आणि ती भूमिका करताना शशांक शेंडे यांनी आपल्या अभिनयाचं वैविध्य प्रकट केलं आहे. पैशाला हपापलेला आणि त्यासाठी आपल्या पोटच्या मुलीलाही गहाण ठेवणारा कठोर बाप, तसंच वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची फिरकी घेणारा रिकामटेकडा दारुडा म्हातारा शेंडे यांनी प्रभावीपणे रंगवला आहे. अन्य नवोदित कलाकारांची कामंही चांगली झाली आहेत.
गोळीचा 'नेम' तर बरोबर लागलेला आहे, त्याचे योग्य ते परिणाम साध्य व्हावेत हीच अपेक्षा.
लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment